पंडित मदनमोहन मालवीय | Pandit Madan Mohan Malviya
आपलं हार्दिक स्वागत आहे! आपल्या ब्लॉगवर ‘भारतरत्न पंडित मदनमोहन मालवीय’ Pandit Madan Mohan Malviya यांच्या विशेष मार्गदर्शनाने आपल्या सहभाग्याने एक अत्यंत विशेष अनुभव सामायिक करू इच्छितो. पंडित मालवीयांच्या जीवनातील त्यांच्या महत्वाच्या क्षणींचा उल्लेख करून, त्यांच्या समर्पणातील राष्ट्रीय आणि सामाजिक योगदानाचा आवडीचा अनुभव करू शकता.
‘मी जेव्हा भारतात आलो, तेव्हा पहिल्यांदा लोकमान्य टिळकांना भेटलो. त्यावेळी ते मला एखाद्या हिमालयासारखे उत्तुंग वाटले. त्यांच्याइतकी उंची गाठून परत येणे मला शक्य वाटले नाही. त्यानंतर मी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडे गेलो असता ते मला एखाद्या महासागरासारखे अथांग वाटले. त्यांच्या खोलीचा अंदाज बांधणे मला शक्य नव्हते. त्यामुळे तेथूनही मला परतावे लागले. सर्वांत शेवटी मी महामना पंडित महदनमोहन मालवीय यांच्याकडे गेलो असता मला ते एखाद्या गंगेच्या निर्मळ प्रवाहासारखे वाटले. धर्म आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाला वाहून घेतलेल्या त्या प्रवाहात स्नान करणे मला सहज शक्य वाटले!’ असे उद्गार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी महामना पंडित मदनमोहन मालवीय यांच्याबद्दल काढलेले आहेत. यावरून त्यांच्या मोठेपणाची सहज कल्पना करता येते.
जन्म, बालपण व शिक्षण
अशा या महान व्यक्तीचा जन्म प्रयागसारख्या पवित्र क्षेत्री २५ डिसेंबर १८६१ रोजी झाला. भारताचे माजी पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मही २५ डिसेंबर, १९२४ रोजी एकाच दिवशी जन्मलेल्या या दोघांनाही केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार जाहीर केला, हा एक अद्भुत मणिकांचन योगच म्हणाला लागेल.
पं. मदनमोहन मालवीय यांचे घराणे मूळचे मालव्याचे. त्यामुळे ते ‘मालवीय’ या आडनावाने ओळखले जाऊ लागले. या घराण्याचे मूळ पुरुष माळवा सोडून बिहारात पटना मिर्जापूरला येऊन राहिले. काही पूर्वज उत्तर प्रदेशात अलाहाबादला स्थिरावले. पं मदनमोहन मालवीय भारद्वाज गोत्रीय, चतुर्वेदी शाखेचे ब्राह्मण कुलोत्पन्न संस्कारशील साधक होते. त्यांचे आजोबा श्रीकृष्णाचे महान भक्त होते. पारंगत विद्वान म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांच्या वडिलांचे नाव होते पंडित व्रजनाथ. त्यांचा
प्रभाव आणि दबदबा एक विद्वान म्हणून तर होताच, पण ते एक करुणासंपन्न व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. मदनमोहनजींच्या आईचे नाव होते मूनादेवी! त्या सुशील, धर्मपरायण आणि सर्वग्राही सेवाभावी वृत्तीच्या सुगृहिणी होत्या. सुंदर आणि पुष्ट काया मदनमोहनजींना वारशानेच लाभली होते. कमालीची ज्ञानलालसा आणि परमतसहिष्णुवृत्तीचे दानही त्यांच्या झोळीत पूर्वजांनीच टाकले होते. एका गरीब किसान कुटुंबात जन्माला आलेल्या या साधकाने पुढे काशी विद्यापीठाची स्थापना केली. ते विद्वान, निश्चयी व व्रतस्थ होते. मदनमोहनजी सातत्याने यशाच्या वाटा चोखाळत राहिले. ते कधीही निराश झाले नाहीत. ते आपल्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी अखंड प्रयत्नशील राहिले. त्यांच्या चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्वाने लोक दीपून जात.
मदनमोहन मालवीय यांचे वडील संस्कृत पंडित होते. वयाच्या पाचव्या वर्षापासून वडिलांनी त्यांना संस्कृत शिकविण्यास सुरुवात केली. त्यानंतर धर्म ज्ञानोपदेश पाठशाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर अलाहाबाद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. या काळात ‘मकरंद’ या टोपण नावाने ते कविता करत. मौर सेंट्रल महाविद्यालयातून (सध्याचे अलाहाबाद विद्यापीठ) दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी कोलकत्ता विद्यापीठातून बी.ए.ची पदवी मिळवली. संस्कृतमधून एम.ए. करण्याची त्यांची इच्छा होती, परंतु ती अपूर्ण राहिली. इ.स. १८८४ च्या जुलैमध्ये अलाहाबाद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून ते रुजू झाले. त्यांना सहा भाऊ व दोन बहिणी होत्या. त्यांचे वडील व्रजनाथ हे भागवत कथा उत्कृष्टपणे सांगत. आपल्या गोड गळ्याने त्यांनी संपूर्ण प्रदेशाला मोहिनी घातली होती. मदनमोहनजींनीसुद्धा संगीत विषयात निपुणता मिळवलेली होती. साहित्यशास्त्र हा त्यांच्या स्नातक स्तरावरील अध्ययनाचा विषय होता. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांच्या सहपाठींमध्ये पं. मोतीलाल नेहरू आणि सर तेजबहादूर सप्रू यांचा समावेश होता. साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी हा त्यांचा जीवनादर्श होता. बी.ए. झाल्यावर त्यांना पुढे शिकायची खूप इच्छा होती. पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडून ताबडतोब नोकरी धरावी लागली. ज्या सरकारी शाळेत त्यांचे शिक्षण झाले होते त्याच शाळेत त्यांना अध्यापकाची नोकरी पत्करावी लागली. इ.स. १८७८ मध्ये त्यांचा विवाह मिर्झापूरच्या कुमारीदेवी यांच्याबरोबर झाला. मदनमोहन मालवीय जेव्हा शिक्षक झाले, तेव्हा त्यांचा पगार दरमहा फक्त ४०रु. होता. इ.स. १८८४ ते १८९० पर्यंत ते शिक्षकी पेशात होते. पण इ.स. १८९१ मध्ये ते एलएल. बी. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर इ.स. १८९३ पासून त्यांनी उच्च न्यायालयात एक तप वकिलीचा व्यवसाय केला. सर मिर्झा
इस्माईल यांनी, ‘मालवीय हे कायदा व्यवसायाचा दागिना शोभतील इतके हुशार होते’ असे म्हटले आहे. निर्वाहापुरते धन संचित केल्यावर त्यांनी वकिलीचा व्यवसाय सोडला आणि ते जनताजनार्दनाचे वकील बनले. चौरीचौरा कटाच्या खटल्यात मदनमोहन मालवीय यांनी आरोपींची बाजू चांगली लढवली. त्यावेळी तब्बल १७० जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली होती. मात्र मालवीयजींमुळे त्यापैकी १५१ लोकांची फाशीची शिक्षा रद्द झाली. या खटल्यातील आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचे श्रेय मदनमोहन मालवीय यांनाच द्यावे लागेल.
एकात्मतेसाठी समाजकार्य
त्यानंतर त्यांनी राजकाण व समाजकारणात स्वतःला वाहून घेतले. सामाजिक कार्यासाठी त्यांनी अनेक संस्था उभारल्या. इ.स. १९०३ मध्ये त्यांनी प्रयोग येथे हिंदू छात्रालयाची उभारणी केली. प्रयाग येथे प्लेगने गहजब गुदरवला असता कंबर कसून त्यांनी प्लेग निवरणार्थ मोर्चा काढला. सेवेसाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले. मदनमोहन मालवीय यांनी अस्पृश्योद्धाराच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांनी गाथा अद्भुत आहे. इ.स. १९२७ मध्ये महाशिवरात्रीच्या पुण्यपर्व प्रसंगी मालवीयजींनी काशीच्या दशाश्वमेध घाटावर चातुर्वर्णियांना एक साथ दीक्षा प्रदान केली होती. इ.स. १९२८ साली असाच प्रयोग त्यांनी कलकत्ता येथेही घडवला होता. इस. १९३६ मध्ये नाशिक आणि काशी येथे सहस्रावधी हरिजनांना मंत्रदीक्षा देण्याचा अद्भुत प्रयोग त्यांनी केला होता. त्यांच्या काळात अशा प्रकारचे धाडसी पाऊल उचलणे केवळ अशक्यप्राय होते. सर्वांना समानतेच्या व्यासपीठावर स्थापित करण्याचा त्यांचा हा प्रयोग सदैव प्रशंसनीय व अभिनंदनीय मानला जाईल, यात काही शंका नाही. या प्रयोगाच्या यशस्वितेसाठी त्यांनी कट्टर विद्वानांशी टक्कर दिली. शास्त्रार्थासाठी आव्हान दिले. परस्पर भेदभावांना मूठमाती दिल्यावरच आपल्या देशात एकात्मता नांदेल, असा त्यांना दृढ विश्वास होता. नव्या क्रांतिसाठी देशाला जर सिद्ध व्हावयाचे असेल, तर एकात्मता हाच एकमेव आधार असेल त्यावर ते ठाम होते.
‘हिंदुस्थान’ दैनिकाचे संपादक
राजकारणात पडल्यावर मदनमोहन मालवीयांनी पत्रकारिताही गाजवली. भारतीय काँग्रेसच्या कोलकत्ता येथे डिसेंबर १८८६ मध्ये दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशनाला मालवीय आणि ‘हिंदुस्थान’ या साप्ताहिकाचे संस्थापक राजा रामपालसिंह उपस्थित होते. दादाभाई नौरोजी यांच्या भाषणाने प्रेरित होऊन राजा रामपालसिंह यांच्या मनात ‘हिंदुस्थान’ या साप्ताहिकाचे दैनिकात रूपांतर करण्याचा विचार आला. यासाठी संपादक म्हणून मालवीय यांची नियुक्ती करण्यात
आली. शिक्षकाची नोकरी सोडून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. अडीच वर्षे ते त्याचे संपादक होते. त्यानंर एलएल.बी. होण्यासाठी जेव्हा ते अलाहाबादला आले तेव्हा ते ‘द इंडियन युनियन’चे सहसंपादक म्हणून रुजू झाले. ‘अभ्युदय’च्या प्रकाशनासाठी त्यांनी काम केले. ‘मर्यादा’ हे हिंदी वृत्तपत्र त्यांनी काढले. ‘हिंदुस्थान टाईम्स’ व ‘सनातन धर्म’ यातही त्यांनी काम केले. सरकारच्या प्रेसअॅक्टला त्यांनी विरोध केला. मदनमोहन मालवीय यांनी मोतीलाल नेहरू यांच्या मदतीने ‘लीडर’ नावाचे इंग्रजी वृत्तपत्र काढले. प्रसंगी आपल्या पत्नीचे दागिने विकून त्यांनी ‘लीडर’ हे इंग्रजी दैनिक चालवले. ‘हिंदुस्थान’ या दैनिकाचे अंतर्बाह्य स्वरूप पंडिजींच्या स्पर्शाने पालटले. सदर वृत्तपत्राची लोकप्रियता वाढली. पण या पत्राचे मालक राजे रामपालसिंह यांच्याकडून पंडितजींना झोंबतील असे शब्द उच्चारले जाताच पंडितजींनी रामपालसिंहजींचा खरपूस समाचार घेतला व ते त्या दैनिकापासून दूर झाले.
संस्थापक जीवन
मदनमोहन यांचे जीवन संस्थात्मक होते. हिंदू धर्मावर त्यांचे निस्सीम प्रेम होते. त्यांनी प्रयाग हिंदू समाज या संस्थेत काम केले. मध्यभारत हिंदू समाज परिषद अलाहाबाद येथे भरविण्यात त्यांचाच हात होता. सनातनधर्म त्यांनी सुरू केला. सुमारे १० वर्षे ते ऋषिकुल ब्रह्मचर्याश्रमाचे अध्यक्ष होते. मदनमोहन मालवीय यांनी त्यांचा मुलगा रमाकांत याला ‘यात्री सेवादल’ सुरू करण्यातस प्रोत्साहन दिले. नंतर त्यांनी ‘दीनरक्षक समिती’ स्थापन केली. कुंभमेळा व भूकंप तसेच इतरही नैसर्गिक आपत्तीच्यावेळी त्यांच्या संस्थांतर्फे गोरगरिबांना मदत करण्यात आली. म. गांधींच्या आवाहानानुसार १ ऑगस्ट, १९३४ रोजी त्यांनी हरिजनांसाठी शुद्धी मोहीम गंगाकिनारी राबविली होती. इस. १९१६ पं. मदनमोहन मालवीय यांच्या अध्यक्षतेखाली हिंदूमहासभेचे पहिले अधिवेशन पार पडले. इस. १९२०-२१च्या सुमारास मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास यांच्याबरोबर त्यांनी ‘लोकशाही स्वराज्य पक्षा’ची स्थापना करण्यात पुढाकार घेतला होता.
काँग्रेस पक्षाचे चार वेळा अध्यक्ष
इ.स. १८८५ साली अखिल भारतीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली. इ.स. १८८६ सालच्या काँग्रेसच्या अधिवेशनातील मदनमोहन मालवीय यांचे भाषण फार गाजले. त्यांच्या वक्तव्याने श्रोतृवृंद मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या या भाषणामुळे मालवीय राष्ट्रीय नेत्यांच्या झगमगत्या नक्षत्र मंडळातील तेजस्वी तारा बनले. दादाभाई नौरोजी, सर अॅलन ह्यूम यासारख्या मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. काँग्रेस अधिवेशनात त्यांनी केलेली इंग्रजी व हिंदी भाषणे खूप गाजली. त्यांच्या इंग्रजी भाषेचा
प्रवाह चांदीसारखा झगमगता, तर हिंदी भाषेचा प्रवाह शुद्ध सुवर्णासारखा देदीप्यमान होता. ‘मानस सरोवरावरून उतरताना सूर्यकिरणांमुळे जशी गंगा झगमगते तशीच शोभा त्यांच्या डौलदार हिंदी भाषेची असते’ असे त्यांच्या भाषणाबद्दल म्हटले जाते. पन्नास वर्षे ते काँग्रेसमध्ये होते. चार वेळा ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. अलाहाबाद महापालिकेवर ते इ.स. १९१६ मध्ये निवडून गेले होते. प्रोव्हिन्शियल लेजिस्टेटिव्ह असेंब्लीमध्ये ते इ.स. १९२४ ते १९३० या काळात सदस्य होते. इ.स. १९३१ मध्ये ते गोलमेज परिषदेला उपस्थित होते. ना. गोपाळ कृष्ण गोखले व लोकमान्य टिळक यांच्या मागनि ते गेले. सायमन कमिशनच्या विरोधातील लढा, स्वदेशीची चळवळ, वंगभंग चळवळ, असहाकर आंदोलन यामध्ये ते सक्रिय सहभागी झाले होते.
बनारस हिंदू विद्यापीठाचे उपकुलगुरु
मदनमोहन मालवीय यांच्या कामगिरीविषयी कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. त्यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात काँग्रेसमधून बाहेर पडून आपले जीवन शैक्षणिक कार्याला वाहिले. अटलबिहारी वाजपेयीप्रमाणेच त्यांनीही सुरुवातीच्या काळात काही काळ पत्रकारिता केली होती, हे आपण यापूर्वी पाहिलेच आहे. सायमन कमिशन विरोधातील निदर्शनात ते सहभागी झाले होते. त्यांच्या निधनानंतर सहा दशकांनीही लोकांच्या स्मरणात राहिलेले त्यांचे काम म्हणजे त्यांनी स्थापन केलेली ‘बनारस हिंदू युनिव्हर्सिटी’ होय. बनारस हिंदू विद्यापीठ स्थापण्यामागे त्यांची दूरदृष्टी होती. मदनमोहन मालवीय यांचे शिक्षणक्षेत्रातील योगदान फार मोठे आहे. ‘बनारस हिंदू विद्यापीठ’ हे त्यांच्या कार्याचे सर्वात मोठे दृश्य स्वरूप म्हणता येई. इ.स. १९११ मध्ये सेंट्रल हिंदू महाविद्यालयाच्या एक विश्वस्त डॉ. अॅनी बेझंट यांनी
मालवीय यांची भेट घेऊन वाराणसी येथे हिंदू विद्यापीठ स्थापन करण्याविषयी चर्चा केली होती. त्यानंतर इ.स. १९१६ मध्ये बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली. विश्वविद्यालय काढण्याची स्वप्ने ते इ.स. १९०४ पासून पाहत होते. भारताच्या प्राचीन परंपरांना कायम ठेवून जगभरात होणाऱ्या तांत्रिक प्रगतीचे शिक्षणही या विद्यापीठात दिलं जावं असं त्याचं स्वप्न होतं. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट उपसले. अखेर त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले. इस. १९१६ मध्ये बनारस हिंदू विद्यापीठाच्या रूपाने शिक्षणक्षेत्राला त्यांनी एक अनमोल भेट दिली. इ.स. १९१९ पासून पुढील १९ वर्षे ते या विद्यापीठाचे उपकुलगुरू होते. इ.स. १९३८ नंतर उपकुलगुरूपद सोडून देऊन मृत्यूपर्यंत या विश्वविद्यालयाचे कुलगुरू म्हणून त्यांनी काम पाहिले. या बनारस हिंदू विद्यापीठाच्या कोनशिला अनावरण प्रसंगी महात्मा गांधींना त्यांनी सन्मानपूर्वक पाचारण केले होते. त्यावेळी गांधीजींनी केलेले भाषण ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे ठरले. दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतरच्या एका वर्षाच्या मौनानंतरचे त्यांचे ते पहिलेच भाषण होते. गांधीजींचे ते भाषण बहुचर्चित ठरले. एका अर्थाने या अक्षुण्ण भाषणाने संपूर्ण क्रांती केली असेच म्हणायास हवे. कारण या भाषणाच्या प्रभावामुळेच गांधीजींना आचार्य विनोबा भावे हे शिष्य म्हणून लाभले. त्यांच्या या ऐतिहासिक भाषणानंतर मदनमोहन मालवीयांनी असे सांगितले होते की, त्यांच्या विशेष आग्रही विनंतीवरूनच गांधीजींनी हे भाषण केले होते. या भाषणाचा एकमेव हेतू म्हणजे हिंसात्मक कार्यप्रणालीच्या आत्मघातकी स्वरूपाचे विश्लेषण करणे हा होता. यापूर्वी अलाहाबादेत गांधीजींचे पंडितजींच्याच अध्यक्षतेखाली म्योर कॉलेजातील एक भाषण असेच गाजले होते. त्यावेळी व्याख्यानाचा विषय होता, ‘आर्थिक विकास वास्तविक उन्नतीच्या विपरीत आहे काय?’ सदर भाषण अर्थशास्त्र विभागात संपन्न झाले होते. या भाषणानंतर आभार मानताना आपण केवळ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उभे आहोत, असे मालवीयानी सांगिलते. त्यावेळी आपल्या भाषणात पंडितजी म्हणजे होते,
‘गांधीजींनी प्रतिपादित केलेले सिद्धांत इतके काही श्रेष्ठ प्रतीचे आहेत की त्यांना अंमलात आणणे कदाचित आपणा सर्वांना शक्य होणार नाही. पण गांधीजींच्या या मुख्य अभिप्रायाशी मात्र आपण सारेच सहमत होऊ शकतो की आपल्या तमाम प्रश्न आणि सिद्धांतांची दिशा मानवजातीचे कल्याण करणे हीच केवळ असायला हवी!’ महामना मालवीय अमर आहेत
१७ मार्च, १९१८ रोजी आश्रमात प्रार्थनेनंतरच्या एका प्रवचनात बोलताना गांधीजी म्हणाले होते, ‘विद्यमान असलेल्या भारतातील राजकीय नेतृत्वाचा विचार
करता मला ज्ञात अशा नेत्यांमध्ये पं. मदनमोहन मालवीय यांचेच नाव अधिक वित्रतम वाटते!’ मदनमोहन मालवीय हे खऱ्या अर्थाने एक धर्मपुरुष होते. त्यांचा धर्मविचार पाखंडी लोकांना त्रासदायक वाटायचा वेळप्रसंगी ते भिकारणीच्या जखमांवर मलम लावू शकत आणि कुत्र्याला औषध पाजू शकत. त्यांनी महिनाभर यमुना नदीच्या काठावर उभे राहून गायत्री मंत्राचे दीड कोटी पुरश्चरण केले होते. त्यांनी सहस्रावधी हरिजनांना मंत्रदीक्षा दिलेली आहे. त्यांनी केलेल्या सेवाकार्याचा आलेख खूप मोठा आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्यांनी केलेली जनसेवा विशेष नोंदवून ठेवण्याजोगी आहे. ते आपल्या अनुयायांचेही सेवक होते. त्यांच्याच इच्छेला ते मान देत असत. स्वभावाने अत्यंत उदार, सरळ आणि शांतताप्रिय असलेला हा नेता अत्यंत लोकप्रिय होता. त्यांचे कार्य पाहून आणि त्यांच्या सेवाभावी वृत्तीने प्रभावित होऊन लोक त्यांना अत्यंत आदराने ‘महामना’ असे संबोधित असत. त्यांच्या शर्टवर बटनहोलमध्ये ते पांढरे फूल लावीत. ते त्यांच्या निष्कलंक चारित्र्याचे प्रतीक होते; असे ब्रिटिश अधिकारी म्हणत असत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारचा गोडवा होता. खाजगी जीवनात वागताना ते फुलासारखे मृदू होत, पण राजकारणात मात्र ते वज्राप्रमाणे कठोर होत. वादविवादात त्यांचे जरी मतभेद झाले तरी ते मनभेद कधीही होऊ देत नसत. राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन त्यांना ‘कर्मयोगी’ असे म्हणत असत. पं. मालवीय हिंदुत्वाचे केवळ प्रतिनिधी नव्हते, तर ते प्राण होते. आदर्शवाद व शहाणपणा याचा अपूर्व संगम त्यांच्या व्यक्तीमत्त्वात झालेला होता.
इ.स. २०१५मध्ये भारत सरकारने पं. मदनमोहन मालवीय यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर जाहीर केला. तो त्यांच्या वंशजानी स्वीकारला. आयुष्यभर देश आणि समाजाच्या सेवेसाठी आयुष्य वेचलेले पं. मदनमोहन मालवीय वाराणसी येथे त्यांच्या वयाच्या ८५ व्या वर्षी १२ नोव्हेंबर १९४६ रोजी अनंतात विलीन झाले. ३ डिसेंबर, १९४६ च्या ‘हरिजन’च्या अंकात पं. मदनमोहन मालवीयांना श्रद्धांजली अर्पण करताना गांधीजींनी लिहिले होते, ‘इंग्रजीत एक म्हण आहे की, ‘राजा मरण पावला असे म्हणता येत नाही कारण राजा अमर आहे महान आणि श्रेष्ठ अशा मालवीयजींना ही म्हण तंतोतंत लागू पडते. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांचा देह त्यांच्या इच्छेनुसार सक्रिय होत नव्हता. मृत्यूने त्यांना नानाप्रकारच्या व्याधींपासून मुक्त केले. त्यामुळे त्यांच्या संदर्भात आपण असे का म्हणू नये की, ‘भारतवर्षाचे श्रद्धेय मालवीयजी मरण पावले असे कसे म्हणता येईल? कारण पं. मदनमोहन मालवीय हे अमरच आहेत !’
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.