कापूस चोर, बिरबलाच्या खिचडीची गोष्ट, यमुना चालली सासरी, प्रत्येकाला आपला जीव प्यारा, बेगमची अत्यंत प्रिय वस्तू , सर्वश्रेष्ठ पाणी, बिरबलाचे गुरू | Birbal Stories
बिरबल यांच्या कथा आपल्या संशयांचे उत्तर देण्यासाठीच एक स्थापित उपाय आहेत. ह्या अतिशय समर्थ आणि चतुर नव्हे तरी खास कौशल्याने संपन्न बिरबल यांच्या कथा आपल्या मनाला आनंद आणि शिक्षणाची अनुभवे देतात. आजच्या आपल्या लेखात, आपल्याला त्यांच्या एक कथेत जाणून घेऊयात “कापूस चोर”. यात, बिरबल यांच्या चतुराईने आणि त्यांच्या विविध प्रकारांतील उपायांनी कसे एक कापूसीला पकडण्यात मदत केली, ह्याबद्दल आपल्याला लेख प्रारंभ करत आहोत. ह्या कथेच्या माध्यमातून, आपण बिरबल यांच्या ज्ञानाला आणि चतुराईला समजून घेऊ आणि समस्यांसाठी नवीन दृष्टिकोन प्राप्त करण्यास सक्षम होऊ शकता.
कापूस चोर
बादशहाने एकदा कापसाचे उत्पादन केले होते. त्यांनी हजारो टनाचा कापूस उत्पादित केला. तेही ना नफा ना तोटा ह्या तत्त्वावर. शिवाय बाजारपेठेतील भावापेक्षाही कमी दराने त्याने तो गरीब विणकरांना दिल्याने बादशहाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. मात्र कुणाला तरी बादशहाचे यश पाहावले नाही आणि म्हणून कुणीतरी उत्पादित कापसामधील कापूस चोरू लागला. सगळे सरदार अत्यंत प्रामाणिक तरीसुद्धा असली कापूस चोरायची दुर्बुद्धी कुणाच्या तरी मनात निर्माण झाली. बादशहाने ह्या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला, मात्र नक्की कापूस चोर काही हाताला लागेना. कापसाच्या व्यवसायात तोटा येऊ लागला. त्यामुळे बादशहाने कापूस उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला. परंतु बिरबलाने बादशहास विनंती केली. बिरबल बादशहास म्हणाला, “महाराज, तुम्ही हा व्यवसाय बंद करू नका, नाहीतर गरीब विणकरांना उपाशी राहायची वेळ येईल. तुम्ही व्यवसाय चालू ठेवा. मी शोधून काढतो कापूसचोर!”
बिरबलाला ह्या प्रकरणाचा थोडा अंदाज आला होता. कापसाच्या व्यवहारातील दलालांपैकीच कुणाचातरी ह्यात हात असावा. बिरबल त्या दलालांना म्हणाला, “बादशहा आता व्यवसाय बंद करणार आहे. परंतु जो कुणी कापूस चोरणारा आहे त्याला बादशहा कडक शिक्षा करणार आहे. कापूस चोरांची नावेसुद्धा आमच्याकडे आली आहेत. जे कुणी कापूस चोरणारे आहेत त्यांच्या पगडीला कापूस लागलेला आहे!”
बिरबलाने असे म्हणताच दोन सरदारांनी लगेच आपापली पगडी चाचपडून पाहिली. बिरबलास लगेच संशय आला. त्या दोघांना पकडून चाबकाचे फटके मारण्याचे आदेश बिरबलाने शिपायांना दिले. शिपायांनी
चाबताचे फटके मारताच त्या सरदारांनी सर्व चोरांची नावे सांगून कापूस कुठे लपवून ठेवला जातो ती जागाही सांगितली. बिरबलाने त्या सर्व चोरांना पकडून बादशहासमोर उभे केले. त्यांना दंड करून त्यांची हकालपट्टीही करण्यात आली.
बिरबलाने चोरांना पकडून दिल्याने कापूस साठ्यातील अडसर दूर झाला. त्यामुळे कापसाचा नफा वाढू लागला आणि गरीब विणकरांचीही सोय झाली.
बिरबलाच्या खिचडीची गोष्ट
थंडीचे दिवस होते. बिरबल बादशहा संध्याकाळच्या वेळी नदीकाठी फिरायला गेले. नदी जवळ आल्यावर बादशहाला खूपच थंडी वाजू लागली. तो थंडीने कुडकुडू लागला. तो बिरबलास म्हणाला, “असल्या थंडीत ह्या यमुना नदीत साधे बोटसुद्धा बुचकळण्याचेही कुणी धाडस करू शकणार नाही!” यावर बिरबल बादशहास म्हणाला, “महाराज, ज्याला गरज आणि लोभ असेल अशी व्यक्ती काहीही करायला तयार होते. महाराज तुम्ही जर शंभर सुवर्ण मोहरा द्यायला तयार झालात तर कुणीही तसा माणूस कडाक्याच्या थंडीत रात्रभर नदीत उभा राहायला तयार होईल!”
बिरबलाचे विचार ऐकून त्याने लगेच दुसऱ्या दिवशी दवंडी पिटवण्याचे आदेश दिले. दवंडी ऐकून एक अत्यंत गरीब ब्राह्मण नदीत रात्रभर उभा राहायला तयार झाला. तो म्हणाला, “विष खाऊन मरण्यापेक्षा रात्रभर पाण्यात उभा राहिलो तर माझी गरिबी तरी संपुष्टात येईल,” या विचाराने तो नदीत रात्रभर उभा राहायला तयार झाला.
बादशहाने त्याच दिवशी रात्री त्याला यमुनेत उभे राहायला सांगितले. तो गरीब ब्राह्मण यमुनेत उतरला. नदीच्या दोन्ही काठांवर बादशहाने त्याच्यावर कडक पहाऱ्यासाठी सैनिक उभे केले होते. जसजशी रात्र वाढू लागली तसतसे नदीतले पाणी अधिकाधिक गार होऊ लागले. त्यामुळे अर्थातच तो ब्राह्मण गारठ्याने खूप कुडकुडू लागला. त्याचे खूप हाल होऊ लागले. त्याच्या अंगातून अत्यंत तीव्र अशा वेदना येऊ लागल्या. बघता बघता रात्र संपली. सूयोंदय झाला. त्या गरीब ब्राह्मणाने ठरल्याप्रमाणे जिद्दीने, रात्रभर यमुनेत कडाक्याच्या गारठ्यात पाण्यात उभे राहून दाखवले.
दरबार भरला. दरबारात बादशहासमोर त्या ब्राह्मणाला उभे केले गेले. बिरबलाने लगेच बादशहाकडे शिफारस केली, “महाराज, आपल्या आदेशाप्रमाणे ह्या गरीब ब्राह्मणाने रात्रभर नदीत उभे राहून आपली क्षमता, कौशल्य सारे काही सिद्ध केले आहे. तेव्हा त्याला आपण ठरल्याप्रमाणे सुवर्ण मोहरांचे बक्षिस द्यावे!”
बिरबलाने सांगितल्यावरही बादशहाचा विश्वास बसेना. त्याने त्या ब्राह्मणास विचारले, “तू रात्रभर पाण्यात उभा होतास हे खरे, पण नेमके तू त्यावेळी काय करीत होतास?” तेव्हा त्या गरीब ब्राह्मणाने सांगितले, “मी तुमच्या महालात जो दिवा होता, त्या दिव्याकडे पाहात होतो!” त्यावर बादशहा लगेच म्हणाला, “अगदी बरोबर ! आणि त्या दिव्याच्या उजेडाचीच तुला रात्रभर उब मिळाली. त्यामुळेच तू रात्रभर त्या नदीत उभा राहू शकलास. दिव्याच्या उष्णतेचा तू उपयोग केल्याने तुला आता बक्षिस मिळणार नाही!”
ब्राह्मणाने खूप काकुळतीला येऊन, आपण अगदी प्रामाणिकपणे, जिवापाड प्रयत्न करून नदीत रात्रभर उभे राहिलो तरी बक्षिस द्यावे अशी बादशहाला विनंती केली. परंतु बादशहाने त्या गरीब ब्राह्मणाचे काहीसुद्धा ऐकून घेतले नाही, उलट तात्काळ त्याला बादशहाने हाकलून दिले.
दुसऱ्या दिवशी दरबार भरला तेव्हा बिरबल दिसला नाही म्हणून बादशहाने नोकराला पाठवून बिरबलाचा शोध घ्यायला सांगितले. नोकर थोड्या वेळाने दरबारात आला आणि सांगितले की बिरबल साहेबांना खूप भूक लागली असून त्यांची खिचडी तयार झाली की ते जेवून दरबारात येणार आहेत.
दूपार होऊन गेली तरी बिरबल दरबारात आला नाही म्हणून बादशहा खूप चिडला आणि स्वतः दोन सरदारांना घेऊन बिरबलाच्या दारात गेला, तर बिरबल अंगणात मांडी घालून बसला होता. बिरबलाने अंगणात बांबू उभे करून उंचावर एक मातीचे मडके बांधले होते. त्यात डाळ-तांदूळ घातले होते आणि खाली जमिनीवर बिरबल काड्या जाळत बसला होता. ते पाहून बादशहा बिरबलास म्हणाला, “अरे बिरबला, एवढ्या उंचावर मडके टांगून तुझी खिचडी कशी व्हायची? त्या मडक्याला जाळ लागायचा कधी?”
बादशहाचे ऐकून बिरबल शांतपणे म्हणाला, “महाराज, जर तुमच्या महालातल्या दिव्याची उब जर पार नदीत उभ्या राहमाऱ्या ब्राह्मणाला मिळू शकते तर इथे अंगणात उंचावर टांगलेल्या मडक्याला खाली जमिनीवर जळणाऱ्या काटक्यांची उष्णता का लागणार नाही? माझी खिचडी व्हायलाच पाहिजे!”
बिरबलाचे वक्तव्य ऐकल्यावर बादशहाला लगेच त्याची चूक कळली. बादशहाने दरबारात त्या गरीब ब्राह्मणास बोलावून घेतले आणि त्याला, रात्री कडाक्याच्या थंडीत नदीत उभे राहून दाखवल्याबद्दल बादशहाने १०० सुवर्ण मोहरांचे बक्षिस जाहीरपणे दिले.
यमुना चालली सासरी
एकदा रात्रीच्या वेळी बिरबल आणि बादशहा यमुना नदीच्या काठावरून फिरायला चालले होते. रात्रीच्या वेळी तिथे वातावरण अत्यंत रम्य होते. छान चांदणेही पडले होते. पौर्णिमेमुळे यमुनेत झाडाच्या फांद्या, पाने यांचे प्रतिबिंब अत्यंत विलोभनीय, मोहक असे दिसत होते. मंद वाऱ्याची झुळूक सुद्धा भान हरवून टाकणारी होती. सर्वत्र निरव शांतता पसरलेली होती.
मात्र यमुना नदीच्या प्रवाहाचा आवाज मात्र कानाला खूप गंभीर असा ऐकू येत होता. तो आवाज ऐकून बादशहा बिरबलास सहजपणे म्हणाला, “काय रे बिरबला, यमुनेचा आवाज असा गंभीर का येत आहे. ती रडत तर नाही ना?” त्यावर बिरबल अगदी शांतपणे आणि नेहमीसारखे थोडे चतुराईने म्हणाला, “महाराज, यमुना ही एखाद्या नववधूसारखी आहे. ती आता समुद्राकडे म्हणजे आपल्या पतीकडे चालली आहे. माहेर सोडून सासरी निघालेल्या कुठल्याही नववधूचे डोळे भरून आल्याशिवाय राहात नाहीत. त्यामुळे तिला माहेर सोडत असल्याचे दुःख अनावर होत आहे, म्हणून ती रडत आहे.”
अत्यंत भावुक उत्तर ऐकून बादशहाने बिरबलास शाबासकी दिली.
माणसा माणसातील फरक बादशहाच्या दरबारात नेहमीच अनेक गरीब माणसं मदत मागायला येत असत. बादशहा, दरबारात येणाऱ्या प्रत्येकाशीच सुसंवाद साधत असे. त्यांचे दुःख, अडचणी सर्व काही परिस्थिती जाणून घेत असे. प्रत्येक व्यक्ती व्यक्तीमध्ये त्याला खूप फरक जाणवू लागला. मग त्याने एकदा बिरबलास बोलावून घेतले. बिरबलाने बादशहाशी चर्चा केली.
बादशहा म्हणाला, “काय रे बिरबला! माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा अनेकांचा जन्म झाला असेल. पण मीच बादशहा झालो. कुणी गरीबाच्या घरी जन्माला आला तर कुणी श्रीमंताच्या घरी. प्रत्येकाचेच नशीब असे भिन्न भिन्न का? माणसा माणसात एवढा फरक कसा?”.
हे ऐकल्यावर बिरबलाने ५ विड्याची पाने आणली आणि त्याचा एक जुडगा करून त्यात आरपार दाभण घुसवून बाहेर काढला आणि मग त्यातले प्रत्येक पान वेगवेगळे करून बादशहाला दाखवले व बिरबल बादशहास म्हणाला, “महाराज, तुम्हीच बघा! मी एकाच दाभणाने एकाच वेळी ५ पानांमध्ये छिद्र पाडले. परंतु प्रत्येक पानाचे छिद्र लहान-मोठे असे पडले असेल. माणसाचा जन्म जरी एकाच वेळी होत असला तरी त्याचे पूर्व कर्म, भोवतालची परिस्थिती, त्याची सामाजिक स्थिती यात भिन्नता असल्याने माणसा माणसात असा फरक जाणवतो.”
प्रत्येकाला आपला जीव प्यारा
एकदा संध्याकाळच्या वेळी बिरबल-बादशहा गप्पा मारत एका बागेत बसले होते. बोलता बोलता बादशहा सहजपणे बिरबलास म्हणाले, “काय रे बिरबला! ज्याला त्याला आपला जीव खूप प्यारा असतो नाही? प्रत्येकाला आपल्या जिवाची खूप काळजी असते नाही?” यावर बिरबल बादशहास म्हणाला, “बरोबर! तुम्ही म्हणता तसे प्रत्येकाला आपला जीव प्याराच असतो.
मग तो माणूस असो नाहीतर एखादे जनावर!” यावर बादशहाने वेगळे मत मांडले, “हो पण निदान आईला तरी आपल्यापेक्षा मुलाचा जीव खूप प्यारा वाटत असेल!” मग बिरबल म्हणाला, “नाही महाराज ! असे काही नाही.” बादशहाला बिरबलाच्या बोलण्यात काही तथ्य वाटले नाही. मग बिरबलाने काय केले, राजवाड्यात एका पाण्याच्या हौदात माकडीण आणि तिच्या पिल्लाला सोडले. नंतर हळूहळू त्या हौदात पाणी सोडले. हौदातले पाणी वाढायला लागल्यावर माकडिने त्या पिल्लास खांद्यावर घेतले.
त्याबरोबर बादशहा लगेच बिरबलास म्हणाला, “ते बघ बिरबला, माकडीण तिच्या पिल्लाची किती काळजी घेते आहे!” मग बिरबल बादशहास म्हणाला, “तसं नाही महाराज ! थोडं थांबा. आता मी पाणी आणखी वाढवतो मग माकडीण काय करते ते बघा. मग लक्षात येईल की परिस्थिती बदलल्यावर वागण्यात कसा फरक पडतो ते!”
मग बिरबलाने हौदात आणखी पाणी सोडले. माकडिणीचे पिल्लू खूप अस्वस्थ झाले. हौदात पाणी खूप वाढल्याने ते पाणी आता माकडिणीच्या गळ्यापाशी आले. एवढेच नाही तर ते पाणी आता माकडिणीच्या नाकातोंडात शिरू लागले. माकडीणीच्या लक्षात येऊ लागले की आता
आपला जीव खूप धोक्यात आहे. आपला जीव वाचवण्यासाठी काहीतरी केलेच पाहिजे. माकडीण बेचैन झाली आणि क्षणाचाही विलंब न लावता त्या माकडिणीने त्या खांद्यावरच्या पिल्लाला पाण्यात खाली घेतले आणि त्या पिल्लाच्या अंगावर पाय ठेवून माकडीण हौदाच्या बाहेर येण्याची धडपड करू लागली, का तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी.
प्रत्यक्ष माकडिणीचे कृत्य पाहून बादशहाची खात्री पटली की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किती प्रयत्न केला जातो. कुणीही असो ज्याला त्याला आपलाच जीव प्यारा. मग बिरबलाने तातडीने हौद रिकामा करून माकडीण आणि तिच्या पिल्लासही बाहेर काढून त्यांना वाचविले.
बेगमची अत्यंत प्रिय वस्तू
बेगम तशी खूप हट्टी होती आणि तिचे हट्ट बादशहा अगदी मनापासून पुरवत असे. परंतु एकदा बादशहाला तिच्या हट्टीपणाचा खूप राग आला आणि रागाच्या भरात बादशहा बेगमला म्हणाला, “तू आत्ताच्या आत्ता चालती हो, अजिबात थांबायचे नाही इथे!” बेगम खूप अस्वस्थ झाली. तिने बिरबलास सर्व प्रकार सांगितला.
मग बिरबलाने बेगमला एक युक्ती सांगितली. बेगम बादशहा जवळ गेली आणि म्हणाली, “मी निघून जाते परंतु मला जाताना माझी अत्यंत प्रिय अशी वस्तू बरोबर नेण्याची परवानगी द्या!” बादशहा पुन्हा रागावून म्हणाला, “ठीक आहे. काय न्यायचे आहे ते खुशाल घेऊन जा बरोबर, पण परत इथे यायचं नाही, जा ताबडतोब. निघून जा इथून. थांबू नकोस अजिबात!”
मग बेगमने काय केले, बाहेरून एक गुंगीचे औषध आणून आचाऱ्याकडे दिले. ते औषध त्याने बादशहाला जेवणातून देताच बादशहाची शुद्ध
हरपली. बादशहाला गुंगी आली. मग बेगमने एका पालखीतून बादशहाला आपल्या माहेरी नेले. बादशहाला सकाळी जाग आली आणि तो आश्चर्यचकित झाला. बेगमला तो म्हणाला, “मी इथे कसा आलो? राजवाड्यात नाही?” यावर बेगम म्हणाली, “तुम्ही मला राजवाड्यातून निघून जा सांगितलंत आणि मी निघताना कसली परवानगी मागितली…. माझी सर्वात आवडती प्रिय अशी गोष्ट बरोबर नेण्याची… आणि ती तुम्ही मान्य केलीत.
मला सगळ्यात प्रिय आवडते असे काय तर तुम्हीच आणि म्हणून तुम्हाला इथे आणले!” बेगमचे हे अत्यंत लाघवी, जिवापाड प्रेमळ बोल ऐकून बादशहाचा राग कुठल्या कुठे निघून गेला. त्याने बेगमला विचारले, “असे हे करायला तुला कुणी सुचवले?” अर्थातच बेगमने बिरबलाचे नाव सांगितले. या हुशारीबद्दल बादशहाने बिरबलाचे कौतुक तर केलेच पण बादशहा बेगमला घेऊन राजवाड्यात आला आणि पुन्हा बेगमवर कधीही रागावला नाही.
सर्वश्रेष्ठ पाणी
एकदा दरबार भरला असताना बादशहाने सर्वांना एक प्रश्न विचारला, “सर्वात श्रेष्ठ पाणी कोणते आहे?” बादशहाचा प्रश्न ऐकताच दरबारातला प्रत्येक सरदार क्षणाचाही विलंब न लावता उत्तर देऊ लागला, “महाराज! महाराज !! सर्वात श्रेष्ठ पाणी कुठले असेल तर ते गंगा नदीचेच!” प्रत्येकाने उत्तर दिले मात्र बिरबल काहीच बोलला नाही, मग बादशहाने विचारले, “बिरबला, तू काहीच बोलला नाहीस, तू सांग ना सर्वात श्रेष्ठ पाणी कोणते?” मग बिरबलाने उत्तर दिले, “महाराज, सर्वात श्रेष्ठ पाणी कोणते असेल तर ते यमुना नदीचेच!” हे ऐकून सर्वांना खूप आश्चर्य वाटले.
बादशहालाही खूप नवल वाटले. तो बिरबलास म्हणाला, “अरे बिरबला, तुमच्या हिंदू धर्मग्रंथात तर गंगेला पवित्र मानतात !” मग बिरबलाने समर्थन केले.
बिरबल म्हणाला, “होय महाराज ! गंगातर पवित्र आहेच. तिचे पाणी तर अमृतमयच आहे आणि तिच्याशी कुणाचीच तुलना करणेही कठीण आहे. मात्र मी उरलेल्या नद्यांशी केल्यावर त्यात यमुनाच श्रेष्ठ वाटली!” गंगेचे माहात्म्य पटवण्यासाठी यमुनेला श्रेष्ठत्व देण्याची हुशारी, कौशल्य याबद्दल सर्वांनी बिरबलाचे कैतुक केले.
बिरबलाचे गुरू
बिरबल हुशार होता. विद्वान होता. चतुर होता. त्याच्यात हजरजबाबीपणा होता. बादशहाला बिरबलाचे सगळे हे गुण पाहून असे वाटले की अरे हा बिरबल जर इतका हुशार आहे तर त्याचा गुरू किती हुशार असेल. म्हणून बादशहा एकदा बिरबलास म्हणाला, “बिरबला, मला तुझ्या गुरूलाच आता भेटायचे आहे. तर तेवढी मला तुझ्या गुरूंची भेट घालून दे!” बिरबलाने लगेच हो म्हटले, मात्र प्रत्यक्षात बिरबलास कुणीच गुरू नव्हता.
मग त्याने काय केले एका अगदी सामान्य शेतकऱ्यास गाठले व त्याला गुरूचा वेष परिधान करायला सांगितले. शिवाय त्याला बादशहा भेटायला आल्यावर काय खबरदारी घ्यायची तेही सांगितले. बिरबल त्याला म्हणाला, “हे बघ, तू इथे अगदी शांत बसून राहायचे. बादशहाने काहीही भेट म्हणून दिले तरी घ्यायचे नाही. बादशहाशी एक शब्दही बोलायचा नाही. तू फक्त हातात माळ घेऊन जप करीत राहा. बादशहाने काहीही विचारले तरी तोंड उघडायचे नाही. तुझे हे सोंग आहे असे कळले तर बादशहा तुझे लगेच जागच्या जागी मुंडके उडवेल आणि म्हणून खूप शांत बसायचे. फार फार तर मध्येच कधी तरी आकाशाकडे पाहात राहायचे.”
बिरबलाने त्यास खूप पढवले तसेच गुरू होण्यासाठी शंभर मोहरा देण्याचे अमिष दाखवले. त्याची गुरू व्हायची सर्व तयारी झाल्यावरच बिरबलाने बादशहाला सांगितले, “महाराज, मी तुमची इच्छा गुरूंजवळ बोलून दाखविली आहे. त्यांनी तुम्हाला आजच भेटायला या असे सांगितले आहे. कारण त्यांना उद्या लगेच हिमालयात जायचे आहे” बादशहाला खूप आनंद झाला.
बादशहा आपल्या ताफ्यासह बिरबलाच्या गुरूला भेटायला निघाला. संपूर्ण दिल्लीत, बादशहा बिरबलाच्या गुरूंना भेटणार या विषयी वाऱ्यासारखी चर्चा पसरली. ताफा गुरूंच्या देवळासमोर जाताच बादशहा पालखी मेण्यातून खाली उतरला. बादशहा बिरबला बरोबर गुरूजवळ गेला. त्याने गुरूला वाकून नमस्कार केला, “दिल्लीच्या
तख्ताचा सम्राट आपणास अत्यंत सन्मानाने नमस्कार करीत आहे!” बादशहाचा आवाज ऐकून त्या गुरूने क्षणभर आपले डोळे उघडले आणि नुसते आकाशाकडे पाहून पुन्हा आपले डोळे मिटले! बादशहाने सोबत आणलेले भेटवस्तू, धन गुरूंपुढे ठेवले व विनंती केली, “आमच्या भेटीचा गुरूंनी स्वीकार करावा. तसेच आमच्याशी चार शब्द बोलावेत!” मात्र त्या गुरूंनी क्षणभर देखील डोळे उघडले नाहीत की बादशहाकडे, त्याच्या दिशेने जरादेखील मान फिरवली नाही आणि हा प्रत्यय आल्यावर बादशहा खूप संतापला. तो रागारागानेच दरबारात आला. त्याने बिरबलास बोलावून घेतले आणि तावातावाने आपली नाराजी व्यक्त करून दाखवली, “अरे काय रे बिरबला! हे तुझे गुरू आहेत की कोण? आम्ही एवढी धनदौलत त्यांच्या समोर ठेवली, भेटवस्तू समोर ठेवली तर ते बघायला तयार नाहीत. साधा एक शब्दही ते बोलू नयेत आमच्याशी? एखादा मूर्ख भेटला तर काय करावे?”
यावर बिरबल अगदी शांतपणे म्हणाला, “महाराज, आपण अशावेळी काहीच करू नये. एकही शब्दही बोलू नये. एकदम चूप बसावे” बिरबलाचे हे वक्तव्य ऐकल्यावर बादशहा एकदम चपापलाच. बादशहाने आत्मचिंतन केले. मग त्याचे त्यालाच कळू लागले की बिरबलाचा गुरू आपल्याला मूर्ख समजूनच चूप बसला. आपल्याशी एक शब्दही बोलला नाही. त्यात गुरूचे काहीच चुकले नाही. कुठल्याही साधूला एखादा सम्राट असो नाहीतर धनवान असो त्याने दिलेल्या भेटवस्तूंचे अथवा धनाचे काय कौतुक वाटणार आणि अशा गोष्टी साधू-संत, गुरूंसारख्या मंडळींना जरादेखील प्रिय नसतात. आपलेच चुकले आणि म्हणूनच बिरबलाच्या गुरूंनी आपल्याला मूर्ख ठरवले. जे बिरबलास माहिती आहे ते त्याच्या गुरूला माहिती असणारच आणि म्हणूनच बिरबलाच्या गुरूने आपल्याकडे पाहिले सुद्धा नाही!
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.