कोकिळेचा अभिमान, तीन बैल आणि सिंह, झुले झुले झोका झुले | कथा
कथा कोकिळेचा अभिमान, तीन बैल आणि सिंह, झुले झुले झोका झुले हा विशेष ब्लॉग आपल्याला नवीन आणि रोमांचक कथांच्या संग्रहासाठी आणि मराठीतून नवीन साहित्याच्या आनंदात प्रवेश करण्यासाठी तयार केला गेला आहे. या ब्लॉगमध्ये, आपण कोकिळेचा अभिमान, तीन बैल आणि सिंह, आणि झुले झुले झोका झुले या कथांच्या साक्षी व्हावं, ज्या त्यांनी जीवनात अत्यंत महत्वाच्या भूमिका बजावली आहे. या कथांमध्ये समाजातील विविध गुण, चरित्रे, आणि भावना या विशेषांच्या उघडतात. हे ब्लॉग तुमच्या साहित्याच्या भ्रमातून बाहेर पडण्यास मदत करेल आणि नवीन कथा आणि कथाकथनांच्या संग्रहाच्या आनंदात तुम्हाला सहभागी बनवेल. आपले स्वागत आहे आणि आपल्याला खात्री आहे की आपल्याला हे कथा संदर्भ आवडेल!
कथा – कोकिळेचा अभिमान
ही गोष्ट अति प्राचीन काळाची आहे. ज्यावेळी सृष्टिनिर्माता ब्रह्मदेव हे सृष्टी निर्माण करताना निरनिराळ्या अन् विविध पक्ष्यांना मनपसंत रंग प्रदान करीत होते. त्यावेळची ही गोष्ट. ब्रह्मदेवांनी रंगांचे कलश पक्ष्यांपुढे ठेवले होते. पक्ष्यांनी आपल्याला जो रंग आवडेल तो घ्यावा असे स्वातंत्र्य ब्रह्मदेवांनी पक्ष्यांना दिलेले होते. त्यामुळे पक्षी यायचे आणि आपणास जो रंग आवडेल तो रंग ते ब्रह्मदेवाला सांगायचे. त्याप्रमाणे ब्रह्मदेव पक्ष्यांना रंगाने सजवून द्यायचे, तेच रंग पुढे पक्ष्यांचे झाले.
त्यावेळी कोकिळा पण तेथे गेली. तिने पण आपला आवडता रंग निवडला. ब्रह्मदेवाने कोकिळेने निवडलेल्या रंगाने तिला रंगवून दिले. त्यामुळे ती अधिकच सुंदर दिसू लागली. आपल्या मधुर स्वरांनी कोकिळा सर्वांचे मन रिझवायची. आता तर तिला चांगले रंगीत रूप प्राप्त झाले होते.
कोकिळेला सुंदर रूप आणि मधुर स्वर लाभल्याने लोकांना ती हवीहवीशी वाटे. ती जेव्हा कुहुकुहू स्वर काढायची तेव्हा सारे वातावरण नादमधुर व्हायचे. ती आम्रवृक्षावर राहायची. तिच्या वास्तव्याने आम्रवृक्ष कृतार्थ झाला. ती नाचायची. गायची.
मी कोकिळा,
मी कोकिळाऽ
ऐका माझे गाणेऽ
त्या गाण्याने मोहरली
वसुधा नि उपवने !
मी कोकिळा, मी कोकिळाऽ रूपगर्विता छान
त्या रूपाने मोहित होती
विसरून जाती भान !
कोकिळा मानवप्रिय पक्षी झाली होती. लोक तिची वाहवा करायचे. तिचे गुणगान गायचे. तिचे तोंडभरून कौतुक करायचे.
त्यामुळे कोकिळेला पुढे-पुढे आपले रूप-रंग आणि आपला स्वर याबद्दल अभिमान वाटू लागला. ती स्वतःला विशेष समजू लागली. ती दुसऱ्यांना तुच्छ समजू लागली. तिला अभिमानाचा दर्प चढल्याने ती कुणाशी नीटपणे बोलत पण नसे. ती ठिकठिकाणी आपल्या रंगरूपाचेच वर्णन करायची. तिच्यावर गर्वाची छाया पसरली.
कोकिळा ज्या वृक्षावर रहात होती, त्या वृक्षाच्या समोरच्या वृक्षावर एक कावळा आपल्या दोन पिलांसह रहात होता. कावळ्याने वृक्षावर घरटे बनविलेले होते. ही पिले विकसित झालेली नव्हती. कोकिळा त्या कावळ्याला व त्याच्या पिलांना पाहून नाक-तोंड मुरडायची. त्यांच्याकडे घृणेने पाहायची.
एकदा ब्रह्मदेवांनी आपण पक्ष्यांना जे रंग दिले, त्यामुळे पक्षीगण मनपसंत रंग प्राप्त झाल्याने समाधानी आहेत किंवा नाहीत हे पाहण्याचे ठरविले. त्यांनी सामान्य माणसाचे रूप घेतले. ते पृथ्वीवर आले. त्यांनी अनेक पक्षी पाहिले. त्यांचे निरीक्षण केले. त्यांना प्रत्येक पक्षी आनंदित व प्रसन्नचित्त दिसला. त्यामुळे ते संतुष्ट झाले.
ब्रह्मदेव पृथ्वीवर पक्ष्यांना पाहत फिरत असताना सूर्य पश्चिमेला कलू लागला होता. पूर्व संध्येची वेळ समीप आली होती. त्याच वेळी आकाशात ढगांचा गडगडाट झाला. जोराचा पाऊस पडू लागला. तेव्हा ब्रह्मदेव एका झाडाखाली ओले होऊ नये म्हणून उभे राहिले. योगायोगाने तेच झाड कोकिळेच्या वास्तव्याचे होते.
पावसामुळे कावळ्याचे घरटे मोडले. ते झाडावरून जमिनीवर पडले. कावळ्याची छोटीशी पिल्ले जमिनीवर पडली होती. पावसाच्या पाण्याने ती चांगलीच भिजली होती. पिलांची स्थिती बघून कावळा घाबरल्यागत झाला होता. काय करावे हे त्याला सुचेनासे झाले होते.
कोकिळा आपल्या झाडावरून कावळ्याची सारी परिस्थिती पाहत
होती. तिला मुळीच दया वाटत नव्हती. उलट ती मनातल्या मनात हसत होती.
कावळ्याने आपली पिले उचलली. तो कोकिळेचे जवळ गेला. काकुळतेने म्हणाला, “ताई, माझे घरटे या तुफान पावसाने मोडले. त्यामुळे माझी पिले ओलीचिंब झाली आहेत. कृपाकरून एक रात्रभर तुझ्या घरट्यात आम्हाला आश्रय दे.”
“अरे, माझे घरटे म्हणजे धर्मशाळा नव्हे ! तू आणि तुझी पिले मातीच्या घाणीने भरलेली आहेत. तुला घरट्यात घेतले तर तुला लागलेली मातीची घाण मला लागेल. त्यामुळे माझे सुंदर रूप खराब होईल. जा बाबा, मला त्रास देऊ नकोस.” कोकिळा उत्तरली.
ब्रह्मदेव कोकिळा व कावळा यांचे हे सारे संभाषण ऐकत होते. त्यांना कोकिळेचे वर्तन योग्य वाटले नाही. तरी देखील त्यांच्याने राहवले गेले नाही. म्हणून ते कोकिळेला म्हणाले, “कोकिळे, त्या कावळ्याला आश्रय
दे. संकटात असलेल्यांना मदत करणे सत्कर्म असते.”
“एऽ अनाहूत माणसा, तू कशाला बोलतोस ? मला काही शिकवू नकोस. ही घाणेरडी पिले आणि हा कावळा माझ्या घरट्यात आले तर माझे घरटे खराब होईल आणि त्याबरोबर माझ्या सुंदर रूपाला घाण लागेल. त्याचे माझ्या शरीरावर डाग पडतील. ते घालवायला तू काही मला रंग देऊ शकत नाही !” कोकिळा तोऱ्यात बोलत होती.
“जरूर ! मी तुला रंग देईन !” ब्रह्मदेव म्हणाले.
“मोठा आलास रंग देणारा ! मुकाट्याने जा.”
कोकिळेचे उर्मट बोलणे ऐकून ब्रह्मदेवांना क्रोध आला. तेव्हा ते वास्तव रूपात प्रगट झाले. प्रत्यक्ष सृष्टिनिर्मात्या ब्रह्मदेवांना पाहून कोकिळेचा थरकाप उडाला.
ब्रह्मदेवांनी कावळ्यासाठी आपल्या शक्तीने घरटे तयार केले. ते कावळ्याला दिले. कावळा व त्याची पिले त्या घरट्यात सुरक्षित झाली. नंतर ते कोकिळेकडे दृष्टी वळवून म्हणाले, “कोकिळे, तुला तुझ्या
रंग-रूपाचा अभिमान वाटत आहे. त्या अभिमानाने तू बेभान झाली आहेस. एखाद्या गोष्टीचा अभिमान असावा, पण त्याचा दुराभिमान नको. तू रंग-रूपाने माझ्यामुळे सुंदर झालीस, परंतु तुझे मन काळे आहे. त्यामुळे मी तुला शाप देतो की, तू मनाने जशी काळी आहेस, तशीच शरीराने पण होशील. त्याचप्रमाणे तुझ्याजवळ ममता, करुणेचा अभाव आहे.
काळी म्हणून तू मातृत्वाचा अधिकार गमावशील. आजपासून तुझी अंडी कावळ्याच्या घरट्यात उबवण्यासाठी देत जा. या आज्ञेचे जर तू उल्लंघन केलेस, तर तू तुझ्या मधुर स्वरालीला वंचित होशील. नीट लक्षात ठेव.”
नंतर ब्रह्मदेव अंतर्धान पावले.
बिचारी कोकिळा ! ती त्या दिवसापासून काळी झाली. आपला मातृत्वाचा अधिकार गमावून बसली. ती रानावनात आपल्या मधुर स्वरांनी कूजन करते. उडते. नाचते. ब्रह्मदेवांनी आपला शाप परत घ्यावा म्हणून स्वर आळवून आराधना करते. परंतु तिला आजपर्यंत त्यात यश आलेले नाही. तिला सृष्टिनिर्माता अजून तरी प्रसन्न झालेले नाहीत.
कथा – तीन बैल आणि सिंह
एका जंगलात तीन बैल होते. त्यांचा कुणी मालक नव्हता. मुक्त होते ते. त्यामुळे जंगलात एकसाथ फिरणे, चारा खाणे, एका ठिकाणी राहणे असे त्यांचे चाले. त्या तिघा बैलांची मैत्री हेवा वाटावी अशी होती.
तिघे बैल शरीराने चांगले पोसलेले होते. ताकदवान होते ते. एक बैल पांढऱ्या रंगाचा, दुसरा बैल काळ्या-पांढऱ्या रंगाचा, तर तिसरा बैल पांढऱ्या रंगाचा होता अन् त्याच्या शरिरावर लालसर ठिपके होते. तिघांचे ऐक्य हे त्यांचे विशेष होते.
एकदा एका कोल्ह्याला वाटले, ‘हे बैल किती मस्त आहेत ! यांची शिकार करून त्यांचे मांस खायला मिळाले पाहिजे. फारच छान भोजन होईल ते !’
कोल्ह्याच्या जिभेला पाणी सुटले होते; परंतु बैलांपुढे कोल्ह्याची डाळ शिजणार नव्हती, याची त्याला कल्पना होती. म्हणून तो एखादी युक्ती शोधण्याच्या प्रयत्नात होता.
विचारांती कोल्हा गुहेत राहणाऱ्या सिंहाकडे गेला.
“काय रे, का आलास?” सिंहाने कोल्ह्याला विचारले.
“महाराज, तुम्ही या जंगलाचे राजे असताना येथे तीन माजोरी बैल तुमची जागा घेऊ पाहत आहेत. जणू या जंगलात त्यांचेच राज्य आहे, असे त्यांना वाटते !” कोल्हा धूर्तपणे सांगत होता.
“हे कसे शक्य आहे ? तू मला खोटे तर सांगत नाहीस ना ?” सिंह बोलला.
“नाही महाराज, माझे बोलणे खोटे निघाले तर तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती मी भोगावयास तयार आहे.” कोल्ह्याने सांगितले, “महाराज, तुम्ही चला आणि त्या तिघांना शिक्षा देऊन चांगला धडा शिकवा.”
“चल, कोण हे दांडगे बैल आहेत ते मी पाहतो. एकेकाचा लचकाच तोडतो !” सिंहाने गर्जना केली.
कोल्हा पुढे चालू लागला. त्याच्यामागे सिंह चालू लागला. काही अंतर चालून गेल्यावर कोल्हा थांबला.
“महाराज, ते बघा बैल. हे बैलच तुमचे राज्य हिसकवू पाहात आहेत.” कोल्ह्याने बैल दाखवून म्हटले.
तेव्हा सिंहाने मोठ्याने डरकाळी फोडली. त्या डरकाळीने सारे जंगल दणाणले. डरकाळी ऐकून बैलांचे कान उंचावले. सिंह चवताळला. त्याने क्षणार्धात त्या बैलावर झेप घेतली. तेव्हा दुसरा बैल धावला आणि आपल्या शिंगांनी सिंहाला धडक देऊन दूर लोटले. सिंहाला अधिक चेव आला. त्याने छलांग मारली आणि दुसऱ्या बैलावर तो तुटून पडला. परंतु तिसऱ्या बैलाने आपली शिंगे त्याच्या पोटात खुपसली. त्यामुळे सिंह विव्हळला. खाली पडला. परंतु तसाच उठून सिंह घायाळ अवस्थेत तेथून पळाला.
सिंह पळाल्याचे बघून कोल्हाही जीव मुठीत घेऊन सिंहाच्या मागे पळाला.
सिंह गुहेत आला. कोल्हा तेथेच गेला.
“कोल्होबा, बैल मोठे भारी दिसतात ! परंतु त्यांना इंगा दाखविलाच
पाहिजे. मी त्यांना सोडणार नाही.” सिंह कोल्ह्याशी बोलत होता. “महाराज ताकद मोठी तेव्ही ही , आपण म्हणता ते बरोबर आहे. परंतु त्या तिघांची एकत्रित आहे. त्या तिघांची एकजूट आहे ना! एकजूट बलवान असते. एकजूट फोडली पाहिजे.” कोल्हा उत्तरला.
“ती कशी फोडता येईल ?” सिंहाने प्रश्न केला.
थोडा विचार करून कोल्हा म्हणाला, ‘ मी कोणत्या न कोणत्या बहाण्याने एकट्या बैलाला तुमच्या समोर आणतो. एकट्या बैलाचा चेंदा तुम्हाला काहीच अवघड नाही.”
करायला “होय, तू अगदी बरोबर सांगितलेस ! जा, कामाला लाग.” सिंहाला कोल्ह्याचे म्हणणे पटले.
नंतर कोल्हा जंगलात गेला.
जंगलात तिन्ही बैल वेगवेगळ्या ठिकाणी चरत होते. दूरवर असलेल्या बैलाजवळ कोल्हा गेला. त्याने बैलाला नमस्कार केला.
“कोण तू !” बैलाने विचारले.
“मी या जंगलच्या राजाचा दूत आहे. तू बलवान असल्याने तुला राजाने बोलावले आहे. राजा तुला सेनापती करू इच्छितात.” कोल्ह्याने सांगितले.
बैल म्हणाला, ‘मी माझ्या मित्रांशी याबाबतीत चर्चा करतो.”
“नको-नको ! तू चर्चा करशील, पण तुझ्या मित्रांनाही सेनापती बनावेसे वाटेल. तुला सेनापती व्हायचे असेल तर तू एकटाच चल.’ धूर्तपणे कोल्ह्याने सांगितले.
बैल विचार करू लागला. त्याला वाटले, ‘प्रथम आपण सेनापती होऊ. नंतर आपल्या मित्रांनाही मोठ्या हुद्याच्या पदावर घेऊ.’ असा
विचार करून बैल कोल्ह्याला म्हणाला, “चल.”
कोल्ह्यामागोमाग बैल चालू लागला.
सिंहाची गुहा आली. कोल्ह्याने बैलाला गुहेपुढे नेले. सिंहाने बैलाला पाहताच त्याच्यावर झेप घेतली. बैल खाली कोसळला. आपल्या तीक्ष्ण दातांनी आणि नखांनी सिंहाने बैलाला ओरबाडून घायाळ केले. बैल रक्तबंबाळ झाला. सिंह बैलाचे लचके तोडतच होता. एकटा बैल सिंहाचा प्रतिकार करू शकला नाही. बैल मारला गेला.
“महाराज, उद्या मी दुसरा बैल आणीन.”
“आण.” सिंह उत्तरला.
अशाच तन्हेने दुसऱ्या दिवशी कोल्ह्याने दुसऱ्या बैलाला फसवून सिंहाच्या गुहेपुढे नेले. पहिल्या बैलाची जी गत झाली, तीच गत दुसऱ्या बैलाचीही झाली.
आता पांढऱ्या रंगाचा व अंगावर लालसर ठिपके असलेला बैल राहिला. तेव्हा सिंह कोल्ह्याला म्हणाला, “आता तिसरा बैल गुहेपुढे आणू नकोस. तो जेथे असेल तेथे मीच त्याचा समाचार घेऊन ठार करीन. ती शिकार मी तुला देईन. तेव्हा तू पोटभर खा. समजलास.”
कोल्ह्याने नुसती मान हलविली.
नंतर सिंह जंगलात निघाला. त्याला तिसरा बैल दिसला. डरकाळी फोडून सिंह त्याच्यावर तुटून पडला. सिंह व बैल यांची झटापट झाली, परंतु सिंहापुढे एकट्या बैलाचे काही चालले नाही. बैल शिकार झाला.
एकजुटीत फाटाफूट झाली म्हणजे विनाश असतो, हेच या गोष्टीवरून दिसून येते.
कथा – झुले झुले झोका झुले… !
सुमारे सप्ताहापासून जंगलात पावासाची झडी चालू होती. मुसळधार पावसाने जंगल धुवून निघाले होते. सर्वत्र हिरवेपणा दिसत होता. जमीन न्हाऊन निघाल्यामुळे तिचा गंध वातावरणात दरवळलेला होता.
आज उघडीप झाली होती. सूर्याच्या किरणांचा प्रकाश साऱ्या जंगलात पसरला होता. कोवळे ऊन पडले होते.
“किती सुंदर सकाळ आहे ही!” आपले डोळे किलकिले करून एक माकड पुटपुटले आणि त्याने बसलेल्या फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी घेतली.
“आता मी माझी इच्छा पूर्ण करणार. झाडावर झोका बांधणार. झोके घेणार…. झुलणार !” माकड म्हणाले.
नंतर माकडाने झाडावर लटकेल्या दोन मोठ्या वेली निवडून त्यांची मजबूत गाठ मारली. झोका तायार केला.
“झाला झोका तयार ! आता मी मनसोक्त झोके घेणार. मज्जाच मजा !”
माकड झोक्यावर बसले. झोका घेऊ लागले. गाणे गाऊ लागले
झुले झुले झुले झुले झोका झुले
मागे-पुढे मागे-पुढे झोका झुले
झोक्यावर मन झुले झुले झोका झुले
वाऱ्यासवे झुले झुले झोका झुले !
माकड झोका घेत होते. मजा लुटत होते.
“नमस्कार !” माकडाच्या कानावर आवाज आला. तो आवाज वाघाचा होता. वाघ झोक्याजवळ येऊन उभा राहिला. माकडाने वाघाकडे पाहिले.
“नमस्कार !” माकड उत्तरले.
“हे काय आहे ?” वाघाने विचारले.
“झोका.”
“याचा उपयोग काय ?”
“झुलण्यासाठी ! बघ, किती मजा येते आहे ती.”
“अस्सं ?”
“हो. स्वप्न पाहताना जशी मजा वाटते, तशी ! पहा आता मी वेग वाढवितो. आकाशात पक्ष्याप्रमाणे वर जाईन… अगदी ढगांच्याजवळ !” माकड मोठ्या ऐटीत सांगत होते आणि नंतर गाणे म्हणू लागले –
झुले झुले झुले झुले झोका झुले मागे-पुढे मागे-पुढे झोका झुले झोक्यावर मन झुले झुले झोका झुले वाऱ्यासवे झुले झुले झोका झुले !
वाघ म्हणाला, “माकडदादा, मला पण झोक्यावर बसू दे ना !”
“अरे थांब, प्रथम माझे पूर्ण होऊ दे; नंतर तू झोक्यावर बस.” माकड उत्तरले.
परंतु वाघ थोडा हिरमुसला. म्हणाला, “अरे, मला बसू दे. आकाशातील ढग निघून जातील. मग मला झोक्यावरून ढगाजवळ कसे जाता येईल ? ढंग कसे चालतात, ढगांचे पाय कसे आहेत, हे मला पाहावयाचे आहे.”
“वाघोबा, अगदीच खुळा तू ! ढगाला कुठे पाय असतात का ! बरं,
तू आता झोक्यावर बस. मी उतरतो.” माकडाने सांगितले.
वाघ झोक्यावर बसला. तो उंच-उंच झोके घेऊ लागला. त्याने एकदा मोठ्याने डरकाळी मारली. त्यामुळे जंगल दुमदुमले. किती तरी वेळ वाघ झोके घेत होता. त्यामुळे त्याला चक्कर येऊ लागली. म्हणून तो
झोक्यावरून उतरला. त्याच वेळी तेथे एक हत्तीचा बच्चा आला. म्हणाला, “माकडदादा, तुझ्या झोक्यावर मला पण बसू दे. झोक्याची गंमत पाहू दे.”
“अरे, तुझ्या वजनाने झोका तुटून जाईल. तू या झोक्याच्या वेलाची दोरी धरून मला हिंदोळा दे.” माकडाने सांगितले.
माकड झोक घेऊ लागले.
थोड्या वेळाने ससा आला. ससा त्याच्या मावशीकडे चालला होता, परंतु झोका बघून
थांबला.
“माकडदादा, तुझ्याबरोबर मला झोक्यावर बसव ना !” सशाने म्हटले.
“चल, ये. माझ्याजवळ बस.” झोका थांबवून माकडाने सशाला बसविले. दोघे झोका घेऊ लागले.
वाघ व हत्ती पाहत होते. झाडावरील चिमण्या देखील झोक्याचे झुलणे पाहून चिवचिवाट करीत होत्या.
हळूहळू तेथे एक कोल्हा, एक हरीण, एक लांडगा आला. ते सारे झोका पाहून स्तंभित झाले होते. त्यांना पण आपण झोक्यावर बसावे
असे वाटत होते. त्याप्रमाणे त्यांनी माकडाला सांगितलेही. माकडाने सर्वांना पाळीपाळीने झोक्यावर बसविले. सर्वांनी झोक्याचा आनंद घेतला.
अशा त-हेने दिवस केव्हा संपला, हे कळलेही नाही. सूर्य मावळला. जंगलात अंधार पसरू लागला. मग मात्र नाईलाजाने जनावरे आपापल्या घरी परतली.
नाकड मात्र तेथेच, त्या झाडावर वास्तव्याला होते. त्याची झोत्याची धुंदी उतरलेली नव्हती. ते झाडावर पुटपुटतच होते
झुले झुले झुले झुले झोका झुले
झोक्यावर मन झुले झोका झुले…!
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.