आचार्य विनोबा भावे | Acharya Vinoba Bhave
भारतरत्न आचार्य विनोबा भावे Acharya Vinoba Bhave ह्या ब्लॉगवर आपलं हार्दिक स्वागत आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अपूर्व योगदान देणाऱ्या आचार्य विनोबा भावेंच्या शिक्षणांचं आणि कार्यांचं परिचय या ब्लॉगच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. त्यांच्या विचारशक्ती, समाजसेवा, आणि गांधीवादी विचारांचं ज्ञान आपल्याला अशी गोष्टी शिकण्याची संधी देणारी आहे. या ब्लॉगवर त्यांच्या जीवनावर, कृतींवर आणि त्यांच्या संदेशांवर ध्यान केंद्रित करून, त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर चर्चा करू आणि त्यांच्या समर्थनात देशवासियांचं एकत्रित करण्याचं प्रयत्न करण्यात येईल
आचार्य विनोबा भावे यांनी ग्रामदानातून निर्माण होणाऱ्या स्वयंपूर्ण ग्रामस्वराज्याचे चित्र पुढील प्रमाणे रेखाटले आहे :-
‘गावातील जमिनी देवाच्या मालकीच्या! गाव होईल, देवाच्या वतीने, जमिनीचा विश्वस्त. कायद्यानेही कोणा व्यक्तीला जमिनीचा मालक म्हणता येणार नाही. गावच जमिनीचा मालक मानले जाईल. कुटुंबात किती लोक आहेत, हे पाहून माणशी एक एकर याप्रमाणे प्रत्येक कुटंबाला शेती कसायला दिली जाईल. काही वर्षे अनुभव पाहून गावच्या लोकांना वाटेल, तर सर्व जमीनही ते सामुदायिकरित्या कसू शकतील. सर्व गाव जणू एक कुटुंबच मानले जाईल. त्याबरोबरच तेथे ग्रामोद्योगही सुरू करण्यात येतील आणि गाव स्वावलंबी बनवण्यावर भर देण्यात येईल. सर्व गाववाले एकत्र येऊन ठरवतील की यापुढे गावात बाहेरून कापड आणण्यात येणार नाही. कापसापासून कापडापर्यंत सर्व प्रक्रिया गावातल्या गावातच होतील. त्यामुळे गावकऱ्यांना काम मिळेल आणि गावातली लक्ष्मी गावातच राहील. गावातल्या गावातच गावाच्या
मालकीचे एखादे दुकान असेल. गावातील सर्व मुलांमुलींना समाजशिक्षण मिळेल. शिक्षक सकाळी मुलांमुलींना आणि संध्याकाळी प्रौढांना शिक्षण देतील. शिक्षणात उद्योग आणि आत्मज्ञान ही दोन्हीही असली पाहिजेत. त्यामुळे प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल आणि बुद्धीला चालना मिळेल. संध्याकाळी गावातील सर्व लोक एकत्र जमतील आणि तेथे सर्व धर्मग्रंथांचा पाठ होईल. गाव निर्व्यसनी राहील. सामाजिक क्षेत्रात जातिभेद, अस्पृश्यता वगैरे सर्व भेदभाव दूर करण्यात येतील. प्रत्येक मनुष्य परमेश्वराचे संतान मानले जाईल. याप्रमाणे ‘वसुधैव कुटुंबकम्’ या सिद्धांताचा प्रारंभ ग्रामपरिवारापासूनच सुरू होईल!’
जन्म, बालपण व शिक्षण
अशा तन्हेने ग्रामदानातून ग्रामस्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या आचार्य विनोबा भावे यांचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ रोजी कुलाबा जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गागोदे या खेड्यात झाला. त्यांचे संपूर्ण नाव विनायक नरहरी भावे असे असले, तरी पुढे जो गांधी-विनोबांमध्ये पत्रव्यवहार झाला, त्यात गांधीजींनी विनायक भावेंना ‘विनोबा’ असे प्रथम संबोधले. त्यामुळे विनायक भावे हे त्यानंतर विनोबा भावे याच नावाने संबोधले जाऊ लागले. तसेच विनोबांनी हयातभर अध्ययन व अध्यापन केले. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते ‘आचार्य’ होते. ‘जो स्वतः आचरतो व समाजाला आचरायला लावतो तो आचार्य’ अशी आचार्याची व्याख्या विनोबांनी स्वतःच सांगितली आहे. ही व्याख्या विनोबांना तंतोतंत लागू पडत असल्याने लोक त्यांना ‘आचार्य’ म्हणू लागले. त्यामुळे ‘आचार्य विनोबा भावे’ या नावाने ते सर्वत्र परिचित आहेत. त्यांच्या आईचे नाव रुख्मिणीबाई आणि वडिलांचे नाव नरहरी होते. या दांपत्याचे विनोबा हे सर्वांत मोठे अपत्य होते. विनोबांना तीन भाऊ आणि एक बहीण होती.
विनायकचे आजोबा शंभूराज हे धार्मिक पण आधुनिक विचारांचे होते. दरवर्षी गावातील महादेव मंदिरात उत्सवाच्या वेळी ते साऱ्या गावकऱ्यांसाठी जेवणाचा कार्यक्रम ठेवीत. त्यावेळी एका मुसलमान गायकाचा भजनाचा कार्यक्रम ते आयोजित करत असत. विनायकची आजीदेखील फार धार्मिक व श्रद्धाळू होती. वयाच्या ५६ व्या वर्षी ती लिहायला-वाचायला शिकली आणि ‘शिवलीलामृत’, ‘पांडवप्रताप’ व ‘भक्तिविजय’ यासारखे धार्मिक ग्रंथ वाचू लागली. विनोबांची आई रुख्मिणीबाई ही दयाळू व परोपकारी वृत्तीची होती. आजारी व गरजू माणसांना मदत करायला ती सदैव तत्पर असे. ती छोट्या विनायकाला सांगे, ‘देव सर्वत्र आहे. पृथ्वीवरील अणुरेणूत त्याचे अस्तित्व आहे.’ आपल्या घरातील नित्य कामे करताना ती सतत भगवंताचे नामस्मरण करीत असे. रुख्मिणीबाईंना कृष्णाने सांगितलेली ‘भगवत्गीता’ फार आवडे. पण ती संस्कृत भाषेत असल्याने तिला कळत नसे. तिने विनोबांना आपली अडचण सांगितली. विनोबांनी तिला मोरोपंतांनी गीतेचा मराठीत केलेला अनुवाद आणून दिला. पण तो प्राचीन मराठीतील पंडिती ग्रंथ असल्याने रुख्मिणीबाईंना तोही समजण्यास अवघड वाटे. तेव्हा आपल्या आईच्या समाधानासाठी विनोबांनी भगवत्गीतेचे अगदी सोप्या मराठीत रूपांतर केले आणि घराघरातून ते ‘गीताई’ या
नावाने लोकप्रिय झाले. गीताईच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. लक्षावधी प्रती छापल्या गेल्या. पुढे विनोबा आधुनिक संत या पदवीला जाऊन पोहोचले, त्यात त्यांच्या मातेचा सर्वाधिक मोठा वाटा आहे. किंबहुना विनोबांनी स्वतःच असे सांगून ठेवले आहे की, ‘मी अनेक ग्रंथ वाचले, अनेक थोरामोठ्यांचा मला सहवास लाभला, त्यातून मिळालेले ज्ञान व
अनुभव मी एका पारड्यात ठेवले, तर माझ्या आईचेच पारडे अधिक जड भरेल!’ विनोबांचे वडील नरहरी भावे हे कला व विज्ञानाचे विद्वान पंडित होते.
वयाच्या ५५व्या वर्षी ते गाणे शिकले. त्यासाठी त्यांनी एका मुसलमान गवयाकडे शिकवणी लावली. रोज चौदा चौदा तास ते संगीताचा रियाज करत. विनोबांनी लहानपणी आपल्या वडिलांकडून भरपूर मार खाल्ला आहे. वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत त्यांना रोज मार खावा लागे. पण विनोबांच्या सोळाव्या वर्षापासून त्यांच्या वडिलांचे मारणे आचनक बंद झाले. विनोबांना याचे आश्चर्य वाटले. त्यावेळी त्यांना याचे कारण समजले नाही. पुढे मोठे झाल्यावर जेव्हा विनोबांनी ‘मनुस्मृती’ वाचली तेव्हा वडिलांनी न मारण्याचे कारण त्यांना समजले. ‘मुलगा १६ वर्षाचा झाल्यावर त्याला मित्राप्रमाणे वागवावे’ असे वचन मनुस्मृतीमध्ये होते, म्हणून नरहरपंतांनी विनोबा १६ वर्षांचे झाल्यावर त्यांना मारणे सोडून दिले. याबाबत विनोबा म्हणतात, ‘वडिलांनी ज्या वयात मला शिक्षा करावयास हवी होती, तेव्हा शिक्षा केली आणि शिक्षा जेव्हा बंद करावयास हवी होती, तेव्हा ती बंद केली. म्हणजे धर्मानुसारच त्यांनी आचरण केले. त्यामुळे माझ्या हातून चुका कमी कमी होत गेल्या.’ लहानपणी विनोबांना त्यांच्या वडिलांनी ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ हे ग्रंथ भेट म्हणून दिले. ते विनोबांना जन्मभर पुरून उरले. विनोबा ज्या गावी जन्मले, त्या गागोद्यास शाळा नव्हती. त्यामुळे विनोबा शाळेत जाण्याचा प्रश्नच नव्हता.
पाचवी सहावीपर्यंतचे त्यांचे शिक्षण घरीच झाले. वडील नोकरीनिमित्त बडोद्यास राहू लागले. त्यामुळे विनोबाही बडोद्याला गेले. परंतु लहानपणचे बरेचसे शिक्षण त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. नंतर ते हायस्कूलमध्ये गेले. एकदा हायस्कूलमध्ये शिकत असताना शिक्षक वर्गात मुलांना काहीतरी लिहून देत होते व मुले शांतपणे ते लिहून घेत होती. वर्गात शांतता पसरली होती. विनोबा काहीही लिहून घेत नव्हते. पण लिहून घेण्याचे नाटक करीत होते, ही गोष्ट शिक्षकांच्या लक्षात आल्यावाचून राहिली नाही. त्यांनी विनोबांना वर्गात उभे केले व काय लिहिले आहे ते वाचायला सांगितले. विनोबा शांतपणे उभे राहून वहीकडे पाहत वाचू लागले. शिक्षकानी जे लिहून घ्यायला सांगितले होते, ते सर्व त्यांनी जसेच्यातसे वाचून दाखवले. तरीही शिक्षकांना शंका आलीच. ते विनोबांजवळ आले व म्हणाले, ‘तुझी वही जरा दे पाहू.’ तेव्हा विनोबा शिक्षकांना कोरी करकरीत वही देत म्हणाले, ‘मी लिहिलेले आपण वाचू शकणार नाही.’ यावरून विनोबांची स्मरणशक्ती किती तल्लख होती आणि शाळेतील अभ्यास त्यांना किती सोपा वाटत होता ते दिसून येते. म्हणजे आजच्या भाषेत सांगावयाचे झाले तर विनोबांचा मेंदू म्हणजे कॉम्प्युटरच होता.
सर्वसाधारणपणे मुलांना गणित आणि इंग्रजी हे विषय कठिण वाटतात. बहुसंख्य मुले याच विषयांत नापास होतात. पण गणित हा विषय विनोबांचा खास आवडीचा विषय होता. शाळेत शिकत असताना त्यांच्या मित्रांना गणितातील उदाहरणे सुटली नाहीत, तर ते ती विनोबांकडून सोडवून घेत असत.
विनोबा त्यांच्या मित्रांना नेहमी उदाहरणे सोडवून देत. त्यामुळे त्यांचे मित्र अवघड उदाहरणे एका कागदावर लिहून आणत व ती विनोबांकडे देत. विनोबांचे खिसे नेहमी कागदांनी भरलेले असत. इतर मुलांच्या खिशात गोट्या, खाऊ असायचा पण विनोबांच्या खिशात काय, तर कागदाचे कपटे. ते एका खिशातून सोडवलेल्या उदाहरणांचे कागद बाहेर काढत व मित्रांच्या पुढे ठेवत, तर दुसऱ्या खिशात त्यांना सोडविण्यासाठी दिलेले उदाहरणांचे कागद ठेवत. अशा प्रकारे विनोबांचे खिसे नेहमी
गणिताने भरलेले असत. एवढेच कशाला! एखादे अवघड उदाहरण शिक्षकांना अडले तर भर वर्गात ते निःसंकोचपणे विनोबांना विचारीत आणि विनोबाही त्याचे उत्तर सांगत, रीत सांगत, उदाहरण सोडवून देत. एकदा वर्गात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक अवघड उदाहरण सोडविण्यास दिले. नंतर स्वतः ते उदाहरण फळ्यावर सोडवू लागले. झाले एकदाचे. उदाहरण सुटले, पण नंतर त्यांनी पुस्तकातील पाठीमागील छापलेले उत्तर वाचले, तर काय? शिक्षकाचे उत्तर व पुस्तकातील उत्तर यांचा मेळ लागेना. आढळून येऊ लागली. शिक्षक पुनः पुन्हा उदाहरण पडताळून
दोन्ही उत्तरात तफावत पाहू लागले. पण गणितातील चूक काही केल्या सापडेना. शिक्षक अस्वस्थ झाले. अखेर त्यांनी विनोबांना विचारले. त्यावर विनोबा म्हणाले, ‘मी पूर्वीच पडताळून पाहिले आहे. तुमचेच उत्तर बरोबर आहे. पुस्तकात पाठीमागे छापलेले उत्तर चूक आहे.’ शिक्षकांचा जीव भांड्यात पडला.
परीक्षेमध्ये सर्वसामान्य मुले अगोदर प्रश्नपत्रिकेतील सोपी उदाहरणे सोडवतात व मग अवघड उदाहरणांकडे वळतात. म्हणजे सोप्याकडून अवघडाकडे असा त्यांचा प्रयत्नरूपी प्रवास चालू असतो. विनोबाचे मात्र नेमके उलटेच. ते प्रश्नपत्रिकेतील प्रथमपासून क्रमाने उदाहरणे सोडवत. एवढेच काय, पण आवश्यक ती उदाहरणे सोडवून ते पर्यायी उदाहरणे सोडवून लिहून ठेवत आणि परीक्षकांसाठी सूचना लिहीत, ‘कोणतीही उदाहरणे तपासा.’
विनोबांची शिवजयंती
१९३२ साली विनोबा धुळ्याच्या जेलमध्ये होते. तेथे ते कैद्यांना गीता प्रवचने सांगू लागले. त्यावेळी त्यांच्याबरोबर तुरुंगात साने गुरुजी होते. त्यांनी
विनोबांची गीताप्रवचने कागदावर उतरवली. तीच ‘गीता प्रवचने’ या नावाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली. अनेक भाषांत त्यांची भाषांतरे झाली.
हायस्कूलमध्ये शिकत असताना घरात चर्चा सुरू झाली की, विनोबांनी दुसरा भाषा विषय कोणता घ्यावा? विनोबांचे वडील म्हणाले, ‘फ्रेंच घे’ आणि विनोबांनी फ्रेंच घेतले. त्यांच्या आईला हे आवडले नाही. विनोबांनी संस्कृत घ्यावे अशी तिची इच्छा होती. विनोबांनी फ्रेंच तर घेतलेच, पण आईच्या समाधानासाठी ते संस्कृतही शिकले. व्याकरणावर विनोबांचा विशेष अधिकार होता आणि संस्कृत व्याकरणामध्ये त्यांना ‘पाणिनी’ विशेष प्रिय होता. इसापच्या नीतिकथांइतकीच त्यांना युक्लिडची भूमितीही आवडे. संस्कृतप्रमाणेच ते इतरही भाषा शिकले. संस्कृत, मराठीप्रमाणेच हिंदी, गुजराथी, कन्नड, तमिळ, तेलगु, बंगाली, पर्शियन इत्यादी भाषांवर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते. विनोबांना एकूण २२ भाषा येत होत्या. एका दृष्टीने पाहता त्यांचा हा जागतिक विक्रमच म्हटला पाहिजे.
१९१४ साली विनोबांनी बडोद्यात लोकसेवेसाठी एक विद्यार्थी मंडळ स्थापले. या मंडळाच्या माध्यमातून साजऱ्या होणाऱ्या अनेक कार्यक्रमांत विनोबा वेगवेगळ्या विषयावर भाषणे करीत. त्यावेळी त्यांनी जोसेफ मॅझिनीवर केलेले भाषण फारच गाजले. विनोबा हायस्कूलमध्य शिकत असताना त्यांना छत्रपती शिवाजीमहाराजांचा इतिहास अभ्यासासाठी नेमलेला होता. शिवाजीबद्दल विनोबांना विलक्षण प्रेम होते. तसे प्रत्येक मराठी माणसाला शिवाजी महाराजांबद्दल प्रेम असतेच, कारण उभ्या महाराष्ट्राची ती अस्मिता आहे. विनोबांच्या मित्रांनी विचारलेली, ‘आपण शिवजंयती कोठे साजरी करावी?’ विनोबा उत्तरले, ‘शिवाजीची जयंती एखाद्या बंद खोलीत साजरी करणे बरोबर नाही. शिवाजीची जयंती आपण मोकळ्या वातावरणात, निसर्गाच्या सान्निध्यात साजरी करू.’ परंतु त्यांच्यासमोर दुसरी एक अडचण आली आणि ती म्हणजे त्यादिवशी शाळेला सुट्टी नव्हती. तेव्हा विनोबा म्हणाले की, ‘आपण इतिहासाच्या तासाला शाळा बुडवून शिवजयंती साजरी करायला जाऊ.’ सर्वांनी होकार दिला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे शिवजयंतीच्या दिवशी सर्वजण जंगलात गेले आणि अत्यंत श्रद्धापूर्वक त्यांनी जयंती साजरी केली. पण माघारी येताना विनोबा सर्वांना म्हणाले की, ‘उद्या शाळेत येताना प्रत्येकाने चार चार आणे आणावे. शाळेने दंड केल्यास तो भरायला पैसे हवेत!’ दुसऱ्या दिवशी इतिहासाच्या तासाला शिक्षकांनी चौकशी केलीच. ‘काल तुम्ही शाळा बुडवून कोठे गेला होतात?’ असे शिक्षकांनी विचारताच विनोबा उत्तरले, ‘शिवजंयती साजरी करायला जंगलात गेलो होतो.’ शिक्षक म्हणाले, ‘का? वर्गात शिवजयंती साजरी करता आली नसती का?’ विनोबा ताडकन्
उत्तरले, ‘शिवाजीसारख्या स्वातंत्र्यवीराची जयंती बंद खोलीत कशी काय साजरी करणार? यावर शिक्षक नाराज झाले. ते म्हणाले, ‘तुम्हाला प्रत्येकाला चार आणे दंड पडेल.’ प्रत्येकाने शांतपणाने आपापल्या खिशातले चार-चार आणे काढून दंड भरला.
अथा तो ब्रह्मजिज्ञासा
सविनय कायदेभंगाची ही लुटीपुटीची लढाई होती. विनोबांचे प्राथमिक, माध्यमिक व काही उच्च शिक्षण बडोदा येथेच पार पडले. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी कॉलेजमध्ये इंटरपर्यंत शिक्षण घेतले. एकदा त्यांनी मॅट्रिक परीक्षेची व इतर विषयांची मिळालेली सर्व प्रमाणपत्रे चुलीमध्ये जाळून टाकली. तीही आपल्या
आईच्यादेखत. तेव्हा आई म्हणाली, ‘अरे विन्या, तू हे काय करतोस?’
तेव्हा विनोबा शांतपणे म्हणाले, ‘प्रमाणपत्रे जाळतोय!’
‘पण ती पेटीत राहिली असती, तर काय बिघडले असते का?’
‘प्रमाणपत्र जाळून मी मोहाचा दोर तोडून टाकतोय!’ विनोबा उत्तरले.
या प्रसंगाचे मोठे मार्मिक विश्लेषण आचार्य अत्रे यांनी त्यांच्या ‘मराठी माणसे, मराठी मने’ या पुस्तकात केले आहे. विनोबांच्या प्रमाणपत्रे जाळण्याच्या कृतीचे वर्णन करताना अत्रे म्हणतात, ‘ज्याप्रमाणे सिंहगडावरून पळून जाणाऱ्या मावळ्यांना परावृत्त करण्यासाठी सूर्याजीने दोर कापून टाकला, त्याप्रमाणे प्रमाणपत्रे जाळून गृहस्थाश्रमी जीवनाकडे वळण्याचे आकर्षण विनोबांनी पूर्णपणे तोडून टाकले !’ १९१६ साली विनोबा बडोद्याला इंटरच्या वर्गात शिकत होते. ती परीक्षा
मुंबईला द्यावी लागे. म्हणून बडोद्यावरून परीक्षेसाठी ते मुंबईला निघाले. वाटेत सुरत स्टेशन लागले. ते स्टेशनवर उतरले आणि तडक चालत निघाले. मित्र घाबरले. एकाने विचारले, ‘अरे विनायक तू कुठे निघालास?’ विनोबांनी निर्भयपणे उत्तर दिले, ‘अथा तो ब्रह्मजिज्ञासा’, म्हणजे मला ब्रह्म जाणून घ्यायचे आहे. परीक्षेला न बसता विनोबा काशीला गेले. तेथे त्यांनी संस्कृतचे मनसोक्त अध्ययन केले. विनोबा स्वतःला जंगली प्राणी म्हणवून घेत. ते म्हणत, ‘मी एक जंगली प्राणी आहे. मला उपनिषदे आवडतात. उपनिषदे हे जंगली साहित्य आहे. संस्कृतात त्याला आरण्यके म्हणतात.’ ह्या उपनिषदांत ब्रह्माच्या स्वरूपाचे वर्णन केले आहे. ब्रह्माला ते ‘अवाकी आणि अनादर’ म्हणजे अबोल आणि बेपर्वा अशा त-हेने वर्णन करून संबोधतात. ही ब्रहृयाची दोन लक्षणे विनोबांच्या अगदी हाडीमांसी खिळलेली होती. देहाला विसरून जगण्याची कला ते जगद्गुरू शंकराचार्यांकडून शिकले. काशीला दोन महिने राहिल्यावर ते गांधीजींच्या साबरमती आश्रमात आले.
तेव्हा विनोबा २१ वर्षांचे होते. माणसाजवळ शारीरिक शक्ती, विचार
शक्ती, मानसिक शक्ती, बौद्धिक शक्ती अशा अनेक शक्ती असतात. पण या सर्वाहून इच्छा शक्ती जास्त प्रबळ असते. गाधीजींच्या आश्रमात विनोबा आठ-आठ तास शारीरिक कामे करीत आणि रात्री पुन्हा दोन तीन तास अखंड अभ्यास करीत. गांधीजींना या सर्व गोष्टींचे मोठे आश्चर्य वाटे. एकदा ते विनोबांना म्हणाले, विनोबा, तुझी प्रकृती दुबळी व अशक्त असतानाही तू येथे कष्ट कसे काय करतोस?’
‘इच्छाशक्तीच्या बळावर!’ विनोबा उत्तरले.
त्याच सुमारास विनोबांचे ‘गीताई’ हे पुस्तक धुळ्याच्या तुरुंगातच प्रकाशित झाले. त्याची किंमत त्यावेळी एक आणा होती. विनोबा त्यावेळी सही करून ते पुस्तक विकत असत. विनोबांची ही गीताप्रवचने विकत घ्यावीशी वाटली, तीसुद्धा तुरुंगातील कैद्यांना. त्यांनी ती प्रवचने ऐकली होती. पण ती पुस्तके विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी जेलरकडे अर्ज करून आपल्या मजुरीच्या पैशातून दोन आण्यांची मागणी केली. प्रत्येकाने दोन आणेच का मागितले हे जेलरला कळेना. त्याने दोन आणे मागण्यामागचे कारण विचारल्यावर कैदी म्हणाले, ‘एक आण्याची आम्ही गीताई घेणार आहोत आणि एक आणा या संताला ‘दक्षिणा’ देणार आहोत.’ त्याप्रमाणे मजुरीच्या दोन आण्यातून प्रत्येकाने एक आण्याची ‘गीताई’ घेतली आणि एक आणा विनोबांना दक्षिणा दिली. फाशी गेटमध्ये ठेवलेल्या एका कैद्यानेही विनोबांकडून ‘गीताई’ची प्रत घेतली आणि एक आणा विनोबांना दक्षिणा दिली. विनोबांनी त्याला गळामिठी मारली.
आजन्म ब्रह्मचारी
आचार्य विनोबांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याची भीष्म प्रतिज्ञा केली होती. त्यांना हे माहीत होते की, जर प्रमाणपत्रे जपून ठेवली, तर नोकरी करण्याचा मोह होणार. एकदा नोकरी मिळाली की पुढे लग्न करण्याचा मोह होणार. त्यापेक्षा त्या मोहाचा दोर मुळापासूनच तोडून टाकलेला काय वाईट? म्हणून विनोबांनी मोहाचे मूळच उखडून टाकले.
मोहाप्रमाणेच त्यांनी स्तुतिनिंदेचाही त्याग केला होता. एकदा विनोबा पवनारच्या आश्रमात असताना त्यांना गांधीजींचे एक पत्र आले. त्या पत्रात गांधीजींनी विनोबांची प्रशंसा करून विनोबांना सर्व शिष्यांत सर्वश्रेष्ठ ठरवले होते. विनोबांनी ते पत्र वाचले आणि फाडून टाकले. जमनालाल बजाजांना हे समजले, तेव्हा ते म्हणाले होते, ‘इतके महत्त्वाचे पत्र का फाडले?’ यावर विनोबा उतरले की, ‘या पत्रातील स्तुतीमुळे माझ्यातील अहंकार वाढला असता. शिवाय ‘या पत्रात गांधीजींनी मला सर्वश्रेष्ठ ठरवल्याने त्यांच्या अन्य शिष्यांवर अन्याय झाला असे मला वाटले, म्हणून ते पत्र
मी फाडले!’ विनोबांच्या या उत्तराने जमनालाल बजाज आश्चर्यचकित झाले.
विनोबांनी आयुष्यभर ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले. हिंदू धर्माने ब्रह्मचर्य पालनाच्या अधिकारापासून स्त्रियांना वंचित ठेवले आहे. याबाबत खेद व्यक्त करून स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणेच ब्रह्मचर्य पालनाचा अधिकार द्यायला हवा, असे विनोबा म्हणत. स्त्रीशक्तीवर विनोबांची अपरिमित श्रद्धा होती. जेव्हा स्त्रीयांतून जगद्गुरू शंकराचार्यांसारख्या प्रखर वैराग्यसंपन्न आणि ज्ञानदान करणाऱ्या संन्यासिनी निर्माण , तेव्हाच भारतवर्षाचा उद्धार होईल, असे विनोबा म्हणत. प्रचंड राष्ट्रकार्य केले. गांधीजींच्या
सत्यव्रत पित्याचा सत्यव्रत पुत्र
होतील प्रबल इच्छाशक्तीच्या जोरावरच पुढे विनोबांनी साबरमती आश्रमात एक वर्ष राहिल्यावर विनोबा वाईला गेले. तेव्हा वाई हे गाव दक्षिणेकडील काशी म्हणून प्रसिद्ध होते. तेथे नारायणशास्त्री मराठे यांची प्राज्ञ पाठशाळा होती. विनोबा या प्राज्ञ पाठशाळेत दाखल झाले. तेथे वर्षभर राहून विनोबांनी गीता, उपनिषदे, ब्रह्मसूत्र, शांकरभाष्य, मनुस्मृती, पातंजली योगदर्शन अशा अनेक ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. वाईला वर्षभर राहिल्यावर विनोबांनी एका वर्षात आपण काय काय केले, त्याचा वृत्तांत गांधीजींना कळविला. ते पत्र वाचून गांधीजी म्हणजे भीम आहे, भीम. आज गोरखनाथाने मच्छिंद्रनाथाला हरवले.’ परस्पर भटकताहेत आणि आईबापांना
म्हणाले, ‘विनोबा विनोबा घरी काहीएक न कळविताच त्याचा पत्ताच नाही, हे कळताच गांधीजींनी विनोबांच्या वडिलांना एक पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात, ‘तुमच्या मुलगा विनोबा माझ्याकडे आहे. माझ्या इतक्या वर्षांच्या प्रदीर्घ परिश्रमाने माझी तपस्या व उच्च भूमिका मी सिद्ध करू शकलो, ती या मुलाने लहान वयातच हस्तगत केली आहे.’ या पत्रावरून विनोबांची योग्यता केवढी थोर होती आणि गांधीजींनी ती चटकन कशी ओळखली होती, या दोहोंची साक्ष पटते. पुढे विनोबांनी गांधीजींना तळमळीने एक पत्र लिहून, ‘मी तुमचा मुलगाच आहे आणि आपण स्वहस्तेच मला पत्राने उत्तर द्यावे’ अशी विनंती एकदा केली असता त्याला गांधीजींनी दिलेले उत्तर अत्यंत उद्बोधक व मार्मिक आहे. गांधीजींनी विनोबांना लिहिले, ‘तुम्हाला काय उपमा द्यावी हेच मला समजत नाही. तुमच्या प्रेमाने व चारित्र्याने मी अगदी भारावून गेलो आहे. तुम्हाला जोखण्याइतका अधिकार मजजवळ नाही. तुम्ही मला पित्याचे स्थान घेण्याबद्दल विचारले तर ते स्थान मी स्वीकारतो. माझ्या तुमच्याबद्दलच्या अपेक्षा तुम्ही जवळजवळ पुऱ्या करीत आणल्या आहेत. मी असे मानतो की सत्यव्रत पित्याला त्याच्याहीपेक्षा जास्त सत्यव्रत पुत्राचा लाभ होतो. पिता जर सत्यनिष्ठ, निश्चयी आणि दयाशील असेल तर पुत्रालाही मोठ्या प्रमाणात
या गुणांचा वारसा मिळतो. तसे तुम्ही केलेलेच आहे. परंतु मला असे वाटते की ही गुणसंपदा तुमच्या अंगी बाणण्यात माझा असा काहीही भाग नाही. म्हणून केवळ प्रेमाची देणगी म्हणूनच मी तुमच्या पितृस्थानाचा स्वीकार करतो. मी त्यास पात्र राहण्याचा सदैव प्रयत्न करीन, पण मी जर का हिरण्यकश्यपू झालो तर तुम्ही प्रल्हाद सिद्ध झाले पाहिजे.’
विनोबांची स्वयंसिद्ध योग्यता, त्यांच्या आग्रहामुळे पितृत्व स्वीकारण्यास संमती आणि शेवटी अत्यंत समयसूचक व मार्मिक असा हिरण्यकश्यपू प्रल्हाद यांचा दृष्टांत या सर्व दृष्टीने हे पत्र अत्यंत मननीय असून उभयतांच्या विभूतिमत्त्वावर झगझगीत प्रकाशझोत टाकणारे आहे.
साबरमती आश्रमात भंगीकाम
गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आल्यावर अहमदाबादजवळ कोचर येथे ‘साबरमती आश्रम’ स्थापन केला. पुढे त्याला ‘सत्याग्रही आश्रम’ असे नाव पडले. अशाच प्रकारचा एक आश्रम वर्ध्यासही असावा, अशी जमनालाल बजाज यांची इच्छा होती. ती त्यांनी गांधीजींजवळ बोलून दाखवली. गांधीजींनी त्याला मान्यता दिल्यावर जमनालाजीनी वर्ध्यास एक आश्रम काढला. गांधीजींच्या सांगण्यावरून विनोबा वर्ध्यास आले आणि शेवटपर्यंत ते या आश्रमातच राहिले. विनोबांनी फक्त धर्मकारणच केले नाही, तर समाजकारणही केले. त्यांनी आपल्या ८७ वर्षांच्या आयुष्यात अनेक सेवाभावी कामे केली.
१९१८ सालची गोष्ट. तेव्हा विनोबा गांधीजींच्या साबरमती आश्रमात होते. त्यांचे एक बंधू बाळकोबा भावेही तेथे दाखल झाले होते. त्या आश्रमात भंगीकाम करण्यासाठी एक भंगी येत असे. मलमूत्राची बादली डोक्यावर घेऊन तो दूर शेतातील खेड्यात नेऊन ओतत असे. अर्थात, त्याला त्या कामाबद्दल पगार मिळत असे. पण एकदा तो आजारी पडला म्हणून भंगीकाम करण्यासाठी त्याने त्याच्या मुलाला पाठवले. पण तो मुलगा लहान होता. डोक्यावर मलमूत्राची बादली घेताना तो लटपटत होता. बाळकोबाने हे दृश्य पाहून विनोबांना विचारले की, ‘मी भंगीकाम करू का?’ विनोबा म्हणाले, ‘का नाही? अवश्य कर. मीसुद्धा तुझ्या मदतीला येतो.’
आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते दोघेही भाऊ साबरमती आश्रमात रोज भंगीकाम करू लागले. ब्राह्मणाच्या मुलांनी भंगीकाम करणे म्हणजे फारच झाले. वाऱ्यासारखी ही बातमी साऱ्या आश्रमात पसरली. कस्तुरबा गांधींच्या कानावर ही गोष्ट गेली. त्या नाराज झाल्या आणि त्यांनी बापूंचे या गोष्टीकडे लक्ष वेधले. यावर गांधीजी म्हणाले, ‘अगं बा, या भंगीकामापेक्षा दुसरे अधिक पवित्र काम कोणते असू शकेल?’ असे म्हणून स्वतः गांधीजीसुद्धा भंगीकामात सहभागी झाले. गांधीजींच्या सहभागामुळे भंगीकामाला राजमान्यता मिळाली.
विनोबा केवळ आश्रमातच भंगीकाम करून थांबले नाहीत. पवनार आश्रमापासून तीन मैल दूर असलेल्या सुरगाव या गावीसुद्धा त्यांनी भंगीकाम सुरू केले. रोज सकाळी खांद्यावर खोरे घेऊन व हातात घमेले घेऊन ते सुरगावची वाट चालू लागायचे. गावात गेल्यावर रस्त्यात किंवा रस्त्याकडेला, जेथे मैला दिसेल तो खोऱ्याने घमेल्यात भरून शेतात नेऊन टाकत असत. रोज तास दीड तास काम करून ते माघारी येत. अशा त-हेने हे काम त्यांनी सतत पावणेदोन वर्षे केले. एके दिवशी एक गृहस्थ विनोबांना म्हणाला की, ‘तुम्ही दररोज हे खोरे, घमेले बरोबर कशाला घेऊन जाता? ते येथेच का ठेवत नाही? त्यामुळे तुमचा त्रास वाचणार नाही का?’ तेव्हा विनोबा म्हणाले, ‘त्यात त्रास कसला? न्हावीकाम करावयाचे तर धोपटी बाळगण्याची लाज कशाला?’
याबाबत लोक कधीकधी विनोबांना विचारायचे, ‘हे भंगीकाम तुम्ही किती दिवस करणार?’ विनोबा उत्तरायचे ‘वीस वर्षे. कारण तोपर्यंत एक पिढी बदलेल. त्यामुळे लोकांची मनोवृत्ती बदलेल’ पुढे सुरगावमध्ये खरोखरच बदल जाणवू लागला. विनोबांच्या भंगी मुक्तीच्या कामात गावकरी लोकांचा सहभाग दिसू लागला. विनोबा म्हणाले ‘गाव सुधारला, आता आपण भंगीकाम बंद करायला हरकत नाही.’
जातीय ऐक्य व अस्पृश्योद्धार
जातीय ऐक्यावर विनोबांचा दृढ विश्वास होता. त्यांनी अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन आपल्या अंतःकरणातून केले होते. हरिजनांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी सत्याग्रह केला १९ एप्रिल १९५३ रोजी बिहारमधल्या वैद्यनाथधाम येथे हरिजनांसह मंदिरात प्रवेश करताना विनोबांवर हल्लाही झाला. त्यातच त्यांचा उजवा कान कायमचा बधिर व निकामी झाला. हरिजनांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी जसा प्रयत्न केला, तसाच १ मार्च १९५९ रोजी अजमेर दर्गा शरीफमध्ये मुस्लीम महिलांसह प्रवेश करून सत्याग्रह केला होता, हे लक्षात ठेवले पाहिजे. समतेच्या लढ्यात त्यांनी हिंदू मुस्लीम असा भेदाभेद ठेवता नाही. मुस्लीम अनुनयही त्यांनी कधी केला नाही. त्यांना मुस्लीम अनुनयच करायचा असता, तर त्यांनी संपूर्ण गोवंश हत्याबंदीसाठी मुंबईच्या देवनार येथे सत्याग्रह करण्याचा आदेश दिला नसता.
१९३२ साली धुळ्याला तुरुंगातून सुटून आल्यावर विनोबांनी वर्ध्याजवळील नालवाडी हे गाव सेवेसाठी निवडले. या गावात ९५ घरे हरिजनांची व ५ इतर जमातीची होती. या हरिजन लोकांचा मुख्य उद्योग जनावरांची फाडतोड करून कातडी कमावणे हा होता. विनोबांनी विचार केला की खऱ्या अर्थाने या लोकांच्या जीवनात समरस व्हावयाचे असेल, तर ही गुरे फाडण्याची कला आपणास यायला पाहिजे. तरच आपण त्यांची सेवा करू शकू व खऱ्या अर्थाने मिसळू शकू. म्हणून त्यांनी वाळुंजकर व रानडे या ब्राह्मण मुलांना गुरे फाडण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी गावात पाठवले. अनेक दिवस ते गावात येऊन प्रशिक्षण घेत होते. यावेळी अनेकांनी या ब्राह्मण मुलांची टिंगल टवाळी केली. पण अखेर त्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले. गुरे फाडण्याची कला हस्तगत केली. त्यानंतर या दोन मुलांनी विनोबा भावे यांच्या सांगण्यावरून तेथे चर्मालय सुरू केले.
गांधीजीचा पहिला वैयक्तिक सत्याग्रही
आचार्य विनोबांनी सामाजिक कार्याबरोबरच राजकीय कार्यातही उडी घेतली. १९४० मध्ये गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली, त्यावेळी अनेक राजकीय नेत्यांना या निवडीचे आश्चर्य वाटले. लोकांना वाटले की, वैयक्तिक सत्याग्रही म्हणून गांधीजी नेहरूंची किंवा सरदार वल्लभाईंची निवड करतील, पण झाले वेगळेच. व्यक्तिगत सत्याग्रहासाठी गांधीजींनी पहिला सत्याग्रही म्हणून आचार्य विनोबांची निवड केली आणि दुसरा सत्याग्रही म्हणून नेहरूंचे नाव घोषित केले.
गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली व त्यासाठी विनोबांची संमती घेण्यासाठी ते पवनारला विनोबांकडे गेले. गांधीजी विनोबांना
म्हणाले, ‘काँग्रेसने आता इंग्रजांविरुद्ध आंदोलन सुरू करण्याचे ठरविले आहे आणि माझ्यावर त्याचा पुढाकार सोपवला आहे. त्यासाठी वैयक्तिक सत्याग्रहाने सुरुवात करावी असे मी ठरविले आहे आणि पहिला सत्याग्रह करणारा सत्याग्रही म्हणून तुमचे नाव माझ्या मनात आहे. तेव्हा तुम्ही ही जवाबदारी घेण्यास तयार आहात काय?’ विनोबांनी त्यांच्या व्यक्तित्वाला साजेसे समर्पक उत्तर दिले. ते म्हणाले ‘अलबत, मी तयार आहेच. आताच्या आताच मी तुमच्या आज्ञेचे पालन करण्यास जसा तयार आहे. तसा यमराजाचे मला सरळ बोलावणे आले, तरी मी तयारच असेना.’
ठरल्याप्रमाणे विनोबांनी १७ ऑक्टोबर १९४० रोजी वैयक्तिक सत्याग्रह केला. सुटल्यानंतर पुन्हा केला. अशा त-हेने इजा, बिजा व तिजा असे तीनदा घडले. एकूण पावनेदोन वर्षांची तुरुंगाची शिक्षा झाली.
तिन्ही वेळा मिळून त्यांना सर्वोदय, भूदान आणि ग्रामदान
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्यप्राप्ती झाली. पण त्याच वेळी देशाची फाळणी झाली आणि फाळणीपाठोपाठ गांधीजींची हत्या झाली. १९४८ च्या मार्च महिन्यात सेवाग्रामला डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली विधायक कार्यकर्त्यांचा एक मेळावा भरला होता. तेथे आचार्य विनोबांच्या पुढाकाराने सर्वोदय समाजाची स्थापना करण्यात आली. गांधीजींच्या हत्येनंतर सर्वांची दृष्टी आचार्य विनोबा भावेंकडे वळली. त्यांनी गांधीजींच्या सर्व विधायक कार्यकर्त्यांना एकत्र आणून सर्व सेवा संघाची स्थापना केली. १९४९ च्या सुमारास आंध्रप्रदेशातील तेलंगणात सम्युनिस्टांनी भूमिहीन शेतमजुरांसाठी जमीनदारांविरुद्ध हिंस्र व तीव्र लढा सुरू केला होता. भूमिहीनांना जमिनीचा लहान प्रमाणात का होईना पण मालकी हक्क प्राप्त करून देण्यासाठी विनोबांनी नवा मार्ग, नवा विचार सुचवला. भारतीय संस्कृतीत दान व यश या संकल्पनेला महत्त्व आहे. त्याला अनुसरून भूदानाचे आवाहन विनोबा जमीनदारांना करू लागले. सर्व जमीन परमेश्वराची आहे. म्हणून प्रत्येक जमीनदाराने समाजऋण फेडण्यासाठी आपल्या जमिनीचा सहावा हिस्सा दान म्हणून द्यावा, असे ते जमीनदारांना आवाहन करू लागले. हीच विनोबांची भूदान चळवळ होय. भूदान यज्ञ हा विनोबांच्या जीवनातील महान चमत्कार आहे.
मानवी मनात राग, लोभ, मद, मत्सर जसे आहे, तसेच प्रेमही आहे. या प्रेम शक्तीवर विनोबांचा विश्वास होता. यातूनच त्यांना भूदान यज्ञाची कल्पना सुचली. आंध्र प्रदेशातील तेलंगणातून फिरत असताना तिसऱ्या दिवशी पोचमपल्ली येथे काही हरिजन विनोबांना भेटावयाला आले. त्यांना विनोबांकडे ८० एकर जमिनीची मागणी केली. तेव्हा रामचंद्र रेड्डी नावाच्या एका जमीनदाराने १०० एकर जमीन विनोबांना दान देण्याचे कबूल केले. जमीनदाराचे झालेले हे हृदयपरिवर्तन पाहून विनोबा खुष झाले. येथूनच भूदान यज्ञाला सुरुवात झाली.
या भूदान चळवळीसाठी विनोबा १३ वर्षे, ३ महिने व ३ दिवस अखंड फिरत होते. त्यांच्या पायावर चक्र होते. या चक्रावर आरूढ होऊन त्यांनी ८०,००० कि.मी. प्रवास केला. म्हणजे २ पृथ्वी प्रदक्षिणा त्यांनी पूर्ण केल्या, असे म्हणण्यास हरकत नसावी. लोकांनी विनोबांना ४३ लाख एकर जमीन दान म्हणून दिली, तीही मोफत आणि स्वखुषीने. लोकांच्या हृदयात स्थान मिळवून एवढे भूदान मिळवणारा माणूस जगाच्या पाठीवर दुसरा कोणी झाला नसेल. या भूदान चळवळीचे पुढे ग्रामदान चळवळीत रूपांतर झाले.
ग्रामदान म्हणजे ‘गाव करी ते राव न करी’ या म्हणीचा क्रांतिकारी प्रत्यय होय. करुणा, कत्तल आणि कायदा हे भूसमस्या सोडविण्याचे मार्ग आहेत, असे विनोबा म्हणत. नक्षलवादी कम्युनिस्टांचा मार्ग कत्तलीचा, भारतीय लोकशाही शासनाचा मार्ग कायद्याचा तर आचार्य विनोबांचा मार्ग करुणेचा. हे करुणेचे सामर्थ्य उभे करून विनोबांनी लाखो लोकांच्या जमिनीचा प्रश्न सोडवला आणि भूमिक्षेत्रात लँडसेलिंगसारखे समता प्रस्थापित करणारे कायदे करण्याच्या बाबतीत व अंमलबजावणीच्या बाबतीत प्रभावी जनमानस तयार केले. ही विनोबांच्या ग्रामदानाची सामाजिक फलश्रुती होय, हे कोणीही विचारी मनुष्य मान्य केल्याशिवाय राहणार नाही. भूमालकांचे शिरकाण हा
खरी क्रांती नसून ग्रामदान हीच खरी क्रांती होय, याचा प्रत्यय विनोबांनी जगास आणून दिला.
भूदान आणि ग्रामदान या चळवळीबरोबरच त्यांनी सर्वोदयी समाजाचाही यशस्वी प्रयोग केला. शासनमुक्त समाज निर्माण करणे हे सर्वोदयचे ध्येय आहे.
‘रेमन मॅगसेसे’ व ‘भारतरत्न’ पुरस्कार
वास्तविक पाहता विनोबांच्या या असामान्य कामगिरीबद्दल त्यांना जागतिक कीतींचा नोबेल पुरस्कार मिळावयास काहीच हरकत नसावी. परंतु ते पारतंत्र्याच्या काळात जन्माला आले आणि आयुष्यभर ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढत होते. त्यामुळे कदाचित त्यांचे नाव मागे पडले असेल. कारण काहीही असो, पण भारताचा एक नोबेल पुरस्कार हुकला, एवढे मात्र खरे ! विनोबांना नोबेल पुरस्कार मिळाला नसेल, पण १९५८ मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या रेमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविले गेले. रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे आचार्य विनोबा भावे हे पहिले भारतीय आहेत, ही गोष्ट आपण विसरता कामा नये. पण विनोबांना यापैकी कशाचेही सोयरेसुतक नव्हते. ते मानसन्मानाच्या पलीकडे गेलेले संत होते. ज्यांनी ऐन तरुणपणी आपली सर्टिफिकेटे जाळून टाकली होती, त्यांना म्हातारपणी नोबेल पुरस्कार मिळाला असता तरी त्यांना विशेष आनंद वाटला असता काय ?
स्वतः शून्य होऊन पूर्णात विलीन व्हावे, हीच विनोबांची अंतिम इच्छ होती. त्यांनी स्वतःच्या रोजनिशीमध्ये लिहून ठेवले आहे. की, ‘माझे चरित्र लिहिण्याच्या भानगडीत कोणी पडू नये. कारण माझ्या जीवनाचा बराचसा भाग हा आंतरिक आहे.’ आयुष्याची ८७ वर्षे त्यांनी आपला देह एखाद्या चंदनाप्रमाणे झिजवला. शेवटी वृद्धत्वामुळे ते आजारी पडले पण औषधपाणी करून हा मर्त्य देह टिकविण्यात त्यांना फारसे स्वारस्य उरले नव्हते. ते मृत्यूलाही भीत नव्हते. ते म्हणत की, ‘जन्म आणि मृत्यू या दोन्हीही परमेश्वराच्याच क्रिया आहेत. त्यामुळे एक आनंदाची व दुसरी दुःखाची कशी असू शकेल?’ शरीर वेगळे आणि आत्मा वेगळा याचे पूर्ण ज्ञान त्यांना होते. म्हणूनच त्यांनी ८ नोव्हेंबर १९८२ पासून अन्न पाणी वर्ज्य करून अत्यंत आनंदाने १५ नोव्हेंबर १९८२ रोजी या जगाचा निरोप घेतला.
महादेवीताई या एका बालविधवेच्या हस्ते विनोबांच्या पार्थिवाला त्यांच्या मृत्यूनंतर अग्नी देण्यात आला. एक बालविधवा स्त्री विनोबांच्या देहाला अग्नी देते, ही गोष्ट अपवादातील अपवाद मानावा लागेल. पण आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा तो एक आविष्कार होता. विनोबांचा देह साध्या बाभळीच्या लाकडांनी जाळण्यात आला, हा त्यांचा दुसरा विशेष होता. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी रशियाचा दौरा अर्धवट टाकून पवनार आश्रमात या देहदहन सोहळ्यास आल्या
होत्या. येताना त्यांनी चंदनाचे लाकूड सोबत आणले होते. आश्रमवासीयांची परवानगी घेऊन ते चंदनाचे लाकूड त्या धगधगत्या चितेस अर्पण करण्यात आले.
भारतीय संतपरंपरेतील एक आधुनिक संत काळाच्या पडद्याआड गेला, याची आत्यंतिक खंत व्यक्त करण्यासाठी भारत सरकारने आचार्य विनोबा भावे यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला. मात्र हा सन्मान त्यांना ‘याची देही याचि डोळा’ पाहता आला नाही. त्यांना १९८३ साली मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सर्वधर्म समभावी मानवतावादी संत
१९७५ मध्ये पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणीबाणीमुळे भारतीय जनता क्षुब्ध झाली असता आचार्य विनोबांनी त्या कृतीचे ‘अनुशासन पर्व’ असे वर्णन केले, म्हणून काही लोक त्यांची ‘सरकारी संत’ अशी अवहेलना करू लागले. याठिकाणी इंदिरा गांधींच्या आणीबाणीचे समर्थन करण्याचा मुळीच विचार नाही. पण आज निःपक्षपातीपणाने जर विचार केला, तर इंदिरा गांधींच्या आणीबाणीचे वाईट आणि चांगले असे दोन्ही परिणाम देशावर झालेले आहेत. आणीबाणीत व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा आली, राजकीय पक्षांवर बंदी घालण्यात आली, ही गोष्ट वाईट होती, यात काही शंका नाही. परंतु आणीबाणीच्या काळात लोकांना शिस्त लागली, गरिबांना घरे मिळाली, सावकारीवर बंधने आली या गोष्टी चांगल्या होत्या असे कोण म्हणणार नाही? विनोबा स्पष्टवक्ते होते. त्यांना आणीबाणीच्या चांगल्या गोष्टींचे समर्थन करावयाचे होते. त्यामुळे त्यांनी लोकांचा रोष ओढवून घेऊनही इंदिरा गांधींच्या आणीबाणीचे ‘अनुशासन पर्व’ असे जोरदार समर्थन केले.
विनोबा हे सरकारी ‘संत’ नव्हते तर ते ‘मानवतावादी संत’ होते. त्यांनी सर्वधर्म समभावी व धर्मनिरपेक्ष (Secular) प्रार्थना पुढीलप्रमाणे केली आहे.
‘ॐ तत् सत् श्री नारायण तू
पुरुषोत्तम गुरू तूं
रूद्र विष्णू तू,
राम कृष्ण तू
रहिम ताओ तू वासुदेव गो विश्वरूप तू चिदानंद हरि तू
अद्वितीय तू, अकाल निर्भय.
आत्मालिंग शिव तू ।’
आचार्य विनोबा भावे यांच्या या सर्वधर्मीय प्रार्थनेची आज आपणा सर्वांना नितांत गरज आहे.
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.