माझी आजी, माझे आजोबा, माझा वर्गमित्र, आमचे गाव, माझी शाळा, माझे गुरुजी, शाळेत साजरा झालेला बालदिन, स्वातंत्र्यदिन, शाळेत साजरा झालेला ‘ प्रजासत्ताक दिन ‘, आपला देश, आपले निशाण, सावित्रीबाई फुले, आरसा नसता तर… | निबंध
हा विशेष ब्लॉग त्यांना साहित्यिक साहित्यिक प्रयोगांमध्ये सहाय्य करतो, ज्यात त्यांना शाळेतल्या विविध घटनांच्या वर्णनातून समाजातील महत्वाच्या घटनांची माहिती मिळेल. या ब्लॉगमध्ये, विविध विषयांवर मराठी निबंध Marathi Essay – Marathi Nibandh आणि लेखनाच्या कौशल्यातून अनेक विधांतली निबंधे प्रस्तुत केली जातात, ज्यामध्ये त्यांना शाळेतल्या साजर्या दिवसांचा वर्णन, स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिन, आणि विशेषत: शाळेच्या जीवनात आम्ही अनेक चरित्र जसं माझी आजी, माझे आजोबा, माझा वर्गमित्र, आपले गाव, आपली शाळा, आमचे गुरुजी, आणि आपला देश व सावित्रीबाई फुले यांचा विचार लागू करून अभ्यासाचा समृद्ध क्षेत्र त्यांना प्रस्तुत केला जातो. या ब्लॉगमध्ये बालकांसाठी मदतीला उत्तम साहित्य आणि शिकवण्याचा अवसर तयार केला गेला आहे. आपले स्वागत आहे आणि आपल्याला अभ्यासात शुभरंगी आणि शिक्षणात यशस्वी होण्याचा आशा आहे!
या ब्लॉगवरील निबंधांचा निर्माण विविध वर्गांच्या विद्यार्थ्यांसाठी केला गेला आहे, ज्यामध्ये शिक्षकांसाठी सोपे आणि आदर्श अभ्यास व प्रेरणादायी साहित्य मिळेल. या निबंधांमध्ये, विविध विषयांवर मराठी निबंध आणि लेखनाच्या कौशल्यातून विविध वर्गांसाठी अनेक विधांतली निबंधे प्रस्तुत केली जातात, ज्यामध्ये त्यांना त्यांच्या विद्यालयातील प्रसिद्ध आणि दिवसभर विशेष घटनांचा वर्णन, सामाजिक आणि सांस्कृतिक दिवसांचा संपूर्ण विचार, आणि त्यामुळे त्यांना अध्ययनाच्या संपूर्ण दिवसांत अध्ययन मदतीला उत्तम साहित्य आणि शिकवण्याचा अवसर मिळाला आहे. आपले स्वागत आहे आणि आपल्याला अभ्यासात शुभरंगी आणि शिक्षणात यशस्वी होण्याचा आशा आहे!
माझी आजी – Marathi Essay
My Grandmother – Marathi Essay
मी म्हणजे एक धडपड्या मुलगा आहे असे माझी आई म्हणते आणि माझ्यावर रागावते. कधी कधी मारते देखील. मग अशा वेळी माझी आजी मला जवळ घेते. कुरवाळते. शिवाय माझे कौतुक करते. म्हणूनच माझी आजी मला खूप आवडते.
माझे आई-बाबा ऑफिसला जातात. त्यांची नेहमीच घाई असते. त्यांना माझ्याकडे लक्ष दयायला वेळच नसतो. पण माझी आजी मात्र माझ्या सगळ्याच गोष्टीकडे लक्ष देते. माझ्या आवडीचे पदार्थ तयार करून ती मला खायला देते. माझ्या अभ्यासात मदत करते. मला स्वच्छता शिकवते. तिचा मी पहिला नातू म्हणून ती माझ्यावर खूप प्रेम करते.
रात्रीचे जेवण संपून कधी एकदा अंथरुणावर पडायला मिळते, याची मी वाट पाहत असतो. अंथरुणावर पडल्यावर मी आजीच्या मांडीवर डोके ठेवतो. माझ्या केसात आपली बोटे फिरवत आजी मला अनेक छान छान गोष्टी सांगते. गोष्ट ऐकता ऐकता मला केव्हा झोप लागते हे कळत सुद्धा नाही.
माझे आजोबा Marathi Nibandh
My Grandfather – Marathi Essay
आमच्या घरातील सर्वांवरच माझ्या आजोबांचे प्रेम आहे. पण मी बोलण्यात हुशार, खोड्या करण्यात हुशार आणि अभ्यासातही हुशार म्हणून आजोबांचा मी फार लाडका नातू आहे. ते नेहमीच माझे कौतुक करतात. त्यामुळेच माझे आजोबा मला खूप आवडतात.
संध्याकाळी शाळेतून घरी परत आल्यावर माझे आजोबा माझ्याबरोबर खेळतात. कधी आम्ही कॅरम खेळतो. कधी पत्ते खेळतो. मी खेळात हरणार असे
आजोबांना वाटले की, ते स्वतः हरतात आणि मला आनंदित करतात. बाजारातून माझ्यासाठी माझ्या आवडीचा खाऊ आणतात.
कधी कधी माझे आजोबा मला बागेत फिरायला नेतात. एखादया रविवारी नाटकाला घेऊन जातात. अंथरुणावर पडल्या पडल्या अनेक मजेदार गोष्टी सांगतात. स्वतः मोठ्याने हसतात आणि मलाही हसवतात. असे मौजमजा करणारे आजोबा कोणाला आवडणार नाहीत ! नारा
माझा वर्गमित्र
My Classmate – Marathi Essay
आनंद हा माझा वर्गमित्र आहे. नावाप्रमाणेच तो आनंदी स्वभावाचा आहे. आमच्या वर्गात त्याचा पहिला क्रमांक येतो. सर्वांशी प्रेमाने वागणारा हा माझा मित्र मलाच काय पण सर्वांनाच आवडतो.
आनंद नेहमी वेळेवर शाळेत येतो. त्याचा गणवेश स्वच्छ व नीट असतो. तो नियमित अभ्यास करतो. कधी माझे अभ्यासात दुर्लक्ष झाले तर तो मला रागावतो. एखादे गणित मला अडले तर तो ते समजावून देतो. त्याच्या संगतीमुळे मी आता मन लावून अभ्यास करतो.
नेहमी खरे बोलावे. सर्वांशी प्रेमाने वागावे. मोठ्या माणसांचा आदर करावा. नीटनेटके राहावे असे तो मला सांगतो. तो मधल्या सुटीत माझ्याशिवाय डबा खात नाही. मला चांगल्या गोष्टी शिकवून, माझ्यावर मनापासून प्रेम करणारा माझा वर्गमित्र आनंद मला खूप आवडतो. ☆☆☆
आमचे गाव
My Village – Marathi Essay
आमच्या गावाचे नाव आनंदमळा! ते नदीच्या काठी वसले आहे. गावचा कारभार ग्रामपंचायतीमार्फत चालतो. गावात एक प्राथमिक शाळा आहे. शाळेजवळ देवीचे देऊळ आहे. दररोज सकाळ-संध्याकाळ देवीची पूजा होते. गावकरी भक्तिभावाने देवीला नमस्कार करून मग आपल्या शेतावर जातात.
गावाच्या आजूबाजूला बरीच झाडी असल्यामुळे गावात नेहमी थंडावा असतो. गावातील बहुतेक लोक शेतकरी आहेत. ते दिवसभर कष्ट करतात आणि सूर्य मावळताच घरी येतात. घरातील सर्व कामे आवरली की, एखादया पारावर गप्पा मारतात.
गावच्या शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीमार्फत रात्रीच्या वेळी शिक्षण दिले जाते. चांगली शेती कशी पिकवावी याचे शेतकऱ्यांना ज्ञान दिले जाते.
गावातील भाजीचे मळे बाराही महिने हिरवेगार असतात. त्या मळ्यांकडे पाहून फारच आनंद होतो. मला वाटते की, या मळ्यांमुळेच आमच्या गावाला’ आनंदमळा’ असे नाव पडले असावे.
आमच्या गावातील सर्व लोक प्रेमाने व सहकार्याने वागतात. त्यामुळे हे गाव ‘आदर्श’ म्हणून समजले जाते.
माझी शाळा
My School – Marathi Essay
“ही आवडते मज मनापासुनी शाळा । लाविते लळा ही जशी माऊली बाळा ।।”
जसे आईचे आपल्यावर अनंत उपकार असतात; तसे शाळेचेही असतात. शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे. मला माझ्या शाळेमुळे लिहिता-वाचता येऊ लागले.
माझ्या शाळेचे नाव ‘ आदर्श विद्यालय’ आहे. शाळेची इमारत दुमजली आहे. तिचा आकार चौकोनी आहे. ती हवेशीर व भरपूर उजेडाची आहे. आमच्या शाळेत १ ली ते ७ वीपर्यंतचे वर्ग आहेत. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र खोली आहे. शाळेत वाचनालयदेखील आहे. मुलांना खेळण्यासाठी शाळेपुढे भव्य पटांगण आहे.
माझ्या शाळेत गणित, भाषा, सामान्यज्ञान, इतिहास, भूगोल या विषयांबरोबरच हस्तकला, बालवीर-कार्य, चित्रकला, शिवण व शारीरिक शिक्षण इत्यादी विषय शिकवले जातात.
माझ्या शाळेचे मुख्याध्यापक फार चांगले आहेत. मुलांना विविध प्रकारचे ज्ञान मिळावे म्हणून शैक्षणिक सहली, शालेय पंचायत, अभ्यास मंडळ इत्यादी उपक्रम त्यांनी सुरू केले आहेत. आमची शाळा म्हणजे जणू विविध प्रकारचे ज्ञानभांडारच !
शिक्षणप्रेमी वर्गशिक्षकांमुळे शाळेचा वार्षिक निकालही चांगला लागतो. आमच्या शाळेने आंतरशालेय चढाओढीतसुद्धा अनेक बक्षिसे मिळवली आहेत. अशी उत्तम विदयार्थी तयार करणारी, बंधुप्रेमाचे धडे शिकवणारी शाळा मला खूप आवडते. ही माझी आदर्श शाळा पाहून लोक म्हणतात –
” धन्य धन्य ती शाळा । जी देशासाठी तयार करिते बाळा ।।”
माझे गुरुजी
My Teacher – Marathi Essay
माझे गुरुजी मला फार आवडतात. त्यांच्याबद्दल मला मोठा आदर वाटतो. त्यांची कोणतीही आज्ञा आम्ही आनंदाने पाळतो. ते सर्व विद्यार्थ्यांवर प्रेम करतात.
आमचा वर्ग नेहमी शांत असतो. शिस्त, अभ्यास, स्वच्छता व वागणूक यांत आमचा वर्ग आदर्श ठरला आहे. याला कारण आमच्या गुरुजींची शिकवण.
प्रेमळपणा, शांत वृत्ती व विषय समजावून सांगण्याची सोपी पद्धत यांमुळे आम्हांला अभ्यासाची गोडी लागली आहे. त्यांच्याशी मनमोकळेपणाने वागण्यास आम्हांला भीती वाटत नाही.
विद्यार्थ्यांनी नम्रतेने वागावे, मोठ्यांचा आदर राखावा इत्यादी गोष्टींकडे त्यांचे अधिक लक्ष असते. ‘ढ’ समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ते अधिक अभ्यास करवून घेतात.
विद्यार्थ्यांना हुशार व सद्गुणी बनवणारे, त्यांच्याशी ममतेने वागणारे असे हे गुरुजी आमच्या शाळेचे भूषण आहे! असे गुरुजी कोणाला बरे आवडणार नाहीत !
शाळेत साजरा झालेला बालदिन
Children’s Day Celebration in school – Marathi Essay
दरवर्षी १४ नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो. याच दिवशी पंडित जवाहरलाल नेहरूंची जयंती असते. त्यांना मुले फार आवडत असत. आपल्या जन्मदिवशी बालदिन साजरा व्हावा, अशी त्यांची इच्छा होती; म्हणून साऱ्या भारतभर पं. नेहरूंच्या जयंतीचा दिवस हा ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो.
आमच्या शाळेतही दरवर्षी ‘बालदिन’ साजरा केला जातो. या वर्षी बालदिनाच्या दिवशी आम्ही आमच्या शाळेची सजावट उत्तम प्रकारे केली होती. नेहरूंच्या जीवनावर एक आकर्षक प्रदर्शन भरवले होते. तसेच एक हस्तलिखित तयार केले होते.
या वर्षी बालदिन समारंभास शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. त्यांनी प्रथम प्रदर्शनाचे उद्घाटन केले. प्रदर्शन पाहून त्यांना फारच आनंद झाला. सभागृहात आल्यावर त्यांनी नेहरूंच्या तसबिरीला गुलाबांचा हार घातला. आम्ही टाळ्या वाजवून पं. नेहरूंचा जयजयकार केला. नंतर पाहुण्यांनी आमच्या हस्तलिखिताचे उद्घाटन केले. हस्तलिखित पाहून त्यांनी आमचे कौतुक केले.
या समारंभाला सर्व मुलांची पालकमंडळी आली होती. पाहुण्यांनी बालदिनासंबंधी छोटेसे पण सुंदर भाषण केले. शेवटी मुख्य गुरुजींनी पाहुण्यांचे व इतर सर्वांचे आभार मानले. नंतर राष्ट्रगीत होऊन ‘बालदिन’ समारंभ संपला.
स्वातंत्र्यदिन
Independence day – Marathi Essay
‘१५ ऑगस्ट’ हा आपला ‘स्वातंत्र्यदिन’ आहे. हा एक राष्ट्रीय सण म्हणून आपण साजरा करतो. या दिवशी शाळेत झेंडावंदनाचा कार्यक्रम असतो. या दिवशी गणवेश घालून आम्ही सकाळीच शाळेत जातो. पटांगणावर आखलेल्या रांगांमध्ये शिस्तीने उभे राहतो. मग पाहुण्यांच्या हस्ते झेंडा उंच फडकवण्यात येतो. आम्ही सारे झेंड्याला वंदन करतो. “विजयी विश्व तिरंगा प्यारा” असे ध्वजगीत गातो, कवायत करतो, पाहुण्यांचे व गुरुजींचे भाषण ऐकतो. शेवटी ” भारतमाता की जय” असा जयघोष करतो.
पूर्वी आपल्यावर इंग्रज लोक राज्य करत होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांनी संपूर्ण देश स्वातंत्र्याकरता जागृत केला. सत्याग्रहासारख्या अनेक चळवळी सुरू केल्या.
१५ ऑगस्ट, १९४७ रोजी आपल्याला स्वराज्य मिळाले. त्यामुळे दरवर्षी देशभर १५ ऑगस्ट हा ‘स्वातंत्र्यदिन’ म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी आपण सर्व भारतीय भारतमातेला वंदन करतो. पुन्हा तिला शत्रूच्या जाऊ दयायचे नाही, अशी शपथ घेतो. ‘मी तुझे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी तुझ्या वैभवासाठी व मानासाठी झटेन,’ अशी प्रतिज्ञा करतो. ताब्यात झटेन,
शाळेत साजरा झालेला ‘ प्रजासत्ताक दिन ‘
Republic day – Marathi Essay
२६ जानेवारी, १९५० या दिवसापासून भारताच्या नवीन घटनेप्रमाणे जनतेने निवडून दिलेंल्या प्रतिनिधींनी राज्यकारभार करायचा असे ठरले आणि प्रजेचे राज्य सुरू झाले. तेव्हापासून दरवर्षी २६ जानेवारी हा भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून मोठ्या उत्साहाने साऱ्या भारतभर साजरा केला जातो.
यंदा आमच्या शाळेत झेंडावंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. झेंडावंदनाच्या कार्यक्रमाच्या वेळी आम्ही शाळेच्या पटांगणात
शिस्तीने उभे राहिलो. समारंभास आलेल्या मुख्य पाहुण्यांनी ध्वजस्तंभाची दोरी ओढताच तिरंगी झेंडा मोठ्या डौलाने फडकू लागला. आम्ही मोठ्या अभिमानाने झेंड्याला वंदन केले आणि मग एकसुरात ‘ध्वजगीत’ म्हटले.
नंतर आम्ही रांगेत बसलो. आपला भारत देश स्वतंत्र कसा झाला, त्यासाठी त्यावेळी लोकांनी कसा त्याग केला, त्याचा इतिहास पाहुण्यांनी सांगितला. “तुम्ही भारताचे छोटे जवान आहात ! खूप शिका व देशसेवक बना,” असा संदेश त्यांनी आम्हांला दिला.
शेवटी आमच्या शालेय पंचायतीच्या प्रमुख विद्यार्थ्याने पाहुण्यांचे आभार मानले व राष्ट्रगीत होऊन समारंभ संपला.
आपला देश
My country India – Marathi Essay
आपला भारत देश हा विशाल आहे. भारताच्या उत्तरेस हिमालय, पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस ब्रह्मदेश व चीन हे देश आणि दक्षिणेस हिंदी महासागर आहे.
जगातील अतिभव्य असा हिमालय आणि विंध्याचल, सातपुडा व सह्याद्री यांच्यासारखे पर्वत आपल्या देशात आहेत. गंगा, यमुना, महानदी, तापी, नर्मदा, गोदावरी, कृष्णा, कोयना यांच्यासारख्या मोठमोठ्या नद्या आहेत. त्यांच्या पाण्यामुळे जमीन सुपीक बनून अनेक पिके, फळे व फुले यांनी भारतभूमी समृद्ध झाली आहे.
द्वारका, काशी, जगन्नाथपुरी, रामेश्वर, पंढरपूर, गाणगापूर, शेगाव, शिर्डी यांसारखी पवित्र तीर्थक्षेत्रे येथे आहेत. काश्मीर व केरळच्या सृष्टिसौंदर्याला जगात तोड नाही. ताजमहाल, सांची स्तूप, कुतुबमिनार या ऐतिहासिक वास्तू आणि अजिंठा, वेरूळसारखी कोरीव लेणी ही तर जगातील आश्चर्ये ठरली आहेत.
अनेक पराक्रमी राजे, धर्मसंस्थापक, संत आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महान विभूती आपल्या देशात होऊन गेल्या. त्यांनी भारताची संस्कृती घडवली, वैभव वाढवले. सर्व जगात भारतीय संस्कृती जुनी व श्रेष्ठ ठरली आहे.
आज आपला भारत हा स्वतंत्र प्रजासत्ताक असा देश आहे. आपला देश आज विज्ञानक्षेत्रात व निरनिराळ्या उद्योगधंदयांत प्रगती करत आहे. आपणही भारताच्या प्रगतीसाठी झटूया.
“किती विशाल भारत देश। परी हृदय खोदूनि बघता।
किती भाषा, अनेक वेष । ‘आम्ही असू एक’ हा जयघोष ।।”
आपले निशाण
आपले निशाण म्हणजे स्वतंत्र भारताचे निशाण! अशोकचक्रांकित तिरंगी निशाण हे भारतीयांचे निशाण आहे.
१४ ऑगस्ट, १९४७ रोजी मध्यरात्री स्वतंत्र भारताच्या निशाणाचा जन्म झाला. आपले निशाण केशरी, पांढरा व हिरवा अशा तीन रंगांचे आहे. मधोमध चोवीस आऱ्यांचे निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे.
यांतील केशरी रंग हा, ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले त्यांची आठवण करून देतो. “मनाने निर्भय व्हा! देशासाठी त्याग करायला शिका,” अशी शिकवण केशरी रंग देतो. पांढरा रंग सांगतो, “मनाने निर्मळ व्हा! प्रसन्न व शांत वृत्ती ठेवा!” हिरवा रंग सांगतो, “हसतमुख राहा! कष्ट करून समृद्ध व्हा ! चिकाटी सोडू नका!” अशोकचक्र सांगते, “सत्याने व प्रेमाने वागा! यातच खरा धर्म आहे. सतत प्रगतीच्या मार्गावर राहा !”
आपल्या निशाणाकडे पाहून आपले हृदय अभिमानाने भरून येते. आदराने मस्तक नम्र होते. मन प्रसन्न होते. आपले तिरंगी निशाण म्हणजे स्वातंत्र्याचे प्रतीक ! हे निशाण मानाने उंच फडकत राहील तोपर्यंत राष्ट्र जिवंत आहे, स्वतंत्र आहे असे समजायचे. आपला भारत देश विशाल आहे. तो या निशाणाच्या रूपाने देशातील लोकांची एकजूट सिद्ध करतो.
आपल्या या तिरंगी निशाणाचे, भारताच्या मानचिन्हाचे, आपण प्राणपणाने रक्षण केले पाहिजे.
सावित्रीबाई फुले
आज सर्वच क्षेत्रांत पुरुषांबरोबर स्त्रियाही वावरताना दिसतात. याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांनाच दयावे लागेल. कारण मुलींना सर्वप्रथम ‘श्रीगणेशा’ शिकवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय शिक्षिका होत.
सावित्रीबाई फुले ह्या महात्मा फुले यांच्या पत्नी. त्यांचा जन्म १८३१ साली, नायगाव (जि. सातारा) येथे झाला आणि १८४० मध्ये, जोतीराव फुले यांच्याशी त्यांचे लग्न झाले. त्या काळात मुलीना शिक्षण दिले जात नसे. मुलींना शिक्षण दिले तर त्यांचे आयुष्य सुखाचे होईल, हे ओळखून महात्मा फुले यांनी मुलींची शाळा काढायचे ठरवले; पण त्या काळात मुलींना शिकवणारी शिक्षिकाच नव्हती.
तेव्हा सावित्रीबाईंनी प्रथम स्वतः आपल्या पतीकडून शिक्षण घेतले व मग मुलींना शिकवण्याचे कार्य सुरू केले. महात्मा फुले यांनी पुण्यात भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.
शाळेत मुलींना शिकवताना सावित्रीबाईंना लोकांनी खूप त्रास दिला; पण त्यांनी धैर्याने व शांतपणे सर्व संकटे सहन केली. शेवटी सावित्रीबाईंचाच विजय झाला व गौरवही झाला.
सावित्रीबाईंनी महात्मा फुले यांना समाजसुधारणेच्या कार्यात आयुष्यभर मदत केली. दीनदुबळ्यांची सेवा केली. दुःखितांची सेवा करता करताच त्यांना १८९७ साली मृत्यू आला. पण ‘पहिल्या भारतीय शिक्षिका’ म्हणून कीर्तिरूपाने त्या अमर झाल्या.
आरसा नसता तर…
आजच्या सुधारलेल्या जगात आरशाशिवाय बिलकुल चालायचे नाही. एक वेळ जेवण नसले तरी चालेल; पण आरसा समोर पाहिजे. मी आरशासमोर बराच वेळ उभी होते. आरसा नसता तर… किंवा हा आरसा कसा निर्माण झाला? असे विचार माझ्या मनात एकसारखे येत होते. या विचारात मी कधी झोपी गेले हे सुद्धा
कळले नाही.
थोड्याच वेळात आरसा माझ्यासमोर बोलू लागला-
“मी जर नसतो तर स्वतःची ओळख माणसाला पटली नसती. माणसाला स्वतःचे रूपरंग पाहता आले नसते.
” मी कसा निर्माण झालो हे माझे मलाच आठवत नाही. माझे पूर्वज रामायण- काळापासून आहेत. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांचा जन्म इटली देशात झाला असे म्हणतात. आता जगभर आमचा प्रसार झाला आहे. आमच्याशिवाय तुमचा चेहरा कसा आहे हे तुम्हांला कसे कळणार ?
“आम्ही तुमची नेहमीच स्तुती करतो. तुम्ही कुरूप असलात तरी आम्ही सांगतो की, ‘अग, तू छबीपेक्षा किती तरी चांगली आहेस!’ तसेच सुंदर असाल तर आम्ही म्हणतो, ‘वा ! वा !! तुझ्यासारखी रूपवान तूच!’ आणि याचमुळे आम्ही आरसे तुम्हां सर्वांना प्रिय ! म्हणूनच तुम्ही इतरांपेक्षा आम्हांला फार जपता. सुंदर चौकटीत बसवता, कोणाचा धक्का न लागेल अशा ठिकाणी ठेवता. यामुळे आम्ही सुरक्षित आहोत.
“तुझे मन असेच माझ्यासारखे स्वच्छ ठेव आणि तू सुद्धा गुणवान हो!” असे म्हणून आरसा बोलायचा थांबला.
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपयोगी निबंध आहेत.
सुंदर !