कथा | धूर्त कोल्हा आणि लबाड लांडगा |उतावीळपणाची सजा | Marathi Story

धूर्त कोल्हा आणि लबाड लांडगा आणि उतावीळपणाची सजा

कथा – Marathi Story ” धूर्त कोल्हा आणि लबाड लांडगा ” , ” उतावीळपणाची सजा ” हा ब्लॉग आपल्याला विविध आणि रोमांचक कथांच्या संग्रहासाठी आणि मराठीतून नवीन साहित्याच्या आनंदात प्रवेश करण्यासाठी तयार केला गेला आहे. या ब्लॉगमध्ये, आपण धूर्त कोल्हा आणि लबाड लांडगांच्या जगात अनेक कथांच्या साक्षी व्हावं, ज्या त्यांनी उतावीळपणाची सजा भोगायला अनुभवलेली आहे. या कथांमध्ये समाजातील विविध गुण, चरित्रे, आणि भावना या विशेषांच्या उघडतात. हे ब्लॉग तुमच्या साहित्याच्या भ्रमातून बाहेर पडण्यास मदत करेल आणि नवीन कथा आणि कथाकथनांच्या संग्रहाच्या आनंदात तुम्हाला सहभागी बनवेल. आपले स्वागत आहे आणि आपल्याला खात्री आहे की आपल्याला हे कथा संदर्भ आवडेल!


कथा – धूर्त कोल्हा आणि लबाड लांडगा

fox story marathi

एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात नाना प्रकारचे पशू राहात होते. त्यामध्ये एक कोल्हा होता. तो अतिशय धूर्त होता. तसाच एक लांडगाही होता. तो फारच लबाड होता. ते दोघं सर्व पशुंना सतत फसवत असत. एका वाघोबाशी त्या दोघांची घनिष्ठ मैत्री होती. त्यामुळे सर्व पशू त्यांना वचकून असत. वाघोबाचा रोष ओढवू नये म्हणून कुणीही त्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा आरोप करीत नसत.

एकदा काय झालं, त्या तिघांनी केली एका सांबराची शिकार. खरंतर शिकार वाघोबांनीच केली होती. कोल्होबा आणि लांडगोबांनी सांबर मेल्यावर त्याच्यावर झडप घालून हजेरी लावलेली होती. अशा परिस्थितीत त्या दोघांना आपली वाटणी देण्याची वाघोबाची इच्छा नव्हती. मैत्रीमुळे परखडपणे वाघोबा बोलूही शकत नव्हते. तेव्हा त्यांनी एक शक्कल लढवली. त्या दोन मित्रांना उद्देशून वाघोबा म्हणाले,

“मित्रांनो, आपण शिकार केली खरी, पण आज माझा उपास असल्यामुळं मी मांस खाऊ शकत नाही. त्यामुळे शिकारीची वाटणी उद्याच करु, तोवर मी या मेलेल्या सांबरावर पहारा करीत इथेच बसून राहीन. तुम्ही आता आपापल्या ठिकाणावर जाऊन विश्रांती घेण्यास मुळीच हरकत नाही.”
वाघोबाचे बोलणे ऐकताच धूर्त कोल्होबाने लगेच ओळखले की, ते निघून जाताच वाघोबा सांबराच्या निम्या शिम्या मांसाचा फडशा पाडणार. पुन्हा दुसऱ्या दिवशी उरलेल्या निम्या मांसातील निम्मी वाटणी हक्काने फस्त करणार. मग आमच्या वाटणीला काय उरणार ? वाघोबा नेहमी असंच करतात. यावेळी त्यांचा हेतू सफल होऊ द्यावयाचा नाही असा विचार करुन लगबगीने कोल्होबा वाघोबाजवळ जात विनयानं म्हणाले,

” वाघोबादादा, शिकारीवर पहारा करण्याचं काम तुम्ही नेहमीच करता. आम्हाला कसलीच तसदी घेऊ देत नाही. आज आम्ही तुमचं मुळीच ऐकणार नाही. आज तुम्ही फारच थकला असल्यामुळे आम्ही तुम्हाला सक्तीने विश्रांती घेणं भाग पाडणार आहोत. तेव्हा आता क्षणभरही इथं न थांबता तुमच्या गुहेत जाऊन विश्रांती घ्या.”
कोल्होबाच्या बोलण्यावर वाघोबांनी खूप आढेवेढे घेऊन पाहिलं, पण कोल्होबांनी त्यांना मुळीच दाद दिली नाही. लांडगोबांनीही कोल्होबांचीच री ओढल्यामुळे तर वाघोबांचे काहीच चालेना. अगदी नाईलाजानेच ते त्याच्या गुहेच्या दिशेने निघून गेले. कोल्होबा आणि लांडगोबा मेलेल्या सांबरावर पहारा देत तेथेच बसून राहिले.

थोड्या वेळाने दोघांनाही खूप भूक लागली. वाघोबा शिकारीवर पहारा देण्याचं निमित्त करुन नेहमीच शिकार फस्त करतात. मग आज आपणही थोडी फार शिकार फस्त केली तर काय बिघडणार आहे ? असा विचार करुन ते दोघेही त्या सांबराचे लचके तोडू लागले. हळूहळू सांबराचे मांस खाण्यात ते इतके मग्न झाले की सांबराच्या हाडांचा केवळ सांगाडा उरल्यावरच ते भानावर आले. आता वाघोबाला काय सांगायचे ? या धास्तीने त्यांच्या भरल्या पोटी भीतीचा गोळा उठला.

दोघांनी बराच विचार केला, पण घडलेल्या प्रसंगातून सुटका करुन घेण्याचा मार्ग दोघांनाही सुचेना, विचार करुन थकल्यावर कोल्हा लांडग्याला खिजवीत म्हणाला,

fox

“लांडगोबा, माझ्या धूर्तपणामुळं आपली दोघांचीही पोटं भरली. आता खाल्लेलं पचवण्यासाठी तुम्ही काही लबाडी केली नाही तर लबाड लांडगा हे तुमचं ब्रीद तुम्ही मिरविण्यात काहीच अर्थ उरणार नाही. तेव्हा तुमचं ब्रीद सांभाळायचं असेल, तर काही तरी लबाडी करा आणि वाघोबाच्या तावडीतून सुटण्याची उमेद धरा. “
कोल्होबानं लांडगोबाला डिवचून त्याच्या लबाड बुद्धीला चालना देताच ताडकन उठत लांडगोबा म्हणाले,

” कोल्होबा, तुमच्या धूर्तपणाची फुशारकी फार गाजवू नका. तुम्ही जितके धूर्त तितकाच मी ही लबाड आहे. कुणीही खरं जितक्या छातीठोकपणे बोलू शकत नाही, त्याच्या दसपटीने मी खोटंही छातीठोकपणे बोलू शकतो. माझ्या मागून तुम्ही धावत या आणि माझ्या लबाड बोलण्याचा प्रभाव पहा.

इतकं बोलून लांडगोबा वाघोबाच्या गुहेच्या दिशेने सुसाट धावत सुटले. त्याच्या मागून कोल्होबाही धावू लागले. वाघोबाच्या गुहेजवळ येताच धापा टाकत लांडगोबा गुहेत शिरले. त्याच्या पाठोपाठ कोल्होबाही गुहेत शिरले. वाघोबा त्यावेळी गुहेत विश्रांती घेत पहुडले होते. लांडगोबाला पाहाताच ताडकन उठत त्यांनी विचारले,

“लांडगोबा, शिकारीवर पहारा करायचं सोडून तुम्ही इथं का आलात ?”

वाघोबांच्या प्रश्नावर लांडगोबा गयावया करीत म्हणाले,

आता कसली शिकार आणि कसला पहारा घेऊन बसलात, वाघोबादादा ?”

लांडगोबाच्या विधानावर खवळून वाघोब्रा गर्जले,

मूर्खा, खरं काय ते बोल. नाहीतर तुझी धडगत नाही हे लक्षात ठेव ! “

वाघोबाची तंबी ऐकून अधिकच गयावया करीत लांडगोबा

म्हणाले,
‘देवा शपथ खरं तेच सांगतो, दादा, फारच तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी मी तळ्याकाठी गेलो होतो. लगबगीनं पाणी पिऊन परत आलो, येऊन पाहातो तर मेलेलं सांबर गायब. सांबर कुठं आहे म्हणून पहारेकरी कोल्होबांना विचारलं तर ते काहीही न सांगता मोठमोठ्यानं रडू लागले. पुन्हा पुन्हा विचारलं तरी अवाक्षर न बोलता ते आपले रडतच बसले. त्यामुळं त्यांच्या नादी न लागता घडलेला प्रकार तुमच्या कानावर घालण्यासाठी धावतच मी तुमच्याकडं आलो. माझं खोटं वाटत असेल तर या कोल्होबांनाच विचारा.’

Tiger looking at fox

लांडगोबांनी लबाडीने स्वतःची सुटका करुन घेऊन
कोल्होबांना संकटात टाकले होते. आता आपण काय करावे असा विचार करतानाच कोल्होबांना रडू कोसळले. त्यांना रडताना पाहून वाघोबा थोडे शांत होत म्हणाले,

“कोल्होबा, तुम्ही घाबरु नका. तुमच्याकडून काही चुकलं असेल तर मी काही तेवढ्यासाठी तुम्हाला एकदम तोंडात उचलून टाकणार नाही. मात्र जे काही घडलं असेल ते अगदी खरं खरं सांगा.”

“वाघोबादादा, तुमच्याशी खोटं बोलायचं म्हणजे देवाशीच खोटं बोलण्यासारखं आहे. असं पाप माझ्याकडून घडणार नाही याची खात्री बाळगा आणि माझ्या डोळ्यादेखत त्या कजली बनातील चित्यानेच आपली शिकार पळवली या माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवा !” कोल्होबाने कजली बनातील चित्याने शिकार पळवल्याचा

उल्लेख करताच मागचा पुढचा विचार न करता वाघोबा खवळून डरकाळी फोडीत म्हणाले,

मित्रांनो, आज आमच्या तोंडची शिकार पळवणाऱ्या त्या चित्त्याची शिकार आपण उद्या नक्कीच करु. आता तुम्ही निर्धास्तपणे आपापल्या ठिकाणावर जाऊन विश्रांती घ्या. “

वाघोबांची आज्ञा मिळताच धूर्त कोल्होबा व लबाड लांडगोबा मोठ्या खुशीत गुहेबाहेर पडले. ज्याची त्यांना सतत भीती वाटत होती, त्या कजली बनातील चित्त्याचा अनायसेच उद्या काटा निघणार या कल्पनेने ते अगदी निर्धास्त झाले होते.


कथा – उतावीळपणाची सजा

marathi story

एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात सर्व प्रकारचे पशु राहात होते. सिंह त्यांचा राजा होता. त्याने कोल्हेबन, लांडगेबन, वाघराई, सांबर पठार, ससेकुरण असे जंगलाचे अनेक विभाग केलेले होते. त्या त्या विभागात त्या त्या प्रकारचे पशू राहात असत. दुर्बल पशुंच्या संरक्षणासाठी त्यांच्याहून सबल असलेले पशू पहारा करीत असत.

ससे बनात हजारो ससे होते. त्यांच्या संरक्षणासाठी एका गाढवाची नेमणूक केलेली होती. धोक्याच्या वेळी ते गाढव मोठमोठ्याने ओरडत असे. त्याच्या ओरडण्याच्या इशाऱ्यामुळे सावध झालेले ससे सुरक्षित ठिकाणी पळून जात असत. त्या जंगलापासून थोड्याच अंतरावर दुसरे एक जंगल होते, त्या जंगलातील एक कोल्हा सशाच्या कोवळ्या लुसलुशीत मासाला चटावलेला होता. ससे राहात असलेल्या जंगलातील सर्व ससे त्याने खाऊन फस्त केलेले होते. त्यामुळे या जंगलातील ससेबनाकडे त्याने मोर्चा वळविला होता.

ससेबनातील गाढव अत्यंत प्रामाणिक होते. त्याच्यावर सोपविलेले काम पार पाडण्यासाठी ते नेहमी सावधपणे टेहळणी करीत असे. दुसऱ्या जगलातून येणारा तो कोल्हा गाढवाच्या सावध नजरेतून कधीच सुटत नसे. कोल्हा दिसताक्षणीच गाढव मोठमोठ्याने
ओरडू लागे. तो धोक्याचा इशारा कानी येताच ससे सुरक्षित ठिकाणी लपून बसत. मग सशाची शिकार करण्याच्या उद्देशाने आलोच नव्हतो अशा अविर्भावात तो कोल्हा आपल्या जंगलाच्या दिशेने निघून जात असे. मनातून मात्र तो फारच निराश हताश झालेला असे. सशांची शिकार करण्यामध्ये अडसर ठरलेल्या त्या कर्तव्यदक्ष गाढवाचा काटा कसा काढावा या विषयी तो कोल्हा सारखा विचार करीत असे.

एके दिवशी विचार करता करता त्याला एक युक्ती सुचली. त्या युक्तीवर खूष होऊन तो ससेबनाच्या दिशेने निघाला. त्याच्या येण्याची चाहूल लागताच सशांना सावध करण्यासाठी गाढव मोठमोठ्याने ओरडू लागले. तो इशारा मिळताच ससेबनातील ससे क्षणार्धात दिसेनासे झाले. तरीही कोल्हा पुढे येत असल्याचे पाहून गाढवाच्या मनात शंका आली. त्याला वाटले, की कोल्हा त्याच्यावर आक्रमण करण्यासाठीच पुढे येत असावा. तेव्हा त्याला दटावीत गाढव म्हणाले,

“कोल्होबा, आणखी पुढे याल तर माझ्या लाथेच्या एकाच ठोकरीसरशी तुमच्या जंगलात जाऊन बेशुद्ध अवस्थेत पडाल !” गाढवाची धमकी ऐकून अगदी नम्रपणाचा आव आणीत कोल्हा म्हणाला,

गर्दभराज, आपल्यावर आक्रमण करण्याची हिंमत माझ्यातच काय, पण अन्य कोणत्याही पशुत असणार नाही. आपणास आपल्या सामर्थ्याची जाणीव नाही, पण सर्व पशू आपले सामर्थ्य जाणून आहेत. केवळ आपल्या कर्णभेदी गर्जनेने समस्त
पशू जगताचा थरकाप उडतो. सिंह वनाचा राजा असल्यामुळे त्याच्या आरोळीला महत्त्व आहे खरे, पण आपल्या गर्जनेत जी जबरदस्त हुकूमत आहे, ती सिंहाच्या आरोळीत किंवा वाघाच्या डरकाळीत शोधूनही सापडणार नसल्यामुळे वनाचा राजा होण्याचा खरा मान आपलाच आहे गर्दभराज ! “

कोल्ह्याने केलेली स्तुती ऐकून गाढव मनातून खूश झाले होते. वनाचा राजा होण्याची आपली पात्रता असूनही आपणास त्या सर्वोच्च पदापासून वंचित ठेवून आपल्या जंगलातील पशुंनी आपल्यावर घोर अन्याय केला आहे, असे त्याला वाटू लागले होते. त्यामुळे विषण्ण मुद्रेने ते म्हणाले,

कोल्होबा, तुम्ही म्हणता ते मलाही पटतं, पण या जंगलाच्या राज्यात खऱ्या गुणाची पारख कोण करणार ? मी या जंगलाचा राजा होण्याच्या पात्रतेचा असूनही माझ्यावर या सशासारख्या गरीब आणि भित्र्या प्राण्याच्या संरक्षणाची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. हीच का माझ्या पात्रतेची कदर ? अहो, जिथं पिकतं तिथं विकत नसतं हेच खरं !”

many animals

गाढवाच्या तोंडचे उद्‌गार ऐकताच आपली युक्ती सफल होत असल्याच्या आनंदात उत्साहाने कोल्हा म्हणाला,

“गर्दभराज, पिकतं तिथं विकत नसेल, तर ज्या ठिकाणी ते विकतं तिथं जाण्यातच खरा शहाणपणा आहे !”

“म्हणजे मी कुठं जावं म्हणता कोल्होबा ?”

गाढवाच्या भाबड्या प्रश्नावर कोल्हा धूर्तपणे म्हणाला, “

पशूराज, आपल्या गुणांची कदर करणारा, आपला एक निष्ठावंत सेवक म्हणून मी आपणास विनंती करतो की, आपण निर्धास्तपणे आमच्या राज्यात यावं. आमच्या राज्यातील वनराज सिंह मरणासन्न अवस्थेत पडलेला आहे. या क्षणापर्यंत कदाचित तो स्वर्गवासीही झाला असेल. त्यामुळे आमच्या वनातील सर्व प्राणी नव्या राजाच्या विवंचनेत आहेत. आपल्या सारखा प्रतापी राजा मिळताच आमच्या वनातील सर्व पशू जगत धन्य होईल ! “
धूर्त कोल्हाच्या बोलण्याने मूर्ख गाढव अधिकच प्रभावित झाले. राजपदासाठी त्याचे मन अगदी उतावीळ झाल्यामुळे निमूटपणे ते कोल्ह्यामागून चालू लागले. कोल्हा नेईल तिकडे जाऊ लागले.

बरेच अंतर चालल्यावर ते एका दगडाच्या खाणीजवळ आले. तेथे एक पाथरवट दगड फोडीत होता. बरेच दगड फोडून त्याने भला मोठा ढीग रचलेला होता. त्याच्या जवळ आल्यावर गाढवाने भाबडेपणाने कोल्ह्यास विचारले, “कोल्होबा, हा तर पाथरवट दिसतो. तुम्ही मला माणसाकडे कशासाठी आणले ?”

गाढवाच्या प्रश्नावर कोल्हा धूर्तपणे म्हणाला,

“गर्दभराज, तुम्हाला राजपद हवे ना ? हा पाथरवट तुम्हाला ते मिळवून देईल. आपण निःशंकपणे त्याच्याकडे जावे.”

कोल्ह्याचे स्पष्टीकरण ऐकून राजपदासाठी उताविळ झालेले ते गाढव त्या पाथरवटासमोर जाऊन नम्रपणे उभे राहिले. फोडलेल्या दगडांचा ढीग कसा हलवायचा या विवंचनेत असलेल्या त्या पाथरवटास गाढवासारखा आयता चालून आलेला गरीब प्राणी सापडल्यामुळे त्याने त्याच्या पाठीवर दगडाच्या गोण्या लादल्या व गावच्या दिशेने हाकलत नेले. काम फत्ते झाल्याच्या आनंदात कोल्हा ससेबनाच्या दिशेने पळून गेला.

. त्या दिवसापासून तो धूर्त कोल्हा निर्धास्तपणे सशांची शिकार करु लागला आणि राजपदासाठी उताविळ झालेले गाढव दगडाच्या गोण्या वाहू लागले. पात्रता नसताना मोठेपण मिरवायची हाव धरल्याच्या उतावळेपणाची सजा अद्याप ते गाढव भोगतच आहे.


आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.

Leave a Comment