Birbal Stories In Marathi : बकरीचे वजन | मोठी रेषा | खरे दुर्दैव कुणाचे | हुशार ज्योतिषी

बकरीचे वजन, मोठी रेषा, खरे दुर्दैव कुणाचे, कावळे किती?, दारूड्याची चूक, सर्व जावयांना सुळी द्या! , हुशार ज्योतिषी , गाढवाचा बाप, डोळस आणि आंधळे | Birbal Stories In Marathi

बिरबल यांच्या कथांचं अमूल्य ज्ञान आणि विनोदाचं संग्रह आहे. हे कथांचं समृद्ध जग विविध आणि समृद्ध असलेल्या भारतीय सांस्कृतिक धरोहरांमध्ये समाविष्ट केलं आहे. ‘बिरबल कथांचं संग्रह’ हा ब्लॉग ह्या अद्वितीय आणि लोकप्रिय कथांचं संग्रह करतं, ज्यामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या कथांचं आनंद घेऊन जाण्याचा संधी देतं. अशा नैसर्गिक, मनोरंजनात्मक आणि ज्ञानदायी कथा संग्रहातून, ह्या ब्लॉगमध्ये आपल्याला बिरबलांच्या चतुरतेचं आणि आणखी अनेक रहस्यमय गोष्टींचं आनंद मिळेल. आणि हे सर्व केवळ एक क्लिक दूरचं आहे. आपलं स्वागत आहे ‘बिरबल कथांचं संग्रह’ ब्लॉगमध्ये!

आपल्याला हार्दिक स्वागत आहे!


बकरीचे वजन

Goat weight birbal stories in marathi  बकरीचे वजन

बिरबल नेहमीच बादशहाचे मनोरंजन करायचा तसेच बादशहाची काही चूक झाल्यास तो त्याला दाखवूनपण द्यायचा. मात्र अशा वेळी बादशहाला ते कमीपणाचे वाटायचे. एकदा अशीच चूक बिरबलाने दाखवून दिल्याने बादशहा बिरबलावर चिडला. त्यामुळे बिरबलही रागावून दिल्लीला निघून गेला. त्याचा खूप तपास केला पण बिरबलाचा काही शोध लागला नाही.

मग बादशहाने एक युक्ती केली. गावच्या आजूबाजूच्याही गावच्या पाटलांना बोलावून घेतले. बादशहाने प्रत्येकाला एकेक बकरी देऊन सांगितले, “एक महिनाभर प्रत्येकाकडे एकेक बकरी राहील. मात्र एक खबरदारी घ्यायची, तिचे वजन कमी होता कामा नये अथवा वाढताही कामा नये. जर कुणाचे तसे घडले तर कठोर शिक्षा देण्यात येईल. मग प्रत्येक पाटील आपल्याला दिलेली बकरी आपल्या घरी घेऊन गेला.

प्रत्येकाने बकरीचे वजन कमी-जास्त होऊ नये म्हणून काळजी घेतली परंतु असे करूनही प्रत्येकाच्या बकरीच्या वजनात फरक पडलेला होताच. फक्त एकाच्याच बकरीचे वजन तसे राहिले. बादशहाने त्या पाटलाला बोलावून विचारले, “तुझ्या बकरीचे वजन आहे तेवढेच कसे राहिले?”

त्यावर त्या पाटलाने सांगितले, “मी दिवसभर बकरीला भरपूर खायला घालायचो आणि रात्र झाल्यावर तिला वाघाच्या पिंजऱ्यासमोर बांधून ठेवायचो. त्यामुळे तिला दिवसा खाल्लेले अन्न रात्री पचायचे नाही!”

बादशहाने पाटलाला शाबासकी दिली, “वा! तुला!” मग पाटलाने खरी हकिगत सांगितली, छान युक्ती सुचली “गावात एक साधू राहायला आला आहे, त्याने ही युक्ती मला सांगितली!” पाटलाने असे सांगताच बादशहाच्या डोक्यात लगेच प्रकाश पडला.

बादशहाने लगेच ओळखले, ” बरोबर! तो साधू दुसरा तिसरा कुणी नसून बिरबलच असणार! ” आणि मग बादशहा स्वतः त्या साधुच्या वेषातील बिरबलाकडे गेला आणि त्याची समजूत काढून त्याला पुन्हा आपल्या दरबारात आणले.


मोठी रेषा

एकदा बादशहा आणि बिरबल संध्याकाळच्या वेळी नदीच्या काठाने फिरायला चालले होते. चालता चालता बादशहाने आपल्या हाताच्या बोटाने रेतीवर खाली वाकून एक रेष काढली. बादशहा बिरबलाला म्हणाला, “बिरबल, आता एक करायचं या रेषेला हात देखील न लावता ही रेष लहान करून दाखव!”

बिरबलाने क्षणभर देखील वेळ लावला नाही. त्याने काय केले. खाली वाकला आणि रेतीवर बादशहाने काढलेल्या रेषेशेजारी स्वतःच्या बोटाने एक मोठी रेष काढली. त्यामुळे बादशहाची रेष आपोआपच लहान झाली. बादशहाने बिरबलाच्या हुशारीचे मनसोक्तपणे कौतुक केले.


खरे दुर्दैव कुणाचे

एक दिवस सकाळी सकाळीच बादशहाला भेटायला बिरबल आला. बादशहा खूप नाराज दिसत होता. बादशहां बिरबलाशी बोलू लागला, “अरे बिरबला, तू एवढ्या सकाळी सकाळीच माझ्याकडे आलास?” बिरबलास आश्चर्य वाटले. तो म्हणाला, “का महाराज? मी सहज आलोय तुम्हाला भेटायला.” मग बादशहा म्हणाला, “माझे अजून स्नान व्हायचे आहे आणि तेही खूप अंग रगडून, घासून करायचे आहे.”

बिरबलाने सहज कुतूहलाने विचारले, “पण महाराज, आजच आपण एवढे रगडून, घासून स्नान का बरं करणार?” हे ऐकून बादशहा अधिकच नाराज झाला, तो सांगू लागला, “मला काल स्वप्न पडले स्वप्नात मी अत्तराच्या हौदात पडलो तर तू गटारात….” मग बिरबलही हसला. तो म्हणाला, “मलाही तेच स्वप्न पडले होते, पण त्या स्वप्नात मी तुम्हाला आणि तुम्ही मला चाटत होता.”

सर्वात बलवान बादशहाने एकदा दरबार भरला असताना सर्वांना एक प्रश्न विचारला, “या जगात सर्वात बलवान कोण आहे?” बादशहाचा प्रश्न ऐकून प्रत्येकजण विचारात पडला. मग एका मागोमाग एक सरदार उठून बादशहाच्या प्रश्नाचे उत्तर सांगू लागला. “महाराज, आपणच ह्या जगात सर्वांत बलवान आहात!” प्रत्येक सरदार एकच उत्तर देत होता. बिरबल मात्र शांतपणे तसाच बसून राहिला होता. बिरबल काहीच बोलत नाही हे पाहून सर्वचजण आपापसात कुजबुजत होते. सर्वांच्या लक्षात येत होतं की, बिरबलाचं उत्तर नक्कीच काहीतरी वेगळं असावं. शेवटी बादशहाला राहवलं नाही. त्याने बिरबलास विचारलं, “बिरबला तू सांग, ह्या जगात सर्वात बलवान कोण आहे ते!” बिरबल उभा राहिला आणि अगदी शांतपणे उत्तर देत म्हणाला, “महाराज, ह्या जगात सर्वात जास्त बलवान आणि तेही आपल्यापेक्षा बलवान काय असेल तर वेळ!” आणि मग ह्या उत्तराला बादशहाने संमतीदर्शक मान डोलावली.


कावळे किती?

HOW MANY CROWS birbal stories in marathi कावळे किती

बादशहाच्या दरबारात एक विद्वान मौलवी आला होता. बादशहा सतत बिरबलाच्या विद्वत्तेविषयी मौलवीला सांगत होता. त्यामुळे मौलवीच्या मनात बिरबलाविषयी खूपच मत्सर वाटू लागला. मग बादशहा मौलवीला म्हणाला, “एकदा तूच त्या बिरबलाच्या हुशारीची परीक्षा घे!”

मौलवीला ही चांगली संधीच चालून आल्याने त्याला खूप आनंद झाला. त्याने खूप विचार केला आणि ठरविले की असा काही प्रश्न बिरबलास विचारायचा की त्याला त्याचे उत्तरच देता येणार नाही. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. भर दरबारात मौलवीने बिरबलास प्रश्न विचारला, “बिरबला, सांग! आपल्या राज्यात एकूण किती कावळे आहेत?” बिरबलाने क्षणाचाही विलंब लावला नाही. त्याने धाडकन उत्तर दिले, “दहा लाख दोन हजार पाचशे सत्तर.” त्यावर बिरबलास त्याने उलट प्रश्न विचारला, “कावळे कमी असतील तर?”

बिरबल म्हणाला, “तर मग काही कावळे दुसऱ्या राज्यात पाहुणे म्हणून गेले असतील!”

यावर बिरबलास बादशहाने पुन्हा एक प्रश्न विचारला, “हो पण कावळे जास्त असतील तर?” यावरही बिरबलाने लगेच उत्तर दिले, “जास्त कावळे असतील तर सरळ आहे की बाहेरच्या राज्यातील काही कावळे आपल्या राज्यात पाहुणे म्हणून आले असतील!!”

बिरबलाचे उत्तर ऐकताच बादशहाने मौलवीकडे नुसती नजर टाकली. मौलवी खजील झाला आणि त्याने मान खाली घातली.


दारूड्याची चूक

DRUNK MAN birbal stories in marathi दारूड्याची चूक

एकदा बादशहा हत्तीवरून फिरायला चालला होता. तेवढ्यात समोरून एक दारुड्या झोकांड्या खात पुढे आला आणि बादशहाला अतिशय उमटपणे म्हणाला, “ओ साहेब तुमचा हत्ती विकायचा आहे का? बोला ‘किती पैसे देऊ?” त्याचे बोलणे ऐकल्यावर बादशहा खूप संतापला आणि त्याने आपल्या सैनिकांना सांगितले, “ताबडतोब याला पकडा आणि तुरुंगात टाका!” सैनिकांनी त्या दारुड्याला पकडून तुरुंगात नेऊन टाकले. तुरुंगात संध्याकाळी त्या दारुड्याची सर्व नशा उतरली आणि मग त्याला त्याची चूक कळली.

तो मनाशी म्हणाला, “बापरे आपण दारूच्या नशेत बादशहाला काय बोललो? आता बादशहा आपल्याला माफ नाही करणार, तो आपली जीभच कापून टाकेल!”पण दारुड्याचे नशीब इतके चांगले की दुसऱ्या दिवशी मुख्य वजीर म्हणून बादशहाने बिरबलास तुरुंगात पाहणी करायला पाठविले. बिरबल दिसताच, दारुड्याने बिरबलाचे पायच धरले आणि गयावया करू लागला, “मला वाचवा हो! मी खूप गरीब आहे, मी दारूच्या नशेत होतो. त्यामुळे मी काय बोललो ते माझे मलाच कळले नाही. कृपा करा माझ्यावर!” बिरबलाला त्या दारुड्याची दया आली.

मग बिरबलाने दारुड्याच्या कानात एक युक्ती सांगितली. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. दारुड्याला बादशहा समोर उभे करण्यात आले. बादशहा खूप संतापून दारुड्याला विचारू लागला, “बोल तुला हत्ती घ्यायचा आहे का?” बादशहाचा राग पाहून दारुड्याला घाम फुटला, दारुड्या थरथर कापू लागला. तो बादशहाला सांगू लागला, “महाराज जो हत्ती विकत घेणारा होता तो अचानक निघून गेला.

मी फक्त दलाल. गरीब माणूस. मग मी काय हत्ती विकत घेणार. महाराज मला तुम्ही माफ करा.” मग बादशहालाही दारुड्याविषयी दया वाटू लागली. त्याने माफ केले आणि त्याने विचारले, “अरे काल तूच दारूच्या नशेत चूक केलीस आणि आज तुला हे असे उत्तर द्यायचे सुचले कसे?”

दारुड्याने खरे काय ते सांगितले, “महाराज, ही बुद्धी माझी नाही. बिरबल महाशयांनीच मला कसे उत्तर द्यायचे ते सांगितले.”


सर्व जावयांना सुळी द्या!

एकदा बादशहाने आपल्या जावयाला निरोप पाठवला. त्याने सांगितले, “मी, बऱ्याच दिवसात मुलीला भेटलो नाही, तर तिला माहेरी पाठवावे!” तर जावयाने साफ नकार दिला. जावयाचा विरोध कळल्यावर बादशहा खूप संतापला. त्याने बिरबलास बोलावून घेतले. बिरबलाने खूप समजावण्याचा प्रयत्न केला, “जावई तसा असंतुष्टच असतो, त्याला उपकाराची जाणीव राहतेच असे नाही. परंतु सर्वच जावई सारखे असतात असे नाह.” परंतु बादशहाला काही पटवूनच घ्यायचे नव्हते. त्याने बिरबलास आदेश दिला, “आपल्या राज्यातल्या सगळ्या जावयांना सुळावर चढवायचे आहे. ताबडतोब सूळ तयार करावेत.”

बादशहाच्या आज्ञेनुसार सर्व सूळ उभारणीचे काम सुरू झाले. काही लाकडी – काही लोखंडी सूळ तयार करण्यात आले. सुळांचे काम पूर्ण झाल्यावर बिरबल बादशहाला म्हणाला, “महाराज, सर्व सूळ तयार आन्त. फक्त आपण एकदा ते नजरेखालून घालावेत.”

बिरबलाच्या सांगण्यानुसार बादशहा सूळ पाहायला गेला. बिरबलाने बादशहास लाकडी सूळ दाखविले, लोखंडी सूळ दाखविले आणि त्या सुळांच्या शेवटी एक सूळ चांदीचा होता आणि त्या पलीकडे एक सोन्याचा सूळ होता. बादशहास आश्चर्य वाटले. त्याने विचारले, “काय रे बिरबला, हा चांदीचा सूळ कोणासाठी?” त्यावर बिरबल म्हणाला, “हा सूळ माझ्यासाठी कारण मीही एक जावई आहे!” मग सोन्याच्या सुळाकडे पाहत बादशहाने विचारले, “आणि हा सोन्याचा सूळ कोणासाठी?” बिरबल नम्रतेने म्हणाला, “महाराज हा सूळ खास आपल्यासाठी केला आहे. कारण आपणही कुणाचे तरी जावई आहातच!”

बिरबलाचा हा सगळा प्रकार पाहून बादशहाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्याला कळून चुकले की आपण किती अविचाराने वागत आहोत. मग बादशहाने बिरबलास लगेच आज्ञा दिली, “कुणी पाहायच्या आत हे सगळेच सूळ ताबडतोब काढून टाक!”


हुशार ज्योतिषी

ASTROLOGER birbal stories in marathi हुशार ज्योतिषी

एकदा बादशहाने सगळीकडे एक दवंडी पिटायला सांगितली. त्याप्रमाणे संपूर्ण दिल्लीत दवंडी पिटवली गेली, “ऐका हो ऐका! जो कुणी बादशहाच्या मनातली गोष्ट ओळखेल त्याला १० हजार सुवर्ण मोहरा आणि ५ गायी बक्षीस देण्यात येतील!”

अनेक मंडळी दरबारात येत राहिली. कुणालाच बादशहाच्या मनातले

ओळखता आले नाही. त्यामुळे बक्षीस तर लांबच उलट उत्तर चुकल्याबद्दल सर्वांसमोर १०-१० फटकेच खावे लागले.

बादशहाच्या दवंडीचे वृत्त एका ब्राह्मणाच्या कानी गेले. तो चांगला ज्योतिषीपण होता. तो दिल्लीत आला. बिरबलास भेटला. त्याने बादशहाची अचूक कुंडलीपण मांडली. परंतु बिरबलाने त्याला एक मंत्र दिला, “ठीक आहे. तुझे ज्योतिष शास्त्रावर चांगले प्रभुत्व आहे परंतु प्रत्येक ठिकाणी असे शास्त्र कामी येतेच असे नाही. थोडे चतुराईने देखील वागावे लागते. तर तू थोडी चतुराई दाखव म्हणजे यश मिळेल!”

ब्राह्मण ज्योतिषी दरबारात गेले. त्याने बादशहाला त्याच्या मनातले ओळखून दाखवायची इच्छा प्रकट केली. परंतु बादशहा त्या ब्राह्मण ज्योतिषास म्हणाला, “हे बघ आधी ह्या सरदारांच्या मनात काय चालले आहे ते तू ओळखून दाखव!” ब्रह्मण ज्योतिषाने तात्काळ ओळखून दाखवले, “महाराज, ह्या सरदारांना असे वाटते आहे की माझे उत्तर चुकावे आणि तुमचा विजय

व्हावा. तसेच तुम्हाला दीर्घायुष्य, दीघियुरारोग्य लाभावे!”

बादशहाने सगळ्या सरदारांना विचारले, “काय आपणा सर्वाच्या मनात हाच विचार आहे?” सगळ्या सरदारांनी माना हलविल्या. मग बादशहा म्हणाला, “अरे ब्राह्मणा आता आमच्या मनात काय आहे ते सांगू शकशील?”

ब्राह्मण ज्योतिषाने तात्काळ बादशहाच्या मनातलेही सांगून टाकले, “महाराज, आपले सर्व पितर स्वर्गात जावेत आणि फक्त आपल्या वंशजांनीच दिल्लीचे राज्य चालवावे!”

बादशहा त्या ब्राह्मण ज्योतिषाची हुशारी पाहून खूप खूष झाला आणि त्याने ठरल्याप्रमाणे १० हजार सुवर्ण मोहरा आणि पाच गायी बक्षीस देण्याचे मान्य केले.

परंतु ब्राह्मण ज्योतिषाने एक विनंती केली, “महाराज, या पूर्वी ज्या ज्या ज्योतिषांचे उत्तर चुकले त्या प्रत्येक ज्योतिषास १०० सुवर्ण मोहरा बक्षीस द्याव्यात आणि तेवढ्या मोहरा माझ्या बक्षीस मोहरातून कमी कराव्यात!”

बादशहाने ब्राह्मण ज्योतिषाची मागणी मान्य केली. त्या प्रमाणे उत्तर चुकलेल्या सर्व ज्योतिषांना प्रत्येकी १०० सुवर्ण मोहरांचा लाभ झाला. ब्राह्मण ज्योतिषी गरीब होता. त्यालाही सुवर्ण मोहरा आणि पाच गायी बक्षीस मिळाल्याने त्याची गरिबी दूर झाली आणि तो सुखासमाधानाने ऐश्वर्यात जगू लागला.


गाढवाचा बाप

एक सरदार होता. तो ज्याच्या त्याच्या अंगावर सारखा ओरडायचा. त्याचा एक तरुण मुलगा होता. त्याच्यावरही तो सारखा ओरडायचा. वडिलांच्या असल्या वागण्याने तो तरुण खूप घाबरून गेला होता. मग

बिरबलाने त्या तरुणाला विश्वासात घेतले, त्याला एक युक्ती सांगितली. त्याप्रमाणे त्या तरुणाने सर्व काही लक्षात ठेवले.

काही दिवसांनी त्या सरदाराकडे एक मोठा मेजवानीचा कार्यक्रम होता. नातेवाईक, मित्रपरिवार, खूप मंडळी जमली होती आणि नेमके अशा वेळी काय झाले – त्याच्या तरुण मुलाच्या हातून एक चमचा खाली पडला. सरदार खूप भडकला आणि सर्वांच्या समोर मोठ्याने ओरडला, “काय गाढव आहेस?” मग त्या तरुणाने तात्काळ चातुर्य दाखविले. तो म्हणाला, “होय! होय! मी जरूर गाढव आहे. पण आपण तर गाढवाचे बाप आहात!”

हे ऐकून सर्वत्र जोरात हशा पिकला. सरदार खजील झाला आणि मग त्यानंतर तो कधी कुणाच्या अंगावर ओरडला नाही.


डोळस आणि आंधळे

एकदा बादशहा दरबारात चर्चा करीत होता.

‘ह्या जगात आंधळे किती आणि डोळस किती?’

त्यावर बिरबल म्हणाला, “आंधळ्यांची संख्या जास्त आहे.” बादशहाने उलट प्रश्न विचारला, “कशावरून तू हे सांगतोस?”

मग बिरबल म्हणाला, “तुम्हाला, ह्याची खात्रीच करून घ्यायची असेल तर प्रत्यक्षच तुम्हाला उद्या. दाखवून देतो!”

दुसऱ्या दिवशी दरबार भरला. बराच वेळ झाला. बिरबल काही दिसेना म्हणून बादशहाने आपल्या एका नोकराला बिरबलाचा तपास करायला पाठविले. नोकर बिरबलाचा तपास काढून दरबारात आला, तो बादशहाला म्हणाला, “महाराज! बिरबल साहेब भर बाजारात एक बाज  विणत बसले आहेत!” बादशहाला समजेना, दरबारात यायचं सोडून बिरबल आत्ता बाज काय विणत बसला आहे. मग स्वतःच बादशहा बाजारात गेला. बिरबलाचे बाज विणणे चालूच होते.

बादशहा बिरबलाच्या जवळ गेला आणि त्याने बिरबलास विचारले, “बिरबला, हे तू काय करीत आहेस?” बिरबलाने बादशहाकडे पाहिले आणि दुसऱ्या क्षणी आपल्या कारकुनाकडे पाहत त्याला म्हणाला, “हे बघ महाराजांचे नाव या वहीत अगदी अग्रक्रमाने म्हणजे सुरुवातीलाच लिही!” बादशहाने ती वही हातात घेतली. त्या वहीवर लिहिले होते, “आंधळ्यांची वही!” ते वाचून बादशहा भडकला. तो बिरबलास म्हणाला, “तुला मी काय आंधळा वाटलो ? खुशाल माझे नाव आंधळ्यांच्या यादीत

टाकतोस?” मग बिरबलाने खुलासा केला. “मी इथे बाज विणत बसलोय. जे मला प्रश्न विचारतात, “कायरे बिरबला आज तू स्वतः बाज विणतोस?” अशांची नावे डोळसांच्या वहीत नोंदवत आहे आणि ज्यांना दिसत असूनही जे विचारतात, “बिरबला, हे तू काय करीत आहेस?” त्यांची नावे आंधळ्यांच्या वहीत आहेत. याप्रमाणे आंधळ्यांची नावे जास्त झाली आहेत.”

मग बादशहाला बिरबलाचे म्हणणे पटले. की ह्या जगात आंधळेच जास्त आहेत.

बादशहाने बिरबलास आज्ञा दिली, “बिरबला, तुझा हा उद्योग आता बंद कर! तू म्हणतोस त्याप्रमाणे ह्या जगात आंधळेच जास्त आहेत.”


तंबाखू माणसांसाठीच!

एकदा बिरबल आणि बादशहा फिरायला चालले होते. दोघे फिरत असताना बिरबलाचे तंबाखू खाणे चालू होते. पुढे जाता जाता एक गाढव चरता चरता तंबाखूच्या लागवड केलेल्या भागात शिरले. तेथील फक्त गवतच गाढव खात होते. ते पाहून बादशहा बिरबलास म्हणाला, “बघ त्या गाढवालाही कळते की आपण तंबाखू खाऊ नये. ते तंबाखूच्या रोपाचा वास येताच लगेच बाजूने निघून जात आहे!” मग थोड्या वेळाने बिरबल-बादशहा थोडे पुढे गेल्यावर बिरबलाने पुन्हा हातावर तंबाखू मळली आणि तंबाखूची गोळी तोंडात ठेवली. बिरबल बादशहाला म्हणाला, “आपण म्हणता ते बरोबर आहे महाराज ! तंबाखू ही माणसांसाठीच असते, गाढवांसाठी नव्हे!” बिरबलाचे हजरजबाबीचे उत्तर ऐकून बादशहाने बिरबलाची पाठ थोपटली आणि पुन्हा दोघं गप्पा मारीत पुढे जाऊ लागले.


गोमाता

एकदा दरबारात बादशहा सगळ्यांशी निरनिराळ्या प्राण्यांवर चर्चा करीत होता. बादशहाला गाईचे खूपच महत्त्व वाटत होते, त्यामुळे उपस्थित असलेले सर्वच सरदार आणि मौलवी गाईची स्तुती करू लागले. परंतु त्यातला एक मौलवी, जाणूनबुजून बिरबलास डिवचण्यासाठी बोलू लागला, “गाय पवित्र आहे, त्यामुळे तिचे दूध आरोग्यदायी असल्याचे हिंदू लोक मानतात. पण गायीचे मांस मात्र आरोग्याला चांगले नसते!” त्या मौलवीचे असे भाष्य ऐकल्यावर बिरबल चिडलाच. तो लगेच त्या मौलवीला म्हणाला, “गाय हा प्राणी केवळ हिंदूपुरताच उपयोगी नाही. करायची नसते.”

गाय ही गोमाता आहे आणि आईची किंमत ही तिचे रक्त पिऊन

बिरबलाचे घणाघाती हजरजबाबी परखड उत्तर ऐकून मौलवी खजिल होऊन गप्पच बसला.


चंद्रसूर्याला न दिसणारी गोष्ट

बादशहाला एक छंदच होता. दरबार भरला की तो सर्वांना नेहमी कुठला ना कुठला तरी प्रश्न विचारी. एकदा असाच दरबार भरला असता त्याने सर्वांना प्रश्न विचारला, “मला असे सांगा की अशी कोणती गोष्ट आहे की जी गोष्ट सूर्याला दिसत नाही आणि चंद्रालाही दिसू शकत नाही!” बादशहाने प्रश्न विचारल्यावर प्रत्येक जण विचारात पडला. कुणालाच त्याचे नेमके उत्तर देता येईना. शेवटी बादशहाने बिरबलाचे ना पुकारले. बिरबलाने उत्तर दिले, “अशी एकच गोष्ट आहे की जी सूर्याला दिसू शकत नाही आणि चंद्रालाही दिसू शकत नाही आणि ती गोष्ट म्हणजे अंधार!”

बादशहाने आणि दरबारातील सर्वच मंडळींनी बिरबलाच्या ह्या हजरजबाबीपणाचे पुन्हा पुन्हा खूप कौतुक केले.


धीट आणि घाबरट स्त्री

एक दिवस बादशहाने बिरबलास बोलावून घेतले. त्याने बिरबलास आज्ञा दिली, “आजच्या आज संध्याकाळच्या आत एक धीट स्त्री आणि एक घाबरट स्त्री शोधून आण.”

बिरबल बादशहाला म्हणाला, “जशी आपली आज्ञा महाराज!”

बिरबलाने अवघ्या तासात ते काम केले. बिरबल दरबारात हजर झाला. मग बादशहा त्याला म्हणाला, “अरे बिरबला, एकेकीला आत आणू नकोस, दोघींना एकाच वेळी आत घेऊन ये!” मग बिरबलाने खुलासा केला, “महाराज, मी एकच स्त्री घेऊन आलो आहे. तिच्यातच धीट स्त्री आणि घाबरट स्त्री अशी दोन्ही रूपं आहेत. जेव्हा ही स्त्री आपल्या प्रियकराला भेटायला जाते तेव्हा ती अंधार, भूत अथवा चोराला कुणालाच भीत नाही. मात्र पतिजवळ असताना हीच स्त्री साध्या झुरळालासुद्धा घाबरते!”

बिरबलाची राज्यात असणारी बारीक जागरूक नजर आणि हुशारी पाहून बादशहाने बिरबलास स्वतःच्या गळ्यातला हार काढून बक्षिस दिला.


प्रश्न तीन पण उत्तर एकच

रशियातून एक विद्वान दिल्लीत आला होता. त्याला कळले की बादशहाच्या दरबारात नऊ रत्नांसारखे ९ विद्वान आहेत. तो बादशहाला भेटला आणि त्याने दरबारातल्या विद्वानांची परीक्षा घेण्याची इच्छा व्यक्त केली. बादशहाने त्या रशियन विद्वानाचे दरबारात जोरदार स्वागत करून त्याची इच्छाही मान्य केली. रशियन विद्वानाने दरबारात परीक्षा घेण्यापूर्वी सर्वांना एक अट घातली, तो म्हणाला,

“मी तीन वेगवेगळे प्रश्न विचारणार आहे, मात्र तिन्हीचे उत्तर एकाच वाक्यात द्यायचे आहे.”

बादशहाच्या संमतीने त्याने दरबारात सर्वांना ३ प्रश्न विचारले.

१) भाकरी का करपली ?

२) पाने का सडली?

३) घोडा का अडला?

सर्वजण विचारात पडले. बराच वेळ गेला तरी कुणालाच नेमके उत्तर सुचेना. कुणी योग्य असे उत्तर देणारा दिसत नाही असे लक्षात येताच तो रशियन विद्वान बादशहाला म्हणाला, “आता मी दुसऱ्या देशात जाऊन हे प्रश्न विचारेन!” पण तेवढ्यात बिरबल आला आणि त्याने क्षणाचाही विचार न लावता तिन्ही प्रश्नांचे उत्तर एका वाक्यात दिले.

भाकरी करपली, पाने सडली, घोडा अडला कारण ‘न फिरवल्याने!’

बिरबलाचे अचूक उत्तर ऐकून रशियन विद्वान खूपच खूष झाला. तो मनसोक्त हसला. त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून संपूर्ण दरबारात टाळ्यांचा कडकडाट झाला. बिरबलाचे, त्याच्या हुशारीचे, हजरजबाबीपणाचे दरबारात जोरदार कौतुक झाले. बिरबल वेळेत आला, त्याने अचूक उत्तर

दिल्यानेच साऱ्या दरबाराची इभ्रत वाचवली म्हणून बादशहाने बिरबलाचे अगदी मनापासून कौतुक केले.


आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.

Leave a Comment