कथा | अहंकारी बेडूक | साप, मुंगूस आणि जादूगार

अहंकारी बेडूक आणि साप, मुंगूस आणि जादूगार

कथा अहंकारी बेडूक, साप, मुंगूस आणि जादूगार हा विशेष ब्लॉग आपल्याला नवीन आणि रोमांचक कथांच्या संग्रहासाठी आणि मराठीतून नवीन साहित्याच्या आनंदात प्रवेश करण्यासाठी तयार केला गेला आहे. या ब्लॉगमध्ये, आपण अहंकारी बेडूक, साप, मुंगूस, आणि जादूगार या प्राणींच्या जगात अनेक कथांच्या साक्षी व्हावं, ज्या त्यांनी अत्यंत विचारायला प्रेरित केलं आहे. या कथांमध्ये समाजातील विविध गुण, चरित्रे, आणि भावना या विशेषांच्या उघडतात. हे ब्लॉग तुमच्या साहित्याच्या भ्रमातून बाहेर पडण्यास मदत करेल आणि नवीन कथा आणि कथाकथनांच्या संग्रहाच्या आनंदात तुम्हाला सहभागी बनवेल. आपले स्वागत आहे आणि आपल्याला खात्री आहे की आपल्याला हे कथा संदर्भ आवडेल!


कथा – अहंकारी बेडूक

frog story अहंकारी बेडूक

एका तळ्यात असंख्य बेडूक राहात होते. त्या बेडकांमध्ये सर्वांहून चार पावसाळे अधिक अनुभवलेला एक भला मोठा बेडूक होता. सर्व बेडकात तो अधिक समंजस होता. तळ्यातील छोट्या मोठ्या बेडकांना याचे मार्गदर्शन सतत लाभत असे. त्यामुळे सर्व बेडूक त्याला तळ्याचा राजा मानत असत. ‘महाराज’ असा आदबीने त्याचा उल्लेख करीत असत. तोही सर्वांना मान देत असे.

त्या तळ्यात राजा बेडकाच्या वयाचा दुसरा एक बेडूक होता. त्यानेही राजा बेडकाप्रमाणेच इतरांहून चार पावसाळे अधिक पाहिलेले होते, पण अनुभवाने त्याला शहाणपण मुळीच आलेले नव्हते. लहानपणी एका खोडकर मुलाने त्याच्या मागील पायावर दगड मारल्यामुळे तो पाय कायमचा अधू बनलेला होता. त्यामुळे उड्या मारताना तो लंगडत असे. पाण्यात पोहतानाही त्याची गती इतराहून कितीतरी कमी होती. परिणामी इतर बेडकांविषयी त्याच्या मनात नेहमी इर्षेची भावना असे. नेहमीच तो इतरांशी फुटकून वागत असे. इतरांनी मात्र आपल्याला मोठा मान द्यावा, असे त्याला वाटे.

त्याच्या या कुढ्या स्वभावामुळे इतर बेडूकही त्याच्याशी फटकून वागत असत. राजा बेडकाला सर्वजण मान देत असल्यामुळे त्याच्यावर तो सतत जळत असे. राजा बेडूक मात्र त्याची मन:स्थिती जाणून त्याला योग्य तो मान देत असे. गरज नसतानाही वेळोवेळी
त्याचा सल्ला घेत असे. आदबीने त्याचा ‘स्वामी’ असा त्याचा उल्लेख करीत असे.

एक वर्षी पाऊस चांगला झालेला होता. तळं पाण्याने तुडुंब भरलेलं होतं. त्यामुळे तळ्यातील सर्व बेडूक अत्यंत आनंदात होते. तरुण बेडकांच्या मनात तर उदंड उत्साह भरलेला होता. त्या उत्साहाच्या भरात त्या वर्षी तळ्याकाठी मोठा वनमहोत्सव साजरा करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. विचार मनात येताच ते सल्ला घेण्यासाठी राजा बेडकाकडे गेले. सर्वांवरुन नजर फिरवित

frog

राजा बेडूक म्हणाला, “मित्रहो, पाऊस चांगला झाल्यामुळे तुम्हा सर्वांचा आनंद अगदी अनावर होणं साहजिकच आहे. माझ्या मनातही तुमच्या सारखा आनंद ओसंडून वाहतो आहे. त्यामुळे या वर्षी मोठ्या उत्साहाने वनमहोत्सव साजरा करण्यासाठी तुमच्या इतकाच मी ही उत्सुक आहे, पण अशा आनंदाच्या वेळी स्वामी कुठंच कसे दिसत नाहीत ? आपण त्यांचाही विचार घ्यावा असं मला वाटतं.”

कशासाठी घ्यायचा त्या लंगड स्वामीचा विचार ? आमच्या मनाचा विचार कधीतरी करतो का तो ? नेहमी एकल- कोंड्यासारखा कुढत राहातो. आमच्यात तो कधीच मिसळत नाही. मग आम्ही तरी का घ्यावा त्याचा विचार ?”

एका तरुण बेडकाने अशी तक्रार करताच समजुतीच्या स्वरात राजा बेडूक म्हणाला,

अरे बाळ, कुणाचाही उपमर्द होईल असं कधी बोलू नये. काही झालं तरी स्वामी तुम्हा सर्वांहून वयानं मोठे आहेत. त्यांचा मान राखायला हवा. विशेषप्रसंगी त्यांचाही सल्ला घ्यायला हवा.”

राजा बेडकाच्या बोलण्यावर दुसरा बेडूक म्हणाला,

“महाराज, त्यांचा सल्ला घ्यायला काहीच हरकत नाही, पण हल्ली बराच काळ तो असतो कुठं या तळ्यात ? एकलकोंड्या- सारखा तळ्याबाहेर कित्येक दिवस भटकत असतो. मग त्याचा सल्ला आपण घेणार कधी आणि वनमहोत्सव होणार कधी ?”

त्या तरुण बेडकाच्या प्रश्नावर राजा बेडूक शांतपणे उत्तरला, बाळांनो, थोडा विलंब झाला तरी चालेल, पण वन- महोत्सवासारख्या आनंदाला कुणीही पारखं होऊ नये असं मला वाटतं. “

“पण महाराज, तो रडतराऊ लंगड स्वामी काहीतरी कुरापत काढून आमच्या साऱ्या आनंदाचा विचका करुन टाकील, त्या पेक्षा त्याचा सल्ला न घेतलेलाच बरा.”

तिसऱ्या एका तरुण बेडकाने सूचना मांडताच सर्व बेडकांनी ती उचलून धरली. सर्वांनी एकमुखाने वनमहोत्सव त्वरित साजरा करण्याचा ठराव पास केला. चारच दिवसात राजा बेडकाच्या अध्यक्षतेखाली तळ्याच्या काठावर वनमहोत्सव साजरा करण्याचा निर्णय पक्का झाला. समारंभाच्या तयारीसाठी अनेक समित्या नेमल्या. सर्व बेडूक उत्साहाने वनमहोत्सवाच्या तयारीला लागले.

वनमहोत्सवाचा दिवस उजाडला आणि नेमका त्याच दिवशी तो लंगडा बेडूक अचानकपणे तळ्यात टपकला. तळ्यातील सर्व बेडकात वनमहोत्सवाची उत्साहाने चर्चा लागल्याचे ऐकून त्याचे
पित्त खवळले. तावातावाने तो त्यांना म्हणाला,

” मूर्खानो, माझ्या अपरोक्ष वनमहोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही ? मला डावलण्याचं केलंच कसं ?”

धाडस तुम्ही लंगड्या बेडकाचा प्रश्न त्याच्यावरच उलटवीत एक तरुण बेडूक उत्तरला, “अरे थेरड्या, आम्हाला असा प्रश्न विचारताना खरं तर तुलाच लाज वाटायला हवी. तुझा-आमचा काय संबंध ? तू आमच्यात असतोस कुठं ? स्वतःच्या मनात कुढत कुठंतरी भरकटत जातोस. अहंकाराने टम्म फुगून नेहमी आमच्याशीच फटकून वागतोस. मग तुझा विचार करण्याचं आम्हाला तरी काय कारण?”

” कारण नाही ना ? ठीक आहे, मी ही पाहतोच तुम्ही ،، वनमहोत्सव कसा साजरा करता ते !”

अशी धमकी देऊन अहंकाराने टम्म फुगलेला तो लंगडा बेडूक तळ्याबाहेर पडला आणि त्या तळ्यातील बेडकांचा वनमहोत्सव कसा उधळून लावता येईल त्याचा विचार करीत एक पाय हवेत उडवून उड्या मारीत जाऊ लागला.

इकडे त्या तरुण बेडकांनी राजा बेडकास घडलेला प्रसंग हुबेहूब वर्णन करुन सांगितल्यावर राजा बेडूक खेदाने उद्‌गारला,

“अरे बाळांनो, या आनंदाच्या प्रसंगी घडलं ते फार वाईट घडलं. तुम्ही आपल्या स्वामींचं मन दुखवायला नको होतं, अशा वेळी एखाद्याचं जरी मन दुखवलं तरी कोणता अनर्थ ओढवेल याची कल्पनाही करता येत नाही.”

राजा बेडकाच्या बोलण्यावर एक तरुण बेडूक म्हणाला,
“आमचं काय वाकडं करणार आहे तो लंगड स्वामी ?”

तरुण बेडकाच्या प्रश्नावर शांतपणे राजा बेडूक म्हणाला,

अरे बाळ, तुमचं जरी काहीचं वाकडं होणार नसलं तरी ज्याला राज्य चालवायचं असतं, त्याला तरी अशा अहंकारी प्राण्यापासून नेहमीच सावध राहावं लागतं. एक अहंकारी असंतुष्ट प्राणीही कधी, कधी महाभयंकर अनर्थ ओढवू शकतो !”

“महाराज, आपण मुळीच चिंता करु नका. मी जातीनिशी त्या लंगडस्वामीच्या हालचालीवर चांगली पाळत ठेवीन आणि वनमहोत्सवाच्या आनंददायक प्रसंगी काही अनर्थ घडू देणार नाही.”

तो लंगडा बेडूक तळ्यातून निघाला तो सरळ एका सापाकडे आला. त्याला पाहाताच साप जिभल्या चाटू लागला. तेव्हा लंगडा बेडूक त्याला म्हणाला,
मित्रत्वाच्या नात्याने मी आपल्याकडे आलो आहे. यापुढे प्रत्येक दिवशी मी आपणास चांगल्या तगड्या बेडकांची मेजवानी देईन आज आमच्या तळ्यातील बेडकांचा राजा तळ्यातील वनमहोत्सव साजरा करण्यात गुंतलेला आहे. तो बेसावध असल्यामुळे आपण त्याला सहज पकडून फस्त करु शकाल. तळ्यामधील तो मोठ्यातमोठा बेडूक खाण्याची संधी घ्यायची असेल तर आपण माझ्या मागून यावं.”

त्या लंगड्या बेडकांचं बोलणं ऐकून सापाच्या तोंडाला पाणी सुटलं, त्यामुळं तो बेडकामागून सरपटत निघाला.

इकडे तळ्याकाठी बेडकाच्या वनमहोत्सवात रंग भरु लागलेला होता. राजा बेडूक एका उंच खडकावर बसलेला होता. त्याच्यासमोर तळ्यातील सर्व बेडूक ओळीनं बसलेले होते. काही तरुण बेडूक एका सुरात स्वागत पद्य गात होते. एक तगडा बेडूक मात्र राजा बेडकामागे राहून सावधपणे सर्वत्र टेहळणी करीत होता. अशा त-हेने बारकाईने टेहळणी करीत असता लंगड्या बेडकामागून दबा धरुन सरपटत येणाऱ्या सापाकडे त्याचे लक्ष जाताच त्याने राजा बेडकाला सावध केले. राजा बेडकाने प्रसंगावधान राखून सर्व बेडकांना तळ्यात उड्या टाकून जीव वाचविण्याची आज्ञा दिली. क्षणार्धात सर्व बेडकांनी धोका ओळखून पटापट समोरच्या तळ्यात उड्या टाकल्या. राजा बेडूक त्याच्या मागे असलेल्या तगड्या बेडकासह तळ्याच्या काठावर आला. सापाचे संकट येताच तळ्यात उडी मारण्याच्या पवित्र्यात सापावर नजर ठेवून ते तळ्याच्या काठावर बसले.

शिकार निसटल्याची सापाला जाणीव होताच तो चवताळला. लंगड्या बेडकामागून खूप दूर अंतरावरुन सरपटत आल्यामुळे त्याला सपाटून भूक लागलेली होती. भुकेल्या पोटी माघारी जाण्याची त्याची इच्छा नव्हती. त्यामुळे समोरच्या लंगड्या बेडकावर हल्ला करुन त्याने त्याला आपल्या जबड्यात पकडले. हळूहळू तो त्याला गिळू लागताच सुटकेसाठी केविलवाणी धडपड करीत तो सापाला विनवू लागला, “सर्पराज, मी आपला मित्र आहे. मित्राशी अशी दगाबाजी करु नका.

लंगड्या बेडकाचं बोलणं ऐकून तळ्याच्या काठावरील तगडा बेडूक त्वेषाने उद्‌गारला,

“अरे लंगडस्वामी, सर्पराजावर दगाबाजीचा आरोप करण्याचा तुला मुळीच अधिकार नाही. स्वतःच्या जातिबांधवांशी दगाबाजी करणारा तूच खरा दगाबाज आहेस. तुझ्या अहंकारी वृत्तीनेच तुला गिळले ! आता भोग तुझ्या कर्माची फळे ! “

त्याच क्षणी सापाने लंगड्या बेडकाला गटकन गिळून टाकले.


कथा – साप, मुंगूस आणि जादूगार

snake, Mongoose, Magician stories साप, मुंगूस आणि जादूगार

एकदा एका नाग सापाची आणि मुंगूसाची समोरासमोर गाठ पडली. एकमेकांना वैरी समजणारे ते दोघेही परस्परांशी झुंज देण्याच्या पवित्र्यात सज्ज झाले. नाग आपला फणा उंच उभारुन फुत्कारु लागला. मुंगूस नागावर आक्रमण करण्याच्या इराद्याने दबा धरुन चित्कारु लागले. परस्परांची नजरानजर होताच दोघेही वैर भावनेने पेटून उठले. एकमेकावर तुटून पडले. नाग मुंगूसास त्वेषाने दंश करण्याचा प्रयत्न करु लागला. मुंगूस नागास चकवून त्याच्या शरीराचे तुकडे पाडण्यासाठी नागावर झडप घालू लागले. परस्परांवर हल्ले-प्रतिहल्ले होऊ लागले. नागाने मुंगूसाच्या शरीरास जबरदस्त विळखा घालण्याचा प्रयत्न करावा आणि मुंगसाने चपळाईने सुटका करुन घ्यावी, असा प्रकार बराच वेळ सुरु होता. परस्परांशी लढून दोघेही जखमी झाले होते. दोघांच्याही अंगात त्राण उरले नव्हते. तरीही परस्परांशी ते निकराची झुंज देतच होते.

त्यांची ती चित्तथरारक झुंज पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी उसळली होती. खरंतर ती झुंज जीवघेणी होती, पण ती पाहाण्यात लोकांना मौज वाटत होती. अगदी तल्लीनतेने लोक ती झुंज पाहात असतानाच एक जादूगार तेथे टपकला. तो गावो गावी फिरुन लोकांना जादूचे खेळ दाखवत असे. लोकांनी खुशीने दिलेल्या चार पैशावर तो आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असे. तेच तेच जादूचे खेळ पाहून कंटाळलेले लोक अलिकडे त्याला फारसे पैसे देत नसत. त्यामुळे यापुढे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा

करावयाचा, या विवंचनेतच तो होता. साप आणि मुंगूसाची झुंज पाहाण्यात लोकांना मौज वाटते हे पाहता क्षणीच त्या जादूगाराच्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली. त्या लोकांच्या गर्दीतून वाट काढत तो पुढे झेपावला.
परस्परांशी झुंज देण्यात तल्लीन झालेल्या सापास आणि मुंगूसासही त्याने चपळाईने पकडले. लोकांच्या मदतीने दोघांच्याही जखमा धुवून-पुसून औषधपाणी केले. त्यांना अंडी खाऊ घातली. दूध पाजले. मग त्यांच्या अंगात हुशारी आली. अशा त-हेने आठ दिवस त्यांना खाऊ पिऊ घालून जखमांवर औषधपाणी केल्यावर साप- मुंगूसाच्या तब्येतीत चांगलीच सुधारणा झाली. ते पाहून लोकांना वाटले, किती दयाळू हा प्राणिमित्र ! किती महान आहे याचं प्राणिप्रेम ! साप आणि मुंगूसही त्या प्रेमाने भारावून गेले. जादूगाराचे उपकार आठवून त्यांची अंतःकरणे हेलावून गेली. पण…

थोड्याच दिवसात ‘घी देखा, लेकिन बडगा नही देखा’ या म्हणीचा त्यांना अनुभव आला. जादूगाराने त्यांचे दात मुळासह उपटून टाकले. मुंगसाच्या गळ्यात पट्टा बांधून त्याला साखळीने जखडून ठेवले. सापाला बांबूच्या करंडीत बंदिस्त केले. त्यांच्या वरचे औषधोपचार आणि मऊ मऊ अन्नपदार्थ खायला देण्यात मात्र मुळीच हयगय केली नाही. असं करण्यात जादूगाराच्या मनात नक्की कोणता हेतू आहे, ते त्या दोघांनाही कळेना. त्यांनी चावा घेऊन परस्परांना दुखापत करु नये या शुद्ध हेतूने त्या जादूगाराने स्वतःच्या इच्छेविरुद्ध त्यांचे दात उपटण्याचे क्रूर कृत्य केले, की त्याच्या मनात आणखी काही हेतू आहे, याबाबत त्यांचे मन संभ्रमात पडले. जादूगार त्यांच्या उपकारकर्ता मित्र आहे, की त्यांच्या असहाय्य परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना छळणारा शत्रू आहे, तेच समजेना.

magician

त्यांचा तो संभ्रम दूर होऊन सत्य उजेडात येण्यास फार वेळ
लागला नाही. त्यांच्या तोंडातील जखमा बऱ्या होताच तो जादूगार त्यांना गावोगावी फिरवू लागला. लोकांना त्यांच्या झुंजीचा खेळ दाखवू लागला. त्यात त्याला खूप पैसा मिळू लागला. मग पैसे मिळवण्याची हाव इतकी वाढली की त्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत तो त्या साप-मुंगूसाला पुनःपुन्हा झुंजवत ठेवू लागला.

दिवसामागून दिवस निघून जात होते. स्वार्थापोटी जादूगार आयुष्यभर आपणास झुंजवत ठेवणार हे कटू सत्य त्यांना कळून चुकले होते. रोज रोजच्या त्या झुंजीने ते पुरते वैतागून गेले होते. परस्परातील त्या झुंजण्याविषयी त्यांच्या मनात घृणा निर्माण होऊ लागली होती. त्यांच्यातील वैरत्वाची भावना नष्ट होऊन एकमेकाविषयी सहानुभूतीची भावना मूळ धरु लागली होती. आता त्यांना परस्परांशी झुंजण्याची मुळीच ईर्षा उरली नसली तरी जादूगाराला त्यांनी सतत झुंजत राहाण्याची आवश्यकता होती त्यातच त्यांचं हित होतं, त्यामुळे त्यांना सतत झुंजत ठेवण्यासाठी तो काठीचा धाक दाखवून छेडत होता. त्याच्या इच्छेसाठीच स्वतःच्या इच्छेविरुद्ध मग लुट्पुटूची झुंज खेळत होते.

परस्परातील वैरभावनेमुळे दोघेही स्वतःचे स्वातंत्र्य गमावून बसल्याचा साप आणि मुंगूसालाही आता फार पश्चात्ताप होत होता गुलामगिरीचं लाजिरवाणं जिणं जगण्यापेक्षा परस्परांशी निकराच झुंज देवून दोघांनीही एकमेकाचे प्राण घ्यावेत असे विचार निराशेपोर्ट कधी कधी त्यांच्या मनात येत. पण त्यांचे तीक्ष्ण दात उपटू जादूगाराने मरण्याचे स्वातंत्र्यही त्यांच्या स्वाधीन ठेवले नव्हते. त्यांना या गोष्टीची खूपच खंत वाटत होती.

त्यामुळे रात्रंदिवस ते जादूगाराच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याबाबत विचार करीत असत. तशी संधी मिळताच सुटकेसाठी धडपडत असत. पण जादूगाराच्या जागरुकपणामुळे त्यांच्या धडपडीला यश येत नसे, मग पुन्हा ते नव्या संधीची वाट पाहात असत.

एके दिवशी त्यांच्या सुदैवाने सुटकेसाठी त्यांना एक नामी संधी चालून आली. त्या दिवशी एका गावच्या यात्रेत त्यांच्या झुंजीचा खेळ दाखवून जादूगाराने नेहमीपेक्षा कितीतरी पटीने अधिक पैसे मिळवले होते. गरजेहून अधिक मिळालेले पैसे पाहाताच जादूगाराच्या डोक्यात थोडी चैन करण्याचा विचार थैमान घालू लागला. त्यासाठी तो एका दारुच्या गुत्त्यावर गेला. तेथे त्याने खूप दारु ढोसली. त्या दारुच्या नशेत तो गावाबाहेरील मारुतीच्या देवळात आला. देवळातील एका खांबाला मुंगसाच्या गळ्यातील साखली बांधली. सापाच्या करंडीवरील झाकणावर एक दगड ठेवला आणि बसल्या जागीच कलंडला. दारुच्या नशेमुळे थोड्याच वेळात

त्याची शुद्ध हरपली. ती संधी साधून मुंगूस समोरच्या करंडीतील सापाला उद्देशून म्हणाले,

“नागराज, आज या स्वार्थी जादूगाराच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याची नामी संधी आपल्यापुढे चालून आलेली आहे. परस्परातील वैर विसरुन आपण एकमेकास सहकार्य केले तरच या गुलामगिरीतून आपली सुटका होऊ शकेल.”
त्यावर साप म्हणाला,

मुंगूस भाऊ, या दुष्ट जादूगाराच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी कोणतंही दिव्य करायची माझी तयारी आहे, पण करंडीत मी बंदिवानासारखा कोंडला गेलो आहे. अशा परिस्थितीत मी काय करु?”

सापाच्या प्रश्नावर मुंगूस म्हणाले,

समज मी तुला करंडीतून मुक्त केले तर तू माझ्या मुक्ततेसाठी काय करु शकशील ?”

” मी ही तुझ्या गळ्यातील साखळीतून तुझा गळा मुक्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन. तुझी मुक्तता झाल्याखेरीज तसूभरही येथून हलणार नाही.”

सापाने वचन देताच मुंगूसाने सर्व शक्तीनीशी त्या सापाच्या करंडीवरील दगड दूर ढकलला, मग पायाच्या नख्यांनी वरचे झाकण दूर करताच उत्साहाने सळसळतच साप करंडीतून बाहेर आला.

जादूगाराच्या गुलामगिरीतून सुटका झाल्याचा सापाला अतिशय आनंद झालेला होता. पण मुंगसाच्या गळ्यातील साखळीकडे लक्ष जाताच मुंगसाची मुक्तता कशी करायची याबाबत तो गंभीरपणे विचार करु लागला. काम कितीही कठीण असले तरी ते करण्यामागे प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची इच्छा असल्यास योग्य मार्ग सुचतोच. त्या सापालाही तो मार्ग सुचला. मारुतीच्या देवळात भक्तांनी मारुतीरायाला वाहिलेले तेल-तांदुळ खाण्यासाठी उंदरांचा अगदी सुळसुळाट झालेला होता. त्यातील एखाद्या उंदरास अ पकडून मुंगसाच्या गळ्यातील चामडी पट्टा त्या उंदराकडून

कुरतडल्यास मुंगूसभाऊची सुटका करणे शक्य होईल, अशा विचाराने साप दबा धरुन बसला. थोड्याच वेळात एका उंदरास पकडण्यात तो यशस्वीही झाला.

सापाने त्या उंदरास मुंगसाच्या गळ्यातील चामडी पट्टा कुरतडण्यास फर्माविले, सापाच्या भीतीमुळे उंदराने आपल्या तीक्ष्ण दातांनी मुंगसाच्या गळ्यातील पट्टा भराभर कुरतडताच मुंगूस गळ्यातील साखळीच्या बंधनातून मुक्त झाले. परस्परांच्या सहकार्यामुळे जादूगाराच्या गुलामगिरीतून कायमची मुक्तता झाली. या आनंदात साप-मुंगूस एकमेकास प्रेमभराने क्षणभर कडकडून भेटले. दुसऱ्याच क्षणी भय आणि आश्चर्याने थक्क झालेल्या उंदराचा त्यांनी कृतज्ञतेने निरोप घेतला आणि मुक्त जीवन जगण्यासाठी ते आनंदाने सुसाट धावत सुटले.


आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.

Leave a Comment