Dr Zakir Hussain
भारतरत्न डॉ. झाकीर हुसेन Dr. Zakir Hussain यांच्यावर एक अद्वितीय संघर्ष, संघटना आणि संघटकता वाढवलेल्या जीवनाची कथा आहे. त्यांच्यावर अद्वितीय संग्रहालय आहे, ज्यामुळे त्यांना एक समर्पित नागरिक आणि नागरिक अधिकारांच्या अधिक्षेपात आणि वास्तव्यात्मक न्यायाच्या आवश्यकता आहे.
‘भारतातील संस्कृती कुठूनही आलेली असली आणि कुणीही ती समृद्ध करण्याचे प्रयत्न केले असले, तरी तिच्यातील मौलिक ऐक्याची जपणूक करण्याची प्रतिज्ञा मी करीत आहे. संपूर्ण भारत हे माझे घर आहे आणि येथील जनता हे माझे कुटुंब आहे. या कुटुंबाचा प्रमुख म्हणून जनतेने काही काळासाठी म्हणून का असेना पण माझी निवड केली आहे. हे घर मजबूत व सुंदर बनविण्यासाठी एक न्यायपूर्ण, संपन्न व उमदे जीवन उभारण्याच्या रोमहर्षक कार्यात गुंतलेल्या महान जनतेला साजेल असे घर उभारण्यासाठी मी मनःपूर्वक प्रयत्न करीन!’
वरील उद्गार १३ मे १९६७ रोजी भारताचे तिसरे राष्ट्रपती म्हणून शपथविधी समारंभानंतर डॉ. झाकीर हुसेन यांनी काढलेले आहेत. मुस्लीम जातीयवादाच्या उठावणीला जे काही थोडे मूठभर विचारी व संस्कारी मुस्लीम नेते बळी पडले नाहीत, त्यात डॉ. झाकीर हुसेन अग्रभागी आहेत. ‘ईश्वर अल्ला तेरे नाम । सबको सन्मति दे भगवान !’ या गांधीजींच्या प्रार्थनेला प्रत्यक्ष कृतीने प्रतिसाद देण्यात ज्यांनी उभा जन्म वेचला, त्यात डॉ. झाकीर हुसेन यांची गणना करावी लागेल.
जन्म, बालपण व शिक्षण
खऱ्या अर्थाने सच्चे राष्ट्रीय मुसलमान असलेले भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन याचा जन्म दक्षिण हैदराबाद या पूर्वीच्या संस्थानाच्या राजधानीत ८ फेब्रुवारी १८९७ रोजी झाला. ते मूळचे सरहद्द प्रांतातील सुन्नीपंथी मुसलमान. उत्तरप्रदेशातील खानदानी अफगाण घराणे. फरुखाबाद जिल्ह्यात कैमगज येथे हे कुटुंब राहत होते. त्यांचे वडील फिदा हुसेन हे हैदराबाद शहरातील एक नामवंत वकील होते. खरे म्हणजे त्यांच्या मागील अनेक पिढ्यांनी लष्करात पराक्रम गाजविले होते. शौर्य आणि पराक्रम याविषयी त्यांच्या घराण्याचा लौकिक होता. पण फिदा हुसेन यांना शिकूनसवरून मोठे व्हायचे होते. समाजात नाव कमवायचे होते. यासाठी करीमगंज हे आपले गाव सोडून ते हैदराबादला राहायला आले. तेथे शिकून त्यांनी वकिली सुरू केली. त्यांचा व्यवसाय वकिलीचा असला तरी धर्मावर त्यांची निष्ठा होती. ‘धार्मिक वृत्ती अनैतिक वर्तणुकीला पायबंद घालतात’ असे ते म्हणायचे. फिदा हुसेनना एकूण ७ अपत्ये झाली. त्यात झाकीरचा नंबर तिसरा होता. वडिलांच्या खास व्यवस्थेमुळे लहानपणी झाकीरला शाळेत जायची पाळीच आली नाही. एक इंग्लिश लेडी त्यांना शिकवायला घरी येत असे. झाकीर जात्याच हुशार असल्याने एकदा शिकविलेले तो पक्के लक्षात ठेवीत असे. आपली मुले हुशार व बुद्धिमान आहेत याचा फिदा हुसेनना अभिमान वाटे. त्यासाठी ते आपल्या मुलांना सर्व सोयी सवलती उपलब्ध करून देत असत. वडिलांच्या या तीव्र इच्छेला झाकीरने चांगलाच प्रतिसाद दिला. पुढे झाकीर हुसेन थोर शिक्षणतज्ज्ञ झाले, हे पाहावयास त्यांचे वडील राहिले नाहीत, पण आपल्या वडिलांच्या इच्छापूर्तीचे समाधान झाकीर हुसेन यांना पुढे हयातभर मिळाले, असे म्हणावयास काही हरकत नाही.
झाकीर हुसेन दहा वर्षांचे असतानाच त्यांचे वडील फिदा हुसेन यांचे दुःखद निधन झाले. त्यांचा मृत्यू म्हणजे नियतीने हुसेन कुटुंबीयांवर केलेला दुर्दैवी आघातच होता. त्यांच्या घरात मिळवते कोणी नव्हते. त्यामुळे सारे कुटुंबच निराधार झाले होते. हैदराबाद शहरात राहणेही त्यांना परवडणारे नव्हते. त्यामुळे हुसेन कुटुंबाने हैदराबाद सोडायचा निर्णय घेतला. झाकीरचे वय त्यावेळी अवघे नऊ वर्षांचे होते. दीनवाण्या मुद्रेने वडिलांच्या आठवणी उराशी कवटाळून त्यांनी हैदराबाद शहर सोडले आणि सारे हुसेन कुटुंब उत्तर प्रदेशात इटावा या गावी दाखल झाले. इटावा येथील इस्लामिया विद्यालयात झाकीरचे नाव दाखल करण्यात आले. या शाळेचे मुख्याध्यापक अल्ताफ हुसेन हे कडक शिस्तीने म्हणून प्रसिद्ध होते. शाळेतील साऱ्या विद्यार्थ्यांनी स्वावलंबी बनावे, अशी त्यांची अपेक्षा असे. ‘अल्ताफ हुसेन गुरुजींनी लहानपणी माझी जडणघडण केली. त्यामुळे मी एवढ्या पदापर्यंत येऊन पोहोचलो.’ असे डॉ. झाकीर हुसेन अखेरपर्यंत म्हणत असत.
शालेय शिक्षण चालू असतानाच १९११ मध्ये झाकीरच्या आईचे दुःखद निधन झाले. त्यावेळी ते १४ वर्षांचे होते. त्यांच्या जीवनातील हा दुसरा मोठा आघात होता. या कालखंडात सुफी हसन शहा यांनी त्यांचा चांगल्या रीतीने सांभाळ केला.
इटावा येथील वास्तव्यात अल्ताफ हुसेन गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली झाकीरचे शिक्षण व्यवस्थित चालले होते. १९१३ मध्ये आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करून झाकीर पुढील शिक्षणासाठी अलिगढ येथे आले. १९१८ मध्ये ते बी.ए. उत्तीर्ण झाले.
१९२१ साली एम.ए. नंतर झाकीरसाहेब कायद्याचा अभ्यास करीत असतानाच गांधीजींनी असहकाराचे रणशिंग फुंकले आणि तरुणांना त्यांनी शिक्षणावर बहिष्कार टाकण्याचा आदेश दिला. गांधीजींची ही हाक ऐकून तरुण व उमद्या झाकीरने आपले शिक्षण मध्येच थांबवले व ‘जामिया मिलिया इस्लामिया’ या मुस्लिमांना राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थेच्या उभारणीत सिंहाचा वाटा उचलला. यावेळी पहिल्यांदाच डॉ. झाकीर हुसेन यांचा गांधीजींशी संबंध आला आणि तो अखेरपर्यंत टिकला. याच सुमारास ते मुस्लीम लीग या जातीय संघटनेत दाखल झाले असते, तर ते मुस्लीम लीगचे फार मोठे पुढारी झाले असते. परंतु जातीयवादी संघटनेत न जाता ते राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आले आणि आजन्म ‘गांधीवादी’ बनले.
१९२२ साली झाकीर हुसेन उच्च शिक्षणासाठी जर्मनीला गेले. तेथे त्यांनी बर्लिन विद्यापीठाच्या एम.ए. आणि पीएच.डी. या पदव्या मिळवल्या. जर्मनीमध्ये अध्ययन चालू असतानाच त्यांनी गांधीजींचे चरित्र लिहिले. अशा त-हेने १९०७ पासून १९२६ पर्यंत सतत १९ वर्षे झाकीर हुसेन यांनी विद्याव्यासंगात घालविली. पीएच.डी. पदवी प्राप्त करून तीन वर्षांच्या जर्मनीतील वास्तव्यानंतर डॉ. झाकीर हुसेन भारतात परतले. बर्लिन विद्यापीठाची डॉक्टरेट मिळविलेल्या डॉ. झाकीर हुसेनना हिंदुस्थानात आल्याबरोबर लठ्ठ पगाराची नोकरी कोठेही मिळाली असती. परंतु त्यांनी मोठ्या परिश्रमपूर्वक मिळविलेली विद्या अशी केवळ पोटार्थी बनण्यासाठी नव्हती. त्यामुळे भारतात परतल्यावर पैसा, ऐश्वर्य, सुख यांच्या मागे न लागता, आपणच स्थापन केलेल्या जामिया मिलिया इस्लामिया या संस्थेची सारी सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली.
१९२६ पासून १९४८ पर्यंत तब्बल २२ वर्षे त्यांनी या संस्थेचे कुलगुरूपद भूषवले. सुरुवातीला एम.ए. झाल्याबरोबर काही दिवस झाकीरसाहेब एक प्राध्यापक म्हणून या संस्थेत दाखल झाले होते. त्यावेळी त्यांचा दरमहाचा पगार होता केवळ ४० रुपये! पुढे विदेशात जाऊन आल्यानंतर कुलगुरू झाल्यावर त्यांचे वेतन होते
फक्त १०० रुपये! एवढ्या अल्प वेतनात राहणारा कुलगुरू कदाचित हा एकमेव असावा. आपला खर्च एवढ्याच रकमेत भागवण्यासाठी ते साधा आहार घेत असत, साधे कपडे वापरीत असत आणि कामानिमित्त बाहेर जाताना कधी साध्या टांग्याने, कधी बसने, तर कधी पायीदेखील जात असत. संस्थेचे कुठलेही हलके सलके काम करण्यास त्यांना कधी संकोच वाटत नसे. अन्य सेवकवर्गानेही कमीत कमी वेतनावर सेवाभावी वृत्तीने काम करावे, अशी त्यांची अपेक्षा असे. त्याप्रमाणे विनावेतन काम करणाऱ्या आदर्श सेवकांची एक फळीच त्यांनी निर्माण केली होती. झाकीरसाहेबांनी केलेल्या या त्यागाचे मोजमाप कसे करावयाचे ?
एक अगगण्य भारतीय शिक्षणतज्ज्ञ
डॉ. झाकीर हुसेन यांचे गांधीजी हे खरेखुरे स्फूर्तिस्थान होते. शिक्षण पद्धती कशा प्रकारची असावी, या बाबत गांधीजींचे विचार अन्य शिक्षणतज्ज्ञांहून काहीसे निराळे होते. त्यामुळे ‘जामिया मिलिया’च्या स्थापनेपासूनच त्यांनी स्वयंशिक्षण पद्धतीवर भर दिला होता. नवनवीन कल्पनाही त्यांनी राबविल्या. कुटिरोद्योग, मूलोद्योग, प्रौढशिक्षण इत्यादी गांधीजींना अभिप्रेत असलेल्या शिक्षणप्रणालींचा अंमल डॉ. झाकीर हुसेन यांच्याकडून मुक्तपणे आणि विचारपूर्वक होत असे. त्यामुळे गांधीजींना डॉ. झाकीर हुसेन यांच्याबद्दल विशेष आस्था वाटत असे. आपल्या या शैक्षणिक विचारप्रणालीला राष्ट्रीय स्तरावर राबविले पाहिजे, या हेतूने भारतातील शिक्षणक्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ज्ञ लोकांची एक समिती निर्माण करण्यात आली होती. ‘राष्ट्रीय मूलोद्योग समिती’ हे या समितीचे नाव होते. १९३७ पासून या समितीचे कार्य सुरू झाले. डॉ. झाकीर हुसेन यांच्याकडे गांधीजींनी या समितीचे अध्यक्षपद सोपविले. या समितीने विविध योजना आखल्या. प्रचारासाठी राष्ट्रव्यापी दौरे आयोजित केले. ‘नई तालीम’ या नावाचे एक मासिक सुरू केले. त्याद्वारेही प्रचार कार्य चालू ठेवले. पण नुसता प्रचार करून झाकीर हुसेन थांबले नाहीत. महात्माजींच्या या कल्पनेनुसार कार्य करणाऱ्या व शिक्षण देणाऱ्या संस्था ठिकठिकाणी कार्यरत करण्यात आल्या. गांधीजींची कल्पनाशक्ती आणि डॉ. झाकीर हुसेन यांचे प्रयत्न याद्वारे ‘राष्ट्रीय मूलोद्योग’चे कार्य लवकरच फलद्रूप झाले. ‘अग्रगण्य भारतीय शिक्षणतज्ज्ञ’ म्हणून झाकीर हुसेन यांच्याकडे भारतीय नेतेमंडळी मोठ्या आशेने
आणि अपेक्षेने पाहू लागली. जवाहरलाल नेहरूंनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सौहार्दाचे व शांततेचे संबंध प्रस्थापित व्हावेत म्हणून जसे ‘पंचशील’ पुरस्कारले होते, तसेच शैक्षणिक क्षेत्रात ‘परिवर्तनाचे पंचशील’ डॉ. झाकीर हुसेननी मांडले. या आपल्या कल्पनेचे स्पष्टीकरण करताना
ते म्हणतात, ‘अध्ययन, संशोधन व काही मर्यादित क्षेत्रात नेतृत्व निर्मिती ही विद्यापीठांची तीन पंरपरागत कार्ये मानली जातात, हे खरे. पण आता आधुनिक विद्यापीठांनी ती आणखी विस्तृत प्रमाणात करावीत. परंतु त्याच्याच जोडीने समाजाची सेवा व प्रौढ शिक्षण या दोन कार्यांची अधिक जोड द्यावी. भारतासारख्या देशात या कार्याचे फार महत्त्व आहे. देशातील सुशिक्षित तरुणवर्गातील उदासीनता नष्ट करून त्यांना लोकाभिमुख बनवील, अशा पद्धतीने शिक्षणाची पुनर्रचना केली पाहिजे. अशी पुनर्रचना केली तरच आपल्याला चिरस्थायी स्वरूपाची राष्ट्रीय पुनर्रचना करता येईल!’
डॉ. झाकीर हुसेन जवळ जवळ अकरा वर्षांपर्यंत राष्ट्रीय शिक्षण व मूलोद्योग समितीचे अध्यक्ष होते. ‘जामिया मिलिया इस्लामिया’ या संस्थेला स्थिरता लाभल्यावर डॉ. झाकीर हुसेन यांनी दिल्ली सोडली आणि ते अलीगढच्या मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरू बनले. पंडित जवाहरलाल नेहरू व मौलाना आझाद यांनी त्यांना अलीगढच्या मुस्लीम विद्यापीठाकडे लक्ष देण्याची खास विनंती केली होती. १९४८ ते १९५६ पर्यंत डॉ. झाकीर हुसेननी अलीगढ विद्यापीठाचे कुलगुरूपद सांभाळले आणि मुस्लीम जातीयतेचा अड्डा बनलेल्या या जातीयवादी मुस्लीम शिक्षणसंस्थेत निधर्मीपणाची व सर्वधर्मसमभावनेची शिकवण रुजविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. याबाबत डॉ. झाकीर हुसेनना काही प्रमाणात यश आले. अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचा कारभार पाहत असतानाच त्यांनी अनेक अन्य शैक्षणिक कार्यातही मोठ्या आस्थेने भाग घेतला. ‘इंटरनॅशनल स्टुडंट्स सर्व्हिस इंडिया कमिटी’ या संस्थेचे ते १९५५ पर्यंत चेअरमन होते. त्याचप्रमाणे ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी सर्व्हिस, जिनिव्हा’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचे १९५५ते १९५७ अशी २ वर्षे चेअरमन होते. ‘सेंट्रल बोर्ड ऑफ एज्युकेशन’, विद्यापीठ अनुदान मंडळ,’ ‘विद्यापीठ शिक्षण मंडळ’, तसेच ‘प्रेस कमिशन’, ‘युनेस्को एक्झिक्युटिव्ह बोर्ड’, ‘बेसिक नॅशनल एज्युकेशन कमिटी’ आदि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांची कामे करण्याचा बहुमान त्यांना मिळाला. डॉ. झाकीर हुसेनचे शैक्षणिक क्षेत्रातले हे महनीय कार्य लक्षात घेऊन १९५४ रोजी त्यावेळचे भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी त्यांना ‘पद्मविभूषण’
ही पदवी बहाल केली. एक थोर शिक्षणतज्ज्ञ म्हणून जवाहरलाल नेहरूंनी डॉ. झाकीर हुसेन यांची १९५५ साली राज्यसभेवर निवड केली. राज्यसभेत त्यांनी भरीव कामगिरी केली. तथापि राज्यसभेवर त्यांना फार काळ राहता आले नाही. उणीपुरी दोन वर्षेच ते तेथे होते. १९५० साली सार्वजनिक निवडणुका जाहीर झाल्यामुळे त्यांच्या सभासदत्वाची
मुदतही संपुष्टात आली. त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका झाल्या. काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली. नेहरू पुन्हा पंतप्रधानपदावर आले. पुनश्च पंतप्रधान झाल्यावर नेहरूंनी डॉ. झाकीर हुसेन यांची बिहारच्या राज्यपालपदावर नियुक्ती केली. १९५७ पासून पुढे ५ वर्षेपर्यंत त्यांनी हे पद भूषवले. राज्यपालपदी असताना बिहारच्या शैक्षणिक उन्नतीसाठी त्यांनी विशेष लक्ष पुरवले.
उपराष्ट्रपती व भारतरत्न
१९५७ ते १९६२ पर्यंत डॉ. झाकीर हुसेन बिहारचे राज्यपाल होते. या काळात डॉ. राजेंद्रप्रसाद हे राष्ट्रपती आणि डॉ. राधाकृष्णन् हे उपराष्ट्रपतीपदावर आरूढ झालेले होते. परंतु १९६२ साली राजेंद्रप्रसादांची राष्ट्रपतीपदाची मुदत संपणार होती. यापूर्वी २ वेळा राष्ट्रपती म्हणून निवड झाल्याने पुन्हा तिसऱ्यांदा राष्ट्रपती होण्यास राजेंद्रप्रसादांनी स्पष्ट नकार दिला. त्यांच्याजागी डॉ. राधाकृष्णन यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाल्याने त्यांची उपराष्ट्रपतिपदाची जागा रिकामी झाली. या जागेवर १९६२ साली डॉ. झाकीर हुसेन यांची उपराष्ट्रपतिपदी निवड करण्यात आली. उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. त्यामुळे डॉ. झाकीर हुसेन यांच्यावर दुहेरी जबाबदारी येऊन पडली. त्यांच्या गुणवत्तेला २ नवीन क्षेत्रे मिळाली. राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून काम करताना सत्ताधारी व विरोधक यांचा त्यांनी विश्वास संपादन केला. राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांची वागणूक निःपक्षपाती व सौजन्याची असे.
डॉ. झाकीर हुसेन यांनी उपराष्ट्रपती म्हणून इथिओपिया, सुदान, युनायटेड अरब रिपब्लिकन (१९६३), जुलप्पोरिया, ट्युनिशिया आणि मोरोक्को (१९६४) आणि कुवेत, जॉर्डन, टर्की आणि ग्रीस (१९६५) या देशांना सदिच्छा भेटी दिल्या. ते अफगाणिस्तानात शासकीय दौऱ्यावर गेले असता त्यांचे जिवलग मित्र खान अब्दुल गफारखान (सरहद्द गांधी) यांच्याशी त्यांची भेट झाली होती (१९६६).
आपल्या उपराष्ट्रपतिपदाच्या ५ वर्षांच्या कारकिर्दीत विविध देशांना भेटी देऊन भारताचे निधर्मी (Secular) लोकशाहीवादी राजकारणच जगाला शांतता देऊ शकेल, हे त्यांनी आवर्जून सांगितले. भारतीय आणि बाहेरील विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. पदवीने गौरवले होते. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाने त्याना ‘डॉक्टर ऑफ लॉज’ या पदवीने गौरवले. त्यावेळी तेथील खास पदवीदान समारंभात त्यांनी ‘राष्ट्रवादाची जोपासन करणाऱ्या सरकारचे नैतिक कर्तव्य’ या विषयावर विचार मांडले. ते म्हणाले, ‘विचारी माणसे तयार केली पाहिजेत. अशीच माणसे राष्ट्रवादाची जोपासना करणाऱ्या सरकारला राजकीय सत्तेचा दुरुपयोग करण्यापासून
वाचवू शकतील!’
अशा या गुणी व ज्ञानी माणसाने भारताची थोर अशी सेवा केली. या महान सेवेसाठीच राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी १९६३ साली डॉ. झाकीर हुसेन यांना ‘भारतरत्न’ ही सर्वोच्च पदवी देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. डॉ. झाकीर हुसेन यांच्या उदारमतवादी व गांधीवादी राष्ट्रीय दृष्टिकोनाचे जवाहरलाल नेहरूंना कौतुक वाटे. दरम्यान १९६३ साली म्हणजेच पंडितजी हयात असताना हुसेनना ‘भारतरत्न’ या किताबाने गौरविण्यात आले. एका दृष्टीने त्यांचा सन्मान करून पंडितजींनी आपली अंतिम इच्छा पूर्ण करून घेतली, असेच म्हणावे लागेल.
‘यः क्रियावान् सः पंडीतः’
डॉ. झाकीर हुसेन यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती, ते नेहमी खादीच्या पांढऱ्या स्वच्छ पोषाखात असत. ते चांगले उंचेपुरे, देखणे व लालबुंद दिसत. त्यांच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर सोनेरी बारीक काडीचा चष्मा असे. मुस्लिमांप्रमाणेच ते ‘बुलगॅन’ दाढी ठेवत असत. त्यांचे कपाळ भव्य होते. त्यांचा गॉगल घातलेला चेहरा अनेकाना आठवत असेल. गुलाबपुष्पाप्रमाणे ते सदैव टवटवीत असत. राष्ट्रपती म्हणून आपल्या वास्तव्यात त्यांनी राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनमध्ये विशेष रस घेतला. मुघल गार्डन अतिप्रचंड आहे. राष्ट्रपती भवनाच्या बिल्डिंगला लागूनच ते सुरू होते. त्याचे चार भाग आहेत. पहिल्या भागात मुख्य बाग आहे. या बागेच्या दक्षिणोत्तर टेरेस गार्डन आहेत, तर पश्चिमेकडे लॉग गार्डन आहे. यात सहा कमळांच्या आकाराचे कारंजे असून त्यातून येणारा पाण्याचा मंजुळ आवाज अभ्यागतांना सुखविल्यावाचून राहत नाही. दोन मोठ्या हिरवळींनी राष्ट्रपती भवनाची शोभा अधिकच वाढवली आहे. संध्याकाळी हिरवळीवर मोर नाचताना दिसतात. या शिवाय पोपट, मैना, कबुतरे आणि बदकांनी बागेला विशेष चैतन्य येते. पक्ष्यांचा कलरव या वातावरणाला अधिकच गूढता देतो. गुलाबांच्या रोपांनी बागेला मनोहारी रंगाचे रूप मिळते. येथे एकंदर २५० प्रकारची गुलाबाची रोपे आहेत. येथील गुलाबांच्या रोपांना विविध भारतीय नेत्यांची नावे दिलेली आहेत. त्यात मदर टेरेसांपासून राजा राममोहन
रॉयपर्यंत अनेकांचा समावेश आहे. बागकाम हा डॉ. झाकीर हुसेनचा आवडता छंद होता. दररोज सकाळ- संध्याकाळ काही वेळ बगीच्यात घालविल्याशिवाय त्यांना चैनच पडत नसे. गुलाबांची कितीतरी नवनवीन रोपे त्यांनी तयार केली आणि त्यांना मजेशीर नावेही दिली. काही नव्या जातीच्या गुलाबांना डॉ. राधाकृष्णन् तर काहींना डॉ. झाकीर हुसेन अशी त्यांनी नावे ठेवली आहेत. त्यांच्या एका मित्राने पॅरिसहून काही गुलाबाची कलमे धाडली
होती. दुर्दैवाने पुढे त्यांचा तो मित्र निधन पावला. डॉ. झाकीर हुसेननी आपल्या बागेत त्या जातीच्या गुलाबांचा ताटवाच फुलवून आपल्या मित्राचे चिरंतन स्मारक बनवले.
फुलांप्रमाणेच त्यांचे मुलांवरही प्रेम होते. लहान मुलांसाठी त्यांनी अनेक लहानमोठ्या व चटकदार गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांच्या या गोष्टी मनोरंजनात्मक तर आहेतच, पण त्याबरोबरच बोधप्रदही आहेत. लहानपणी आम्ही हायस्कूलमध्ये शिकत असताना हिंदी पाठ्यपुस्तकांतील त्यांची ‘अब्बूखाँ की बकरी’ ही छोटीशी चटकदार गोष्ट वाचल्याचे आजही चांगले आठवते. लेखन, वाचनाप्रमाणे त्यांना इतरही बरेच छंद होते. पुराणवस्तू गोळा करणे, हस्ताक्षरे व पुस्तके यांचा संग्रह करणे अशा त्यांच्या इतरही काही आवडी होत्या. जुनी नाणी आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या वस्तू या वस्तूंच्या पुराणअवशेषांच्या संग्रहातून एक विलक्षण आनंद लाभतो, असे ते म्हणत. यंत्रज्ञान व तंत्रज्ञान यांना साहित्य, काव्य, मनोरंजन व संगीत यांची जोड मिळाल्याखेरीज मानवी व्यक्तित्वाचा खराखुरा विकास होणार नाही, असे त्यांचे मत होते.
शिक्षणाप्रमाणेच अर्थशास्त्र हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय होता. त्यांनी ‘कॅपिटॅलिझम : अॅन एसे अंडरस्टैंडिंग’, ‘लेक्चर्स ऑन स्कोप अँड मेथड्स ऑफ इकॉनॉमिक्स,’ ‘डायनॅमिक युनिव्हर्सिटी’, ‘इकॉनॉमिक रिकन्स्ट्रक्शन इन इंडिया’ इत्यादी अर्थशास्त्रविषयक पुस्तके लिहिली असून ती विद्वन्मान्य ठरली आहेत. प्लेटोचे (‘Philosopher must be A King’) हे स्वप्न राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी खरे करून दाखवले, तर प्लेटोच्या गाजलेल्या ‘रिपब्लिक’ या प्रसिद्ध ग्रंथाचे राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांनी उर्दूत भाषांतर केले. डॉ. झाकीर हुसेन हे गाढे पंडित पण केवळ पढिक पंडित नाहीत तर ते क्रियाशील पंडित होते, हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते. ‘यः क्रियावान् सः पंडितः’ हेच त्यांचे यथार्थ वर्णन होय.
भारताचे तिसरे राष्ट्रपति
१९६७ साली डॉ. राधाकृष्णन राष्ट्रपतिपदावरून निवृत्त झाले. त्यामुळे राष्ट्रपतिपदाची निवडणूक जाहीर झाली. १९६७ सालची राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही जगात एक चर्चेची न उत्सुकतेची बाब होऊन राहिली. यापूर्वी डॉ. राजेंद्रप्रसाद व डॉ. राधाकृष्णन या दोघांनाही निवडणूक लढवावी लागली नाही. त्यांच्यावेळी काही नामधारी लोक जरी निवडणुकीला उभे राहिले असले, तरी त्यांची निवडणूक एकतर्फीच पार पडली होती. पण यावेळची परिस्थिती मात्र एकदम वेगळी होती. या पदासाठी आजवर निवडणूकच झालेली नव्हती. पण यावेळी विरोधी पक्षात जागृती आलेली होती. या खेपेला काँग्रेसला विरोध करावयाचाच ह्या उद्देशाने सर्व विरोधी
पक्षांनी एक आघाडी बनवून काँग्रेसतर्फे डॉ. झाकीर हुसेन यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश काका सुब्बाराव यांची उमेदवारी जाहीर केली. यावेळी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीला सर्वाधिक १७ उमेदवार उभे राहिले, तरी खरी लढत डॉ. झाकीर हुसेन विरुद्ध के. सुब्बाराव अशीच होती. १९६७च्या पहिल्या आठवड्यात ही अटीतटीची निवडणूक पार पडली. ९ मे १९६७ रोजी मतमोजणी पूर्ण होऊन डॉ. झाकीर हुसेन हे मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या आठ उमेदवारांना एकही मत पडले नाही. अन्य उमेदवारसुद्धा १७०० मतांपेक्षा अधिक मते खाऊ शकले नाहीत. या निवडणुकीत डॉ. झाकीर हुसेन यांना ४,७१,००० तर त्याचे प्रमुख प्रतिस्पर्धी के. सुब्बाराव यांना ३,५०,००० मते पडली होती. अशा त-हेने १,०७,००० मतांहून अधिक मते घेऊन डॉ. झाकीर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. पंतप्रधान इंदिरा गांधी यांना या घटनेचा विशेष आनंद झाला. ‘भारताची लोकशाही ही सर्वार्थाने धर्मनिरपेक्ष कशी आहे हे डॉ. झाकीर हुसेन यांच्या निवडीने स्पष्ट झाले आहे’, असे इंदिराजीनी उद्गार काढले.
डॉ. झाकीर हुसेन हे राष्ट्रपती म्हणून निवडून आले असले तरी, त्यांच्या विरोधात सुमारे साडेतीन लाख मते पडली होती. यापूर्वी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एवढे विरोधी मतदान कधी झाले नव्हते. त्यांच्या भोवतालचे राजकीय वातवारण मोठे कसोटीचे होते, पण एकदा हे पद मिळाल्यावर ते कुठल्याही एका पक्षाचे राहिले नाहीत. कुठल्याही प्रकारे पक्षीय भावना व भेदाभेद न बाळगता सर्व निर्णय त्यांनी शक्यतो निःपक्षपातीपणाने घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यात त्यांना काही प्रमाणात यशही आले. त्यांची राष्ट्रपतिपदाची कारकीर्द अवघी दोन वर्षांची (१९६७ते १९६९) होती. पण या अल्प अवधीतही त्यांनी बरीच कामे केली. ते रशियाच्या भेटीसाठी गेले. रशियात त्यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत झाले. भारत हा शांतताप्रेमी देश आहे, त्याचप्रमाणे अन्य देशांतही शांततेचे संवर्धन व्हावे, अशी इच्छा त्यांनी प्रकट केली. १९६७ साली महाराष्ट्रात कोयना परिसरात भूकंप झाला असता त्यांनी कोयनानगरला भेट देऊन भूकंपग्रस्तांना दिलासा दिला.
धर्म निरपेक्षतेचे प्रतीक
डॉ. झाकीर हुसेन राष्ट्रपती असतानाच नागा लोकांनी सैन्यासमोर शरणागती पत्करली होती. आपले चुकलेले देशबांधव सुधारत आहेत. हे पाहण्यासाठी डॉ. झाकीर हुसेन नागाप्रदेशाला भेट देण्यास गेले होते. ३ मे १९६९ पूर्वीच ते नागा प्रदेशाचा दौरा आटोपून आले होते.
३ मे १९६९ रोजी डॉ. झाकीर हुसेन यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्या दिवशी त्यांनी नित्याप्रमाणे सकाळचे प्रातर्विधी आटोपले होते. बागेत फेरफटका मारून आले. सकाळी दहाच्या सुमारास त्यांच्या पत्नी शहाजहान बेगम यांनी त्यांना पेलाभर दूध दिले. त्यादिवशी त्यांना थोडेसे अस्वस्थ वाटत होते, म्हणून त्यांनी न्याहारी घेतली नाही. थोड्या येरझारा घालून आपल्या आवडत्या ‘एडविना’ या खोलीत येऊन ते पुस्तक वाचीत बसले. नित्याप्रमाणे त्यांची प्रकृती तपासण्यासाठी अकरा वाजण्यापूर्वीच डॉक्टर हजर झाले. डॉक्टर आल्याबरोबर राष्ट्रपतींनी पुस्तक बाजूला ठेवले. बाथरूमला जाऊन येण्यासाठी ते उठले आणि बाथरूममध्येच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे ते कोसळले. कसेबसे ते बिछान्यापर्यंत येऊन पोहोचले. त्यांची प्रकृती तपासण्यासाठी आलेले डॉक्टर त्यांना सावरण्यासाठी धावले. डॉ. झाकीर हुसेनना हृदयविकाराचा तीव्र झटका आलेला आहे, हे लक्षात येताच त्यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले. त्यावेळी दोरायस्वामी या तज्ज्ञ डॉक्टरांनाही बोलावण्यात आले, पण ते येण्यापूर्वीच डॉ. झाकीर हुसेन अल्लाला प्यारे झाले होते. राष्ट्रपतिपदावर काम करीत असताना राष्ट्रपती भवनातच मृत्यू पावणारे ते भारताचे पहिले राष्ट्रपती होते.
पंतप्रधान इंदिरा गांधी सकाळीच राजस्थानच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. उपराष्ट्रपती भोपाळमध्ये होते. दोघांनाही ही दुःखद वार्ता कळविण्यात आली. आपापला दौरा अर्ध्यावरच टाकून दोघेही दिल्लीला राष्ट्रपती भवनात हजर झाले. सुन्त्री मुस्लीम प्रथेनुसार स्नान घालून शुभ्रवस्त्रात आच्छादलेला त्यांचा पार्थिव देह दरबार हॉलमध्ये ठेवण्यात आला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखो लोकांची रीघ लागली होती. सरकारी इतमामात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. डॉ. झाकीर हुसेन यांना गुलाबाची फुले फार आवडायची. हजारो गुलाबांच्या फुलांत त्यांचा मृतदेह चिरविश्रांती घेत होता. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार ‘जामिया मिलिया इस्लामिया’ या संस्थेच्या आवारात मुस्लीम धर्मविधीपूर्वक त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाचे सरकारी इतमानाने, २१ तोफांच्या सलामीने दफन करण्यात आले. राष्ट्रपतिपदाची त्यांची कारकीर्द उणीपुरी दोन वर्षांचीच झाली. पण त्यांनी निर्माण केलेले आदर्श, सेवाभावी वृत्ती, शिक्षणाविषयीची आस्था आणि निःस्वार्थी राष्ट्रसेवा हा भारतीय नेत्यांना आणि सर्व भारतीय जनतेला लाभलेला एक अमोल ठेवाच आहे, असे म्हणावे लागले.
डॉ. झाकीर हुसेन हे गांधीजींचे निष्ठावंत अनुयायी होते. ते धर्मनिरपेक्षता व सर्वधर्मसमभावाचे प्रतीक होते. देशाला स्वातंत्र्य देताना इंग्रजांनी धर्माच्या आधारावर
देशाची फाळणी करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी मुस्लीम लीगचे भूत उभे केले. बॅ. महंमदअल्ली जीनांनी मुसलमानांसाठी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली. यावेळी भारताच्या या फाळणीला खान अब्दुल गफारखान, मौलाना आझाद आणि डॉ. झाकीर हुसेन या राष्ट्रीय मुस्लिमांनी कडाडून विरोध केला. मुस्लीम लीगमुळे देशभर जातीय दंगली उसळल्या. त्यामुळे नेहरू, गांधीजी, सरदार वल्लभभाई पटेल या हिंदूंच्या नेत्यांनी भारत आणि पाकिस्तान फाळणीला मान्यता दिली. १९४६ मध्ये देशात जातीय दंगली उसळल्या, तेव्हा ‘जामिया मिलिया उस्मानिया’चा रौप्यमहोत्सव साजरा करण्यात येत होता. त्यावेळी डॉ. झाकीर हुसेन यांनी ‘जामिया म्हणजे काय?’ असे एक पत्रक काढले होते. त्यात स्वतंत्र भारतात मुस्लिमांची भूमिका काय असावी, यासंबंधात विवेचन करण्यात आले होते. अलीकडे धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भात आपल्या देशात अल्पसंख्याक असलेल्या मुस्लीमधर्मीयांनी काय भूमिका घ्यावी? कसा विचार करावा आणि कशी कृती करावी? याबद्दल बराच वादविवाद चाललेला असतो. त्यांना खरे मार्गदर्शन डॉ. झाकीर हुसेन यांच्या आचारविचारांवरून झाल्यावाचून राहणार नाही.
या धामधुमीच्या काळात १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अवघ्या पाच महिन्यात राष्ट्रपिता गांधीजींची निघृण हत्या झाली. ही हत्या नथूराम गोडसे नावाच्या एका मराठी माणसाने केली होती. त्यामुळे महाराष्ट्रीय माणसाविषयी महाराष्ट्राबाहेर अनेक प्रकारचे गैरसमज पसरले आहेत. गुणाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करायचे आणि दुर्गुणांचे मात्र ढोल बडवायचे अशी काही लोकांची वृत्ती असते. त्यांनी गांधी हत्येचे भांडवल करून महाराष्ट्राची बदनामी केली आहे. पण डॉ. झाकीर हुसेन मात्र सद्गुणाचे चाहते व पूजक होते. गुण पहावे आणि दोष टाळावे अशी उदार दृष्टी डॉ. झाकीर हुसेन यांची असे. ‘महाराष्ट्राने केवळ गांधीजींचा मारेकरी निर्माण केला हे ‘अर्धसत्य’ आहे. याउलट महाराष्टाने गांधीजींना आपला गुरू दिला आणि शिष्योत्तमही दिला, ही गोष्ट्र कृतज्ञ भारत कदापि विसरणार नाही!’
राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांचे हे उद्गार आहेत आणि तेसुद्धा निष्कारण महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या शिक्षणक्षेत्रातील एका अधिकाऱ्यापुढे काढलेले आहेत, हे आपण विसरता कामा नये.
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.