माझी मातृभाषा मराठी – माझं प्रेम माझ्या भाषेवर
माझी मातृभाषा, मराठी! – Mazi Matrubhasha Marathi ही माझं आणि माझ्या भाषेचं नातं कसं साखरंत गोडं! तिचं सौंदर्य, तिचं संवाद, तिचं साहित्य हे सर्व आमच्यातूनच वाटतं. आजच्या ब्लॉगमध्ये, आपल्या मराठी भाषेबद्दलचं प्रेम आणि अभिमान अनुभवूया.
ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली १९८९ मध्ये पहिली जागतिक मराठी परिषद मुंबई येथे भरली होती, त्यावेळी त्यांनी आपल्या काव्यमय भाषेत त्यावेळच्या मराठी भाषेची स्थिती वर्णन केली होती. ते म्हणाले होते की डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत ती मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे. मराठी भाषेची सर्वच क्षेत्रांत पीछेहाट होते आहे. तिचा विकास व्हायचा असेल, बोलभाषा म्हणून तिला माजघरात ढकलायचं नसेल तर सामाजिक व्यवहाराच्या प्रत्येक क्षेत्रात तिचा प्रवेश व्हायला हवा. महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व लोकांनी जर कटाक्षानं मराठीतूनच सर्व व्यवहार करायचे ठरवले तर ही परिस्थिती हळूहळू सुधारू शकेल, असा आशावाद त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला होता. या गोष्टीला आज बावीस वर्षं उलटून गेली, पण मराठीची स्थिती काही सुधारत नाही, उलट ती इतकी बिघडत चालली आहे की आता तिच्या डोक्यावर काटेरी मुकुट आणि अंगावर इंग्रजी ‘फॅशन’चे कपडे आलेत, असं म्हणावंसं वाटतं. एवढेच काय आता आपण जी मराठी भाषा वापरतो ना, तिचे मराठी हे नाव बदलून आपण तिला इंग्रजाळून टाकलं आहे. तुम्ही जरा कान देऊन ऐका, डोळे उघडे ठेवून वाचा आणि स्वतःचंच बोलणं पुन्हा एकदा तपासा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी काय म्हणते ते. हवा, पाणी प्रदूषण यांबद्दल आपण हल्ली जागरूक राहतो; पण आपली मातृभाषा किती प्रचंड प्रमाणात प्रदूषित झाली आहे, याचं मात्र आपल्याला भान नसतं.
चला एक फेरफटका मारूया बंटीच्या घरी. ही बंटीची ‘मम्मी’, तीच आपल्याला ‘इन्फर्मेशन’ देईल.
“गुड मॉर्निंग, मिसेस जोशी.”
“गुड मॉर्निंग, वेलकम्. या, बसा इथे सोफ्यावर बसा.”
“तुमचा ‘फ्लॅट’ पाहायचा होता.”
सटिका।
ल शिळा ।।
छात्र प्रबोधन
“चला दाखवते ना ! हा आमचा ‘ओनरशिप फ्लॅट’ आहे. ‘टू बी. एच्. के’ चा. हा ‘हॉल’, हे ‘किचन’, ही ‘बाथरूम’, ही ‘बेडरूम’, ही मुलांसाठी छोटी ‘स्टडी कम प्ले रूम’. याला ‘अटॅच्ड टॉयलेट’ सुद्धा आहे. हे ‘टेरेस’. इथे आम्ही एक छोटं ‘गार्डन’ केलं आहे. इथं बसलं म्हणजे एकदम ‘प्लेझंट’ वाटतं. बंटीचा ‘बर्थ डे’ आम्ही इथेच ‘सेलिब्रेट’ केला. बंटीचे दहा-बारा ‘फ्रेंडस’, आमचे ‘रिलेटिव्हज्’ आणि ‘गेस्टस्’. जवळजवळ २५ एक लोकांची ‘पार्टी’ आम्ही मस्त ‘एंजॉय’ केली. आम्ही ‘रिसेंटली’ घराचं ‘रिनोव्हेशन’ केलं. ‘फ्लोअरिंग, कर्टन्स’ सगळं ‘चेंज’ केलं. बंटीच्या ‘रूम’ला ‘फॉल्स सिलिंग’ केलं, नवा ‘टी पॉय’, ‘टेबल लॅम्प’ घेतला. त्याची ‘बुक शेल्फ’ पण ‘कलर’ केली. आता कसा ‘फ्रेश लूक’ आला की नाही, त्याच्या ‘स्टडीला !’
हे सगळं ‘इमॅजिनरी कॉन्व्हर्सेशन’ नाही हं, अगदी खरं खरं, तुमच्या-माझ्या घरात आणि आसपास घडणारं! यातले महत्त्वाचे सगळे शब्द इंग्रजी आहेत, पण ते आपल्या इतके तोंडात बसलेत की ते इंग्रजी आहेत म्हणून आपल्याला अजिबात खटकत नाहीत.
खरं तर यातल्या बहुतेक शब्दांना मराठी प्रतिशब्द आहेत. स्वयंपाकघर, अभ्यासिका, स्नानगृह, बैठकीची खोली, दिवाण, मित्र, पाहुणे, वाढदिवस, गच्ची, नूतनीकरण, रंगकाम असे कितीतरी.
आजचा पेपर पाहिलात? आपण त्यातली ‘होम स्कीमची’ ही मोठी जाहिरात पाहूया.
“आनंद अनोख्या ‘अॅमिनिटीज’चा, शानदार ‘एन्ट्रन्स लॉबी’, ‘लॅण्डस्केप गार्डन’, मुलांसाठी ‘प्ले एरिया’, ‘किचनसाठी एल् पी. जी सिस्टिम’, ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’, ‘सिव्हेज ट्रिटमेंट प्लॅट’, ‘फायर फायरिंग सिस्टिम’, ‘ब्रॉड इंटर्नल रोडस्’, ‘इंटरकॉम व वायफाय’ – २७ शब्दांच्या या यादीत मराठी शब्द आहेत फक्त ४, आणि ही आपली मराठी वृत्तपत्रातली जाहिरात आहे बरं का ! आणि हीच का, बहुतेक सगळ्याच जाहिराती अशा इंग्रजाळलेल्या आहेत. ‘गोल्ड एक्स्चेंज ऑफर’,
‘हॉट डील्स’, ‘ऑर्डर बुक’ करा, ‘स्टेज परफॉर्मन्स’ ची संधी’ आकर्षक ‘कॅश कोर्सेस’, ‘गेस्ट लेक्चर्स’, आम्ही ‘डायरेक्ट सेल्स असोसिएट’ च्या शोधात आहोत इ. इ.
बापरे, हा मारा आमच्या कधी अंगावर येत नाही का? भात खाताना तांदूळ कमी आणि खडे जास्त अशी ही स्थिती ! पण जाहिरातच का, युवकांसाठी म्हणून असलेल्या ‘स्पेशल सप्लीमेंट’ची चव तर चाखा. मग ते ‘टु डे’ असेल ‘टाईम्स’ असेल, ‘युथ ट्यूब’ नाहीतर ‘प्रिमियर…’ आमची शीर्षकांची भाषासुद्धा सगळी एकच इंग्रजी !
‘हॉटेस्ट व्हेजिटेरियन, ‘हिंदी इज रॉकिंग’, ‘शॉपिंग व्हायरस’, ‘ऑल इज वेल अॅट हॉटेल इंडस्ट्री’, ‘इंटरनॅशनल कल्ला’, ‘मुंबई ऑन रिल्स’, ‘अभिनयात एंट्री’पूर्वी ‘अॅडमिशन प्रोसेस टान्स्परंट आहे का?’ ‘कॅम्पसवरील अॅक्टिव्हिटीजची माहिती पाठवून कनेक्ट व्हा.’
काय म्हणालात? यातल्या कित्येक शब्दांना मराठी शब्द नाहीत. नाही, असं सहसा होत नाही. यांत्रिक आणि तांत्रिक गुंतागुंतीच्या बाबतीत कदाचित ते खरं असेल, पण आपल्या रोजच्या जीवनातील आणि जेवणातीलसुद्धा शब्द आपण ठरवलं तर कटाक्षानं मराठीत वापरू शकतो. पण काय आहे, आपण मराठी लोक भाषेच्या बाबतीत खूप बेफिकीर आहोत, आपल्याला आपल्या भाषेबद्दल खरं तर प्रेमच वाटत नाही.
इंग्रजीला प्रतिशब्द शोधण्याचा आपल्याला आळस आहे. इंग्रजी शब्द पेरत पेरत मराठी बोलणं यात काही कमीपणा आहे, असं पुष्कळ लोकांना वाटतंच नाही. कोलकता आणि चेन्नई ही भारतातील दोन मोठी शहरं आहेत, पण तिथले बहुतेक व्यवहार बंगाली आणि तमिळमध्ये चालतात. मुंबईत मात्र इंग्रजीशिवाय तुमचे पान हलत नाही. दोन तमिळ माणसं भारताबाहेर परदेशात एकमेकांना भेटली की तमिळमध्ये बोलतात; पण दोन मराठी माणसं मात्र इंग्रजीत बोलतात, आहे की नाही गंमत !
आज विशेषतः शहरांतून, शाळा
महाविद्यालयांतून, कचेऱ्या, दुकानं, बाजार इथे जे मराठी बोललं जातं, त्यात ९० टक्के शब्द इंग्रजी आहेत, असं एक सर्वेक्षण आहे. दूरदर्शनच्या अनेक मराठी वाहिन्यांवरून तर यापेक्षा अधिक भेसळयुक्त मराठी वापरलं जातं. ‘या नंतर घेऊया एक छोटासा ब्रेक’, ‘छान झाला परफॉर्मन्स’, ‘मोबाईल धारकांनी व्होट करण्यासाठी ‘कॉल’ करा’, खरं तर या सगळ्या शब्दांना मराठीत छान पर्याय उपलब्ध आहेत, पण आपण त्या दृष्टीनं विचारच करत नाही. आपल्याला वाटतं काय हरकत आहे इंग्रजी शब्द वापरले तर? हरकत नाही, पण त्यामुळे आपल्या भाषेतले कितीतरी शब्द आपण विसरून चाललो आहोत. आपण आता पटकन आंटी म्हणतो, पण मराठीत मावशी, काकू, आत्या असे कितीतरी वेगवेगळे शब्द आहेत; इंग्रजीत या सर्वच जणी ‘आंटी ! अंकल, नेफ्यू’ या शब्दांनासुद्धा
मराठीत नात्याची वीण दाखवणारे वेगवेगळे शब्द आहेत. बघा, तुम्हाला आठवतात का? असं म्हणतात की भाषा ही नदीच्या प्रवाहासारखी असते. नदीला छोटे-छोटे दुसरे प्रवाह, ओढे, झरे येऊन मिळतात. आणि मग नदीचं पात्र अधिकाधिक विशाल होऊ लागतं. भाषेचंसुद्धा तसंच आहे. अनेक भाषांमधले शब्द आपल्या भाषेत येतात आणि संपन्न होते.
आपली भाषा मराठी प्राकृत भाषा आहे, पण सुरुवातीच्या काळात ती फार संस्कृतप्रचूर म्हणून अवघड होती. ज्ञानेश्वरांनी हा प्रभाव दूर करण्यासाठी आणि सर्वसामान्यांना समजावी म्हणून ज्ञानेश्वरी प्राकृत भाषेत लिहिली. एकनाथ, तुकाराम, नामदेव, रामदास यांनी मराठीत ग्रंथरचना करून मराठीला समृद्ध केलं. पुढे मुसलमानी अमलाखाली अनेक उर्दू, फारसी
शब्द मराठीत घुसले. शिवाजी महाराजांना त्याकाळीसुद्धा या परकीय शब्दांनी आपली भाषा ‘बुजबुजाटलेली’ आहे, असं वाटलं आणि त्यांनी स्वभाषेच्या अधिक वापरासाठी ‘राजव्यवहार कोश’ बनवून घेतला. पण मुस्लिम आमदानी अनेक वर्ष टिकल्याने आपल्या भाषेत आजही हे परकी शब्द टिकून राहिले आणि आपलेच झाले. दुकान, शिपाई, सैनिक, हजर, ईमानदार हे शब्द आपले नाहीत, असं म्हटलं तर पटेल कोणाला? इंग्रजांनी १५० वर्ष आपल्यावर राज्य केलं. इंग्रजीतून शाळा – महाविद्यालयात शिक्षण सुरू झालं. शासकीय व्यवहार, न्याय, वैदयकीय, तांत्रिक प्रगती यामध्ये इंग्रजीतून व्यवहार सुरू झाले आणि हळूहळू ते आपल्यामध्ये रुजायला लागले. ‘इंग्रजी भाषा शिकणं म्हणजे वाघिणीचं दूध काढणं आहे’, असा इंग्रजीचा अभिमान त्या काळातले मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ज्यांना म्हटलं जातं त्या विष्णूशास्त्री चिपळूणकरांनीही व्यक्त केला. इंग्रजी राजवटीबरोबर इंग्रजी भाषा, इंग्रजी संस्कृती, इंग्रजी पेहराव यांचंही आक्रमण आपल्यावर होऊ लागलं आणि पाहता पाहता आज स्वराज्य मिळून ६४ वर्ष झाली, तरी इंग्रजीचा विळखा वाढतच गेला आणि आता तर आपली मायमराठी जगते की नाही अशीच भीती मराठी भाषकांना वाटू लागली आहे.
आपली इंग्रजी भाषेशी दुष्मनी आहे का? नाही, अजिबात नाही. ती भाषा अतिशय संपन्न आहे. ती ज्ञानभाषा आहे. जगातल्या अद्ययावत ज्ञानाची खिडकी आपल्याला इंग्रजीमुळे खुली होते; त्यामुळे उत्तम इंग्रजी तर यायलाच पाहिजे. चांगलं इंग्रजी लिहिता येणं, बोलता येणं, वाचता येणं, बोललेलं समजणं ही चार भाषाकौशल्ये तर शालेय जगतातच बायला हवीत. पण इंग्रजी लिहिताना किंवा बोलताना आपण त्यात मराठी शब्द वापरतो का? छे, ‘सरां’ना तर बिलकूल चालणार नाही. बाहेरसुद्धा असे मराठी शब्द वापरून इंग्रजी बोलायला लागलो तर लोक आपल्याला हसतील. मग हाच नियम मराठीला का नाही लावायचा? मराठी बोलतानाही शक्यतो इंग्रजी शब्द वापरायचे नाहीत.
मी म्हटलं शक्यतो, कारण १०० टक्के शुद्ध मराठी आता आपल्याला वापरताच येणार नाही. बघा, उठल्यावर एक तास हा प्रयोग करून बघा… पेस्ट, ब्रश, शर्ट, पॅन्ट, टेबल, सायकल, स्कूटर, फूटपाथ, झेब्रा क्रासिंग, सिग्नल, बस, रेडिओ, टी. व्ही., कॅमेरा, पेन अक्षरशः हजारो शब्द आता ‘इंग्रजी’ राहिलेच नाहीत. आपण त्यांना कित्येक वर्षे मराठीच्या घरात घेतलं आहे, त्यामुळे ते पाहुणे आता घरचेच झालेत. संगणक आणि विज्ञान शिकतानाही इंग्रजी शब्द अनेकदा सोपे वाटतात आणि पुष्कळदा मराठी प्रतिशब्द नसतातही. पण विज्ञान, अभियांत्रिकी, न्याय, कायदा, वैदधक, शासन व्यवहार यामध्ये जास्तीतजास्त मराठी भाषा वापरता यावी, म्हणून अनेक नवीन मराठी शब्द तयार करून त्यांची परिभाषा तयार करण्यात येते आहे. मात्र, त्यांच्याशी गट्टी करून आपण ते शब्द वापरायला हवेत.
‘छात्र प्रबोधन’चे शेवटचे पान नीट पाहिले तर ‘ई-मेल’ हा इंग्रजी शब्द वापरला आहे, कारण त्याला अजून चांगला मराठी पर्याय उपलब्ध नाही. पण त्याच्यापुढे ‘संकेत स्थळ’ असा छान मराठी शब्द ‘वेबसाईट’ शब्दासाठी वापरला आहे. म्हणजे जिथे मराठी शब्द उपलब्ध आहेत, तिथे जाणीवपूर्वक संपादकांनी त्यांचा वापर केला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर जसे क्रान्तिकारक होते, उत्तम कवी – साहित्यिक होते, तितकेच जाज्वल्य मराठी भाषाभिमानी होते. ‘आपला शब्द सोडून परकी शब्द वापरणे’ हा त्यांना गुन्हाच वाटे. ज्या वस्तूच आपल्याकडे पूर्वी नव्हत्या, त्यांच्यासाठी इंग्रजी शब्द वापरायला त्यांची हरकत नव्हती. पण नुसती टीका करून सावरकर थांबले नाहीत. त्यांनी दीडशे नवीन मराठी शब्द निर्माण करून मातृभाषेचे पांग फेडले. त्यावेळी त्यांनी तयार केलेले शब्द आज आपण सर्रास वापरतो. चित्रपट, बोलपट, पटकथा, दिग्दर्शक, मध्यंतर, ध्वनिमुद्रिका, परिपत्रक, विसर्जन, प्रचारसभा, प्राचार्य, मुख्याध्यापक, प्रबोधन, क्रीडांगण, दूरध्वनी, कार्यालय, सचिवालय, नगरपालिका, सेवानिवृत्त इ. त्यांनी निर्मिलेले हे शब्द आज आपल्याला अवघड वाटत नाहीत. ते संस्कृतप्रचूर नाहीत आणि वापरायला सोपे आहेत. आज फोन आणि मोबाईलसाठी चलभाष आणि भ्रमणभाष असे शब्द उपलब्ध आहेत, पण ते आपण आवर्जून वापरले तरच ते रूढ होतील. त्यासाठी आपण जाणीवपूर्वक आपली आणि इतरांची भाषा
तपासली पाहिजे.
‘मराठी असे आमुचि मायबोली। जरी आज ती राजभाषा नसे ।।’
अशी खंत पारतंत्र्यात कवी माधव ज्युलियन यांनी व्यक्त केली होती, आज ती नावापुरती राजभाषा आहे, पण लोकभाषा मात्र राहील की नाही हा प्रश्न आहे. गंमत म्हणून तरी एक गोष्ट आपल्याला करून बघता येईल. सही मराठीत करायची, घरचा पत्ता मराठीत लिहायचा, नाती मराठीत सांभाळायची, औषधोपचार मराठीत घ्यायचे आणि मराठीतच खायचं- प्यायचं ! हे एकदा करून बघाच, तुम्हालाही गंमत वाटेल आणि हळूहळू ते तुमच्या अंगवळणी पडेल.
पण त्यासाठी मराठीवर प्रेम हवं. मराठी मासिकं, पुस्तकं वाचायला हवीत. जमलं तर मराठी कथा- कवितांचा हिंदी, इंग्रजी भाषेत अनुवाद करायला हवा. जसं आपण आपल्या आईवर, देशावर प्रेम करतो, तसं आपल्या भाषेवर केलं, तर बघा, आपली भाषा आपल्याला किती भरभरून संपन्नता देईल !
‘एक तास मराठीचा’ तुम्ही कधी मित्रमैत्रिणींत, घरी-दारी अनुभवलायत? म्हणजे सोप्पं आहे. तासभर फक्त मराठीतूनच बोलायचं. चालेल? जमेल? तेवढी तुमची मराठी ‘पॉवरफुल’ आहे? पण अशा खेळांमधूच तर हळूहळू आपली मराठी भाषा अधिक नेमकी, दर्जेदार होत जाणार आहे; टिकणार आहे. मग करणार ना सुरुवात ‘एक तास मराठीला’?
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.