Marathi Short Story | Laghu Katha | हिरवेगार मन | मधली सुट्टी | मालकी आणि भागीदारी | अहम् ब्रह्मास्मि

marathi short story मराठी लघु कथा

हिरवेगार मन, मधली सुट्टी, मालकी आणि भागीदारी, अहम् ब्रह्मास्मि

मराठी लघुकथा हा एक साहित्यिक आवडीचा विभाग आहे, ज्यात असंख्य कथा अशा तालिका जमलेल्या आहेत, ज्यामध्ये दर्जेदार विचार आणि विविध भावना असतात. “हिरवेगार मन” हे एक ब्लॉग आहे ज्यात आपल्याला मराठीतल्या सुंदर लघुकथांची भेट मिळवावी. या ब्लॉगमध्ये, “मधली सुट्टी”, “मालकी आणि भागीदारी”, “अहम् ब्रह्मास्मि” यांच्यासोबत इतर विषयांवरील लघुकथा प्रकट होणार आहेत.

लघुकथा हे साहित्यिक चरित्रांच्या विकासातील केंद्रीय घटक आहे, ज्यामध्ये नाटकातील घटक सुद्धा समाविष्ट होतात. ह्या लघुकथा अवयवात असताना, नात्यातील घटकांचे प्रस्तुतीकरण आणि अद्वितीय कल्पना असतात. “हिरवेगार मन” ब्लॉगमध्ये ह्या लघुकथांचा संग्रह आपल्याला रोमांचक कथांच्या संसारात घेऊन जाईल, ज्यामध्ये आपण अनेक भावना विचारू शकता.

जीवनाच्या तीव्र वेगाने चालत असताना, लघुकथांचं अतिशय आवड पाळून ठेवण्यात विशेष आनंद असतो. “हिरवेगार मन” ब्लॉगमध्ये आपल्याला ती विशिष्ट आनंदाची अनुभूती मिळेल, ज्यामध्ये संजीवनी आणि शिक्षादायी संदेश समाविष्ट आहेत. त्यामुळे, या ब्लॉगच्या संचालकांनी असंख्य मराठी लेखकांना सामील केलेल्या लघुकथांची आपल्याला आवड येईल व त्यामध्ये संदेशांचा उत्कृष्ट संचय उपलब्ध होईल.

लघु कथा

  • हिरवेगार मन
  • मधली सुट्टी
  • अहम् ब्रह्मास्मि
  • मालकी आणि भागीदारी

हिरवेगार मन – लघु कथा

Marathi Short Story Laghu Katha हिरवेगार मन

“दादा, मेथी घ्या ना! अगदी ताजी आहे.” हे आर्जवी स्वर कानावर पडले की आपली नजर पाणी शिंपडलेल्या हिरव्यागार मेथीच्या जुडीवर रेंगाळल्याशिवाय राहात नाही. आपल्याला हवी असलेली सर्व भाजी घेऊन झालेली असली तरी देखील घरात जात असताना त्या ताज्या मेथीच्या जुडीने आपल्या पिशवीत स्थान मिळवलेले असते!

रोज सकाळी नऊच्या ठोक्याला “पालक घ्या, मेथी घ्या, गवार आहे, शेपू आलाऽऽ’ अशी आरोळी कॉलनीतल्या घराघरांतून दौडत जाते. भाजीवाल्याला थांबण्याचा इशारा करून घराघरांतून बायका खाली येतात. भाजीवाल्या काकांची नजर चौफेर फिरत असते. कोणी थांबावयास सांगितले की, ‘या ना ताई’ असे म्हणता म्हणता काकांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतो.

पाच फुटांच्या आत बाहेर उंची, काळा-सावळा- रापलेला वर्ण, पातळ पांढरे केस आणि मिशा, डोक्यावर गांधी टोपी, अंगात अतिशय साधा पण स्वच्छ झब्बा, लेंगा अशा वेषातले भाजीवाले काका आपली भाजीने भरलेली हातगाडी घेऊन नवाच्या ठोक्याला हजर होतात. त्यांचे तंबाखू खाऊन किडलेले दात, फाटक्या चपला आणि दुसरीकडे आकर्षक पद्धतीने मांडलेली रंगीबेरंगी

भाजी ही विसंगती चटकन जाणवते. काकडी, टोमॅटो, गाजर, कोथिंबीर, लिंबू, पालेभाज्या, नवलकोल, बीट अशा भाज्यांचे जणू संमेलनच त्या गाडीवर भरलेले असते. शिवाय एक गंजलेला तराजू, वजने, पैसे ठेवण्याचा पितळेचा डबाही गाडीवर असतो. जेवणाचा डबा मात्र कधी असतो तर कधी नसतोही!

दररोज पहिली कमाई झाली की ते पैसे कपाळाला लावून, डोळे मिटून, “भवानीची कृपा” असे पुटपुटण्याची त्यांची लकब थोडी निराळीच आहे. काका व्यवहारात चोख आहेत. त्यांनी त्या दिवशी जो दर ठरवलेला असेल त्यापेक्षा कमी-जास्त एकही पैसा होणार नाही. वजने- मापे, तराजूही अगदी सचोटीने वापरतात.

“ताई, आजीला बरं नाही ना? मग लिंबं न्या की थोडी! चाटण करा आणि दया त्यान्ला. तोंडाला चव येईल.” असे शब्द ऐकले आणि त्या माणसाची आपुलकी, वागण्यातला शुद्धपणा बघितला की घासाघीस करायची इच्छा मुळी होतच नाही. उलट थोडी भाजी जास्तच खरेदी केली जाते !

कॉलनीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी काका स्वतः इमारतीचे मजले चढून भाजी पोहोचवून येतात. क्वचित कोणी भाजी खराब असल्याची तक्रार केली तर दुसऱ्या दिवशी चांगली भाजी आणून देतात. कोणी टोमॅटो, बटाटे, ढब्बू मिरची, कांदे अशी खरेदी केली तर” काय ताई, आज पावभाजीचा बेत दिसतो?” असेही मिश्किलपणे विचारतात. अशावेळी त्यांच्या गाडीवर जेवणाचा डबा दिसला नाही तर काळजात चरर्र झाल्याशिवाय राहात नाही.

काकांचा दिनक्रम अगदी ठरलेला आहे. ते पहाटे चार वाजता गुलटेकडीला जाऊन मार्केटमधून ताजी भाजी खरेदी करतात. दिवसभर ठिकठिकाणी फिरून ती विकतात. संपूर्ण दिवस श्रम करूनही दिवस मावळला तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू मावळत नाही. एके दिवशी स्वतःचा टेम्पो घेऊन त्यातून भाजी विकत फिरण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. या कल्पनेला त्यांनी ‘फिरते भाजी दुकान’ असे गंमतशीर नाव दिले आहे.

वर्षानुवर्षे ते आमच्या कॉलनीत भाजी घेऊन येत आहेत. रोज सकाळी त्यांची ताज्या भाजीची गाडी बघितली की वाटते, त्यांची हिरवीगार भाजी जास्त सुखावणारी आहे की त्यांचे हिरवेगार मन?


मधली सुट्टी – लघु कथा

Marathi Short Story Laghu Katha मधली सुट्टी

त्या दिवशी शेवटचा तास इतिहासाचा होता. मुले ४०० वर्षापूर्वीचा इतिहास ऐकून कंटाळली होती. त्यातच ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणजे सरांनी सकाळी सकाळी मुलांना ३ किलोमीटर पळवले होते. मुलांच्या मनाची कधी एकदा मधली सुट्टी होते अशी अवस्था झाली होती. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर कळायचे की त्यांच्या पोटातील कावळे कधीच मेले असतील. वर्गातील बाळू, रामू व शम्या हे मस्तीखोर त्रिकूट मुलांच्या खोड्या करण्यात व्यस्त होते. दिनू व माझे लक्ष मात्र कशातच लागेना. सर्व मुलांचे लक्ष वर्गातल्या घड्याळ्याकडे होते.

आणि एकदाचा तासकाटा आणि मिनिटकाटा दोन्हीही बारावर येऊन पोहोचले व शाळेची मधल्या सुट्टीची घंटा वाजली., मुलांचे चेहरे कमळाच्या फुलाप्रमाणे फुलले. शिक्षक वर्गाच्या बाहेर जाताच मुलांनी लगेचच आपले डबे काढले व कधीही न मिळाल्यासारखे खायला सुरुवात केली. जो तो न बोलता व न थांबता खात होता. पोट भरल्यावर शाळेपुढे असणाऱ्या मैदानाच्या दिशेने ती धावत निघाली.

पोट गच्च भरल्यामुळे मुलांच्या शरीरात ताकद आली होती. ‘आता काय करूया?’ या विचारात सगळी होती.

तेवढ्यात राम्या म्हणाला, ‘आपण शाळेमागच्या वनराईत फिरायला जाऊया का?’ सर्वांना ही कल्पना आवडली व सर्वजण मागच्या वनराईत गेले. वनराईत गेल्यावर मी व दिनू पशु-पक्ष्यांचे आवाज, त्यांचा किलबिलाट ऐकण्यात गुंग झालो. राम्या, शाम्या व बाळ्या फुलपाखरांमागे धावत होते. वर्गातील काही मुलांमध्ये सूरपारंबीचा खेळ रंगला. वर्गातील राकेश; ज्याला पुस्तकातील किडा म्हणतात तो त्याच्या सवयीप्रमाणे इथेही पुस्तक घेऊन आला. अशा वातावरणातच बाळ्याने ‘गवतात साप आहे,’ अशी अफवा पसरवली. पण या अफवेने कोणी घाबरले नाही. मुले खेळ खेळत होती. उन्हाळ्याचे दिवस असल्याने वनराईतील झाडांना फळे लागली होती.

वनराईच्या मागे एक ओढा वाहत होता. सर्व मुले आता ओढ्याकडे गेली व मासे पकडू लागली. मुलांच्या नाकी नऊ येत होते पण त्यांना मासे काही सापडत नव्हते. मुलांना आता शाळेची आठवण झाली व ती शाळेकडे परतू लागली.

…रस्त्यात त्यांना घंटेचा आवाज ऐकू आला. मधली सुट्टी संपल्याचे लक्षात येताच आम्ही घाबरलो. जोराने शाळेच्या दिशेने पळत सुटलो. धापा टाकत शाळेत गेल्यावर कळले की ती घंटा शाळा भरल्याची नसून शाळा सुटल्याची आहे !


अहम् ब्रह्मास्मि – लघु कथा

Marathi Short Story Laghu Katha अहम् ब्रह्मास्मि

एकेदिवशी मी बाल्कनीत उभा राहून समोरच्या लोभस पिंपळाकडे पाहात होतो. नवीन पिटुकली पानं प्रौढ पानांच्या खांदयावरून डोकावत होती आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात पोपटी मशालींसारखी लवलवत होती. आकाश कच्च निळं होतं आणि समोरच्या रिकाम्या हिरव्यागार मैदानात एक आश्वासक निवांतपणा भरून राहिला होता.

तेवढ्यात माझं लक्ष बाल्कनीच्या टोकाशी असलेल्या घराकडे गेलं. माँटूची छोटी आकृती त्या घराच्या उंबऱ्याशी गुडघ्यावर बसून खाली वाकली होती. काहीतरी पुटपुटत त्याने तिथल्या पाय-पुसण्याला हाताने स्पर्श केला. तोच हात छातीला लावला आणि मग कपाळाला लावून त्याने वाकून उंबऱ्यावर डोकं टेकवलं. मग कमरेतून सरळ होत त्याने हात जोडले आणि डोळे मिटून घेत तो काहीतरी पुटपुटत राहिला. त्याच्या या प्रार्थनेमध्ये तो इतका गुंग होता की त्याला

भोवतालचं बिलकुल भान नव्हतं. घराच्या पुढच्या उंबऱ्याशीही त्याने प्रार्थनेच्या

सर्व विधींचा ‘अॅक्शन प्ले’ केला. त्याच्या पुढच्या उंबऱ्याशी तो पोहोचला आणि त्याचं माझ्याकडे लक्ष गेलं. त्यानं माझ्याकडे करुणासागराप्रमाणे पाहिलं. तो काय करतो आहे, असं विचारल्यावर त्याने शांत स्वरात सांगितलं, “मैं भगवान की प्रार्थना कर रहा हूँ।”

तो नक्कीच कोणाबरोबर तरी जवळच्या मंदिरात गेला असणार. मंदिरातही गाभाऱ्यासमोर उंबरा असतो. एखादं वस्त्र असतं; त्यामुळे त्याला प्रत्येक उंबऱ्याआड देव असणार, असं वाटत असावं म्हणूनच तो मोठ्या माणसाचं अनुकरण करत (रिती) रूढीप्रमाणे प्रार्थना पार पाडत असणार ! पण तो केवळ उपचार म्हणून कोरडेपणाने प्रार्थना करत नव्हता. त्याला खरोखरच वाटत होतं या उंबऱ्यामागे देव असणार! मी गंमतीच्या मूडमध्ये होतो. मी त्याला म्हटलं,

“लहान मुलांमध्ये देव असतो; असं म्हणतात. म्हणून मी तुझ्या पाया पडतो.”

मी गंमतीनं खाली वाकलो आणि त्याच्या छोट्याशा पायांवर माझं कपाळ टेकवलं. पुन्हा वर

येताना पाहिलं. माँटूने आशीर्वादासाठी त्याचा पंजा कृपाळूपणे माझ्या दिशेनं वळवला होता. अरे देवा ! हा तर शंभर टक्के देवाच्या भूमिकेत शिरला होता !!

मला हसू फुटलं. मला परत एकदा त्याचा हा गोड अभिनय पाहायचा होता म्हणून मी पुन्हा त्याच्या पायांवर डोकं ठेवलं आणि मला खरोखरच छान वाटलं. माझ्या देवाने परत मेहेरबान होत छोटासा पंजा माझ्याकडे वळवला.

स्वतः देव असणं त्याने सहजपणे स्वीकारलं होतं ! मी त्याला म्हटलं, “काही आशीर्वाद दे ना.”

भगवंत म्हणाले, “क्या आशीर्वाद चाहिए?”

प्रत्यक्ष देव प्रकट झाल्यावरही असंच विचारतो ना, ‘बोल वत्सा. तुझी काय इच्छा आहे?’

मी म्हणालो, “मेरा सब अच्छा हो जाएगा ऐसा आशीर्वाद दो।”

माझा देव म्हणाला, “तुम्हारा सब अच्छा हो जाएगा।”

येताना पाहिलं. माँटूने आशीर्वादासाठी त्याचा पंजा कृपाळूपणे माझ्या दिशेनं वळवला होता. अरे देवा ! हा तर शंभर टक्के देवाच्या भूमिकेत शिरला होता !!

मला हसू फुटलं. मला परत एकदा त्याचा हा गोड अभिनय पाहायचा होता म्हणून मी पुन्हा त्याच्या पायांवर डोकं ठेवलं आणि मला खरोखरच छान वाटलं. माझ्या देवाने परत मेहेरबान होत छोटासा पंजा माझ्याकडे वळवला.

स्वतः देव असणं त्याने सहजपणे स्वीकारलं होतं ! मी त्याला म्हटलं, “काही आशीर्वाद दे ना.”

भगवंत म्हणाले, “क्या आशीर्वाद चाहिए?”

प्रत्यक्ष देव प्रकट झाल्यावरही असंच विचारतो ना, ‘बोल वत्सा. तुझी काय इच्छा आहे?’

मी म्हणालो, “मेरा सब अच्छा हो जाएगा ऐसा आशीर्वाद दो।”

माझा देव म्हणाला, “तुम्हारा सब अच्छा हो जाएगा।”

तेवढ्यात माझा देव माझ्याच पाया पडला आणि म्हणाला, “अब तुम भगवान !”

मी हसत हसत आनंदाने त्याला भरभरून आशीर्वाद दिले आणि भरपूर पापे घेतले.

दुसऱ्यामध्ये देव बघणं आणि स्वतः देव होणं अगदीच सोप्पं होतं !

आता मी प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला माझ्या देवाचा आशीर्वाद घेतो आणि तो प्रेमाने उदंड आशीर्वाद देतो – “तुम्हारा सब अच्छा हो गया।”

किती सुंदर जात असेल ना माझा दिवस !!


मालकी आणि भागीदारी – लघु कथा

Marathi Short Story Laghu Katha मालकी आणि भागीदारी

माझी बायको अमृता अधून मधून गोड-गोड खेळणी घेऊन येते. तिला त्याची खूपच गंमत वाटते आणि ती त्याच्याशी आनंदाने एकटीच खेळत बसते. काही वेळा कुणीतरी लहान मूल घरी आलं आणि तिचं खेळणं घरी घेऊन जायचा हट्ट करू लागलं तर अमृताचा चेहरा कसनुसा होतो. ती त्यांच्याविषयी अंमळ ‘पझेसिव्ह’ आहे. पण माँटूला मात्र तिने सूट दिली होती.

माँटू आमचा मित्र झाल्यावर आमच्या घराची मालकी साहजिकच त्याच्या ताब्यात गेली. सतत लुकलुकणारे त्याचे शोधक डोळे बरोब्बर नवीन खेळणं टिपत असत. नवीन खेळण्याबरोबरचं त्याचं वागणं फार मजेशीर होतं. तो एखादया खेळण्याकडे आकर्षित झाला की, लगेच त्याला ते आपल्या हातात हवे असायचे. दोन्ही हातात घेऊन निरखून उलटं पालटं करून झालं की त्याच्याबरोबर तो खेळायला सुरू करायचा. काही वेळातच त्याला आसक्ती जडायची आणि अचानक तो ते उचलून घरी धूम ठोकायचा. मी ते काढून घेईन याची त्याला भीती वाटायची. नंतर कधीतरी त्याची आई ते खेळणं परत दयायची.

हळूहळू माँटूला लक्षात आलं की, आमच्या घरातली कुठलीही गोष्ट तो कधीही घेऊ शकतो आणि तो आश्वस्त झाला. ती वस्तू उचलून घरी नेण्याची गरज त्याला वाटेनाशी झाली.

एक दिवस आमच्याकडे कनीस नावाची एक वर्षाची मुलगी आली होती. अमृता टीव्हीवर ज्या सिरीयलमध्ये काम करते त्यातच कनीस तिच्या मुलीची भूमिका करते. कनीसला बरं वाटत नव्हतं आणि आमच्या घराशेजारीच लहान मुलांचं हॉस्पिटल असल्याने अमृता तिला घेऊन घरी आली होती. आम्ही हॉस्पिटलमधून घरी पोहोचताच आमच्या मजल्यावर सतत पहारा करणारा माँटू आमच्या मागोमाग घरात शिरला.

त्या छोट्याशा बाळाला बघून माँटूला प्रेमाचे भरते आले. त्याने कनीसशी बोलायचा प्रयत्न केला. तिचं नाव विचारलं. छोट्या कनीसला अजून बोलता येत नव्हतं; पण तिने माँटूकडे पाहून एक फर्मास स्माईल केलं. माँटू चेकाळलाच. तो काहीसा स्तिमित होऊन आपलेपणाने कनीसकडे पाहात राहिला. मग अचानक तो त्याच्या घराकडे पळाला.

थोड्या वेळातच खेळण्यातला एक हत्ती घेऊन तो परत आला. आणि त्याने तो कनीसच्या पुढ्यात ठेवला. त्याच्या लक्षात आलं कनीसला बोलता येत नाही. म्हणून तो खुणेनेच तिला ते घ्यायला सांगायला लागला. ती खूपच लहान असल्याने तिला तो हत्ती हातात घेता येईना. मग माँटू तिचं मन रमवण्यासाठी हत्तीशी खेळ करून दाखवायला लागला. हत्तीवर बसून त्याने तो तिला पळवून दाखवला. कनीसच्या प्रत्येक बोबड्या बोलाने त्याला अधिकाधिक उत्साह चढत होता. त्या भरातच तो धावत त्याच्या घरी गेला आणि एक एक करून त्याच्याकडची सगळीच खेळणी घेऊन आला. त्यांची संख्या इतकी होती की छोटी कनीस त्यात बुडूनच गेली. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माँटूच्या घरातील खेळण्याचा या दिशेने पहिल्यांदाच प्रवास झाला होता.

मला लक्षात आलं माँटूपेक्षा लहान कुणीतरी पहिल्यांदाच आमच्या मजल्यावर आलं होतं. त्या बाळाच्या सान्निध्यात माँटूला खूपच शक्तिशाली वाटत होतं. त्याच्याकडील सगळं काही तो शेअर करायला तयार झाला होता, कारण त्याला वाटत होतं, त्या बाळाला त्याची गरज आहे.

आधी जेव्हा त्याला माझ्याकडची खेळणी मिळण्याची खात्री नव्हती तेव्हा तो ती पळवून नेत होता. असुरक्षित वाटल्यानेच तो दादागिरी करत होता. मालकी हक्क गाजवत होता. आता कनीसबरोबर मात्र त्याला शक्तिशाली वाटत होतं.

कारण आपली तिला गरज आहे, असं त्याला वाटत होतं. आणि त्यातूनच आपल्या मालकीच्या खेळण्यांमध्ये तो तिला भागीदार करून घेत होता.

गंमतीदार होतं हे. कनीसला आपली गरज -आहे, हे समजल्यावर माँटू आपोआप ‘मोठ्ठा’ झाला होता. जेव्हा कुणाला तरी सबल करायचे असते तेव्हा त्याला मदत करण्यापेक्षा त्याच्याकडून मदत घ्यावी; त्याच्या गरजा पुरवण्यापेक्षा त्याची दुसऱ्यांना गरज आहे, हे सांगावं.

वेगळाच धडा होता हा ! कनीस बाळाशी खेळणारा छोटासा माँटू मला एखादया झेन गुरूसारखा भासायला लागला. जो वेगवेगळ्या प्रसंगातून जायला लावून मला अधिकाधिक समजूतदारं बनवत होता.

मला असं लक्षात आलं माँटूला माझी जितकी गरज आहे त्यापेक्षा जास्त मला त्याची गरज आहे.

‘मला तुझी गरज आहे’, हे मी अमृताला शेवटचं कधी सांगितलं; हे मी आठवायला लागलो…


आवडलं असल्यास कृपया आपली टिप्पणी द्या आणि सामायिक करा! 📝🔄

1 thought on “Marathi Short Story | Laghu Katha | हिरवेगार मन | मधली सुट्टी | मालकी आणि भागीदारी | अहम् ब्रह्मास्मि”

Leave a Comment