भारतरत्न राजीव गांधी
भारतरत्न राजीव गांधी हा नाव भारतीय इतिहासात अद्वितीय स्थान गाजतो. त्यांचे सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक प्रगतीचं महत्त्वाचं काम भारताला म्हणून आपल्या अज्ञात दिशेनं नेऊन आलं. या ब्लॉगमध्ये आपण त्यांच्या जीवनाचं परिचय, कार्ये, आणि त्यांचं योगदान अधिक सज्ज असलेलं सांगणार आहोत. त्यांच्या आदर्शांची, नवीन तांत्रिक प्रगतीसाठीच्या सोयीस कार्यक्षमतेची प्रेरणा आपल्याला या ब्लॉगमध्ये मिळवू शकता.
‘आमचा नेता उद्याचे स्वप्न’ अशी घोषणा करून काँग्रेस पक्षाने राजीव गांधींची पंतप्रधानपदी एकमताने निवड जाहीर केली आणि आपल्या अल्पावधीच्या काळात राजीव गांधींनी ही घोषणा सार्थ करून दाखवली. आज भारतात घरोघरी मोबाईल फोन दिसतात आणि झोपडपट्टीत राहणारे गरीब लोकही टी.व्ही. वरील कार्यक्रम बघू शकतात, याचे श्रेय भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनाच द्यावे लागेल. स्वातंत्र्यानंतर नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी देशाचा विकास केला आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजीव गांधींनी देशाला एकविसाव्या शतकाकडे नेण्याचा सतत यशस्वी प्रयत्न केला.
जन्म, शिक्षण, कौटुंबिक जीवन
३१ डिसेंबर १९८४ रोजी हिंदुस्थानला पहिल्यांदाच चाळिशीतील पंतप्रधान लाभला. सत्तेवर येताच या तरुणाने पुढीलप्रमाणे आशावादी उद्गार काढले, ‘मी तरुण आहे आणि माझेही एक स्वप्न आहे. बलवान, आत्मनिर्भर आणि जगातील देशांमध्ये पहिल्या रांगेत स्थान असणाऱ्या आणि मानवजातीच्या देशामध्ये पहिल्या रांगेत स्थान असणाऱ्या आणि मानवजातीच्या सेवेला वाहिलेल्या भारताचे स्वप्न मी पाहतो!’ असे उद्गार काढणाऱ्या तरुण व तडफदार पंतप्रधानाचे नाव होते ‘राजीव गांधी!’ देशातील तरुणांच्या स्वप्नांना तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ रोजी मुंबईत शिरोडकर हॉस्पिटलमध्ये झाला. सुप्रसिद्ध संसदपटू असलेले खासदार फिरोज गांधी हे त्यांचे पिताजी, तर भारताच्या माजी पंतप्रधान असलेल्या श्रीमती इंदिरा गांधी या त्यांच्या मातोश्री ! भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांचे आजोबा होते. एकाच घराण्यातील सलग तीन पिढ्यांकडे पंतप्रधानपद चालून आलेला जगातील भारत हाच एकमेव देश असेल! आपल्या आजोबांच्या व आईच्या गुणांचा वारसा राजीव गांधींना लाभला. नेहरू दिल्लीच्या ‘त्रिमूर्ती’ बंगल्यात वास्तव्य करीत. त्यांच्याबरोबर इंदिरा गांधी राहत असत व नेहरूंच्या घराची सर्व देखभाल त्या स्वतः करीत. राजीव व संजय या त्यांच्या दोन्ही मुलांचे बालपण या त्रिमूर्ती बंगल्यातच आपल्या मातेबरोबर गेले. त्यामुळे नेहरूंकडे येणारे राजेमहाराजे व राजकीय पक्षांचे नेते हे राजीव गांधींच्या सहज पाहण्यात आले आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संस्कार राजीव गांधींवर घडत गेले. नेहरू हे केवळ राजकारणीच नव्हते, तर ते काव्य, साहित्य व इतिहास यांचे प्रेमी होते. हिंदी व इंग्रजी भाषा त्यांच्या जिभेवर नाचत होत्या. त्यामुळे यासर्व वातावरणाचा लाभही राजीव गांधींना मिळल्यावाचून राहिला नाही.
राजीव गांधी यांचे अगदी सुरुवातीचे शिक्षण ‘शिवनिकेतन’ या शाळेत झाले. तेथे त्यांना शिकविण्यासाठी एक जर्मन महिला ठेवल्या होत्या. नंतर दहाव्या वर्षी त्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये घालण्यात आले. डेहराडून येथील डून स्कूलमधून सिनियर केंब्रिज परीक्षा ते १९६० मध्ये उत्तीर्ण झाले. उच्च शिक्षणासाठी १९६३ते १९६५ या काळात केंब्रिजला जाऊन त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग कोर्स पूर्ण केला. हे अध्ययन करीत असताना घरून येणारे पैसे कमी पडत, म्हणून ते व त्यांचे मित्र एका बेकरीत काम करून व आईस्क्रीम विकून आपला किरकोळ खर्च भागवीत असत. ते केंब्रिजला दोन वर्षे राहिले. तत्पूर्वी लंडनच्या इंपिरिअल सायन्स कॉलेजात त्यांनी दोन वर्षे तांत्रिक शिक्षण संपादन केले. पण त्यात त्यांचे मन फारसे रमत नव्हते. विमानाचे उड्डाण हाच राजीवजींचा अत्यंत आवडता छंद होता. त्यामुळे शालेय शिक्षणानंतर त्यांनी ग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतले. लंडनमधील मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम संपल्यावर दिल्ली फ्लाईंग क्लबची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. त्यांना पायलटचे लायसेन्स मिळाले. १९८५ मध्ये त्यांनी हैदराबादेस बोइंग पायलटचे ट्रेनिंग घेतले. विमानाचे उड्डाण करीत असताना स्वतःला ‘राजीव गांधी’ असे म्हणवून न घेता ‘कॅप्टन राजीव’ असे म्हणवून घेणे, त्यांना अधिक आवडे.
१९६५ साली केंब्रिज विद्यापीठात शिकत असताना एका पार्टीमध्ये सोनिया मायनो या इटालियन तरुणीची व राजीव गांधींची गाठ पडली. सोनिया वर्षभराचा इंग्रजीचा कोर्स पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला आली होती. त्यावेळी त्यांची मैत्री जुळली व ‘ती पाहताच बाला कलिजा खलास झाला’ अशी राजीव गांधींची अवस्था झाली. दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागले. २५ फेब्रुवारी १९६८ रोजी हे दोघे विवाहबद्ध झाले. अशा त-हेने एक इटालियन मुलगी भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची सून झाली. ती भारतीय नागरिक बनली व राजीवजींच्या राजकीय जीवनात तिने मोलाची साथ दिली. त्यांना राहुल व प्रियांका ही दोन अपत्ये झाली.
सध्या सोनिया गांधी या काँग्रेसच्या अध्यक्षा असून त्यांचे पुत्र राहुल गांधी हे काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. दोघेही लोकसभेचे खासदार आहेत. मोतीलाल जवाहरलाल – इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी अशा तन्हेने नेहरू गांधी घराण्याचे अधिराज्य काँग्रेस पक्षावर अखंड चालू आहे. एखाद्या घराण्याचा एका पक्षावर सत्ता गाजवण्याचा हा कदाचित जागतिक विक्रमच ठरण्याची शक्यता आहे.
तरुण व तडफदार पंतप्रधान
राजीव गांधींना राजकारणाची आवड नव्हती, म्हणून ते वैमानिक झाले. संजय गांधीना राजकारणाची आवड होती, म्हणून ते इंदिरा गांधींजवळ राहिले व इंदिरा गांधींना राजकारणात मदत करू लागले. परंतु एके दिवशी अचानक संजय गांधींचे अपघाती निधन झाले आणि इंदिरा गांधी एकाकी पडल्या. संजय गांधींच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाचे महासचिवपद राजीव गांधींकडे जावे अशी काँग्रेस सभासदांची इच्छा होती. तशा आशयाचे निवेदनही इंदिराजींकडे देण्यात आले.
वास्तविक पाहता राजकारणात पडण्याची राजीवजींची मुळीच इच्छा नव्हती. पण राजकारणातील आपल्या प्रवेशाने आपल्या मातेला मदत होत असेल, तर राजकारणात प्रवेश करायला काय हरकत आहे, असा दूरवर विचार करून राजीवजींनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इंडियन एअर लाईन्सच्या कॅप्टनपदाचा राजीनामा दिला आणि उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून जून १९८१ मध्ये लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला. या निवडणुकीत ते स्पष्ट बहुमताने निवडून आले आणि त्या दिवसापासून त्यांचे लोकसभा सदस्य म्हणून जीवन सुरू झाले. त्या दिवसापासून राजीव गांधींनी स्वतःला पूर्णपणे राजकीय व
सामाजिक कार्याला वाहून घेतले आणि मग त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. एक दशक हे राजीव गांधींच्या प्रभावाचे दशक म्हणूनच ओळखले जाऊ लागले. इंदिरा पुत्र म्हणून त्यांच्याभोवती प्रसिद्धीचे वलय होतेच. यावेळी अरुण
पुढील नेहरू त्यांचे सल्लागार होते. १९८३ च्या कलकत्ता अधिवेशनात ‘आमचा नेता : उद्याचे स्वप्न’ असा राजीवजींच्या संदर्भात प्रचार करण्यात आला. त्यामुळे त्यांची सामाजिक व राजकीय प्रतिमा तयार होऊ लागली. किसान मेळावा, युवक मेळावा, आशियाई क्रीडास्पर्धा, पर्यटन, पर्यावरण, गंगेच्या पाण्याचे शुद्धीकरण, शिक्षणपद्धतीमध्ये आमूलाग्र सुधारणा, यासारख्या महत्त्वपूर्ण प्रश्नांकडे त्यांनी देशाचे लक्ष वेधले. अशा तन्हेने काँग्रेस पक्षाला मजबूत व बळकट करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. त्यानंतर १९८४ साल उजाडले. हे साल गांधी कुटुंबीयांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले.
इंदिरा गांधीनी १९८४ च्या जून महिन्यात अमृतसरच्या सुवर्णमंदिरात लष्कर घुसवून दहशतवाद्यांना शह देण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार केले. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी सकाळी १ सफदरजंग रोडवरील इंदिराजींच्या निवासस्थानी त्यांच्या बियंतसिंग नावाच्या शीख अंगरक्षकांनी गोळ्या झाडून त्यांची निघृण व नृशंस हत्या केली. अशा प्रचंड दुःखाच्या प्रसंगी राजीव गांधी यांची भारताच्या पंतप्रधानपदी निवड झाली.
राजीवजींना ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी सायंकाळी राष्ट्रपती शैलसिंग यांनी पंतप्रधानपदाची शपथ दिली. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी पंतप्रधान झालेल्या या तरुणाला हिंसाचार थांबविणे हे एक जबरदस्त आव्हान होते. राजीवजींनी हे आव्हान स्वीकारून नोव्हेंबर १९८४ मध्ये राष्ट्राला उद्देशून आकाशवाणीवरून भाषण केले. त्यात भारताचे ऐक्य टिकविणे, देश एकसंध, बलवान व समृद्ध बनवणे, देशातील गरिबीचे उच्चाटन करणे, एकसंधता टिकविण्यासाठी धर्मनिरपेक्षतेचा व्यवहारात अंगीकार करणे, नियोजनात ग्रामीण विकासाला अग्रक्रम देणे, मागासवर्गीय जाती-जमाती, शेतमजूर, स्त्रिया यांच्या आहार, आरोग्य सेवा, शिक्षण इ. बाबींकडे आपले शासन लक्ष देईल, असे आग्रहाने प्रतिपादले व एकविसाव्या शतकात प्रवेश करणाऱ्या भारताच्या उभारणीस सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. राजीव गांधीच्या या विस्तृत भाषणाचे सर्वत्र जोरदार स्वागत कले गेले. ३१ डिसेंबर १९८४ रोजी राजीव गांधींना दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ देण्यात आली. जवाहरलाल नेहरूंनंतर बरोबर २० वर्षांनी राजीव गांधी यांच्याकडे देशाची सूत्रे आली.
आधुनिक भारताची पायाभरणी करणारे राजीव गांधी यांनी नेहरूंनी केलेल्या नियोजनबद्ध विकासाचे पुनर्मूल्यांकन करून मुक्त अर्थव्यवस्था प्राप्त करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली. तसेच आर्थिक पुनर्रचनेचे धोरण इंदिरा गांधींना मान्य होते, पण नोकरशाहीपुढे त्या कच खात. या तुलनेत राजीव गांधी नोकरशाहीला बाजूला ठेवून धाडसाने निर्णय घेत, असे एल. के. झा यांनी म्हटले आहे. भारताच्या २१व्या शतकातील विकासाकडे राजीवजींची मेहेरनजर होती. नवीन बदलांकडे पाहण्याचा तसेच त्या बदलांना आपल्या जीवनात आणण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न होता.
राजीव गांधींनी २० कलमी कार्यक्रम जाहीर केला. काँग्रेस पक्षाची शताब्दी त्यांनी १९८५ साली साजरी केली. पंतप्रधान झाल्यावर देशातील विविध क्षेत्रात तरुण पिढीवर महत्त्वाची जबाबदारी टाकण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. स्वातंत्र्योत्तर
काळातील पिढीचे प्रतिनिधित्व राजीव गांधी करीत होते. देशाचे राजकीय व सामाजिक वातावरण तेजाळून टाकण्याचे सामर्थ्य राजीवजींच्या व्यक्तिमत्त्वात निश्चितच होते.
१९८४ ते १९८९ या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांनी २१ व्या शतकाकडे वाटचाल करणाऱ्या भारताला सुंदर व सुसज्ज बनविण्यासाठी अनेक अंतर्गत, बहिर्गत उपाय व कार्यक्रम आखले. त्यांनी प्रथम देशातील विविध भागांत फेरफटका मारून देशाच्या वास्तव स्थितीचे निरीक्षण केले. त्यामुळे लोकांची गरिबी, हालअपेष्टा, शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, पूल या सोयींचा अभाव याची त्यांना यथार्थ कल्पना आली व त्यांनी जवाहर रोजगार योजना, पंचायतराज संस्था ही गोरगरिबांच्या उत्थानासाठी सुरू केली. उद्योग व कारखानदारी क्षेत्रांत असलेले बरेचसे जाचक नियम त्यांनी शिथिल केल्यामुळे, नवीन कारखाने निघायला प्रोत्साहन मिळाले. १९८५ पूर्वी उत्पादनवाढीचा वेग ६ टक्के होता, तो वाढून ८ टक्क्यांपर्यंत गेला. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी ३३% जागा आरक्षित झाल्या. देशाचे ऐक्य
आणि एकात्मता याला राजीव गांधींनी अग्रक्रम दिला. १९८५ सालच्या निवडणुकात देशाच्या अफाट सहानुभूतीचा फायदा इंदिरा काँग्रेसला मिळाला. राजीव गांधी पुन्हा पंतप्रधान झाले. गुप्तहेर प्रकरण, आसाम व पंजाब प्रकरणे खूप चिघळत होती. ते प्रश्न राजीव गांधींनी मार्गी लावले. २५ जुलै १९८५ ला राजीव लोंगोवाल करार झाला. त्यामुळे पंजाब प्रश्नाला योग्य वळण मिळाले. आसामचा प्रश्न शांततेने मिटविण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी गुरखा चळवळीकडे
व त्रिपुरा समस्यांकडे लक्ष पुरवून उपाययोजना केल्या. मिझोराममधील ५० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या दहशतवादाला प्रतिबंध करण्यास राजीवजींना अपूर्व यश मिळाले. अकार्यक्षम मंत्र्यांना अर्धचंद्र देण्याचे धाडस राजीवजीनी दाखविले. देशाच्या आर्थिक धोरणांची जबाबदारी त्यांनी व्ही.पी. सिंग यांच्याकडे सोपवली. राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली पहिला अर्थसंकल्प युगप्रवर्तक ठरला. देशाचा विकास व समृद्धी साधण्याच्या दृष्टीने त्यांनी आखलेले धोरण कमालीचे यशस्वी ठरले. एक कार्यक्षम पंतप्रधान म्हणून राजीव गांधींचा लौकिक वाढला.
आधुनिक भारताची पायाभरणी
१९८५ च्या जूनमध्ये बांगला देशात जोरदार वादळ झाले. खूप लोक मृत्युमुखी पडले व त्यांचे अत्यंत हाल झाले. तेव्हा राजीव गांधी व श्रीलंकेचे प्रेसिडेंट जयवर्धने जातीने बांगलादेशात गेले, वादळग्रस्त लोकांना भेटले व त्यांनी त्यांचे सांत्वन केले. या त्यांच्या उपकारक कृतीमुळे बांगलादेशाचे प्रेसिडेंट ईर्शाद फार भारावून गेले व त्यांनी भारताचे खूप आभार मानले. द. आशियाई देशांची सार्क संघटना अधिक बळकट होऊन संबंधित देशांतील आर्थिक व राजकीय सहकार्य वाढले.
राजीवजींनी चीन आणि पाकिस्तानशी द्विपक्षीय व्यापारी करार केले. जग अणुशस्त्रविरहित करावे व हे कार्य २०१० पर्यंत पूर्ण व्हावे, अशी त्यांची मनीषा होती. अलिप्ततावादी चळवळ अधिक बळकट करून विकसनशील देशांनी राजकीय व आर्थिक जय मिळवावा, असे त्याचे प्रतिपादन असे. अमेरिका व रशिया या बलाढ्य शक्तींमधील स्पर्धा आणि शत्रुत्व नष्ट होऊन सामंजस्य नांदावे असे प्रयत्न त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या धैर्याने केले. सर्व जगात शांतता व मैत्री प्रस्थापित व्हावी आणि जग एक कुटुंब व्हावे, असा आदर्शवाद प्रतिपादला. राजीव गांधींच्या या प्रयत्नांमुळे ते अल्पावधीतच जागतिक कीर्तीचे नेते गणले जाऊ लागले. त्यामुळे १९८४-८५ साली पंतप्रधान राजीव गांधी यांना ‘मॅन ऑफ द इयर ११९८४- १९८५’ असा किताब नॅशनल इंटिग्रेशन असेंब्लीने बहाल केला.
भारतात आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रांत राजीव गांधींना आमूलाग्र क्रांती करावयाची होती. त्यामुळे राजीवजींनी आपले स्वप्न परिश्रमाने प्रत्यक्षात उतरविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. भारताच्या आर्थिक विकासासाठी नवीन तांत्रिक व शास्त्रीय उपकरणे वापरण्यावर त्यांनी भर दिला. संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्याचे धोरण त्यांचेच होते. विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मिळविलेल्या आघाडीचा पाया राजीव गांधींनीच घातला, याबद्दल कोणाचेही दुमत होण्याचे कारण नाही. राजीव गांधींनी सत्तेवर आल्या आल्या
लोकप्रियतेचे शिखर गाठले. नुकतेच कॉलेजमध्ये पाऊल टाकणाऱ्या पिढीसाठी ते ‘हिरो’ (नायक) बनले. त्यांच्यामुळेच तर या तरुणांना स्टायलिश व परदेशी तंत्रज्ञानाच्या मोटार सायकली मिळत होत्या आणि एकंदरच देश स्कूटरवरून उतरत होता.
बिल गेट्सने तयार केलेल्या डॉसनंतरच्या कोबोल आदि संगणकीय भाषा शिकण्यासाठी देशभर तरुणांची झुंबड उडाली. लोक दुसऱ्या शहरात, परदेशात फोन करायला धावू लागले. खेड्यापाड्यातील गुराख्यांची पोरेसुद्धा मोबाईलचा वापर करू लागली. झोपडपट्टीतील गरिबांना दोन वेळची खाण्याची भ्रांत असेल, त्यांच्या झोपडीत टी. व्ही. आला होता. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशात हिंसाचार उसळला आणि हा तरणाबांड पंतप्रधान नुकत्याच रंगीत बनलेल्या दूरविचत्रवाणीवरून (टी.व्ही. वरून) त्याच्या आईने दिलेला ‘गरिबी हटाव’चा नारा अजिबात न लावता, दीड दशकाआधीच एकविसाव्या शतकातील स्वप्ने दाखवत होता. देशातील तरुणांचा त्यामुळेच तो हिरो बनला. संगणकाचे महत्त्व राजीव गांधींनी वेळीच ओळखले. सॅम पित्रोडा यांना हाताशी धरून त्यांनी आखलेल्या धोरणामुळेच आज माहिती व तंत्रज्ञानात भारताची घोडदौड सुरू आहे. भारतीय तरुणांमधील सुप्त सामर्थ्य राजीवजींच्या काळातच जागे होऊ लागले होते. त्यामुळेच तरुणांना हा आपला नेता वाटत होता.
इंदिरा गांधींपेक्षा राजीव गांधी यांची स्वप्ने अधिक वास्तववादी होती. नोकरशाहीची पकड ढिली केली पाहिजे, अर्थव्यवस्थेला मुक्त केले पाहिजे आणि तरुणांच्या क्षमतांना अधिकाधिक वाव दिला पाहिजे, हे राजीव गांधीजी पक्के ओळखले होते.
पराभवानंतर विरोधी पक्षनेता
त्यांच्या काळात भारतातील मध्यमवर्गाची मानसिकता रशियाकडून अमेरिकेकडे अधिक झुकू लागली. वैचारिक बांधीलकीपेक्षा व्यक्तिगत उत्कर्षाकडे तरुणांचा ओढा वाढू लागला. हीच मानसिकता आज भारताची आर्थिक ताकद वाढवीत आहे. जागतिकीकरणात भारत बराच उशिरा व मंदगतीने उतरला हे खरे असले, तरी या प्रवाहात टिकून राहण्यासाठी आवश्यक ती साधनसामुग्री देशात निर्माण होत गेली, ती राजीव गांधींनी घालून दिलेल्या मार्गामुळे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. तसेच तंत्रज्ञान व मुक्त अर्थव्यवस्था या बाबत राजीव गांधी यांनी घालून दिलेल्या बैठकीमुळेच १९९१ नंतर पंतप्रधान नरसिंहराव आणि २००४ नंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांना काही धाडसी निर्णय घेता आले, हे आपण विसरता कामा नये.
देशाला २१ व्या शतकात नेण्याचे स्वप्न राजीव गांधी यांनी दाखवले. त्यामुळे सुरुवातीला ‘मिस्टर क्लीन’ अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. काळ्या ढगांनी आच्छादलेल्या गडद काळाला रुपेरी किनार लागल्याची भावना निर्माण
झाली. परंतु राजीव गांधींच्याच मंत्रिमंडळातील अर्थमंत्री व्ही. पी. सिंग यांनी स्विस बँकेत व तत्सम मार्गांनी काळा पैसा जमा करणाऱ्या भारतीयांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली. ‘फेअर फॅक्स’ गुप्तचर संस्थेस काम देऊन बच्चन बंधू, टाटा, गोएंका इत्यादी नावे त्यांनी उजेडात आणली. राजीव गांधींनी व्ही. पी. सिंग यांच्याकडून अर्थमंत्रिपद काढून घेतले. त्यामुळे काँग्रेस विरोधकांनी याबाबतीत आक्रमक पवित्रा घेऊन राजीव गांधी ‘मिस्टर क्लीन’ नाहीत असा प्रचार सुरू केला.
१९८६ सालची सुरुवात राजीवजींच्या कारकिर्दीसाठी काहीशी संघर्षमय ठरली. पंजाब कराराला न जुमानता तेथील दहशतवादी कारवायांना ऊत आला होता. ९ ऑगस्टला पुण्यात माजी सरसेनापती अरुण वैद्य यांची पंजाबी अतिरेक्यांनी हत्या केली. श्रीलंकेतील तमिळी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी राजीव गांधींनी पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी १९८७ साली श्रीलंकेच्या अध्यक्षांशी शांतता करार केला. या करारांतर्गत श्रीलंकेत शांतीसेना पाठविण्याचे ठरले. या भारतीय सेनेचा वापर श्रीलंकेच्या तमिळीविरुद्ध होणार होता, म्हणून तमिळींच्या मनात राजीव गांधीविरुद्ध द्वेष निर्माण झाला. लंकेतील दंगे व लढाई थांबविण्यासाठी राजीव गांधी लंकेत गेले असता श्रीलंकेच्या नौदलाची मानवंदना स्वीकारताना एका श्रीलंकीय जवानाने बंदुकीच्या दस्त्याने राजीव गांधींवर प्राणघातक हल्ला केला. राजीवजींनी तो हल्ला चुकविला व या हल्ल्यातून ते वाचले हे खरे, परंतु ही आपल्या जीवनाची अखेरची नांदी आहे हे राजीवजींना कधी कळलेच नाही. शहाबानो आणि रामजन्मभूमी बाबरी मशीद या प्रकरणी राजीव गांधींच्या धर्मनिरपेक्षतेची कसोटी लागली. शहाबानो प्रकरणी त्यांनी मुस्लिमांना खूष करण्यासाठी घटना दुरुस्ती केली, त्यामुळे हिंदू नाराज झाले, तर बाबरी मशीद प्रकरणी त्यांनी रामजन्मभूमीचे कुलूप काढून हिंदूंना राममंदिराचे दरवाजे खुले केले, त्यामुळे मुस्लीम नाराज झाले. बोफोर्स प्रकरणाच्या भ्रष्टाचाराचा चिखल तर सर्वत्र पसरलेला होता.
या सर्व प्रकरणामुळे राजीव गांधी यांच्या सरकारला उतरती कळा लागली. एकूणच राजीवजींची लोकप्रियता सातत्याने भरती आहोटीच्या लाटेवर खालीवर होत होती. परिणामी १९८९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. सत्ताहीन झाल्यावर ‘आपण बरेच काही शिकलो’ हे राजीव गांधींनी प्रांजळपणे कबूल केले, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. राजीव गांधींनी विनम्रपणे विरोधी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. १९९० च्या सुमारास आखाती देशात गल्फ युद्ध सुरू झाले असता ते थांबविण्याबाबत राजीव गांधींनी विरोधी पक्षात असूनही पुढाकार घेतला, हे विशेष होय. १९८९ नंतरच्या १८ महिन्यांत दोन सरकारे आली आणि
गेली. भाजपच्या रथयात्रा व रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणांमुळे व्ही. पी. सिंग यांचे सरकार कोसळले. त्यानंतर इंदिरा काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेवर आलेले चंद्रशेखर यांचे सरकार इंदिरा काँग्रेस पक्षाने पाठिंबा काढून घेताच पडले. त्यानंतर राष्ट्रपती वेंकटरामन यांनी मे १९९१ मध्ये पुन्हा निवडणुका घेण्याची अधिसूचना जारी केली.
मानवी बाँबस्फोटाने हत्त्या
दहाव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा राजीव गांधींनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांनी भारतभर झंझावाती दोरे केले. त्यांनी १५ दिवसांत १५ राज्यांतील सुमारे १७० लोकसभा मतदारसंघांतून प्रचारसभा घेतल्या. २१ मे १९९१ रोजी मद्रासहून पेरुम्बुदुरकडे प्रचारसभेसाठी राजीव गांधी रवाना झाले व रात्री १० वाजून २० मिनिटांनी तेथे जाऊन पोहोचले. त्यादिवशीची तेथील प्रचारसभा अखेरचीच ठरणार, हे नियतीशिवाय कोणालाच ठाऊक नव्हते. त्यादिवशी काँग्रेस पक्षाच्या महिला उमेदवार श्रीमती मार्गोथम चंद्रशेखर यांच्यासाठी श्री पेरांबुदुर येथे राजीव गांधी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. वास्तविक पाहता ही सभाच होऊ नये असे तामिळनाडू काँग्रेस (आय) चे अध्यक्ष राममूर्ती यांच्यासह अन्य काही स्थानिक नेत्यांना वाटत होते. याच्या उलट सभा झालीच पाहिजे, असा दिल्लीतील काही तमिळी नेत्यांचा आग्रह होता. यावेळी राजीव गांधींची मनःस्थितीही द्विधा झालेली होती. त्यामुळे सभास्थानावरची सुरक्षा यंत्रणाही थोडी गाफील राहिली.
त्यादिवशी इंदिरा गांधींच्या पुतळ्याचे श्री पेरांबुदुर येथे राजीव गांधींच्या हस्ते अनावरण व्हावयाचे होते. म्हणून अखेर सभा घेण्यास राजीव गांधींनी संमती दिली आणि त्यांच्या मागावर असलेल्या मारेकरी टोळीने आपले मायाजाल सभास्थानालगत असलेल्या इंदिरा गांधींच्या पुतळ्याजवळ मोठ्या शिताफीने पसरवले. यावेळी राजीव गांधींनी केवळ स्वसंरक्षणाकडेच दुर्लक्ष केले असे नव्हे, तर अतिउत्साहाच्या भरात सुरक्षाकडे तोडले. ही राजीव गांधींची तशी नेहमीचीच रीत होती. सुरक्षा यंत्रणेची चौकट मोडून लोकांमध्ये बेधडक मिसळणाऱ्या राजीव गांधींना, यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत विजयी होण्याचा एवढा काही भरवसा वाटत होता की, त्यापायी ते स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता लोकात सहज मिसळत होते आणि त्यांच्याशी थेट संपर्क साधत होते.
मारेकरी तमिळ महिला थनू हिने स्वतःच्या पाठीवर बॉम्ब बांधून घेतला होता, जो दूरचलित कळीने उडवला जाणार होता. मारेकऱ्यांनी गर्दीतून वाट काढण्याचा प्रकार तसा जुनाच होता. थनूच्या सोबतीला छायाचित्रकार आणि पत्रकार अशी भूमिका घेतलेला हरिबाबू होता. शिवाय अन्य दोघेचौघे होते. छायाचित्र
घेण्याच्या मिषाने हरिबाबू राजीव गांधी यांच्यासमोर गेला. पोलीस सब इन्स्पेक्टर अनुसूया हिने टाळून आणि रोखूनही थनू आघाडीवर राहिली. हातात फुलांचा गुच्छ घेऊन राजीव गांधींच्याजवळ जाऊन थनूने त्यांना अभिवादन केले. स्मितहास्य करून राजीव गांधींनी प्रतिसाद दिला. राजीव गांधींच्या चरणस्पर्शासाठी थनू खाली वाकली, तिला उठवण्यासाठी राजीव गांधीही थोडे खाली वाकले आणि क्षणार्धात नियतीने मानवी बाँबकडून आपला कार्यभाग उरकला. राजीव गांधींच्या मुखावरील स्मितहास्याचे रूपांतर जीवघेण्या किंकाळीत झाले. एकीकडे त्यांच्या स्वागतासाठी फटाके वाजत होते तर दुसरीकडे बाँबस्फोटाचा प्रचंड आवाज झाला होता. हा बाँबस्फोट एवढा काही शक्तिशाली होता की ते व्यासपीठावरदेखील पोहोचू शकले नाहीत. आसपासची माणसे दूरवर पेकली गेली. त्या स्फोटात राजीव गांधी, मारेकरी थनू, छायाचित्रकार हरिबाबू, थनूबरोबरच्या लता कानन व कोकिळा आणि दिल्ली पोलीस दलातील सब इनस्पेक्टर प्रदीप गुप्ता यांसह आणखी काहीजणांचा दुःखद शेवट झाला. यावेळी राजीव गांधींचे शिर शरीरापासून अलग होऊन पडले.
मरणोत्तर ‘भारतरत्न’
‘राजीवरत्न बिर्जिस गांधी’ या स्वनामाने शपथ घेऊन ३१ ऑक्टोबर १९८४ च्या सायंकाळी दिल्लीच्या काटेरी तख्तावर आरूढ झालेला अवघ्या ४० वर्षाचा हा नेता २१ मे १९९१ रोजी म्हणजे वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी आपली उणीपुरी अर्ध्या तपाची राजकीय कारकीर्द संपवून मध्यरात्रीपूर्वीच अनंतात विलीन झाला. फिरोज जहांगीर गांधी यांचा पहिला पुत्र दुसऱ्या जगात निघून गेला. २० ऑगस्ट १९४४ या दिवशी सकाळी सुरू झालेली एक जीवनयात्रा एकविसाव्या शतकाचे स्वप्न अधुरे सोडून परलोक सुधारण्यासाठी २१ मे १९९१ च्या रात्री इहलोकी संपुष्टात आली. थनू नावाची ती कृष्णवर्णीय तमिळ महिला मानवी बाँब नव्हे साक्षात् यमदूत होती. तिच्या स्फोटात राजीव गांधींच्या देहाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या. त्यानंतर सरकारी इतमामाने राजीव गांधींच्या पार्थिवावर दिल्लीत
अंत्यसंस्कार करण्यात आले. आधुनिक भारताची पायाभरणी करणारे व देशाला संगणक युगात घेऊन जाणारे युवा पंतप्रधान म्हणून सारा देश त्यांना ओळखतो. ३० मे १९९१ रोजी ‘भारत एकता आंदोलन, नवी दिल्ली’ यांच्यातर्फे ‘भारताचा महान सुपुत्र’ असा किताब देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच १९९१ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन त्यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला. मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित होणारे राजीव गांधी हे ६ वे भारतीय आहेत.
एकाच घराण्यातील पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी आणि पंतप्रधान राजीव गांधी या तीनही व्यक्तींना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. जगाच्या पाठीवरील असे हे एकमेव उदाहरण असावे !
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.