आम्ही धर्मान्तर का करू इच्छितो
धर्मान्तर किती महत्त्वाचं आणि संवेदनशील विषय आहे हे अद्वितीय विचार आहे. आपल्या समाजात धर्मान्तर करणे, त्याचे कारणे आणि प्रभाव एक विचारमय आणि आलोचनीपूर्ण विषय आहे. बाबासाहेब अंबेडकर यांचं ह्या विषयावरचं भाषण हा अत्यंत महत्त्वाचं आणि तत्वज्ञानपूर्ण आहे. त्यांनी आपल्या भाषणात धर्मान्तर का करू इच्छितो याच्या मुख्य कारणांचं आणि त्याचे सामाजिक, आर्थिक, आणि मानसिक प्रभाव चित्रित केले आहेत. ह्या विचारमय भाषणात अंबेडकर यांनी समाजातील धर्मान्तर करण्याच्या गंभीरतेसह आणि विचारशीलतेसह दाखल केलं आहे. या विशेष ब्लॉगमध्ये, आपल्याला अंबेडकर यांचं भाषण अनुवादित केलं जाईल, ज्याचा सारांश विचारला जाईल आणि त्याच्या संदेशाची महत्त्वाची मार्गदर्शन केली जाईल.
संग्रह – (३१ मे १९३६ चे मुंबईतील भाषण)
सद्गृहस्थ बांधवांनो आणि भगिंनीनो,
ही परिषद मी केलेल्या धर्मांतराच्या घोषणेचा विचार करण्याकरिता मुद्दाम बोलावण्यात आलेली आहे. तुम्हास कळून चुकले आहेच. धर्मान्तराचा विषय हा माझ्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. इतकेच नव्हे तर तुमचे पुढील सर्व भवितव्य माझ्या दृष्टीने त्यांच्यावर अवलंबून असल्या कारणाने तो विषय मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. हे महत्त्व तुम्हा सर्वांना पटले आहे असे म्हणण्यास हरकत वाटत नाही. असे नसते तर आज एवढ्या मोठ्या समुदायाने तुम्ही येथे जमला नसता. आणि म्हणून तुम्ही सर्वजण जे या ठिकाणी जमला आहात हे पाहून मला अतिशय आनंद वाटतो.
[ Why do we want to Convert Religion? Speech By B. R. Ambedkar ]
धर्मान्तराची घोषणा केल्यापासून अनेक ठिकाणी लहान-मोठ्या प्रमाणावर सभा भरवून आपल्या लोकांनी या विषयावरील आपली मते व्यक्त केलेली सर्वांच्या कानी आलेली आहे. परंतु सर्वांनी एके ठिकाणी जमून विचारविनिदमय करून धर्मान्तराच्या प्रश्नाची निर्णयात्मक चर्चा करण्याची संधी आजपावेतो आपल्याला प्राप्त झालेली नव्हती. तशा संधीची तुमच्यापेक्षा मला अत्यंत जरूरी होती. धर्मान्ताराची माहीम सफल होण्याकरिता पूर्वतयारीची फारच आवश्यकता आहे. ही गोष्ट तुम्हा सर्वांनाच कबूल करावी लागेल. धर्मान्तर हा पोरखेळ नव्हे, धर्मान्तर मौजेचे विषय नय्हे हा माणसाच्या जीविताच्या साफल्याचा प्रश्न आहे. जहारातून एका बंदराकडून दुसऱ्या बंदराला नेण्याकरिता नावाड्याला जेवढी पूर्वतयारी करावी लागते तेवढीच पूर्वतयारी धर्मान्तराकरिता करावी
लागणार आहे. त्याशिवा हा तीर सोडून पैलतीर गाठणे शक्य होणार नाही. परंतु नावेत किती उतारू येतात याचा अंदाज समजल्याखेरीज नावाडी सामानसुमान जमविण्यास प्रयत्नात लागत नाही त्याप्रमाणे माझीहीही स्थिती आहे. किती लोक धर्मान्तर करावयास तयार आहेत याचा कयास लागल्याशिवाय मला धर्मान्तराची पूर्वतयारी करण्याच्या उद्योगाला लागणे शक्य नाही. परंतु आपल्या लोकांची कोठेतरी परिषद झाल्याशिवाय लोकमताचा कयास घेण्याची संधी मला प्राप्त होणार नाही, असे जेव्हा मी मुंबईच्या कार्यकर्त्या लोकांस सांगितले तेव्हा त्यांनी खर्चाची अगर परिश्रमाची सबब पुढे न करता परिषद भरविण्याची जबाबदारी आपल्या अंगावर मोठ्या खुषीने घेतली. ती जबाबदारी पार पाडण्याकरता त्यांना किती कष्ट सोसावे लागले याची हकीकत आपले परमपुज्य पुढारी व स्वागत मंडळाचे अध्यक्ष राजमान्य राजश्री देवजी दगडूजी डोळेस यांनी आपल्या भाषणात सविस्तरपणे सांगितले आहे. इतक्या खस्ता खाऊन त्यांनी माझ्याकरिता हा जो सभेचा घाट घडवून आणला त्याकरिता मी परिषदेच्या स्वागत मंडळाचा अत्यंत ऋणी आहे.
नुसत्या महारांचीच परिषद का ? माझी धर्मान्तराची घोषणा जर अस्पृश्यांकरिता आहे तर सर्व अस्पृश्यांची सभा का बोलाविली नाही? नुसत्या महारांचीच सभा का बोलविण्यात आली. असा आक्षेप काही लोक घेण्याचा संभव आहे. ज्या प्रश्नांची चर्चा करण्याकरिता ही सभा बोलविण्यात आली आहे त्या प्रश्नांचा खल करण्यापूर्वी या आक्षेपाला उत्तर देणे मला आवश्यक वाटते. महाराचांचीच सभा का बोलाविली, व सर्व अस्पृश्यांची सभा का बोलाविली नाही, याला अनेक कारणे आहेत. पहिले कारण असे की या परिषदेत कसल्याही प्रकारच्या मागण्या मागावयाच्या नाहीत किंवा हिंदु लोकांपासून काही सामाजिक हक्क मागावयाचे नाहीत. आपल्या जीविताचे काय करावयाचे, आपल्या आयुष्यक्रमाची रुपरेखा कशी ठरवायची, एवढाच प्रश्न या परिषदेपुढे आहे. तो प्रश्न ज्या जातीने स्वतंत्र विचार करून सोडविणे बरे. ज्या कारणांकरिता सर्व अस्पृश्य लोकांची सभा एकत्रित
करण्याची मला आवश्यकता वाटली नाही त्यापैकी हे एक कारण आहे. नुसत्या महारांची परिषद भरविष्याचे दुसरेही एक कारण आहे. धर्मान्तराची घोषणा केलेपासून आज जवळजवळ दहा महिन्यांचा अवधी लोटलेलाच आहे. या आधीत लोकजागृतीचे काम पुष्कळसे झाले आहे. आता लोकमत अजमाविण्याची वेळ आली आहे. असे मला वाटते. हे एक साधे आणि सोपे साधन आहे अशी माझी समजूत आहे तो प्रयत्न करण्यापूर्वी खरे लोकमत काय आहे याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणि माझी अशी समजूत आहे, की जाती जातीची सभा करून अजमाविलेल्या लोकमताबद्दल जशी खात्री देता येईल तशी सर्वसाधारण अस्पृश्यांची सभा भरवून अजमाविलेल्या लोकमताबद्दल देता येणार नाही. कारण सर्व अस्पृश्यांची परिषद असे नाव देऊन जरी सभा बोलविली तरी ती सर्व अस्पृश्यांची प्रतिनिधीक स्वरूपाची सभा होऊ नये व लोकमताची खात्री करून घेता यावी म्हणूनच नुसत्या महार लोकांची सभा भरविण्यात आलेली आहे. या सभेत इतर जातींचा समावेश न केल्यामुळे त्यांचे काही नुकसान होऊ शकत नाही. त्यांना धर्मान्तर करावयाचे नसेल तर त्यांचा या सभेत समावेश न केल्यामुळे यांना वाईट वाटण्याचे काही कारण नाही. त्यांना धर्मान्तर करावयाचे असेल तर या सभेत त्यांचा समावेश करण्यात आला नव्हता म्हणून त्यांना धर्मान्तरास कसलीही आडकाठी येऊ शकणार नाही अशी महार लोकांची सभा भरविण्यात आलेली आहे, तशीच अस्पृश्यातील इतर जातींनी आपापल्या जातीच्या सभा भरवून या विषयासंबंधाने आपले लोकमत व्यक्त करण्याची संधी मोकळी आहे. तशा सभा त्यांनी कराव्या अशी मी त्यांना सुतना करतो व त्या कामी त्यांना माझ्याकडून जी मदत होण्यासारखी असेल ती मी अवश्यक करीन. येथवर झाली ती केवळ प्रस्तावना झाली. आता मी
आजच्या सभेच्या मुख्य विषयाकडे वळतो. धर्मान्तराचा विषय जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो गहनही आहे. साध्या माणसाच्या बुद्धीला त्याचे आकलण होणे कठीण आहे. तसेच साध्या माणसाला धर्मान्तरासारख्या विषयाची समजूत करून देणे हे
काम काही सोपे दिसत नाही. तथापि तुम्हा सर्वांची समजूत पटल्याशिवाय धर्मान्तर कृतीत उतरविणे कठीण आहे याची जाणीव मला पूर्णपणे आहे. आणि म्हणून जितक्या सुलभ रीतीने या विषयाची मांडणी मला करता येईल तितक्या सुलभ रीतीने मी ती करणार आहे.
धर्मान्तराची ऐहिक कारणे :
धर्मान्तराच्या विषयावर दोन दृष्टीने विचार केला पाहिजे. सामाजिक दृष्टीने विचार केला पाहिजे. धार्मिक दृष्टीनेही विचार केला पाहिजे. तसाच तात्त्विकदृष्ट्याही विचार केला पाहिजे. परंतु कोणत्याही दृष्टीने धर्मांतराचा विचार करू लागलो तरी प्रथमतः अस्पृश्यता ही काय बाबा आहे. तिचे खरे स्वरूप काय, याचा पुरता समज करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय माझ्या धर्मान्तराच्या घोषणेचा अर्थ तुम्हाला कळणे शक्य होणार नाही. अस्पृश्यता ही काय बाबा आहे व तिचे खरे स्वरूप काय आहे याचा तुम्हास समज व्हावा म्हणून प्रथमतः तुमच्यावर होत असलेल्या कहाणीची तुम्हाला आठवण करून देणे आवश्यक वाटते. सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे, विहिरीवर पाणी भरण्याचा हक्क सांगितल्यामुळे, वरास घोड्यावर नेण्याचा हक्क सांगितल्यामुळे, स्पृश्य हिंदूंनी मारहाण केल्याची उदाहरणे नेहमीच घडत असल्या कारणाने ती सर्वांच्या डोळ्यांपुढे नेहमी असतात. परंतु मारहाण करण्याची दुसरी तशी अनेक कारणे आहेत की, ज्यांचा उल्लेख केला असता हिंदुस्थानच्या बाहेरील लोकांना तरी त्याचा विस्मय वाटेल. उंची पोषाख घातल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल. पाणी आणण्याकरिता ताब्या पितळेची भांडी वापरल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल. जमीन खरेदी केल्यामुळे जाळपोळ केल्याचे उदारण देता येईल. जानवे घातल्यामुळे मारहाण केल्याचे उदारण देता येईल. मेलेली गुरे न ओढल्यामुळे व मेलेल्या गुरांचे मांस न खाल्ल्यामुळे मारहाण केल्याचे उदारण देता येईल. पायात बुट व मोजे घालून गावातून गेल्यामुळे, भेटलेल्या स्पृश्य हिंदुस जोहार न घातल्यामुळे, शौचास जाताना तांब्यात पाणी नेल्यामुळे छळ झाल्याचे उदाहरण देता येईल. व
पंचाचच्या पंगतीत चपाती वाढल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण नुकतेच घडले आहे. वरील प्रकारचे जोर जुलूम झाल्याची व तुम्हाला अमानुष तहेने वागविल्याची अनेक प्रकरणे तुमच्या ऐकवात असतील व तुमच्यापैकी काहींना तर त्याचा प्रत्यक्ष अनुभवही असेल. मारहाण करता येण्यासारखे नसले तेथे बहिष्काराच्या शास्त्राचा तुमच्याविरुद्ध कसा उपयोग करण्यात येतो हेही तुम्हास अवगत आहेच. मोलमजुरी मिळू द्यायची नाही रानातून गुरांना जाऊ द्यायचे नाही. माणसांना गावात येऊ द्यावयाचे नाही, वगैरे सर्व प्रकारची बंदी करून स्पृश्य लोकांनी तुमच्या लोकांस जेरीस आणल्याची आठवण तुम्हापैकी पुष्कळांना असेल. परंतु हे असे का घडते, याच्या मुळाशी काय आहे, ही गोष्ट माझ्या मते तुमच्यापैकी फारच थोड्यांना कळत असेल. ती समजून घेणे माझ्या मते अत्यंत आवश्यक आहे.
ही वर्गकलहाची बाब आहे :
वर जी कलहाची उदाहरणे दिली आहेत. तिच्याशी व्यक्तीच्या गुणावगुणाचा काही संबंध नाही. दोघा खटनटातील तो कलह नव्हे, अस्पृश्यतेचा प्रश्न हा वर्गकलहाचा प्रश्न आहे. स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन समाजातील तो कलह आहे. एका माणसावर होत असलेल्या आगळीकीचा हा प्रश्न नव्हे. एका माणसावर होत असलेल्या अन्यायाचा हा प्रश्न आहे. एका वर्गाने दुसऱ्या वग चालविलेल्या अन्यायाचा हा प्रश्न आहे. हा वर्गकलह सामाजिक दर्जासंबंधीचा कलह आहे. एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी वागताना आपले वर्तन कसे ठेवावे या संबंधाचा हा कलह आहे. या कलहाची जी वर उदाहरणे दिली आहेत त्यावरून जी एक बाब उघडपणे सिद्ध होत आहे ती ही की तुम्ही वरच्या वर्गाशी वागताना बरोबरीच्या नात्याने वागण्याचा आग्रह धरता म्हणून हा कलह उपस्थित होतो. तसे जर नसते तर चपातीचे जेवण घातल्यामुळे, जानवी घातल्यामुळे, तांब्या-पितळेच्या भांड्यात पाणी आणल्यामुळे, घोड्यावरून वरात नेल्यामुळे तो वरच्या वर्गाचे कोणाचे नुकसान करीत नाही. आपल्याच पदराला खार लावतो. असे असता वरच्या वर्गाला त्याच्या करणीचा रोष का वाटावा? या रोषाचे कारण एकच
आहे व ते हेच की अशी समतेची वागणूक त्यांच्या मानहानीला कारणीभूत होते. तुम्ही खालचे आहात, अपवित्र आहात, खालच्या पायरीनेच तुम्ही राहिलेत तर ते तुम्हाला सुखाने राहू देतील. पायरी सोडली तर कलहाला सुरूवात होते. ही गोष्ट निर्विवाद आहे.हान
वरील उदाहरणांवरून आणखी एक गोष्ट सिद्ध होते ती ही की अस्पृश्यता ही नैमित्तिक नसून नित्याची आहे. हीच गोष्ट स्पष्ट भाषेत सांगवयाची म्हणजे हा स्पृश्य अस्पृश्यता या मधील कलह नित्याचा आहे व तो त्रिकालाबाधीत असा राहणार आहे. कारण ज्या धर्मामुळे तुम्हाला खालची पायरी देण्यात आलेली आहे तो धर्म वरच्या वर्गाच्या म्हणण्याप्रमाणे सनातन आहे. त्यांच्यात कोणत्याही प्रकारच्या कलमाननुसार फेरबदल होऊ शकत नाही. तुम्ही आज जसे खालचे आहात तसेच तुम्ही नेहमी खालेचे राहिले पाहिजे. याचाच अर्थ असा की स्पृश्य व अस्पृश्य यांच्यामधील हा कहल कायमचा राहणार आहे. या कलहातून तुमचा निभाव कसा लागणार हा मुख्य प्रश्न आहे व त्या प्रश्नांचा विचार केल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. असे माझे मत आहे. तुमच्यापैकी ज्यांना हिंदूलोक वागवतील त्याप्रमाणे वागायचे असेल त्यांचा सेवा धर्म पत्करून जगावयाचे असेल त्या लोकांना या प्रश्नाचा विचार करण्याचे काहीच प्रयोजन नाही. परंतु ज्यांना स्वाभिमानाचे जिणे आवश्यक वाटते, ज्यांना समत्त्वाचे जिणे आवश्यक वाटते त्यांना ह्या प्रश्नांचा विचार केल्याखेरीज गत्यंतर नाही. कोणत्या त-हेने या कलहात आपला बचाव कसा होईल? या प्रश्नाचे निर्णय करणे मला तरी मोठेसे कठीण वाटत नाही. येथे जमलेल्या तुम्हा सर्वा लोकांना एक गोष्ट कबूल करावी लागेल व ती ही की कोणत्याही कलहात ज्याच्या हाती सामर्थ्य असते त्यांच्याच हाती जय असतो. ज्याला सामर्थ्य नाही त्यांनी यशाची आशा बाळगावयास नको ही गोष्ट सर्वांच्या अनुभवाने सिद्ध झालेली आहे. तिच्या समर्थनार्थ पुरावा देण्याचे कारण नाही.
प्रथम समार्थ्य मिळवा : याच्या पुढील प्रश्न जो तुम्ही विचारत घेणे आवश्यक आहे तो हा की या कलहातून सुटका करून घेण्यास तुमच्या पदरी पुरेसे सामर्थ्य आहे
का? मनुष्यमात्राला तीन प्रकारचे सामर्थ्य अवगत असते. एक मनुष्यबल दुसरे द्रव्यबल आणि तिसरे मानसिक बल. या बलांपैकी कोणते बल तुम्हाला उपलब्ध आहे, असे तुम्हाला वाटते? मनुष्यबलाच्या दृष्टीने तुम्ही अल्पसंख्यांक आहात. ही गोष्ट तर उघडच आहे. मुंबई इलाख्यात अस्पृश्य वर्गाची लोकसंख्या एक अष्टमांश एवढीच आहे. तीही संघटित नाही. आपसातील जातीभेदामुळे तिच्या संघशक्तीचा पूर्ण अभाव आहे. संघटीत नाही, ती नाहीच पण एकत्रितही नाही. ती खेडोपाडी विखुरली गेलेली आहे, अशा कारणामुळे असलेल्या अल्पस्वल्प संख्येचादेखील प्रसंगग्रस्त झालेल्या अस्पृश्य वर्गाच्या वस्तीत कोणत्याही प्रकारचा उपयोग होऊ शखत नाही. द्रव्यबलाच्या दृष्टीने पाहिले तर तुमची तीच गत आहे. तुमच्याजवळ थोडे बहुत मनुष्यबल आहे, असे म्हटले असता चालेल, पण तुमच्याजवळ द्रव्यबल मुळीच नाही, ही गोष्ट निर्विवाद आहे. तुम्हाला व्यापार नाही, उद्दीम नाही. नोकरी नाही आणि शेतीही नाही. वरच्या वर्गाचे लोक जो घासतुकडा देतील त्यांच्यावर आज तुमची उपजीविका आहे, तुम्हाला अन्न नाही. तुम्हाला वस्त्र नाही. तुमच्याजवळ द्रव्यबल ते काय असणार ? अन्याय झाला तर कोर्टातून दाद मागण्याइतकी अवकाद आज तुमच्यात नाही. तुमच्यातील हजारो लोक कोर्टाचा खर्च सोसण्याची ऐपत नसल्यामुळे हिंदूकडून होणारा त्रास, विटंबना व जोर जुलूम मुकाट्याने सोशीत आहेत. मानसिक बलाची तर याहीपेक्षा अधिक उणीव आहे. शेकडो वर्षे त्यांनी केलेली विटंबना, छी-थू निमुटपणे सोसल्यामुळे उलट भोगवयाची सवय प्रतिकाराची हिंमत नाहीशी झाली आहे. तुमच्यातील आत्मविश्वास उत्साह व महत्त्वाकांक्षा यांचा बिमोड झाला आहे. तुमच्या सर्व लोक हताश, दीनवाणे व निस्तेज झालेले आहेत.
निराशेचे नामर्दुमकीचे वातावरण सर्वत्र पसरले आहे. आपण काही करू शकू अशा प्रकारचा विचारदेखील कोणाच्या ध्यानी मनी येऊ शकत नाही. तुमचाच छळ का होतो ?
वस्तुस्थितीचे मी हे केलेले वर्णन जर खरे असेल तर त्यापासून निघणारा सिद्धांत तुम्हा सर्वांना कबूल करावा लागेल. व तो हा की तुम्ही
तुमच्या सामर्थ्यावर अवलंबून राहाल तर तुम्हाला या जुलाचा प्रतिकार करता यावयाचा नाही. तुमच्याच सामर्त्य नसल्यामुळे तुमच्यावर जोर जुलूम होतो याबद्दल मला काडीचाही संशय नाही. या इलाख्यात तुम्हीच अल्पसंख्यात आहात. अशातला काही भाग. तुमच्याप्रमाणे मुसमानदेखील आहेत. ज्याप्रमाणे महारमागांची दोन चार घरे गावात असतात, त्याचप्रमाणे मुसमलनांचीही एक दोनच घरे गावात असतात, त्या मुसलमानांच्या वाटेस कोणीही जात नाही. परंतु तुमच्यावर मात्र सारखा जुलूम चाललेला असतो. कारण काय? दोन मुलसमानांची घरे असून त्याच्या वाटेला गाव जात नाही. तुमची दहा घरे असूनही गाव तुमचा छळ करतो. असे का होते? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याची खोज तुम्ही चांगल्या रीतीने केली पाहिजे. माझ्या मते या प्रश्नाचे एकच उत्तर देता येर्सल व ते हे की त्या दोन मुसलमानांच्या घरांच्यासाठी साऱ्या हिंदुस्थानातील मुलसमान समाजाची शक्ती व सामर्थ्य उभे आहे, याची जाणीव हिंदु लोकांना असल्यामुळे त्या दोन मुसलामन घराच्या वाटेस जाण्याची कोणाही हिंदूची सहसा छाती होत नाही. त्या त्या दोन घरांच्या वाटेलस गेले असताना पंजाबापासून थेट मद्रासपर्यंत मुसलमान समाज आपली शक्ती वचून त्यांचे सरंक्षण करील अशी खात्री असल्यामुळे ती दोन मुलसामानाची घरे निर्भयपणे आपला व्यवोर करीत असतात. तुमच्या बाबतीत हिंदु लोकांची खात्री असते की तुम्हाला कोणीही मदत करणार नाही व अधिकाऱ्यांची मदत होणार नाही. मामलेदार व पोलिस हे त्यांचेच असल्यामुळे स्पृश्य-अस्पृश्यांच्या वादात ते जातीला जागतात, कर्तव्याला जागत नाहीत याची त्यांना खात्री असते. त्या तुमच्या असहाय्य स्थितीमुळेच तुमच्याशी हिंदू लोक जुलमाची व अन्यायाची वागणूक करतात. येथवर मी जे विवेचन केले आहे त्यावरून दोन गोष्टी सिद्ध होत आहेत. त्यापैकी पहिली गोष्ट ही की सामर्थ्य असल्याशिवाय तुम्हाला हा जुलमाचा प्रतिकार करता येणे शक्य होणार नाही. दुसरी प्रतिकाराला आवश्यक असलेले सामर्थ्य आज तुमच्या पदरी नाही. या दोन गोष्टी सिद्ध झाल्याबरोबर तिसरी एक गोष्ट आपोआपच सिद्ध होते ती ही की है आवश्यक असलेले सामर्थ्य, तुम्हाला कोठून तरी बाहेरून मिळविले पाहिजे, हे सामर्थ्य तुम्हाला कसे मिळविता येईल, हाच खरोखरी महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचा तुम्ही निर्विकल्प मनाने विचार केला पाहिजे.
बाहेरून सामर्थ्य आणले पाहिजे
या देशातील जातिभेद व धर्मभेद यांचा लोकांच्या मनावर व नीतिमत्तेवर एक विलक्षण परिणाम घडून आलेला मला तरी दिसून येतो.
या देशात दुःख, दारिद्र्य आणि क्लेश यांच्याकरिता कोणालाही खेद वाटत नाही व वाटलाच तर त्याच्या निवारण्याकरिता कोणी प्रयत्न करीत नाही. आपल्या धर्मबांधावावर किंवा जातिबांधववांवर जर दुःखाचा, दारिद्र्याचा अथवा जुलमाचा प्रसंग ओढवला तर त्याच्या निवारण्याकरिता मात्र लोक साहाय्य करतात. ही नीतीमत्तेची दृष्टी कितीही विकृत असली तरी ती जारी आहे. कोणीही विसरून चालता कामा नये. ज्या गावामध्ये अशातला काही भाग नाही. अस्पृश्यावर होत असलेला जुलूम अन्याय होतो असे वाटत असूनही ते त्यांच्या सहाय्यास धावून जात नाहीत त्याचे कारण काय ? तुम्ही आम्हाला का मदत करीत नाही असा जर प्रश्न तुम्ही त्यांना केलात तर? तुमच्या वादात आम्हास पडण्याचे कारण काय ? तुम्ही आमच्या धर्माचे असतात तर आम्ही तुम्हाला सहाय्य केले असते असे उत्तर ते तुम्हाला देतील. यावरून एक गोष्ट तुमच्या ध्यानात येऊ शकेल की कोणत्याही अन्य समाजाचा ऋणानुबंध तुम्ही जोडल्याशिवाय, कोणत्याही अन्य धर्मात तुम्ही सामील झाल्याशिवारय तुम्हाला बाहेरचे सामर्थ्य मिळू शकत नाही. याचाच अर्थ स्पष्ट असा आहे की तुम्ही धर्मान्तर करून कोणत्यातरी अन्य समाजात अंतर्भूत झाले पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला त्या समााजचे समार्थ्य प्राप्त होऊ शकणार नाही. आणि जोपर्यंत तुमच्या पदरी सामर्त्य नाही तोपर्यंत तुम्हाला व तुमच्या भावी पिढीला आजच्या दीनवाण्या स्थितीमध्ये दिवस काढावे लागणार आहेत.
धर्मान्तराची आध्यात्मिक कारणे :
येथपर्यंत ऐहिक कल्याणाकरिता धर्मान्तराची कशी आवश्यकता काय आहे याचे दिग्दर्शन केले आहे. आता आध्यात्मिक कारणाकरिता
धर्मान्तराची कशी आवश्यकता आहे याविषयीचे माझे विचार तुमच्यासमोर मी मांडीत आहे. प्रथम धर्म कशाकरिता असतो ? त्याची आवश्यकता काय? हे जाणू घेतले पाहिजे. धर्माच्या अनेक व्याख्या अनेक लोकांनी केलेल्या तुम्हास सापडतील पण त्या सर्वामध्ये अर्थपूर्ण व सर्वांना पटविण्यासारखी अशी एकच व्याख्या आहे ‘ज्याने सर्व प्रजेचे धारण होते तोच धर्म’ हीच ती खरी धर्माची व्याख्या होय. ही धर्माची व्याख्या मी केलेली नही. ही व्याख्या सनातनी हिंदूचे अग्रगण्य लोकमान्य टिळक यांनीच दिलेली आहे. तेव्हा धर्माच्या व्याखेबद्दल मखलाशी केल्याचा आरोप माझ्यावर कोणी करू शकणार नाही. ही व्याख्या जरी मी केलेली नसली तरी मी ती वादाकरिता मान्य केलेली आहे. अशातला भाग नाही. मला ती कबूल आहे. समाजाच्या धारणेकरिता घातलेली बंधने म्हणजे धर्म, हीच माझी देखील धर्माची कल्पना आहे ही व्याख्या वास्तविकदृष्ट्या अथवा तार्किकदृष्ट्या योग्य अशी दिसली तरी समाजाच्या धारणेकरिता समाजाची बंधने कशी प्रकारची असावीत या प्रश्नाचा या व्याखेवरून काहीच बोध होऊ शकत नाही. अथवा उलगडाही होऊ शकत नाही. समाजाच्या योग्य धारणेकरिता समाजाची बंधने कशी असावी हा प्रश्न शिल्लक राहतोच. धर्माच्या व्याख्येपेक्षा धर्म महत्त्वाचा आह. कारण धर्म कोणता हे व्याखेवर अवलंबून नसून बंधनाच्या हेतूवर व स्वरुपावर अवलंबून आहे. ज्या बंधनांनी समाजातील सर्व प्रजेची धारणा होऊ शकते ती बंधने कशी असावी, म्हणजे खऱ्या धर्माचे स्वरूप कसे असावे, याचा विचार करततां समाज आणि व्यक्ती यांचा तात्त्विकदृष्ट्या संबंध काय व कसा असावा हा प्रश्न साहजिकपणे उद्भवतो. या प्रश्नासंबंधाने आधुसनक समाजशास्त्रवेत्यांची तीन प्रकारची मते प्रतिपादन केलेली आहेत. काहींच्या मते व्यक्तीमात्राला त्यांच्या अंगभूत गुणांचा व शक्तीचा विकास करता येऊन त्याला पूर्णावस्थेस पोचविण्यास मदत व्हावी हाच समाजसंटनेचा अंतिम हेतू असला पाहिजे व काहीच्या मते समाजसंघटनेचा मुख्य हेत व्यक्ती किंवा व्यक्तीचे सौख्य हा नसून आदर्शभूत समाज तयार करणे हाच होय. हिंदूधर्माची रचना वर्गाच्या कल्पनेवर केलेली आहे.
एकाने दुसऱ्याशी कसे वागावे यांची शिकवण हिंदुधर्मात नाही. एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी कसे वागावे याची बंधने हिंदुधर्मात आहेत. ज्या धर्मात व्यक्तीला प्राधान्य नाही तो धर्म मला स्वतःला मान्य नाही. व्यक्तीच्या जीवनाला समाजाची जरी आवश्यकता असली तरी समाजाची धारणा हे धर्माचे अंतिम ध्येय होऊ शकत नाही. व्यक्तीचा विकास हे धर्माचे ध्येय आहे असे मी समजतो. एक घटक असला तरी त्याचा आणि समाजाचा संबंध शरीर आणि अवयव, गाडा आणि त्याचे चाक याचा जसा संबंध आहे तसा नव्हे, असे मी समजतो.
समाज आणि व्यक्ती :
ज्या प्रमाणे थेंब समुद्राच्या पाण्यात टाकला असताना त्याचा लोप होतो तसा माणसाचा तो केवळ समाजात राहिला म्हणून त्याचा लोप होऊ शकत नाही. त्याचे जीवन स्वतंत्र असते. त्याचा जन्म समाजाच्या सेवेकरिता नसून आत्मोन्नती करिता आहे. ह्याच एकाच कारणामुळे सुधारलेल्या राष्ट्रात एका माणसाला दुसऱ्या माणसास आपला गुलाम करून ठेवता येत नाही. ज्या धर्मात व्यक्तीला प्राधान्य नाही तो धर्म मला मान्य होऊ शकत नाही. तसेच ज्या धर्मत एका वर्गाने विद्या शिकावी, दुसऱ्या वर्गाने शस्त्र धरावे तिसऱ्याने व्यापार करावा व चौथ्याने नुसती सेवा करावी असे आहे तो धर्म मला मान्य नाही. विद्या दरेकाला हवी, शास्त्राची दरेकाला जरूरी आहे. सर्वांना पाहिजे ही गोष्ट जो धर्म विसरतो व जो एकाला सज्ञान करण्याकरिता बाकीच्यांना अज्ञानात ठेवतारे तो धर्म नूसन लोकांना बौद्धिक गुलामगिरीत ठेवण्याचा कावा आहे. जो धर्म एकाच्या हाती शस्त्र देतो दुसऱ्याला निशस्त्र करतो. जो धर्म काहींना धनसंपादनाचा मार्ग मोकळा ठेवतो व बाकीच्यांना आपल्या जीविकेकरिता दुसऱ्यायवर अवलंबून राहण्याची अनुज्ञा देतो तो धर्म नसून ती स्वार्तपरायणता आहे. हिंदूधर्मातील चातुर्वर्ण्य हे असे आहे. त्याविषयी माझे मत काय आहे हे मी स्पष्टपणे मांडले आहे. हा हिंदुधर्म तुम्हाला हिताच आहे की काय याचा तुम्ही विचार करा. व्यक्तीच्या आत्मोन्नतील पोषक असे वातावरण उत्पन्न करणे ही धर्माची
मूलभूत कल्पना आहे. हे जर मान्य केले तर हिंदूधर्माने तमची आत्मोन्नती कधी ही होऊ शकणार नाही. व्यक्तीच्या विकासाला तीन गोष्टींची आवश्यकता आहे. सहानुभूती. समता आणि स्वातंत्र्य हिंदुधर्मात या तिन्हींपैकी एकतरी बाब तुमच्याकरिता उपलब्ध आहे असे तुम्हाला म्हणता येईल काय ?
हिंदूधर्मात तुम्हाला सहानुभूती आहे काय ?
सहानुभूतीच्या दृष्टीने पाहिले तर सर्वत्र शून्य आहे, असे म्हणावे लागेल. कोठेही तुम्ही गेलात तरी आपुलकीच्या भावनेने कोणीही पाहणार नाही. याचा अनुभव तुम्हाला चांगलाच आहे. आपुलकीही नाहीच नाही परंतु लोकांकडून तुम्हाला परक्यांपेक्षा परके लेखण्यात येते. एकाच गावात राहणारे स्पृश्य – अस्पृश्य यांचा परस्परं संबंध कसा असतो हे जर पाहू गेले तर शेजारी शेजारी राहणारे दोघे भाऊ असे कोणालाही म्हणता येणार नाही. छावणी दिलेले हे दोन परस्पर विरोधी सैन्याचे तळ आहेत असेच म्हणावे लागेल. जितके मुसलमान लोक हिंदूंना जवळचे वाटतात, त्यांच्याशी जेवढा त्यांचा स्नेहभाव असतो. त्यांच्या शताशानेदेखील तुमच्याशी हिंदूंचा नसतो. हिंदू-मुलसमान हे लोकल बोर्डात. कायदे कौन्सिलात, व्यापारात एकमेकांना सहाय्यभूत होऊन वागतात, पण तुमच्याशी तसे सहानुभूतीने हिंदू लोकांनी वागल्याचे एखादे तरी उदाहरण दाकवून देता येईल काय? उलटपक्षी त्यांचा तुमच्याविरुद्ध नेहमीचा कटाक्ष असतो. ही गोष्ट मात्र खरी आहे. हिंदूंच्या मनात तुमच्या विरुद्ध असलेल्या कटाक्षाचा परिणाम किती विघातक झाला ओ हे तुमच्यापैकी ज्या कोणाला दाद मागण्याकरिता कोर्टात जाण्याचा प्रसंग आलेला आहे तो आपल्या अनुभवाने सांगू शकेल. कोर्ट आपल्याला न्याय देईल. पोलिस आपल्याला मदत करील असा तुमच्यापैकी कोणा एकाला तरी विश्वास वाटतो का? व तो जर वाटत नाही तर तशी वृत्ती होण्यास काय कारण आहे? माझ्या मते अशा आत्मविश्वासाचे कारण एकच आहे व ते हेच की हिंदूलोकांमधे तुमच्याबद्दल कोणत्याही प्रकारची सहानुभूती नसल्याकारणाने ते आपल्या अधिकाराचा सदूपयोग करतील अशी आशा
तुम्हाला वाटत नाही. हे जर खरे आहे तर शत्रूत्वाने भरलेल्या या वातावरणात राहून तुमचा काय उपयोग होणार आहे?
हिंदू समाजात तुमच्याकरिता समता आहे काय ?
हा प्रश्न खरोखरीच विचारावास नको. अस्पृश्यता ही मुर्तिमंत असमानताच आहे. एवढी मोठी असामनतेची जागती ज्योत कोठेच दिसावयाची नाही. अस्पृश्यतेपेक्षा जास्त उग्र स्वरूपाची असमानता जगाच्या इतिहासात अन्यत्र सापडणार नाही. कमी अधिक भावामुळे एकाने दुसऱ्याच्या बरोबर भोजन नाकारणे अशा प्रकारचे असमानतेचे निदर्शन वर्तन आपणास पहावयास सापडते.
परंतु एका माणसाला दुसऱ्या माणसाने न शिवण्याइतका पतित लेखण्याची प्रथा हिंदूधर्माखेरीज आणि हिंदू समाजाखेरीज अन्यत्र कोठेतरी सापडेल काय? ज्याच्या स्पर्शाने पाणी बाटते, त्याच्या स्पर्शाने देव बाटतो तो प्राणी मानवाच्या कोटात गणाला गेला आहे असे कोणी तरी म्हणेल काय? अस्पृश्य माणसाकडे पहाण्याची दृष्टी रक्तपितीने भरलेल्या माणसाकडे पाहण्याची दृष्टी यात काय फरक आहे? रक्तपिती भरलेल्या माणसाबद्दल लोकांच्या मनात किळस जरी असली तरी त्याच्याबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती असते! परंतु तुमच्याबद्दल सहानुभूती तर नसतेच पण किळस मात्र असते. रक्तपिती भरलेल्या माणसापेक्षा देखील तुमची स्थिती हीन आहे. अजूनही खेडेगावात एखादा स्पृश्य माणूस उपास सोडीत असताना जर महाराचा शब्द त्याच्या कानावर पडला तर तो अन्न ग्रहण करीत नाही. एवढा कलंक तुमच्या शरीराला, एवढा कलंक तुमच्या शब्दाला आहे ! अस्पृश्यता हिंदूधर्मावरील कलंक आहे असे काही लोक म्हणत आहेत. पण त्याबाबतीत खरे म्हटले असता काही अर्थ नाही. हिंदूधर्म कलंकित आहे असे एकही हिंदू मानीत नाही. तुम्ही कलंकित आहात, अपवित्र आहात असे मात्र बहुजन समाज मानतो. ही दशा तुम्हाला का प्राप्त झाली? तुम्ही हिंदूधर्मात राहिल्यामुळे ही दशा तुम्हाला प्राप्त झाली आहे. असे मला वाटते. तुमच्यातील जे मुसलमान झाले त्यांना हिंदू अस्पृश्य मानीत नाहीत व असमान लेखीत नाहीत.
तुमच्यातील जे ख्रिस्ती झाले त्यांना हिंदू लोक अस्पृश्य मानीत नाहीत व असमान लेखीत नाहीत. नुकताच त्रावणकोर येथे घडलेला प्रकार विर्वीयचारात घेण्यासारखा आहे. तेथील तिया जातीतील अस्पृश्य लोकांस रस्त्यावरून चालण्याची मनाई आहे. परवाच त्यांच्यापैकी काहीजणांनी शीख धर्म वीकारला हे तुम्हास माहीत असेलच. अस्पृश्य असताना ज्या लोकास रस्त्यावरून चालता येत नव्हते त्याच लोकानी शीख धर्म स्वीकारल्याबरोबर त्यांच्यावरची बंदी उठवली गेली. या सर्व गोष्टींवरून एक गोष्ट सिद्ध होत आहे की तुमच्या अस्पृश्यतेला व तुमच्या असमानतेला जर काही कारण असेल तर ते तुमचा आणि हिंदूधर्माचा असलेला लागाबांधा हे होय.
या असमानतेच्या अन्यायात सातवन करण्याच्या हेतूने काही स्पृश्यलोक अस्पृश्यांना सांगतात की तुम्ही शिक्षण घ्या. म्हणजे तुम्हाला शिवू तुम्ही स्वच्छ रहा म्हणजे तुम्हाला शिवू आणि समानतेने वागवू ! खरे म्हटले असता अडाणी महाराची, दरिद्री महाराची आणि स्वच्छ राहणाऱ्या महाराची जी गत तीच गत शिकलेल्या महाराची, पैसेवाल्या महाराची आणि स्वच्छ राहाणाऱ्या महाराची होते. हे तुम्हा आम्हा सर्वांना अनुभवाने माहीत आहे. पण तो प्रश्न बाजूला ठेवला तरी जर शिक्षण घेतल्याशिवाय हाती पैसा असल्याशिवाय अंगावर पोशाख असल्याशिवाय, मान्यता मिळणार नाही तर सध्या महाराने काय करावे? ज्याला शिक्षण प्राप्त होऊ शकत नाही, ज्याला पैसा मिळू शकत नाही, आणि ज्याला नीटनेटका पोषाख करता येत नाही त्या महाराला समानता कशी मिळणार? ख्रिस्ती धर्मात, मुलसामनी धर्मात जी समानतेची शिकवण देण्यात आली आहे तिचा संबंध विद्या, पोषाख, पराक्रम अशा बाह्य वस्तूशी मुळीच नाही. माणसाचे मनुष्यत्व हीच महत्त्वाची गोष्ट आहे. असे दोन्ही धर्मात मानतात. व ते मनुष्यत्त्व सर्वांना आदरणीय असले पाहिजे, कोणी कोणाचा अपमान करू नये व कोणी कोणाला असमान मानू नये, असे ते धर्म शिकवतात. हिंदू धर्मात या शिकवणीचा पूर्ण अभाव आहे. ज्या धर्मात मनुष्यत्वाला व त्याच्या माणुसकीला काही किंमत नाही तो धर्म काय कामाचा? आणि त्याला कवटाळून धरून
राहण्यात काय हशील आहे? याला उत्तर म्हणून काही हिंदू लोक
उपनिषदाची साक्ष देतात व त्यात ईश्वर सर्वत्र भरला ओ, असे तत्त्व आहे म्हणून बढाई मिरवतात. विज्ञान आणि धर्म या दोन गोष्टी अगदी निरनिराळ्या आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याचा विचार केला पाहिजे. सर्वांभूती एक ईश्वर हा विज्ञानाचा सिद्धात आहे. धर्माचा तत्त्वाचा वागणुकीशी संबंध असतो, विज्ञानाचा असतो. सर्वांभूती एक ईश्वर ही धर्माची शिकवण नाही हे विज्ञानाचे तत्त्व आहे. ही गोष्ट हिंदू लोक त्याप्रमाणे वागत नाहीत ह्या माझ्या म्हणण्याचा पुरावाच आहे. उलटपक्षी हिंदूलोकांचा असा आग्रहच आहे की सर्वांभूती एक परमेश्वर आहे, ही गोष्ट तत्त्वज्ञानाचा सिद्धान्त नसून त्यांच्या धर्माचा पाया ओ, आणि म्हणून त्यांचा धर्म श्रेष्ठ आहे तर त्यांना एवढे उत्तर पुरे आहे की त्यांच्या इतके नीच लोक जगामध्ये दुसरे कोणीच नसतील ! मुखाने सर्वांभूती ईश्वर असा जप करणाऱ्या आणि कृतीने भूतमात्रांची विटंबान करणाऱ्या लोकांचा ‘मुखमे राम बगलमें छुरी’ बोलणे महानुभवाचे पण करणी कसाबाची अशा दुष्ट लोकातच समावेश करावा लागेल. सर्वांभूती ईश्वर मानणारे आणि कृतीने माणसाला पशुतुल्य लेखणारे दांभिक आहेत. यांचा संग करू नका !! मुंग्यांना साखर घालणारे व माणसांना पाण्यावाचून मारणारे लोक दांभिक आहेत त्याचा संग करू नका! त्यांच्या संगामुळे तुमच्यावर काय परिणाम झाला? खरे म्हटले असता हिंदू समाजातच तुम्हाला मान सन्मान नाही हे म्हणणे वस्तुस्थितीच्या मानाने अपुरे पडते. तुम्हाला हिंदू लोकच हलके मानातत असे नवय्हे, तर मुसलमान व ख्रिस्ती धर्मात श्रेष्ठ-कनिष्ठ, उच्च नीच असा भेदभाव जागृत करणारी शिकवण नाही असे असतानादेखील हे लोक तुम्हाला कमी लेखतात. त्याचे कारण काय ? ह्याचे कारण एकच हिंदू लोक तुम्हाला नीच लेखतात. अस्पृश्यांना जर आम्ही समान लेखले तर हिंदू लोक आपल्याला अस्पृश्यांच्या इतकेच खालचे लेकतील या भीतीमुळे मुसलमान व ख्रिस्ती लोक तुमच्याशी हिंदूप्रमाणे अस्पृश्यता पाळतात. आम्ही हिंदूसमाजातील हीन गणले गेलो आहोत; इतकेच नव्हे
तर हिंदूंच्या असमानतेच्या वर्तणुकीमुळे आम्ही सर्व हिंदुस्थान देशामध्ये सर्वांपेक्षा हीन गणले गेलो आहोत. ही अपमानकारक परिस्थिती टाळण्याकरिता हा कलंक धुवून काढण्याकरिता, नरदेहाचे चीज करण्याकरिता, जर कोणता एखादा उपाय असेल तर तो आहे व तो म्हणजे हिंदू धर्माचा, हिंदुसमाजाचा त्याग करणे हाच होय.
हिंदु धर्मात तुम्हाला स्वातंत्र्य आहे का ?
दरेक नागरिकाला जेवढे कायद्याने व्यावसाय स्वातंत्र्य आहे, तेवढे व्यवसाय स्वातंत्र्य तुम्हालाही आहे. दरेक नागरिकाला कायद्याने जितके व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तेवढे स्वातंत्र्य तुम्हालाही आहे असे काही लोक म्हणतील. परंतु या म्हणण्यात खरोखरी काही अर्थ आहे काय? याच खोल विचार तुम्ही करावयास पाहिजे. ज्याला ज्याला जन्मजात धंद्याशिवाय दुसरा कोणताही धंदा समाज करू देत नाही त्या माणसाला तुला व्यवसाय स्वातंत्र्य आहे असे सांगण्यात काय हशील आहे? ज्याला संपत्ती मिळविण्याचे कोणत्याही प्रकारचे द्वार खुले नाही त्याला तुझ्या संपत्तीला कोणीही हात लावू शकणार नाही, तुझी संपत्ती उपभोगण्यास तू स्वतंत्र आहे असे सांगणे म्हणजे त्याची थट्टा करणे आहे. कायद्याने पुष्कळ हक्क दिले असतील पण समाज त्यांचा उपयोग करू देईल तरच ते खरे हक्क आहेत, असे म्हणता येईल अस्पृश्यांनी चांगला पोशाख घालून हिंडावे, असा हक्क कायद्याने दिला आहे. पण हिंदू समाज तसे कपडे वापरू देत नाही तर त्या हक्काचा काय उपयोग अस्पृश्यांनी तांब्या पितळेच्या भांड्यात पाशणी आणावे असा हक्क कायद्याने दिला आहे पण हिंदुसमाज अस्पृश्यांना धातूची भांडी वापरू देत नाहीत. तर त्या हक्काचा काय उपयोग? अस्पृश्यांनी अपल्या घरावर कौले घालावी असा हक्क कायद्याने दिला आहे, पण हिंदुसमाज त्यास कौले घालू देत नाही तर त्या हक्काच काय उपयोग? अशी पुष्कळ उदाहरणे देता येतील. परंतु सारांश हा की समाज उपभोगू देईल तर आपला हक्क असे म्हणता येई ज्या रिकाला समाजाची आडकाठी आहे हरकत आहे. तो हक्क कायद्याने जरी दिला असला तरी त्याचा काही उपयोग नाही. अस्पृश्य लोकांना कायदेशीर
स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याची जास्त जरूरी आहे. सामाजिक स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तुम्हाला शारिरीक स्वातंत्र्य आहे असे काही लोक सांगतील. तुम्हाला कायद्याची मनाई नसेल तिकडे जाता येते, कायद्याची मनाई नसेल त्या प्रकारे बोलता येते हे खरे परंतु या स्वातंत्र्याचा काय उपयोग आहे? मनुष्यमात्राला जसे शरीर आहे आहे जितकी शारीरिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे तितकीच मानसिक स्वातंत्र्याचीही आवश्यकता आहे, खरे म्हटले असता, शरीराचे स्वातंत्र्य कशाकरिता असते ? ज्याला त्याला मनसोक्त व्यवहार करता यावा एवढ्याचकरता आहे. कैद्याच्या पायातील बेड्या काढून त्याला मोकळे करण्याचा मतलब काय? हेतू एवढाच की त्याने बाह्य जगात मोकळ्या मनाने वावरून आपल्या अंगी असलेल्या कर्तबगारीचा पूर्ण फायदा घ्यावा म्हणून. परंतु ज्या माणसाचे मन स्वतंत्र नाही त्याला असल्या बाह्यात्कारी स्वातंत्र्याचा काय उपयोग? मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जरी कैदी नसला तरी तो तुरुंगात आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जिवंत असून मेला आहे, मनाचे स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे. परंतु मानसिक स्वातंत्र्य कोणाला आहे, असे म्हणता येईल? जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क काय, आपले अधिकार काय व आपले कर्तव्य काय, याची जाणीव करून घेतो त्याला मी स्वतंत्र म्हणते. जो परिस्थितीचा दास झाला नाही, जो परिस्थितीला आपल्या कह्यात आणण्यास सिद्ध असतो, तो माणूस स्वतंत्र आहे, असे मी म्हणतो. जो रुढीच्या स्वाधीन झाला नाही, तो गतानुगतिक बनला नाही, ज्याच्या विचारांची ज्योत विझली नाही, जो दुसऱ्याच्या शिकवणीने वागत नाही, जो कार्यकारणभाव ध्यानात घेतल्याशिवाय कशावर विश्वास ठेवीत नाही, जो आपल्या हक्कांचा अपहार केला असता त्याच्या रक्षणार्थ दक्ष असतो, जो प्रतिकुल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्याच्य हाताचे बाहुले न होण्याइतकी बुद्धी, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे, असे मी समजतो. जो आपल्या आयुष्यचेच ध्येय व आपल्या आयुष्याचा व्यव दुसऱ्याने घालून दिलेल्या आज्ञेप्रमाणे ठरवित नाही. जो आपल्या बुद्धीनुसार आपल्या आयुष्याचे ध्येय काय असावे व आपले आयुष्य कोणत्या कार्यात व कशारीतीने व्यतीत करावे हे आपले आपण ठरवितो, सारांश जो सर्वस्वी स्वाधीन आहे, तोच माणूस स्वतंत्र आहे, असे मी समजतो.
या दृष्टीने पाहिले असता तुम्ही स्वतंत्र आहात का? तुमचे आयुष्य व तुमच्या आयुष्याचे ध्येय तुमच्या स्वाधीन आहे का? माझ्या मते तुम्हाला स्वातंत्र्य तर नाहीच पण तुम्ही दास आहात. सेवक आहात. इतकेच नव्हे तर तुमच्या दास्यत्वाला सीमा उरली नाही ! हिंदुधर्मात कोणालाही विसारस्वातंत्र्य असू शकत नाही. जो जो मनुष्य हिंदुधर्मात राहील त्या त्या माणसाला आपल्या विचार स्वातंत्र्याला तिलांजली दिल्याशिवाय गत्यंतर नाही., वागताना त्याने वेदाप्रमाणे वागले पाहिजे वेदात तशी आज्ञा नसेल तर स्मृतीतील आज्ञेप्रमाणे वागले पाहिजे. हिंदुधर्मात बुद्धीला विचाराला प्राधान्य तर नाहीच नाही पण वान देखील नाही. हिंदुनी कोणाची तरी गुलामगिरी केलीच पाहिजे. वेदाची गुलामगिरी केली पाहिजे, स्मृतीची कास धरली पाहिजे. अगर महाजनाचे अनुकरकण केले पाहिजे. विचारशक्तीचा त्याने मुळीच उपयोग करता कामा नये. जोपर्यंत तुम्ही हिंदुधर्मात आहात तोपर्यंत तुम्हाला विचारस्वातंत्र्य प्राप्त होऊ शकत नाही. यावर कोणी असे म्हणतील की हिंदुधर्माने तुमचेच मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेतले असे नव्हे, तर हिंदुधर्माला प्रमाण मानणाऱ्या सर्व जातीचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. हिंदुमुळे सर्वच बौद्धिक गुलामगिरीत सापडले आहेत हे खरे पण त्यामुळे ते समदुःकी आहेत असे कोणी समजू नये. कारण या बौद्धिक गुलामगिरीचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागत नाहीत. स्पृश्य वर्गाच्या ऐहिक सुखावर या बौद्धिक गुलामगिररीचा कोणत्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम होऊ शकत नाही. ते जरी वजेदाचे गुलाम झाले, स्मृतीचे दास असले. महाजनांचे गतानुगतिक बनले तरी हिंदूसमाजाच्या व्यवहारात त्यांना वेदांनी व महाजनांनी उच्च पद दिलेले आहे. दुसऱ्यावर हुकूमती गाजविण्याकरिता
त्यांना अधिकार दिलेला आहे, सारा हिंदु धर्म वरिष्ठ वर्गाच्या हिंदुनी वरिष्ठ वर्गाच्या हिंदुंच्या संवर्धनाकरिता रचलेले आहे, ही गोष्ट अगदी निर्विवाद आहे. ज्याला ते धर्म म्हणतात त्या धर्मात तुम्हाला गुलामाची भूमिका दिलेली आहे. इतकेच नव्हे तर या गुलागिरीतून तुमची सुटका होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था त्या धर्मात केलेली आहे म्हणून हिंदुधर्मातील ह्या गुलामगिरीतून सुटका करून घ्यायची तुम्हाला जितकी जुरूरी आहे तितकी हिंदूंना नाही. अशा रीतीने विचार केला असता, हा हिंदुधर्म तुम्हाला दोन्ही तन्हेने मारक ठरला आहे. या धर्माने तुमचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेऊन तुम्हाला गुलामगिरीच्या दशेत आणून टाकले आहे. तुम्हाला जर स्वातंत्र्य हवे असले तर तुम्हाला धर्मान्तरच केले पाहिजे.
अस्पृश्यांची संघटना आणि धर्मान्तर
अस्पृश्यता निवारणाची जी आज चळवळ चालू आहे त्या चळवळीवर अशी टीका करण्यात येते की अस्पृश्यता वर्गात ज्या निरनिराळ्या जातींचा समावेश झालेला आहे त्या जातीतही परस्परातील व्यवहारामध्ये जातिभेद पाळण्यात येतो, नव्हे अस्पृश्यता पाळण्यात येते. महार मांग एकमेकांच्या हातचे खात नाहीत. दोघेही भंग्यासारख्या जातीला शिवत नाहीत व त्यांच्याशी अस्पृश्यता पाळथात. परस्परात जातिभेद व अस्पृश्यता पाळणाऱ्या लोकांना वरच्या जातीकडून तुम्ही जातीभेद व अस्पृश्यता पाळणाऱ्या लोकांना वरच्या जातीकडून तुम्ही जातिभेद सोडा अस्पृश्यता मानू नका, असे म्हणण्याचा काय अधिकार आहे? असा प्रश्न नेहमी विचारण्यात येतो. तुम्ही आपसात जातीभेद व अस्पृश्यता नाहीशी करा. मग आमच्याकडे दाद मागण्यास या असा साळसूदपणाचा सल्ला त्यांना देण्यात येत असतो. या टीकेच्यामुळाशी असलेल्या कथेत सत्य आहे, हे आपल्यापैकी सर्वांना कबूल करावे लागेल. पण त्या टीकेत केलेला आरोप मात्र खोटा आहे. अस्पृश्यवर्गात समाविष्ट झालेले लोक जातिभेद पाळतात व काही अस्पृश्यता पाळतात, या गोष्टीचा इन्कार करता येणे शक्य नाही, या गोष्टी मान्य करणे प्राप्त असले तरी या अपराधाला ते कारणीभूत आहेत असे
म्हणणे निखालस खोटं आहे.. जातिभेदाचा व अस्पृश्यतेचा उगम अस्पृश्य लोकांपासून झालेला नाही. जातिभेदाचा व अस्पृश्यतेचा पायंडा यांना घातला आहे, जातिभेद व अस्पृश्यता पाळण्याचा धडा वरिष्ट वर्गाच्या हिंदुंनी घालून दिला आहे. ही गोष्ट जर सत्य असेल तर जातिभेदाच्या व अस्पृश्यतेच्या रुढीची जबाबदारी स्पृश्य वर्गावरच पडते, अस्पृश्य वर्गावर ती पडू शकत नाही. अस्पृश्य वर्गाचे लोक जातिभेद व अस्पृश्यता पाळतांना वरच्या वर्गाच्या लोकांनी दिलेला धडा गिरवीत आहेत. तो धडा जर खोटा आहे तर त्याचे पाप ज्यांनी तो धडा दिला त्यांच्यारवर येऊन पडते. ज्यांनी गिरविला त्यांच्यावर येऊन पडू शकत नाही. हे उत्तण जरी समर्पक असले तरी या उत्तराने स्वतःचे समाधान होऊ शकत नाही. ज्या कारणामुळे अस्पृश्यता व जातिभेद हा आपल्यामध्ये शिरला, त्या कारणाला आपण जबाबदार नसलो तथापि आपल्यामध्ये जो जातिभेद व जी अस्पृश्यता नांदत आहे तिचा धिक्कार न करणे, ती आहे तशीच चालू देणे आपल्याला इष्ट नाही. अस्पृश्यतेचा व जातिभेदाचा शिरकाव करण्यास जरी आपण जबाबदार नसलो तरी घालविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ही जबाबदारी आपण सर्वांनी ओळखली आहे. याबद्दल मला समाधान वाटते. माझी खात्री आहे की महार जातीत असा कोणताही पुढारी नाही की जातीभेद पाळावा असे तो म्हणतो. तुलनाच करायची झाली तर ती पुढाऱ्यामध्ये केली पाहिजे. महारातील शिकला सवरलेला वर्ग घेतला आणि ब्राह्मणातील शिकला सवरलेला वर्ग जर घेतला व दोहोची तुलना केली तर अस्पृश्य वर्गातील सुशिक्षित वर्ग जातिभेद मोडण्याला जास्त अनुकूल आहे. ही गोष्ट कोणासही कबूल करावी लागेल. इतकेच नव्हे तर ती गोट कृतीनेही सिद्ध करून देता येईल. महारातील सुशिक्षित असा एकही मनुष्य सापडणार नाही की जो महारमांगात रोटीव्यवहार व्हावा याच्या विरुद्ध असेल. आपल्यातील जातीभेद मोडण्याची आवश्यकता तुम्ही ओळखता या गोष्टीबद्दल मला मोठे समाधान वाटले. मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो. परंतु अस्पृश्यातील जातिभेद मोडण्याचा प्रयत्न कसा यशस्वी करता येईल याचा तुम्ही विचार केला आहे? सहभोजन केल्याने किंवा क्वचित प्रसंगी सहविवाह केल्याने
जातीभेद मोडू शकत नाहीत. जातीभेद ही एक मानसिक स्थिती आहे. एक मानसिक व्यथा आहे. ही मानसिक व्यथा जगण्याचे कारण हिंदू धर्माची शिकवण ही आहे. आपण जातिभेद पाळतो, अस्पृश्यता पाळतो याचे मुख्य कारण ज्या हिंदुधर्मात आपण आहोत तो धर्म तसे करावयास सांगतो म्हणून वस्तू कडू असेल तर ती गोड गोड करता येईल. खारट असेल तुरट असाल तर तिची रुची बदलता येईल पण विषाच अमृत करता येणार नाही. हिंदूधर्मात राहून जातिभेद नष्ट करू असे म्हणणे म्हणजे विषाचे अमृत करू असेच म्हणण्यासारखे आहे.
अर्थात ज्या धर्मात माणसाची घाण माणसाने मानली पाहिजे अशी शिकवण देण्यात येते आहे त्या धर्मात आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत जातिभेद नाहीसा होणार नाही. आपल्या मनातील जातीभेद व अस्पृश्यता नाहीशी करावयाची असल्यास त्यांनी धर्मातर करणे हा एकच रामबाण उपाय आहे.
नामांतर आणि धर्मांतर
येथपर्यंत धर्मांतराची कारणमीमांसा तुमच्यापुढे मी मांडली आहे. ही कारणमीमांसा तुम्हाला विचारप्रवर्तक होईल अशी मला आशा आहे. ही कारणमीमांसा ज्यांना खोल आणि गहन अशी वाटत असेल त्यांना या विषयाचा सहज समज पडावा म्हणून मी काही साधे बालबोध विचार तुमच्यापुढे मांडणार आहे. या धर्मान्तराच्या प्रश्नात नवे असे काय आहे? खरे म्हटले असता हिंदुंचा आणि तुमचा सामाजिक संबंध काय आहे? जितके मुसलमान लोक हिंदूंपासून भिन्न आहेत तितकेच तुम्हीही हिंदूपासून भिन्न आहात ख्रीस्ती व मुसलमान यांच्याशी जसा हिंदूचा रोटीबोटी व्यवहार होत नाही तसा तुमच्याशीही होत नाही. तुमचा आणि हिंदुंचा समाज हे हे आतासुद्धा निरनिराळे, वेगवेगळे दोन समाज आहेत. धर्मांतर केल्याने एका समाजाचे दोन तुकडे करण्यात आले, असे कोणालाही म्हणता यावयाचे नाही व कोणालाही तसे वाटायचे नाही. आज जसे तुम्ही निराळे आहात तसेच धर्मांतर केल्यामुळे निराळे होणार आहात. धर्मन्तराने नवे असे काही होणार नाही. हे जर खरे आहे तर धर्मन्तराचा बाऊ कोणाला का वाटावा हे
मला समजत नाही. दुसरे असे की, धर्मांतराचे महत्त्व तुम्हाला जरी पटले नसले तरी नामांतराचे महत्त्व तुम्हा सर्वांना पटले आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. तुमच्यापैकी कोणालाही तुझी जात काय म्हणून विचारले तरी ती चोखामेळा, हरिजन वगैरे सांगतो पण महार हे नाव सांगत नाही. नामांतर करण्याची जती पडल्याशिवाय कोणीही नामांतर करणार नाही. अशा प्रकारचे नामांतर करण्याचे कारण अगदी सोपे आहे. अपरिचित आ माणसाला अस्पृश्य कोण व स्पृश्य कोण हे सांगता येत नाही. आणि म्हणून जोपर्यंत जात कळली नाही. तोपर्यंत स्पृश्य हिंदूंच्या मनात कोणत्याही प्रकारची दूषित भावना उत्पन्न होत नाही. प्रवासात अपरिचित स्पृश्य बंधुभावाने वागत असलेले दिसतात. एकमेकांपासून विडीपान घेतात, फळाफळावळ घेतात. परंतु याच माणसास ज्याच्याशी आपण व्यवहार करतो त्याची जात कळली व त्याची जात अस्पश्य आहे असे समजले की, त्याच्या मनात तिरस्कार उत्पन्न होतो, त्याला तिडीक येते व आपल्याला फसविले म्हणून त्याला क्रोध येऊन प्रवासात जडलेल्या मैत्रीचे पर्यवसान शिवीगाळीत व मारा मारीत होते. हा अनुभव पुष्कळांना असेल, अशी माझी खात्री आहे. हा सा प्रकार का होतो ते तुम्हा सर्वांना अवगत आहे. तुम्हाला जी ही जातिवाचक नावे प्राप्त झालेली आहेत त्या नावांना इतकी दुर्गंधी लागलेली आहे की, त्याचा उच्चार केला असतानादेखील स्पृश्य लोकांना मळमळून येते. म्हणूनच तुम्ही स्वतःला महार न म्हणता चोखामेळा म्हणून लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करता! परंतु लोक फसत नाहीत, याचाही तुम्हाला अनुभव आहेच, कारण, चोखामेळा म्हटले काय किंवा हरिजन म्हटले काय तजे समजावयाचे ते समजतातच ! तुम्हाला नामांतराची आवश्यकता भासते हे तुमच्या वर्तणुकीनेच तुम्ही सिद्ध केले आहे. मला तुम्हाला एवढेच विचारावयाचे आहे की नामांतर करणे हे जर तुम्हाला आवश्यक वाटते तर मग तुम्हाला धर्मान्तराने होणारे नामांतर हे तुम्हाला ख्रिस्त फायदेशीर पडेल. मुसलमान म्हणवून घेणे, ख्रिस्ती म्हणवून घेणे, बौद्ध म्हणवून घेणे, शीख म्हणवून घेणे हे धर्मान्तर आहेच. पण नामांतरही आहे. ते खरे नामांतर आहे. या नामांतराला दुर्गंधी नाही. हे नामांतर
आमूलाग्र आहे याचा शोध कोणी करू शकत नाही. परंतु चोखामेळा, हजिरन नामांतरापासून काही अर्थ नाही जुन्या नावाची घाण नव्या नावाला लागल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात राहाल तोपर्यंत तुम्हाला नामांतर करावेच लागेल. कारण नुसते हिंदु म्हणून चालणार नाही. हिंदू हा कोणी मनुष्य प्राणी आहे असे कोणीच ओळखीत नाहीत, महार असे सांगून भागणार नाही. कारण त्या नावाचा उच्चार केल्याबरोबर कोणी जवळ येणार नाही. आपल्या मधल्या स्थितीत घोटाळत राहण्यापेक्षा आज हे नाव उद्या ते नाव असे नामांतर करीत बसण्यापेक्षा धर्मान्तर करून कायमचे नामांतर तुम का करू नये असा तुम्हाला माझा प्रश्न आहे.
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.