भारतरत्न अमर्त्य सेन
भारतरत्न अमर्त्य सेन हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, विचारवंत, लेखक आणि बौद्धिक प्रेरणास्थान आहेत. त्याच्या अद्भुत गर्वगौरवाने व्यक्तित्वाची मोठी आधारशिळ्प आहे. त्याचा अनुसंधान, लेखन, विचारांचे संचालन आणि सामाजिक सक्षमतेच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे. याच्यात त्याचे सोपे विचार, गंभीर अभिप्राय आणि सांघरेजीचे मर्मज्ञ विचार क्रांतिकारी आहेत. या ब्लॉगमध्ये आपल्याला अमर्त्य सेन यांचे जीवन, कार्य आणि विचार जाणून घ्यायला मिळेल.
‘बबलूच्या गौरवाचा मला व आमच्या नातेवाइकांना निश्चितच अभिमान वाटतो. थोड्या विलंबाने का होईना पण बबलूला ‘नोबेल’ मिळाले. बबलूच्या अभ्यासू वृत्तीबद्दल, त्याच्या कर्तृत्वाबद्दल त्यांच्या वडिलांना पूर्ण विश्वास होता. एक दिवस बबलू ‘नोबेल’ मिळवेल, असे ते नेहमी म्हणायचे. बबलूने त्यांचे शब्द खरे करून दाखवले. म्हणूनच आज बबलूचे वडील बबलूचा हा सन्मान पाहायला हवे होते! असे मला वाटते!’
अशी प्रतिक्रिया प्रा, अमर्त्य सेन यांच्या मातोश्री अमिता सेन यांनी, अमर्त्य सेनना नोबेल पुरस्कार मिळाल्याचे कळताच शांतिनिकेतनमधील ‘प्रतीती’ या प्रा. सेन यांच्या निवासस्थानी, बोलताना व्यक्त केली. प्रा. अमर्त्य सेन यांना अमिता सेन ‘बबलू’ या टोपणनावानेच हाक मारतात. ‘आज सकाळीच मला बबलूचा फोन आला. ‘नोबेल’ची वार्ता प्रथम त्यानेच मला सांगितली. सुरुवातीला माझा यावर विश्वासच बसला नाही. कारण गेल्या अनेक वर्षांपासून बबलूचे नाव नोबेल पारितोषिकाच्या चर्चेत होते. पण दरवर्षी हे पारितोषिक त्याला हुलकावणी देत होते. तीन वर्षांपूर्वी तर एका प्रख्यात अमेरिकन वर्तमानपत्राने खात्रीपूर्वक अमर्त्य सेन यांचे नाव जाहीरही केले होते.’ त्यामुळे जेव्हा प्रा. अमर्त्य सेन यांनी अमेरिकेतून आपली आई अमिता सेन यांना दूरध्वनीवरून ही आनंददायी बातमी कळविली, तेव्हा अमिता सेन म्हणाल्या, ‘बबलू, मी उद्याच्या वर्तमानपत्रात ही बातमी वाचल्यावरच त्यावर विश्वास ठेवीन !’
‘मात्र बबलूने सांगितलेली वार्ता खरी आहे हे कळल्यावर मला अपार आनंद झाला!’ असे अमिता सेन म्हणाल्या, ‘गुरुदेव टागोरांनीच बबलूचे नाव ‘अमर्त्य’ असे ठेवले होते. बबलूने त्यांच्या नावाला साजेशीच कामगिरी केली आहे!’ असेही त्या पुढे म्हणाल्या.
विख्यात भारतीय अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्यकुमार सेन यांना अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार १४ ऑक्टोबर १९९८ रोजी देण्यात आला. जागतिक कीर्तीचा हा नोबेल पुरस्कार मिळविणारे डॉ. सेन हे आशियातील पहिलेच अर्थतज्ज्ञ आहेत.
आशियाला आतापर्यंत ज्यांनी हे सर्वोच्च पारितोषिक मिळवून दिले, त्यातील असमान्य व्यक्ती बंगाली आहेत, हे विशेष होय. साहित्यासाठी नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेले रवींद्रनाथ टागोर हे बंगाली, त्याच्याच शांतीनिकेतनमध्ये शिक्षण घेतलेले अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन हेसुद्धा बंगालीच आणि धर्म वेगळा असला तरी शांतता नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले मोहम्मद युनूस हेही बंगालीच होते.
डॉ. अमर्त्य सेन हे आशियामधले पहिले, बंगालमधले दुसरे आणि भारतामधले सहावे नोबेल पुरस्कार मिळवणारे अर्थशास्त्रज्ञ आहेत. भारतीय राष्ट्रगीताचे जनक रवींद्रनाथ टागोरांना १९१३ मध्ये ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहासाठी, डॉ. सी.व्ही. रामन यांना १९३० मध्ये पदार्थ विज्ञानाच्या क्षेत्रात प्रकाश ऊर्जेच्या गुणधर्मासाठी, हरगोविंद खुराणा यांना १९६८ मध्ये वैद्यक शास्त्रात जनुकांच्या माहितीचा अन्वयार्थ लावण्यासाठी, मदर तेरेसांना १९७९ मध्ये शांतता व मानवसेवेसाठी आणि सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांना १९८३ मध्ये मृत ताऱ्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी लागणाऱ्या किमान वस्तुमानाच्या संशोधनासाठी, नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
१९६८ पासून अर्थशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार देण्यास प्रारंभ झाला. अर्थशास्त्राचा ३० वा पुरस्कार प्रा. अमर्त्य सेन यांना मिळाला. डॉ. सेन यांनी अर्थशास्त्रामध्ये एक दोन नव्हे, तर चार वेगवेगळ्या विषयांमध्ये अगदी मूलभूत सिद्धांत मांडले आहेत. ते विषय पुढीलप्रमाणे आहेत, १) सोशल चॉईस थेअरी (२) वेल्फेअर इकॉनॉमिक्स ३) इकॉनॉमिक मेजरमेंट ४) डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स
डॉ. अमर्त्य सेन यांचे मूलभूत संशोधन अर्थशास्त्रात मोडत असले, तरी प्रत्यक्षात ते तर्कशास्त्र, समाजशास्त्र, नीतिशास्त्र या विषयांमध्येही ते डोकावतात. त्यामुळेच त्यांच्या एका सहकाऱ्यानं म्हटलं आहे की, त्यांचे मन हे एका प्रखर सर्चलाईटसारखे आहे. ते फक्त एकाच विषयावर प्रकाश टाकत नाही, तर त्या अनुषंगाने आजूबाजूला येणाऱ्या इतर सर्व विषयांना ते उजळून टाकतं. त्यामुळेच त्यांचे काही सहकारी म्हणतात की, आज जर तर्कशास्त्र, नीतीशास्त्र वगैरे विषयामध्ये नोबेल पारितोषिकं देण्याची परवानगी असती, तर तीही डॉ. सेन यांनाच द्यावी लागली असती. एरिक हॉब्ज ब्राऊन हा त्यांचा एक सहकारी तर म्हणतो की, ‘खरं म्हणजे, डॉ. अमर्त्य सेन यांना ३०-४० वर्षांपूर्वीच हे नोबेल पारितोषिक मिळायला हवं होतं, एवढ्या क्रांतिकारक कल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत.’
स्वीडिश अॅकॅडमीच्या समाजविज्ञान विभागाच्या पुरस्कार समितीच्या सदस्य शिफारशी प्रामुख्याने ध्यानी घेऊन प्रा. सेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. स्टॉकहोम येथे झालेल्या भव्य समारंभात प्रा. सेन यांना स्वीडनच्या महाराजांच्या हस्ते नोबेल पुरस्काराचे पदक, मानपत्र, ७६ लक्ष स्वीडिश कोनर्सचा (म्हणजे ९ लाख ३८ हजार डॉलर्सचा) धनादेश १९९८ रोजी प्रदान करण्यात आला. पुरस्काररूपाने मिळालेल्या ४ कोटी रुपयांचा ‘प्रचिती’ नावाचा ट्रस्ट उभारून भारत व बांगलादेशातील गरिबांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याचे प्रा. अमर्त्य सेन यांनी जाहीर केले.
जन्म, बालपण व शिक्षण
अमर्त्य सेन यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३३ रोजी बंगालमधील ‘शांतिनिकेतन’ येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव आशुतोष आणि आईचे नाव अमिता होते. त्यांचे ‘अमर्त्य’ हे नाव गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनीच ठेवले होते. क्षितिमोहन सेन हे अमर्त्यचे आजोबा (आईचे वडील) होते. त्यांचा व रवींद्रनाथांचा चांगलाच स्नेह होता. ‘प्रतिती’ या आजोबांच्या बंगल्यात अमर्त्यचा जन्म झाला. शांतिनिकेतनात क्षितिमोहनबाबू हे अध्यापन करीत असत. वास्तविक पाहता ‘अमर्त्य’ या अर्थाचे ‘अमर’ हे नाव बंगालमध्ये अनेक मुलांना सर्रास ठेवले जाते. तरीही रवींद्रनाथांनी त्याच अर्थाचे पण
फारसे परिचित नसलेले नाव आपल्या स्नेह्याच्या नातवासाठी अगत्याने सुचवले आणि अमर्त्य या नावानेच सेन सर्वत्र ओळखले जाऊ लागले. बांगला देशातील माणिकगंज जिल्ह्यातील एका खेड्यात प्रा. अमर्त्य सेन यांचे आईवडील राहत होते. ढाका येथे त्यांचे वडिलोपार्जित घर आहे.
अमर्त्य सेन यांना स्वतःच्या आजोबांविषयी म्हणजे क्षितिमोहन सेन यांच्याविषयी अपरंपार जिव्हाळा होता व आहे. ते आपल्या आजोबांविषयी काय म्हणतात, ते बघण्यासारखे आहे. या आजोबांशी झालेल्या संवादांनी अमर्त्यबाबूंवर गहिरा संस्कार केला आहे. त्यामुळे त्यांच्या एका बंगाली पुस्तकाचा अमर्त्य सेननी कृतज्ञता बुद्धीने इंग्लिशमध्ये अनुवाद केला आहे. आजोबांशी बालपणी झालेल्या आणि नंतरही विकसित झालेल्या वादसंवादाचा या नातवाने एका पानावर उल्लेख केला आहे. ते म्हणतात की, ‘आजोबा मला नेहमी सांगायचे की, तू स्वतःविषयी विचार करू लागलास की तुझ्या मनात ‘Religious Conviction’ उत्पन्न होईलच. मला तर वाढत्या वयाबरोबर संशयवादाने पुरते ग्रासले आहे!’ पुढे प्रौढावस्थेत मी जेव्हा पुन्हा आजोबांना या बाबतीत विचारणा केली तेव्हा आजोबांनी मला शांतपणाने सांगितले, ‘तू जो अभ्यास केला आहेस, त्यातून तू हिंदू रंगपटात (Sepctrum) ‘लोकायत’ नावाने परिचित असलेल्या नास्तिक विचाराला आत्मसात केले आहेस.’
विश्वभारती विद्यापीठात संस्कृतचे प्राध्यापक असलेल्या आपल्या आजोबांमुळे डॉ. सेन यांना संस्कृतची गोडी लागली. संस्कृत पंडित होण्याची त्यांची इच्छा होती. पुढे डॉक्टर होण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्यात उत्पन्न झाली. परंतु शेवटी सुखमय चक्रवर्ती यांच्या आग्रहामुळे प्रा. सेन अर्थशास्त्राकडे वळले व अर्थतज्ज्ञ झाले. प्राथमिक शिक्षणानंतर सेन यांनी कोलकत्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजात आपले शिक्षण पूर्ण केले. कोलकत्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयात त्यांनी सुखमय चक्रवर्तीच्या बरोबरीने अर्थशास्त्राच्या अभ्यासास सुरुवात केली. पुढे दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेच्या उभारणीत या दोघांनी महत्त्वाचा वाटा उचलला. त्यांनी केंब्रिजच्या ‘ट्रिनिटी’ कॉलेजमधून पदव्युत्तर पदवी व डॉक्टरेटपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ट्रिनिटीत असताना त्यांना अॅडम स्मिथ हा बहुमानाचा पुरस्कार मिळाला. ‘रेनबरी’ ही शिष्यवृत्तीही मिळाली. ज्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये ते शिकले. त्याच कॉलेजमध्ये मास्टर या पदावर त्यांची नियुक्ती झाली.
जगातील १३ प्रतिष्ठित विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट देऊन त्यांना सन्मानित केले असून अनेक विद्यापीठे व संस्थांत त्यांनी मानद प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. अमेरिकेतील हॉर्वर्ड या जगद्विख्यात विद्यापीठाने त्यांना अर्थशास्त्र तसेच तत्त्वज्ञान या दोन्ही विषयांचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केले होते. प्रा. अमर्त्य सेन यांना लहानपणापासूनच वाचनाची अतोनात आवड होती. सर्वच ज्ञानशाखांविषयी कुतूहल असलेल्या सेन यांनी चौफेर वाचन, चिंतन व मनन करून केवळ अर्थव्यवस्थेचाच नव्हे, तर भारतीय व विश्वसंस्कृतीविषयी सम्यक दृष्टिकोन बाळगून आपली वाटचाल पुढे चालू ठेवली. आपल्या शैक्षणिक जीवनातच सेन यांनी दुष्काळ, जातीय दंगल व एकूण हाहा:कार पाहिला होता. त्यामुळे त्यांच्या अर्थविचाराला वेगळे असे नैतिकतेचे परिमाण लाभले. कॉलेजात असताना तोंडाच्या कॅन्सरने त्यांच्या जीवनाला उत्पन्न झाला असताही त्यातून ते निभावले.
धोका केंद्रीय विद्यापीठाची अर्थशास्त्रीय पदवी संपादन केल्यामुळे सेन मायदेशी परतले व जादवपूर विद्यापीठातील अर्थशास्त्र भागाचे प्रमुख म्हणून काम करू लागले. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी जादवपूर विद्यापीठात विभाग प्रमुख म्हणून काम करून मान मिळवणारे सेन सर्वांत तरुण प्राध्यापक होते. चाळीस वर्षांपूर्वी प्राध्यापकांची वेतनश्रेणी बिलकूल आकर्षक नव्हती. त्यामुळे बहुतांश अर्थतज्ज्ञ उद्योगक्षेत्रात लठ्ठ पगारावर सल्लागार म्हणून जात असतानाच काहीजण आय.ए.एस. सारख्या म्हणून पदव्या प्राप्त करून भारतातच सल्लागार तेथेच प्रशासक बनत, तर काही जण परदेशात जाऊन स्थायिक होत. परंतु यापैकी कोणत्याही आमिषाला बळी न पडता प्रा. अमर्त्य सेन यांनी स्वीकारलेले प्राध्यापकाचे काम सोडले नाही.
दोन विवाह आणि चार मुले
प्रा. अमर्त्य सेन यांचे दोन विवाह झालेले आहेत. त्यांची प्रथम पत्नी श्रीमती नवनीता देवसेन जादवपूर विद्यापीठात शिकत असताना तिची अमर्त्य सेन यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी ती तौलनिक साहित्याची विद्यार्थिनी होती. प्रा. अमर्त्य सेन विद्यापीठातील वादविवाद विभागाचे प्रमुख होते. नवनीता देवसेन या विद्यार्थिनी म्हणून वादविवादात भाग घेत असत. १९५९ मध्ये प्रा. सेन यांनी नवनीता देवसेन यांना स्वतःहून लग्नाची मागणी घातली आणि ते दोघे विवाहबद्ध झाले. या विवाहापासून त्यांना अंतरा व नंदना या दोन मुली झाल्या. आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलताना श्रीमती देवसेन म्हणतात, ‘प्रा. अमर्त्य सेन यांच्यावर रवींद्रनाथ टागोर यांचा फार प्रभाव आहे. टागोर यांच्याप्रमाणेच प्रा. सेन यांना आपल्या गावात जाऊन काम करायला आवडते. तसेच त्यांना बंगाली पदार्थ खूप आवडतात. अमर्त्य सेन आपल्या अभ्यासात एवढे मग्न होऊन जायचे की, त्यांना घरातील आपल्या दैनंदिन कामकाजाचंही विस्मरण व्हायचे. आमची मुले लहान असताना सुरुवातीला त्यांच्याशी कसे वागायचे हे अमर्त्यांना बिलकूल समजायचे नाही. काही कालाने त्यांनी ते जुळवून घेतले. त्यानंतर ते एक जबाबदार पती म्हणून वागू लागले. दुर्दैवाने आमचे वैवाहिक जीवन फार काळ टिकले नाही हेच खरे. तरीपण आजही आम्ही एकमेकांचे मित्र आहोत!’ श्रीमती नवनीता देवसेन या प्राध्यापिका असून जादवपूर विद्यापीठात त्या तौलनिक साहित्य शिकवितात. त्यांनी आतापर्यंत ३६ पुस्तके लिहिलेली आहेत.
प्रा. अमर्त्य सेन यांची दुसरी पत्नी एम्मा रॉयशील्ड याही पतीप्रमाणेच तत्त्वज्ञ असून ‘किंग्ज कॉले’ मध्ये त्या अध्यापन करतात. पती-पत्नी दोघेही तत्त्वज्ञ असणे असे दांपत्य क्वचित आढळते. विद्यमान पत्नी एम्मा रॉयशील्ड यांची तत्त्वज्ञानावरची काही पुस्तके प्रकाशित झाली आहे आहेत. दुसऱ्या पत्नीपासून प्रा. सेन यांना इंद्रायणी व कबीर अशी दोन मुले आहेत. प्रा. अमर्त्य सेन यांचा दुसरा विवाह झालेला असला, तरी पहिल्या पत्नीबरोबरचे त्यांचे संबंध बिघडलेले नाहीत. त्यामुळे प्रा. अमर्त्य सेन यांच्या ‘नोबेल पारितोषिक वितरण सोहळ्याच्या वेळी यांची चारही मुले आवर्जून उपस्थित होती.
परदेशात राहूनही भारतीय नागरिकत्व
आधुनिक शिक्षणाबरोबरच संस्कृत साहित्यातील न्याय, न्यायक, वैज्ञानिक तसेच तत्त्वज्ञान इत्यादींचा सेन यांनी सखोल अभ्यास केला आहे. संस्कृत भाषेतील ग्रंथांचा त्यांच्या संशोधनावर निश्चित प्रभाव पडला आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रातील अर्थनीती, अॅरिस्टॉलचे तत्त्वज्ञान, श्रीकृष्णाचे तत्त्वज्ञान तसेच चार्वाक, कांट व कार्ल मार्क्स यांचा सुरेख मेळ घालणारा विचार प्रा. अमर्त्य सेन यांनी मांडला आहे. परदेशात अनेक वर्षे अध्ययन अध्यापनासाठी राहिल्यानंतरसुद्धा प्रा. अमर्त्य सेन मनाने भारतीयच राहिले आहेत, हे विशेष होय. त्यांची भारताची दरवर्षीची वारी सहसा चुकत नाही. कोलकत्त्याला ‘शांतिनिकेतन’ मध्ये राहणाऱ्या आपल्या मातोश्री अमिता सेन यांना भेटून वर्षभरातील कामकाजाचा आपला अहवाल सादर केल्याशिवाय त्यांना राहवत नसे. झब्बा, पायजमा, खांद्यावर अडकवलेली शबनम बॅग आणि पायात चपला घालून ते ‘शांतिनिकेतन’ येथे येऊन पोहोचताच बाजारात मासे आणायला हटकून जाणार! आपला मोठेपणा मिरवीत अनेक क्षेत्रांतील नामवंत मंडळी आपल्या कीर्तीचे ओझे अंगावर घेऊन वावरत असतात. त्यामुळे त्यांच्याशी सहज संवाद साधणे सामान्य माणसांना अशक्य होऊन जाते. परंतु अमर्त्य सेन यांचा याबाबतीत कौतुकास्पद अपवाद आहे. सुमारे ४०-५० वर्षे परदेशात राहूनही प्रा. अमर्त्य सेन यांनी आपले ‘भारतीय नागरिकत्व’ (Indian Citizenship) कायम ठेवले आहे. ‘भारतीय पारपत्रा’लाच (Indian passport) चिकटून राहण्याचा तुमचा अट्टाहास का?’ असा प्रश्न जेव्हा त्यांच्यासमोर टाकला जातो, तेव्हा एका क्षणाचाही विलंब न लावता प्रा. सेन म्हणतात, ‘मला माझे भारतीय नागरिकत्व प्रिय आहे!’
‘भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत !’ अशी प्रतिज्ञा आपण घेतो, पण त्याप्रमाणे कधीतरी आपण वागतो का? हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. अमर्त्य सेन यांनी ‘संवादकुशल भारत’ (The Argu- mentative Indian) या नावाचे ४०९ पृष्ठांचे पुस्तक लिहिले आहे. विविध प्रमाणे, पुरावे एकत्र करून साकार झालेले हे पुस्तक म्हणजे १६ निबंधांचा संग्रह आहे. सदर पुस्तक वाचताना एक ख्यातकीर्त अभिजन अमेरिकेत राहूनही भारताचे नागरिकत्व कायम ठेवतो व भारताविषयी लिहिताना ‘माझा देश’ असा उल्लेख करतो, याचा वाचकाला अभिमान वाटल्यावाचून राहत नाही.
अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल नोबेल पुरस्कार
डॉ. अमर्त्य सेन यांना कल्याणकारी अर्थशास्त्रातील त्यांच्या महत्त्वाच्या योगदानाबद्दल नोबेल पुरस्कार मिळाला आहे. विकसित देशांच्या अर्थशास्त्रात लक्षणीय असे नवे विचार मांडल्याबद्दल सर ऑर्थर लुईस हे पहिले, तर प्रा. डॉ. अमर्त्य सेन हे दुसरे अर्थतज्ज्ञ आहेत.
या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे त्यांच्या कल्याणकारी अर्थशास्त्राला एक प्रकारे जागतिक मान्यताच मिळाली आहे. दारिद्र्य, दुष्काळ व उपासमार यांचा मानवी जीवनाशी असलेला संबंध व त्यांचे परिणाम या विषयी डॉ. सेन यांनी अभ्यासपूर्ण सिद्धांत मांडलेले
आहेत. समाजातील गरिबातील गरिबाला ध्यानात घेऊन साधनांचे वाटप कसे केले पाहिजे, याबाबत डॉ. सेन यांनी मांडलेले अर्थशास्त्रीय सिद्धांत विकसनशील व गरीब देशांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. समाजातील सर्वांतखाली असलेल्या, दबलेल्या व पिचलेल्या गरीब वर्गासाठी सामाजिक विकास हा नवा अर्थशास्त्रीय सिद्धांत मांडून प्रा. अमर्त्य सेन यांनी अर्थशास्त्र या प्रांताला खरेखुरे वैभव प्राप्त करून दिले आहे. त्यांनी आपल्यासिद्धांतात व्यक्तीमध्ये असलेल्या योग्यता आणि क्षमता यांना महत्त्व दिले आहे. या सिद्धांताच्या परिपूर्तीसाठी माणसात असलेल्या क्षमतांचा विकास ही आर्थिक विकासासाठी आत्यंतिक गरज असल्याचे सेन मानतात.
प्रा. अमर्त्य सेन यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये पुढीलप्रमाणे १० प्रकारच्या क्षमता असतात. १) जीवन २) शारीरिक आरोग्य ३) शारीरिक एकात्मता ४) समज, कल्पना आणि विचार ५) भावना ६) व्यावहारिक वैचारिकता ७) सामाजिक संलग्नता ८) प्राणी व वनस्पती ९) हसणे व खेळणे १०) राजकीय व सामाजिक बाबींवर नियंत्रण. या क्षमतांचा योग्य विकास आणि त्यांचे वहन झाल्यास व्यक्तीची म्हणजेच समाजाची व देशाची कारकशक्ती वाढून समाज खऱ्या अर्थाने विकास पावतो. यावरून प्रा. अमर्त्य सेन यांची विकासाची संकल्पना किती व्यापक आहे, हे
दिसून येईल. दारिद्र्याची व्याख्या करताना सेन म्हणतात की, व्यक्तीमध्ये असलेल्या वरील १० क्षमता हिरावून नेणे, म्हणजेच दारिद्र्य होय. या क्षमता राजकीय दडपशाही, अज्ञान, आर्थिक स्रोतांचा अभाव, स्वतःबाबत चुकीचा समज यामुळे हिरावून घेतल्या जातात. ‘डेव्हलपमेंट अँड फ्रीडम’ या पुस्तकात त्यांनी विकासासाठी उपरोक्त १० क्षमतांचा विस्तृत ऊहापोह केलेला आहे.
एखाद्या व्यक्तीची श्रीमंती किंवा गरिबीदेखील उत्पन्नाच्या एका ठरावीक आकड्याशी तुलना करून पूर्वी ठरवली जात असे. त्या संख्येहून ज्याचे जास्त उत्पन्न तो श्रीमंत आणि त्याखालचा तो गरीब अशी ठोकळेबाज व्याख्या अगदी कालपरवापर्यंत सर्व ठिकाणी वापरली जायची. पण डॉ. अमर्त्य सेन यांनी हे दाखवून दिले की, अशा त-हेने योजलेल्या गरिबी श्रीमंतीचा प्रत्यक्षात काहीच उपयोग नव्हता, नसतो. माणूस त्याला मिळणाऱ्या उत्पन्नातून त्याच्या त्या वेळच्या गरजा भागवू शकतो का नाही, यावर त्याची गरिबी म्हणजे माणूस म्हणून जगण्यात व नित्यकर्मे करण्यात येणाऱ्या अडचणी, असे त्यांनी प्रतिपादन केले आहे. कोणत्याही व्यक्तीला महत्वाचे काय असणे, तर आपले अस्तित्व टिकवणे आणि माणूस म्हणून नीटपणे जगण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करणे. या गोष्टींच्या आड येणारा आर्थिक अडथळा म्हणजे गरिबी होय. एखाद्या व्यक्तीच्या त्या त्या वेळी कोणत्या गरजा आहेत, त्याप्रमाणे त्या व्यक्तीची गरिबी व श्रीमंती बदलत जाते. एखादा माणूस खाऊन पिऊन सुखी असेल तर तो गरीब निश्चित नाही. पण समजा त्याला मूत्रपिंडाचा विकार उद्भवला व मूत्रपिंडरोपणाची महागडी शस्त्रक्रिया आवश्यक ठरली असता, जर ती त्याला त्याच्या उत्पन्नातून करणे शक्य होत नसेल, तर त्यावेळी तो माणूस गरीबच म्हटला पाहिजे. अशा त-हेने गरिबी व श्रीमंतीची सविस्तर ऊहापोह डॉ. अमर्त्य सेन यांनी
केला आहे.
डाव्या विचारसरणीचे अर्थशास्त्रज्ञ
प्रा. अमर्त्य सेन डाव्या विचारसरणीचे असल्यामुळे ‘ते भुकेचे प्राध्यापक आहेत.’ अशी टिंगल टवाळी त्यांचे टीकाकार नेहमी करत असतात. पण दरिद्री नारायणाची भुकेची वेदना प्रा. सेन यांच्यासारखा अमर्त्य सेन वेदांतीच जाणू शकतो. सापेक्ष दारिद्र्य व निरपवाद दारिद्र्य अशा संकल्पना मांडून दारिद्र्याच्या आंतरराष्ट्रीय तुलनांमध्ये सुसंगतता आणण्याचा प्रयत्न प्रा. सेन यांनी केला आहे. या संदर्भात ते एक उदाहरण देतात. बाथटब, शॉवर व स्वतंत्र बाथरूम नसेल तर युरोपियन माणूस नाराज होईल पण भारतीयाला मात्र बादली, तांब्या व जवळपास एखादी नदी किंवा विहीर असली, तरी त्याचे पूर्ण समाधान होते.
सध्याच्या भांडवली व्यवस्थेत आर्थिक विकास म्हणजे उत्पन्न, अशी व्याख्या केली जाते. अर्थात उत्पन्न हे आर्थिक विकासाचे एक कारण असले, तरी ते अनेक कारणातील एक कारण आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. माणसाच्या राहणीमानात सुधारणा होणे म्हणजे त्याने फक्त जास्त खर्च करणे, असे नसून त्याचा सर्वांगीण कास होणे हे आहे, असे अमर्त्य सेन ठासून सांगतात. त्याचबरोबर त्यांनी विकास ‘इकॉनॉमिक ग्रोथ (आर्थिक वाढ) आणि ‘इकॉनॉमिक डेव्हलपमेंट’ (आर्थिक विकास) यांच्यातला फरक स्पष्ट केला आहे. आर्थिक वाढीमध्ये फक्त राष्ट्रीय उत्पनाची वाढच लक्षात घेतली जाते, तर आर्थिक विकासात मात्र लोकांच्या उत्पन्नाबरोबरच लोकांचं शिक्षण, आरोग्य आणि एकंदरीतच राहणीमानातल्या सुधारणा लक्षात घेतल्या
जातात. १९८१ साली प्रा. सेन यांनी ‘पॉव्हर्टी अँड फॅमिन्स’ हे महत्त्वाचे पुस्तक लिहिले. प्रत्यक्ष उत्पादनापेक्षा वितरणातल्या त्रुटीमुळे दुष्काळ निर्माण होतात, हे मत त्यात मांडले होते. त्यासाठी त्यांनी १९४३ सालच्या बंगालमधील भीषण दुष्काळाच्या स्मृती जागवल्या आहेत. पीक आले नाही म्हणून हा दुष्काळ पडला नव्हता, तर ब्रिटनमध्ये दुसऱ्या महायुद्धातील सैन्याला अन्नपुरवठा करण्यासाठी बंगालमधील
अन्नधान्य ब्रिटनकडे वळविण्यात आले होते आणि त्यामुळेच बंगालमधील लक्षावधी लोक अन्नान्न करून मृत्युमुखी पडले होते, हे त्यांनी स्पष्ट केले होते.
डॉ. अमर्त्य सेन यांनी हे दाखवून दिले आहे की, चांगले शिक्षण हे देशाच्या आर्थिक विकासाची गुरुकिल्ली होय. यातून जनशिक्षणासाठी अधिक संसाधने गोळा केली जाऊ शकतात. तसेच ती एका चांगल्या गोष्टीची सुरुवात होऊन शकते. प्रा. सेन यांच्या मते साक्षरता ही केव्हाही चांगलीच, पण ती केवळ साक्षरतेच्या होणाऱ्या फायद्यामुळे नव्हे, तर त्यामुळे माणूस जास्त सुसंस्कृत बनतो म्हणून! शिक्षणामुळे अनेक पर्याय लोकांना उपलब्ध होतात आणि त्यामुळे त्यांचे ‘वेल्फेअर’ (कल्याण) सुधारते. याउलट अशिक्षित लोकांना यातले कुठले पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य नसतं आणि त्यामुळे त्यांचे ‘वेल्फेअर’ हे सगळ्यात कमी असते.
स्त्रीपुरुष विषमता
स्त्री-पुरुष विषमतेच्या परिणामांविषयी प्रा. अमर्त्य सेन यांनी बरंच काही सांगितलं आहे. त्यांच्या मते श्रीमंत देशांमध्ये दर १०० पुरुषांमागे १०५ बायका हे प्रमाण आहे. गरीब देशामध्ये १०० पुरुषांमागे ९४च बायका आहेत. जर गरीब देशातसुद्धा बायकांना जास्त समानतेनं वागवलं गेलं असतं, तर तिथेही हा दर १०० पुरुषांमागे १०५ च्या दरम्यान बायका असा झाल्या असता पण त्या ९४च राहिल्या आहेत. म्हणजेच दर १०० पुरुषांमागे १० ते ११ बायका आज जिवंत राहिल्या असत्या. डॉ. अमर्त्य सेन यांच्या मतानुसार अजून सुमारे १० कोटी बायका या गरीब देशात जिवंत राहू शकल्या असत्या. त्यामुळे नैतिक व आर्थिक या दोन्ही कारणांमुळे आर्थिक विकास साधावयाचा असेल, तर प्राधान्य क्रमाने बायकांनाच साक्षर व सक्षम करण्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे, असे सेन म्हणतात.
आर्थिक विकास कमी असताना पुरुषांपेक्षा बायकांनाच त्याचे तोटे जास्त सहन करावे लागतात, असं सेन म्हणतात. उदाहरणार्थ गरीब राष्ट्रांमध्ये मर्यादित उत्पन्न असताना मुलाच्या शिक्षणावर खर्च करायचा का मुलीच्या? या प्रश्नाचा कठोर निर्णय घ्यावा लागतो. तेव्हा अर्थातच मुलंच जास्त शिकतात. याशिवाय समाजातल्या प्रथा, चालीरिती आणि मागासलेले विचार यात आणखीनच भर टाकतात. म्हणूनच गरीब कुटुंबांमध्ये बायकांच्या निरक्षरतेचं प्रमाण निश्चितच जास्त असतं. हे जसं शिक्षणाचं, तसंच आरोग्याचंही असतं, हे सेन पटवून देतात. पुरुषांपेक्षा बायका जास्त गंभीररित्या आजारी पडल्या, तरच त्या हॉस्पिटलमध्ये जातात. शिवाय गरीब जनतेत बायकांना पुरुषांपेक्षा आणखीनच कमी पौष्टिक अन्न खायला मिळतं. प्रा. सेन यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे दक्षिण आशियाई राष्ट्रातून शेकडो लाख महिला
पुरुषांच्या मानाने भरपेट खाऊ शकत नाहीत किंवा आरोग्याची देखभाल करू शकत नाहीत. त्यामुळे त्या मृत्यूच्या भक्ष्यस्थानी पडतात, असं डॉ. अमर्त्य सेन यांनी १९८४ मध्ये अभ्यासानं दाखवून दिलं आहे.
भारताच्या प्रगतीबद्दल असमाधानी
अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवून भारताचा गौरव जगात वाढविणारे डॉ. अमर्त्य सेन भारतातील सामाजिक, आर्थिक प्रगतीबाबत मात्र फारसे समाधानी व उत्साही वाटत नाहीत. देशाची प्रगती राजकीय, आर्थिक व सामाजिक विषयात जोखता येते. निवडणुका, नागरी हक्क, वृत्तपत्र स्वातंत्र्य आदीबाबत भारताने समाधानकारक प्रगती केली आहे, त्यामुळे येथे लोकशाही टिकून राहिली आहे. आर्थिक क्षेत्रातील यश अपयश संमिश्र स्वरूपाचे आहे. आर्थिक क्षेत्रात थोडे यश आणि मोठे अपयश दिसून येते. राजकीयदृष्ट्या भारताने अणुस्फोट करण्याची आवश्यकता नव्हती, असे त्यांचे मत आहे. आर्थिक क्षेत्रातील भारताची कामगिरी त्यांना निराशाजनक वाटते. तसेच चित्र त्यांना सामाजिक क्षेत्रात दिसते. आरोग्याविषयक
मूलभूत सुविधांचा अभाव, निरक्षरता, बालकांचे कुपोषण या आघाड्यांवर भारताने
फारसे काही केलेले नाही. भारताचा विकास न होण्यास अज्ञान आणि आर्थिक
स्रोतांचा अभाव या दोन बाबी प्रामुख्याने महत्त्वाच्या आहेत. सोबत सरकार, वित्तीय
संस्थांकडून येणारा पैसा शेवटच्या घटकापर्यंत न पोहोचणे हेसुद्धा एक कारण आहे.
भारताच्या आजच्या दुरवस्थेवर बोलताना ते सतत आग्रहीपणाने आपले मत मांडत आलेले आहेत की, सरकारने शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षितता व जमिनीच्या फेरवाटपाच्या प्रश्नात अधिक लक्ष द्यावयाला हवे होते. वैश्वीकरण खूप चांगले सिद्ध होऊ शकते, पण दिशेने प्रगती करीत असताना देश सामाजिक संधीच्या अनुपलब्धतेकडे निरक्षरता, आरोग्य याकडे दुर्लक्ष करीत असेल, तर त्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण होऊन, त्यातच त्याचा शेवट होईल. जगात ब्राझिलचे हेच झाले आहे आणि भारताच्या बाबतीतदेखील मला हीच भीती वाटते, असा इशारा अमर्त्य सेन देतात. भारतातील दुरवस्था दूर करण्यासाठी डॉ. अमर्त्य सेन यांनी सुचविलेले काही उपाय पुढीलप्रमाणे आहेत- १) लोकशाहीचे संवर्धन २) योजनांचे प्रामाणिक कार्यान्वयन ३) सरकारी व खाजगी क्षेत्राद्वारे द्रुतगतीने सामाजिक प्रगतीसाठी प्रयत्न करणे ४) आमूलाग्र आर्थिक परिवर्तन ५) समानता आणि ६) दळणवळणातील अडथळे दूर करणे इ. भारतामध्ये केरळसारख्या छोट्या राज्यात अल्प उत्पन्नातील गरिबांनासुद्धा शिक्षण न आरोग्य सेवा यांचा लाभ व्हावा म्हणून तिथल्या शासनात जागरूकता अधिक आहे. तिथे लिंगभेदाबाबतही सजग अशी जागृती आहे, असे डॉ. अमर्त्य सेन
यांचे निरीक्षण आहे. अन्य राज्यातील सरकारांनी पण अशीच जागरूकता दाखवावी, अशी प्रा. अमर्त्य सेन यांची अपेक्षा आहे.
भारतरत्न पुरस्कार
अर्थशास्त्रावर डॉ. अमर्त्य सेन यांनी विपुल लेखन केले असून त्यांच्या नावावर पुढीलप्रमाणे पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. १) रॅशनॅलिटी अँड फ्रीडम २) चॉईस, वेल्फेअर अॅड मिसमेजरमेंट आरग्युमेंटिटिव्ह इंडियन ३) कॅपॅबिलिटीज, फ्रीडम अँड इक्विलिटी ४) कमोडिटीज अॅड कॅपॅबिलिटीज ५) डेव्हलपमेंट अँड फ्रीडम ६) आयडेंटिटी अॅड व्हायलन्स ७) इंडिया डेव्हलपमेंट अँड पार्टीसिपेशन ८) इंडियन डेव्हलपमेंट ९) युटीलिटीरिझम अँड बियाँड १०) द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ११) रिसोर्सेस, व्हॅल्यू अँड डेव्हलपमेंट १२) रिझन बिफोर आयडिन्टी १३) इंडिया इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अॅड सोशल अपॉच्र्युनिटी १४) इन इक्विलिटी रिएक्झमाईन.
अशा त-हेने कल्याणकारी अर्थशास्त्राचे प्रणेते, शरीराने परदेशात पण मनाने सदैव भारतात वास्तव्यात असलेल्या अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांना त्यांच्या या अद्वितीय कामगिरीच्या गौरवार्थ भारताचा सर्वश्रेष्ठ नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ १९९९ साली प्रदान करण्यात आला. त्यापूर्वी एकच वर्ष आधी म्हणजे १९९८ साली त्यांना जगातील सर्वोच्च नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. ‘रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या संस्थेने प्रा. अमर्त्य सेन यांना ‘नोबेल पुरस्कार’ जाहीर करताना त्यांच्या अर्थशास्त्रातील योगदानाचा पुढीलप्रमाणे मुक्तकंठाने गौरव केलेला आहे, ‘अमर्त्य सेन यांनी कल्याणकारी अर्थशास्त्रातील मूलभूत प्रश्नांच्या संशोधनात अत्यंत मोलाची भर घातली आहे. दारिद्र्य किंवा लोककल्याण यासारख्या संकल्पनांच्या तात्विक चिकित्सेपासून दुष्काळासंबंधी प्रत्यक्ष अनुभवावरून आधारलेल्या अभ्यासापर्यंत प्रा. अमर्त्य सेन यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे. स्थूलमानाने या अभ्यासामागे समाजातील लाभांचे समान वाटप हे सूत्र असले, तरी प्रा. सेन यांचा सर्वोच्च भर आहे, तो गरिबातल्या गरिबाच्या कल्याणावरच ! समाजाच्या विविध थरांमध्ये होणाऱ्या लाभांच्या विविध वाटपाच्या आकडेवारीच्या आधारे त्यांनी गरिबीचे नवे निर्देशांक सूचित केले आहेत. अर्थशास्त्र व तत्त्वज्ञान या दोन्ही विषयांवरील सिद्धांतांच्या मिलाफामुळेच प्रा. सेन यांच्या विवेचनातून महत्त्वाच्या आर्थिक प्रश्नांची दुष्काळाची दाहकता धान्याच्या टंचाईने जाणवते, अशी सार्वत्रिक समजूत आहे. पण ती चुकीची असून गोरगरिबाकडे रोजगार नाही, रोजगार नाही म्हणून धान्य खरेदीसाठी पैसे नाहीत, त्यामुळे गरिबांची दुष्काळात परवड होते, असे त्यांचे निरीक्षण सखोल
अभ्यासाअंती पक्के झाले होते. त्यांच्या या विश्लेषणावर आधारित ‘कामाच्या मोबदल्यात धान्य’ ही योजना पुढे भारत सरकारने स्वीकारली. त्यामुळे भीषण दुष्काळातही माणसे भुकेने मरण्याची पाळी बंद झाली.
दुष्काळ हा धान्याच्या तुटवड्याचा परिणाम असतो; या रूढ कल्पनेला धक्का देऊन त्यांनी दारिद्र्य व विषमता यांचाही त्यात मोठा वाटा असतो, हे सिद्ध केले आहे. भारत, बांगलादेश आदि देशातील दुष्काळाचे सातत्याने संशोधन करून त्यांनी असे दाखवून दिले आहे की, धान्य उत्पादनात आधीच्या वर्षापेक्षा लक्षणीय घट झालेली नसूनही एखाद्या प्रदेशात भीषण दुष्काळ पडू शकतो. दुष्काळाशी सामना कसा करावा, या संबंधीचे विस्तृत विवेचन त्यांनी केलेले आहे. भारतात लोकशाही व स्वतंत्र पत्रकारिता असल्यामुळे देशात दुष्काळ पडला, तरी भूकबळींची संख मर्यादित राहते. उलट चीनमध्ये सर्वंकष सरकारी यंत्रणा असल्यामुळे तेथे पडलेल्या भीषण दुष्काळात लक्षावधी लोक बळी पडले, हे प्रा. सेन यांनी दाखवून दिले आहे.
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.