मैत्री आणि दुष्मनीकथा | अशी ही मित्रता
कथा – Marathi Story मैत्री आणि दुष्मनीकथा, अशी ही मित्रता हा विशेष ब्लॉग आपल्याला विविध आणि रोमांचक कथांच्या संग्रहासाठी आणि मराठीतून नवीन साहित्याच्या आनंदात प्रवेश करण्यासाठी तयार केला गेला आहे. या ब्लॉगमध्ये, आपण मैत्री आणि दुष्मनीच्या नात्यातील अनेक कथांच्या साक्षी व्हावं, ज्या त्यांनी जीवनात अत्यंत महत्वाच्या भूमिका बजावली आहे. या कथांमध्ये समाजातील विविध गुण, चरित्रे, आणि भावना या विशेषांच्या उघडतात. हे ब्लॉग तुमच्या साहित्याच्या भ्रमातून बाहेर पडण्यास मदत करेल आणि नवीन कथा आणि कथाकथनांच्या संग्रहाच्या आनंदात तुम्हाला सहभागी बनवेल. आपले स्वागत आहे आणि आपल्याला खात्री आहे की आपल्याला हे कथा संदर्भ आवडेल!
मैत्री आणि दुष्मनी
ही कहाणी कुत्रा व मांजरीची आहे. फार वर्षांपूर्वीची आहे. ही कहाणी कुत्रा व मांजरीच्या गाढ मैत्रीची आणि तसेच त्यांच्यातील दुश्मनीची पण आहे. ती ऐकताना मौज वाटेल आणि आश्चर्यही वाटेल.
एक होते जंगल. फार मोठे होते ते. तेथे अगणित झाडे होती. निरनिराळ्या जनावरांची खूप मोठी वस्ती होती. त्या जंगलातील दोन जिवांची ही गोष्ट.
एक होता कुत्रा. त्याचे नाव होते – मोती.
एक होती मांजर. तिचे नाव होते छबी.
मोती व छबी यांचे फार घनिष्ट संबंध होते. दोघांमध्ये अतीव प्रेमभाव होता. दोघांची गाढ मैत्री होती. मोतीच्या घरासमोर छबीचे घर होते.
दररोज सकाळी व संध्याकाळी मोती आणि छबी जंगलातील टेकडीच्या बाजूने वाहत असलेल्या नदीच्या किनाऱ्यावर फिरायला जात असत. तेथे छबी मांजर, मोती कुत्र्याला गोड गाणे म्हणून दाखवी आणि त्या गाण्याच्या तालावर मोती कुत्रा आपल्या मागील दोन पायांवर उभे राहून नाचे. अशा त-हेने त्यांचे दिवस आनंदाने जात होते. ते जीवनाची मौज लुटीत होते.
मोती आणि छबीच्या या मैत्रीबद्दल जंगलातील इतर जनावरांना हेवा वाटे. काहींना या मैत्रीत बिघाड व्हावा असे वाटे. पण काहींना या मैत्रीबद्दल समाधान वाटे, कौतुक वाटे. परंतु एकजण या मैत्रीच्या प्रखर विरोधी होता. हा विराधक होता, एक माकड. त्या माकडाचे नाव होते जंगलू. जंगलूला मोती व छबी यांच्या मैत्रीबद्दल मनस्वी तिटकारा वाटे. मोती कुत्र्याऐवजी छबी आपल्याशी का मैत्री करत नाही, असे त्याला वाटे. म्हणून ही मैत्री कशी तुटेल याचाच विचार जंगलू माकड करायचा आणि अखेर त्याच्या कारस्थानी बुद्धीने एक उपाय शोधला.
सकाळची वेळ होती. सूर्याचा कोमल प्रकाश साऱ्या जंगलावर विखुरलेला होता. थंड हवा वाहत होती. उंदरांची शिकार करून छबी मांजर रस्त्याने परत येत होती. जंगलू माकडाने तिला पाहिले. जंगलूने तिला हाक दिली. छबी थांबली. जंगलू छबीजवळ गेला.
“जंगलूदादा, काय हालचाल आहे ? तू जरा उदास दिसतोस. काही विशेष गोष्ट आहे काय ?” छबी मांजरीने जंगलू माकडला विचारले.
जंगलूने रडका चेहरा केला. म्हणाला, “छबी, तुला कसे सांगू ! सांगतानाच दुःख होते. सांगावे तरी पाप, न सांगावे तरी पाप !”
“अरे, झाले तरी काय ?”
“सांगितले तर तुझा विश्वास बसणार नाही. दुश्मनीच करावयाची होती, तर मैत्री का केली हेच मला समजत नाही. जगात असे लोक असतात म्हणा !”
“जंगलूदादा, तू तर कोड्यासारखे बोलतो आहेस; स्पष्ट बोल.” छबीने सांगितले.
“तुझा तो मित्र मोती कुत्रा मला भेटला होता. तो मला म्हणत होता की, ‘छबी मांजरीला कोठले आले खानदान ! ती खालच्या जातीची. तिची नि माझी दोस्ती कशी होईल ? कुठे इंद्राचा ऐरावत नि कुठे शामभट्टाची तट्टाणी ! मला तर तिची दोस्ती बिलकूल पसंत नाही. पण ती लोचटपणे माझ्याकडे येते म्याँवऽ म्याँवड करून त्रास देते. तिचा नाश करून टाकावा असे मला वाटू लागले आहे.’ मोतीचे हे बोलणे ऐकून मी तर थक्क झालो !” जंगलूने आपल्या मनातीलच लोणकढी ठोकली.
“जंगलू, काय सांगतोस!” आश्चर्याने व रागाने छबी मांजर बोलली.
“अगं, मी कशाला खोटं सांगू ? मोती मला जे म्हणाला, ते तुला सांगितले !”
छबी लाल झाली. तिने तिचे डोळे विस्फारले. तिची नाकपुडी थरथरू लागली. “मोत्याची ही हिंमत ! मैत्रीचे सोंग करून माझा नाश करायला निघाला काय ! मीही वाघाची मावशी आहे म्हटलं ! बच्चम्जीला दाखवीन चांगला इंगा !” दातओठ खात छबी बोलत होती.
“बरं, छबुताई, चलतो मी.” असे म्हणून जंगलू माकड तेथून निसटला.
मोती कुत्रा जिभली बाहेर काढून आराम करीत बसला होता. तेथे जंगलू माकड उड्या मरीत आला.
“या जंगलूदादा ! आज कुणीकडे स्वारी ?” मोतीने स्वागत करून विचारले.
“अरे, काय विचारतोस !”
“का?”
“नाही, म्हटलं – तुझी न् छबी मांजरीची काही भानगड झाली काय?”
“नाही बुबा !”
“अरे, ती मला भेटली होती. म्हणत होती मोती मोठा वाईट आहे. त्याची नजर खराब आहे. नांव फक्त मोती, पण मातीच्या ढेकळासारखा आहे !”
” अस्सं ! असं म्हणत होती ती ?”
“मी काय माझ्या मनाचे सांगत आहे ? तुझी नि तिची एवढी दोस्ती; तिचे ते बोलणे ऐकून मी मात्र कानाला हात लावले!” जंगलू आगीत तेल टाकीत होता.
“आणखी काय म्हणाली ती ?” उत्सुकतेने मोतीनं विचारले.
“सांगितले तर तुझा विश्वास बसणार नाही! ती म्हणत होती, त्या मेल्या कुत्र्याचे मढे काढीन !” आपली शेपटी उंच करीत जंगलूने सांगितले.
“त्या मरतुकडीची ही मजाल ? माझे मढे काढण्यापूर्वी मीच तिची तिरडी काढतो !” संतप्त होऊन मोती म्हणाला.
जंगलू माकडाचे काम फत्ते झाले. त्याने विषाची पेरणी केली. मोती व छबी या दोघांमध्ये कलागती लावून द्वेष निर्माण केला. त्यांची दुश्मनी झाली. उड्या घेत-घेत जंगलू माकड पळाला.
संध्याकाळ झाली. मोती व छबी घरी परतले. समोरासमोर घर असल्यामुळे त्या दोघांची गाठ पडली. छबी मांजरीला बघून मोती कुत्र्याचा पारा चढला आणि मोती कुत्र्याला बघून छबी मांजरीचे रक्त गरम झाले. ‘भूःऽ भूःऽऽ’ करून कुत्रा भुंकू लागला. ‘म्याँवऽ म्याँवऽऽ’ अशी मांजर ओरडू लागली.
मोतीने छबीवर उडी घेतली; पण छबी मोठी वस्ताद ! मोती आपल्या अंगावर धावून येत आहे असे बघून तिने जवळच्या झाडावर उडी घेतली. तिने सरंक्षणाचा पवित्रा घेतला. मोती गुरगुरत होता, जोरजोराने भुंकत होता. नंतर त्यानेही झाडावर उडी घेतली. ते बघून छबीने तेथून पोबारा 1/ केला. मोती मात्र भुंकतच राहिला.
त्या दिवसापासून कुत्रा नेहमी मांजरीकडे रागाने पाहातो. आज सुद्धा कुत्र्याला मांजर दिसली की तो भुंकू लागतो. तिच्यावर धावून जातो. माकडाने कुत्रा व मांजर यांत लावून दिलेल्या कलागतीमुळे निर्माण झालेल्या दुश्मनीचा हा परिणाम होय.
अशी ही मित्रता
एका जंगलात एक हरिणाचे बच्चे राहात होते. त्याच्या लहानपणीच त्याचे आई-वडिल त्याच्यापासून दूर झाले होते. जंगलात आई कुठे, तर वडील कुठे आणि हरिणाचे बच्चे कुठे अशी स्थिती होती. परंतु हरिणाचे बच्चे आपल्या घरात व्यवस्थित राहून आपले जीवन व्यतीत करीत होते.
दिवसामागून दिवस गेल्यानंतर ते बच्चे आता मोठे झाले होते. हरीण स्वतंत्रपणे व मुक्तपणे जंगलात विहार करायचे. उड्या मारायचे.
हरीण मोठे छान होते, सुंदर होते, आकर्षक होते. त्याच्या शरिराचा रंग आणि त्याच्यावरील ठिपके मोहक दिसायचे.
एका दिवसाची गोष्ट. दुपारची वेळ होती. सूर्य डोक्यावर आला होता. त्यावेळी आपल्या घरात हरीण विश्रांती घेत होते.
त्याचवेळी अचानक त्याच्या घराच्या दरवाजावर कुणीतरी थाप देऊन बोलले, “दार उघड, दार उघड !”
हरिणाला थोडे आश्चर्य वाटले. ‘या दुपारच्या वेळी कोण आले असावे!’ असा प्रश्न त्याच्या मनात आला. हरीण दरवाजाच्या फटीतून पाहू लागले.
“अरे माझ्या प्रिय हरिणा, दोस्ता ! दार उघड. माझे प्राण वाचव. दोन शिकारी माझ्यामागे लागले आहेत. तुझ्या घरात मला आसरा देऊन शिकाऱ्यांपासून मला वाचव.”
“तू तर वाघ दिसतोस ! तुझा काय भरोसा ?” घरातूनच हरीण उत्तरले.
“हरिणा, तसं समजू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव. मी संकटात आहे. अशावेळी तू माझ्यावर उपकार कर, उपकारकर्त्याला मी थोडी सुद्धा इजा करणार नाही.” दरवाजाच्या बाहेरून वाघाने सांगितले.
हरिणाला प्रथम थोडी भीतीच वाटली. परंतु तरीदेखील त्याने धोका पत्करून शिकाऱ्यापासून वाघाचे प्राण वाचविण्यासाठी मदत करण्याचे ठरविले.
हरिणाने घराचा दरवाजा उघडला. वाघाने एकदम घरात प्रवेश केला. वाघ घाबरलेला दिसत होता. तो उसासे टाकत होता.
हरिणाने घराचा दरवाजा बंद करून घेतला.
थोड्या वेळाने शिकाऱ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आला. घोडे हरिणाच्या घराच्या समोर अंगणात उभे राहिले. शिकाऱ्यांनी तेथे सर्वत्र आपल्या डोळ्यांनी न्याहाळले, पण त्यांना कुठेच वाघाची चाहूल लागली नाही. म्हणून शिकारी माघारी परतले.
वाघ आणि हरीण यांना शिकारी गेल्याची खात्री पटली. नंतर वाघाने परत जाण्याची हरिणाकडे परवानगी मागितली. तेव्हा त्याला हरीण म्हणाले, “आलाच आहेस तर पाहुण्यासारखा दोन-चार दिवस माझ्याकडे राहा, नंतर जा.”
“ठीक ! ” वाघाने संमती दिली.
नंतर दोन-चार दिवस हरिणाकडे राहून वाघ जाण्यास निघाला. तेव्हा तो हरिणास म्हणाला, “मित्रा, मला तू जी मदत केलीस, ती मी कदापि विसरणार नाही. संकटकाळी जो मदत करतो, तोच खरा मित्र ! आता यापुढे आपल्या मैत्रीत खंड पडणार नाही. मी तुला अवश्य जाईन.”
भेटावयास येत पुढे त्या दोघांची मैत्री चांगलीच दृढ झाली. ते एकमेकांस भेटायचे. जंगलात एकसाथ फिरायचे, फिरताना ते थकले तर एखाद्या झाडाखाली बसून विश्रांती घ्यायचे. दोघांना एकमेकांशिवाय करमायचे नाही. वाघ व हरीण परस्परांचे मित्र झाले होते.
त्यानंतरच्या एका दिवसाची गोष्ट. त्या दिवशी हरीण एकटेच जंगलात कोवळे-कोवळे ऊन खात फिरत होते. त्यावेळी त्याला अचानक वाघाची
डरकाळी ऐकू आली. तेव्हा आपला मित्र येत आहे, असे हरिणाला वाटले. परंतु तो वाघ दुसराच होता. तो सरळ वेगाने हरिणावर चालून आला. तेव्हा हरिणाची गाळण उडाली. मोठ्या मुश्किलीने आपला बचाव करून हरिण पळाले.
परंतु हा दुसरा वाघ हरिणाची शिकार करण्यासाठी चवताळलेला होता. हरिणाला बघून त्याची भूक वाढली होती. हरिणाला खाऊन तो त्याची भूक शमवू पाहत होता.
हरीण जीव मुठीत घेऊन पळत होते. पळता पळता त्याच्या दृष्टीला त्याचा मित्र असलेला वाघ दिसला.
“मित्राऽ मित्राऽऽ” हरिणाने वाघाला हाक दिली.
हाकेच्या दिशेने वाघमित्राने पाहिले. हरीण छलांग मारून पळत होते आणि त्याच्या मागे दुसरा वाघ धावत होता. हे बघून वाघमित्र हरिणाच्या
मदतीला धावला. एक मोठी डरकाळी मारून तो दुसऱ्या वाघावर तुटून पडला.
दोघा वाघांची जोरदार झटपट सुरू झाली. जणू तुंबळ युध्दच ! दोघे परस्परांवर प्रहार करीत होते. डरकाळ्या फोडीत होते. त्या डरकाळ्यांनी जंगल निनादले.
शेवटी दुसरा वाघ चांगलाच घायाळ झाला. तो जमिनीवर कोसळला. तो आता उठू शकत नव्हता. तेव्हा तो म्हणाला, “मी तुझा जातभाई; हरिणासाठी तू माझ्यावर हल्ला का केलास ? हरिणाची तर आपण शिकार पाहिजे !”
करायला “खरे आहे तुझे म्हणणे. परंतु हा हरीण माझा मित्र आहे. या हरिणाने माझे प्राण वाचवले होते. उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे. जो उपकाराची जाणीव ठेवत नाही, तो कृतघ्न असतो. मी कृतज्ञ भावनेने हरिणाला मदत केली. समजलास ? आता तू निघून जा.” वाघमित्राने दुसऱ्या वाघाला सांगितले.
दुसरा वाघ कसाबसा उठला आणि हळूहळू चालू लागला आणि सावकाश निघून गेला.
“मित्रा, तू जर आला नसतास तर मी वाघाची शिकार झालो असतो. तू मित्रत्वाची शान वाढविलीस. तू माझा खरा आणि घनिष्ट मित्र आहेस. मी कोणत्या शब्दांत तुझे आभार मानू, हेच मला समजत नाही !” हरीण म्हणाले.
“मित्रा, चल आता, मात्र एक लक्षात ठेव माझ्या जातीच्या सर्व वाघांपासून सावध राहा. पाची बोटे सारखी नसतात. मित्र तो मित्रच असतो; पण सर्व काही मित्र नसतात. चल आता.” वाघ प्रेमाने हरिणला
समजावून सांगत होता. नंतर ते दोघे मित्र एक-दुसऱ्याला चिकटून चालू लागले.
त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा प्रकाश प्रगटला होता.
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.