Birbal Stories In Marathi : नक्की खादाड कोण? | सुंदर बायको | घोड्याचे हुबेहुब चित्र | स्वप्नाचा अर्थ

नक्की खादाड कोण?, सुंदर बायको, घोड्याचे हुबेहुब चित्र, स्वप्नाचा अर्थ, वाईट व्यापारी, अंगठी लपवणारा सरदार, गाढव थांबेचना, उंटाची मान, नक्की खादाड कोण?, चालणारी गाजरे, गरिबी – श्रीमंती, मूर्ख माणूस, फाशीची शिक्षा | Birbal Stories

आपल्या विचारातील आणि मनातील चांगल्या नात्याने सामर्थ्याशी आणि बुद्धिमत्तेशी दृढ बसलेल्या श्रोत्यांसाठी हा ब्लॉग “Birbal Stories In Marathi” हा आपलं स्वागत करत आहे. ह्या ब्लॉगमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या मनोरंजक बीरबल कथा मिळतील. अत्यंत छान लेखकांच्या सृष्टीकर्तींच्या द्वारे लिहिलेल्या कथांची चांगली आणि मनोरंजक उत्तरी! त्यामुळे, तुम्हाला विविध भावनांच्या संघर्षांची कथा, बुद्धिमत्तेच्या जगात नाविकी करणारे बीरबलचे प्रेरणादायी किस्से आणि अद्भुत कल्पना प्रस्तुत केले जातील. आजच आपण येथे संग्रहित केलेल्या कथांची भेट घेऊन अनेक उपलब्धियांचा आनंद घ्या. संग्रहातील लेख वाचण्याचा आनंद घ्या आणि आपल्या मनाला शांतता आणि प्रेरणा प्राप्त करा. या ब्लॉगवरील नवीन कथांच्या अद्वितीय दुनियेमध्ये सामील होण्याचा सौभाग्य मिळाला असेल. धन्यवाद!

आपल्याला हार्दिक स्वागत आहे!


नक्की खादाड कोण?

constantly eating man story नक्की खादाड कोण

उन्हाळ्याचे दिवस होते. आंब्याचा मौसम होता. बादशहाने भरपूर आंबे आणले आणि बेगमच्या महालात आंबे खाण्याचा कार्यक्रमच केला. बादशहाने काय केले, त्याने खाल्लेल्या आंब्याच्या साली आणि कोयी बेगमने खाल्लेल्या साली- कोयींच्या ढिगात टाकल्या. आंबे खाऊन संपताच बिरबल नेमका तिथे आला. मग बादशहाने बेगमची जरा गंमत करायची ठरवली. बादशहा बेगमकडे बघत बिरबलास म्हणाला, “बेगमला इतके आंबे आवडले, की तिने सगळे आंबे एकटीनेच खाल्ले!”

बिरबला सारख्या वजीरासमोर आपण खादाड ठरलो या जाणिवेने बेगमला खूप शरमल्यासारखे वाटले. परंतु नंतर बिरबलाच्या लक्षात एक गोष्ट आली की बादशहा समोर एकही कोय आणि साल नाही. त्या अर्थी दोघांनी मिळून खाल्लेल्या आंब्याच्या कोयी-सालींचा हा ढीग असावा आणि म्हणून चतुर बिरबल म्हणाला,

“महाराज, तुम्ही म्हणत आहात ते खरे आहे. बेगम साहेबांनी खूप आंबे खाल्ले. पण महाराज, तम्ही तर इतके आंबे खाल्ले आणि तुम्हाला आंबेही इतके आवडले की तुम्ही ते आंबे कोयी आणि सालींसकट खाल्लेत.”

बिरबलाचे उत्तर ऐकून बेगम खूष झाली, बादशहा मात्र ओशाळला.


सुंदर बायको

beautiful wife story सुंदर बायको

बिरबलास गाईवरून अथवा देवाधर्मावरून कितीही चिडविले तरी तो चिडत नाही हे बादशहाच्या लक्षात आले. आता नेमके कुठल्या गोष्टीवरून चिडवावे म्हणजे बिरबल चिडेल याबद्दल बादशहा विचार करू लागला. बादशहा जेव्हा बिरबलाबरोबर बाहेर फिरायला जायला निघाला तेव्हा त्याने बिरबलास चिडवण्याचा प्रयत्न केला. बादशहा बिरबलास म्हणाला, “बिरबला, तुझी बायको दिसायला खूपच सुंदर आहे!” हे ऐकल्यावर बिरबलाने बादशहास तात्काळ उत्तर दिले. बिरबल बादशहास म्हणाला, “इतके दिवस मला माझी बायको खूप सुंदर आहे असे वाटायचे, परंतु जेव्हा मी बेगमना पाहिले तेव्हापासून माझे मत पूर्णपणे बदलले. माझ्या बायकोपेक्षा बेगम दिसायला खूपच सुंदर आहेत!”

बिरबलाचे उत्तर ऐकून बादशहाचा चेहरा एकदम उतरला आणि काहीच न बोलता तो बिरबला बरोबर पुढे जात राहिला.


घोड्याचे हुबेहुब चित्र

horse painting story घोड्याचे हुबेहुब चित्र.webp

एकदा बादशहाने बिरबलास बोलावून घेतले आणि त्याने आपल्या घोड्याचे हुबेहूब चित्र काढून घेण्याची इच्छा प्रकट केली. बिरबल हा अत्यंत कला तज्ज्ञ होता. त्याचे अनेक चांगले चित्रकार ओळखीचे होते.

त्यापैकी एका चित्रकाराला त्याने बादशहाच्या घोड्याचे चित्र काढायला सांगितले. चित्रकाराने तातडीने होकार देऊन, मन एकाग्र करून घोड्याचे हुबेहूब चित्र काढले. मात्र बादशहाने बिरबलाची फजितीच करायचे ठरविल्याने बादशहा त्या चित्रकाराने काढलेल्या चित्रातले काहीही कारण नसताना उगीच दोष दाखवत राहिला. बादशहाचे काही केल्या समाधान होईना, अर्थात तो मुद्दाम करत होता.

एवढी मेहनत करून, जीव ओतून चित्र काढूनही राजा नाखूषच दिसत होता. त्यामुळे चित्रकारही नाराज झाला, मग बिरबलाला एक युक्ती सुचली. त्याने बादशहास सांगितले की हे चित्र घोड्याच्या शेजारी धरून पाहू, मग नेमकी तुलना करता येईल आणि त्यावरून चित्र किती हुबेहूब आहे तेही समजेल.

बादशहाने होकार देताच शिपायांनी पागेतून घोड्याला बाहेर आणले. बिरबलाने घोड्याचे चित्र घोड्याजवळ धरताच घोडा उड्या मारल्याप्रमाणे मागचे खूर जमिनीवर घासून जोराने खिंकाळू लागला. ते बघून बादशहाला आश्चर्य वाटले. मग बिरबलाने बादशहास सांगितले, “महाराज, ह्या घोड्याला चित्रातला घोडा हा खराखुरा साथीदारच वाटतोय. त्याच्याबरोबर आपल्या घोड्याला धावावे असे वाटते मात्र धावता येत नाही म्हणून आपला घोडा जरा अस्वस्थ झाला आहे.”

महाराज महाराजांनी पुन्हा एकदा ते चित्र पाहिले आणि आपल्या घोड्याकडे पाहिल्यासारखे केले आणि चित्र हुबेहूब असल्याचे मान्य करून चित्रकाराला एका मोठ्या रक्कमेचे बक्षिस देऊन त्याचे मनसोक्त कौतुक केले.


स्वप्नाचा अर्थ

एकदा बादशहाला खूप विचित्र स्वप्न पडले. त्याने राज्यातील सगळ्या ज्योतिषांना बोलावून सांगितले, “मला असे स्वप्न पडले की माझे सगळे दात पडले आणि एकच दात राहिला. या स्वप्नाचा नेमका अर्थ काय?”

तेव्हा सर्वांनी एकच अर्थ सांगितला, “महाराज, याचा अर्थ असा की आपले सर्व नातेवाईक आधी मरण पावतील आणि मग तुम्हाला मृत्यू येईल!” हे ऐकून बादशहाने सर्व ज्योतिषांना हाकलून दिले. नंतर दुपारी बिरबल दरबारात आला. बादशहाने, त्याला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ विचारला. बिरबलाने क्षणाचाही विलंब न लावता त्या स्वप्नाचा अर्थ सहजपणे सांगितला, “महाराज, या स्वप्नाचा सरळ अर्थ असा आहे की तुम्हाला दीर्घायुष्य आहे. तुम्हीच सर्वात जास्त उपभोग घ्याल.”

बिरबलाचे चतुर उत्तर ऐकून बादशहा त्याच्यावर खूप खूष झाला आणि एवढे ज्योतिषी आपण उगीचच बाळगले असे त्याला जाणवले.


वाईट व्यापारी

एक व्यापारी खूप धनाढ्य होता. व्यापारी खूप तापट बनला होता. त्यामुळे तो आपल्या बायकोला खूप वाईट पद्धतीने वागवत होता. आपण त्याच्या तावडीत सापडू नये म्हणून त्याची बायको वेळोवेळी खबरदारी घेऊ लागली. तरी देखील व्यापारी काही ना काही क्षुल्लक कारणावरूनही आपल्या बायकोला दमात घेऊ लागला. तू अमूक केलेस तर तुझे केशवपन करीन!! तू तमूक केलेस तर केशवपन करीन असे सारखे धमकावू लागला.

आणि एक दिवस त्याची बायको त्याला जेवायला वाढत असताना चुकून त्या व्यापाराच्या पानात एक केस आला. मग व्यापारी खूप चिडला. त्याने नोकराला पाठवून न्हाव्याला बोलावले. मग त्याच्या बायकोने लगेच बिरबलाकडे तक्रार केली. बिरबलाने त्या व्यापाराची खोड मोडायचीच असे ठरविले. बिरबलाने ८-१० जणांना व्यापाऱ्याच्या दारात जमायला सांगितले. तिरडी बांधायला सुरुवात केली. अंतयात्रेचे सामानही आणले. इकडे व्यापारी त्याच्या बायकोला सारखा ओरडून ओरडून बोलवत होता, परंतु त्याची बायको धुमसून रडत होती. घराच्या बाहेर काहीतरी वेगळाच प्रकार चालला असल्याचे लक्षात येताच व्यापारी बाहेर आला आणि आरडाओरडा करू लागला, “अरे हा काय प्रकार चाललाय. तिरडी कसली बांधताय?”

मग बिरबल पुढे आला आणि तो स्पष्टपणे सांगू लागला, “ही तिरडी आपल्यासाठीच बांधली जात आहे, ही विषाची गोळी खा म्हणजे तुम्ही लगेच मराल आणि मग तुम्हाला स्मशानात नेणे अगदी सोपे

जाईल!” व्यापारी आणखीनच चिडला, “काय, तुम्हाला वेडबिड तर लागले नाही ना? मला विषाची गोळी कशासाठी देता?”

मग बिरबलाने खुलासा केला, ” तुम्ही मग ह्या न्हाव्याला कशाला बोलावलंत? बायकोचे केशवपन करायला ना? पण असे केशवपन करण्यापूर्वी नवरा मरावा लागतो हे आपणास माहिती आहे काय? “

असे म्हणून बिरबलाने त्या व्यापारास पकडून जिवंतपणीच तिरडीवर बांधायला सगळ्यांना सांगितले. ८-१० जण जी माणसं होती ती चांगली तगडी, धष्टपुष्ट होती. त्यांनी त्या व्यापाराला पकडून फरफटत तिरडीकडे नेऊन त्याला जोराने पाडून जिवंतपणीच त्याला तिरडीवर बांधायला सुरुवात केली आणि मग मात्र तो व्यापारी गयावया करू लागला. मग त्याचे जरा डोळे उघडले. सगळ्यांची माफी मागू लागला. डोळ्यात पाणी आणून रडू लागला, “मी चुकलो ! मी चुकलो! मी आता परत कधीही माझ्या कधीही ओरडणार बायकोचा छळ करणार नाही. मी माझ्या बायकोला नाही!” आणि मग शेवटी त्या व्यापाऱ्याला त्याच्या मात्र व्यापारी बिरबलाने त्या उन्मत्त व्यापाऱ्याला माफ केले. बायकोचीही माफी मागायला लावली. त्यानंतर आपल्या बायकोशी गुण्यागोविंदाने संसार करू लागला.


अंगठी लपवणारा सरदार

एकदा काय झाले, सगळ्या सरदारांनी बादशहाजवळ बिरबला विषयी कुरबुर करायला सुरुवात केली. जो तो सरदार बादशहाला म्हणू लागला, महाराज तुम्ही म्हणता तितका काही बिरबल हुशार नाही! बादशहाला ते काही पटेना. मग तो सरदारांना म्हणाला, ” आपण त्याची परीक्षाच बघू ना, मग कळेल तो किती हुशार आहे तो! “

मग बादशहाने काय केले, एका सरदाराला बोलावले. बादशहाने स्वतःच्या हातातली अंगठी काढली आणि ती त्याला एका कापडात गुंडाळून लपवून ठेवण्यास सांगितली. त्या बरोबर त्या सरदाराने लगेच ती अंगठी एका कापडात गुंडाळून कुणाला दिसणार नाही अशा जागी ठेवली. नंतर जेव्हा दरबार भरला तेव्हा बादशहाने बिरबलास सर्व सरदारांसमोर बोलावले आणि विचारले, “बिरबला, माझ्या हातातली अंगठी इथे काढून ठेवली होती. नेमकी कुणी घेतली ते काही लक्षात येत नाही. तुला येईल का त्याचा शोध घेता?” बिरबल विचार करू लागला. तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली. बिरबलाने सर्व सरदारांच्या दाढीकडे एक नजर टाकली आणि बिरबल बादशहास म्हणाला, “महाराज ! ज्या सरदाराच्या दाढीत काडी अडकली आहे त्यानेच तुमची अंगठी घेतली आहे!” असे म्हणताच बिरबलाने पुन्हा प्रत्येक सरदारांच्या चेहऱ्याकडे पाहिले. जवळजवळ सगळेच सरदार शांत बसून राहिले होते.

मात्र एका सरदाराने उगीचच स्वतःच्या दाढीला हात लावून पाहिला. ‘आपल्या दाढीत खरंच काडी अडकलेली नाही ना!’ आणि मग बिरबल लगेच म्हणाला, “महाराज! महाराज !! तो बघा तो बघा सरदार, आपल्या दाढीला हात लावून पाहतोय. त्यानेच तुमची अंगठी घेतली आहे!” आणि मग त्या सरदाराला बोलावल्यावर त्याने लगेच कबुली दिली आणि मग मात्र सर्वच सरदार बादशहाला म्हणू लागले, “महाराज! बिरबल खरोखरच हुशार आहे!”


गाढव थांबेचना

बादशहाला रोजच्या रोज तोच कारभार पाहून कंटाळा आला. मग त्याने विरंगुळ्यासाठी बिरबलास सांगितले, ” बिरबला, जा. आज एखादे विनोदी सोंग घेऊन ये आणि माझे मनोरंजन कर! “

बादशहाने बिरबलाची बरीच वाट पाहिली. शेवटी बादशहा एकटाच रस्त्याने फिरायला जाऊ लागला. तेवढ्यात समोरून एक गाढववाला एका गाढवाला हाकत रस्त्याने येताना दिसला.

मग बादशहाने त्याला पाहून रस्त्याच्या एका बाजूने जायला सुरुवात केली. पण गाढव त्याच बाजूने येत राहिले. बादशहा शेवटी वाटेतच थांबून राहिला आणि त्या गाढववाल्यास म्हणाला, “अरे, तुझ्या त्या गाढवाला थांबव ना!” मग तो गाढवाला म्हणाला, “महाराज, मी तोच प्रयत्न करतोय. पण आपण थांबायलाच तयार होत नव्हतात आत्तापर्यंत!” साक्षातबादशहाने त्या गाढववाल्याकडे पाहिले तर बिरबलच वेष पालटून आला होता. मग बिरबल बादशहा वाटेतच मनसोक्तपणे हसत बसले.


उंटाची मान

camel neck story उंटाची मान

बादशहा एकदा मोठ्या संकटात सापडला होता, परंतु त्यावेळी अर्थातच बिरबलाने आपल्या बुद्धिचातुर्याने बादशहाची सुटका केली होती. तेव्हा बादशहाने बिरबलास आपण लवकरच त्याबद्दल जहागिरी देऊ असे मोठ्या मनाने आश्वासन दिले. परंतु शेवटी ते नुसते कोरडेच आश्वासन राहिले. ५-६ महिने झाले तरी बादशहा काही त्या जाहागिरीचे नावच काढेना. एवढेच नाही तर बिरबल एकदा बादशहाकडे दरबारात गेला, त्याला आठवणही करून दिली, “महाराज, आपण म्हटल्याप्रमाणे आपण मला जहागिरी देण्याची कृपा करावी!” परंतु यावर बादशहाचे एक नाही आणि दोन नाही. उलट टाळाटाळ करण्यासाठी बादशहाने आपली मान पूर्ण वाकडीच केली. कालांतराने बिरबल-बादशहा फिरायला

चालले असताना वाटेत बादशहास एक उंट दिसला. त्या उंटाकडे बघत बादशहा बिरबलास म्हणाला, “काय रे बिरबला, त्या उंटाची मान एवढी वाकडी का?” त्यावर बिरबलाने अतिशय चतुराईने उत्तर दिले, “आता त्या उंटाची मान का वाकडी ? त्याची मान का वाकडी असेल या मागचे खरे कारण काय असेल ते सांगू? त्यानेही कुणालातरी, आपण करून घेतलेल्या कामाच्या मोबदल्यात जहागिरी देण्याचे आश्वासन दिले असेल आणि जहागिरी मागणारा माणूस त्याच्या समोर उभा असेल. त्याला जर जहागिरी द्यायची नसेल तर उंट आपली मान वाकडी करण्याशिवाय दुसरे काय करू शकणार?”

बिरबलाचे चपखल उत्तर ऐकून बादशहा मनातून अतिशय खजिल झाला आणि मग मात्र दरबारात गेल्यावर जरा देखील क्षणाचाही विलंब न लावता बादशहाने बिरबलास तत्काळ जहागिरी देऊ केली.


चालणारी गाजरे

एकदा ब्रह्मदेशाच्या राजाने बादशहाला पत्र पाठविले आणि चालणारी गाजरे भेट म्हणून पाठवून द्यावीत अशी इच्छा प्रकट केली. बादशहाने दरबारात सर्व सरदारांशी चर्चा केली की अशी चालणारी गाजरे कोण देऊ शकेल. प्रत्येक जण विचार करू लागला. मात्र कुणालाही सुचेना की अशी गाजरे आणायची तरी कोणाकडून? शेवटी बिरबलास हा प्रकार कळल्यावर त्याला एक युक्ती सुचली. त्याने एक बैलगाडी आणली. त्या बैलगाडीला चहुबाजूने खोक्यासारख्या फळ्या ठोकल्या. त्यात त्याने शेण, माती भरली. गाजरे लावली. रोज नेमाने खत आणि पाणी घातल्याने गाजरांची वाढ चांगली होऊ लागली. आणि मग ती गाजरे आलेली

बैलगाडी बिरबलाने राजवाड्यासमोर आणली. बादशहाने बिरबलाच्या युक्तीचे संपूर्ण दरबारात भरपूर कौतुक केले आणि ती तशीच गाजरे असलेली बैलगाडी ब्रह्मदेशाच्या राजाला भेट म्हणून पाठवण्यात आली. खरोखरच चालती गाजरे पाहून ब्रह्मदेशाचा राजा खूपच खूष झाला आणि त्याने दिल्ली दरबारच्या दूताबरोबर मौल्यवान हिऱ्यांचा नजराणा पाठविला.


गरिबी – श्रीमंती

rich poor story गरिबी-श्रीमंती

एकदा बिरबल बादशहा एका प्रसिद्ध कीर्तनकाराचे प्रवचन ऐकण्यासाठी गेले. कीर्तनकाराने खूप सुंदर शब्दात आपल्या प्रवचनातून विचार मांडले. “आपण सारे एकाच ईश्वराची लेकरे आहोत आणि ईश्वरही सर्वांवर सारखेच प्रेम करतो.” परंतु हे विचार ऐकून बादशहाला प्रश्न पडला, तो बिरबलास म्हणाला, “अरे पण असें जर आहे तर काही गरीब-काही श्रीमंत असा फरक या विश्वात का दिसून येतो?”

मग बिरबलाने सुद्धा कीर्तनकाराच्या विचाराचे अत्यंत सोप्या भाषेत समर्थन केले, “महाराज, आपण राजे आहात. राजा हा प्रजेला पित्यासमान असतो. असे असूनही आपण कुणाला हजार, कुणाला पाचशे रुपये पगार देता. ईश्वर हा ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पुण्याईप्रमाणे सुख देतो. आपण सुद्धा ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार, गुणवत्तेनुसार पगार देता!” तरी देखील बादशहाला पुन्हा एक प्रश्न पडला, “काही जणांना एवढा पैसा मिळतो की तो सात पिढ्यांना बसून पुरावा आणि काहींना तर पोट भरणे सुद्धा कठिण जाते. असे का होते?”

त्यावर बिरबल बादशहाला म्हणाला, “माणसाची गरिबी असेल तर त्याने जर मेहनत केली तरच तो त्यावर मात करू शकतो. मेहनत करणाऱ्यालाच नेहमी देव आणि दैव यांच्याकडून साथ मिळते. समता जर निर्माण झाली तर सगळा व्यवहार बंद पडेल. एखाद्या जवळ जर एक गोष्ट नसेल तर ईश्वर त्याला दुसरी एखादी गोष्ट देतो. माणूस त्याच्याजवळ जे आहे त्याचा विचार न करता जे जवळ नाही त्याचाच विचार करत बसतो. त्यामुळेच तो गरीब राहतो.”

बिरबलाचे हे सर्व परिपक्व विचार ऐकून बादशहाला त्याच्या विषयी खूप समाधान वाटले. त्याने बिरबलास शाबासकी दिली, बादशहा बिरबलाला म्हणाला, “शाब्बास बिरबला ! तुझे विचार अत्यंत आदर्शकारी आहेत. दरबारातील नवरत्नांइतका तू एकटा तोलामोलाचा आहेस ! नवरत्नांची मिळून जेवढी बुद्धिमत्ता व्हावी तेवढी बुद्धिमत्ता एकट्या तुझ्याजवळ आहे!”


मूर्ख माणूस

बादशहाला एक छंदच लागला होता, तो सतत ह्या ना त्या कारणाने काही ना काही चित्रविचित्र प्रश्न विचारून बिरबलास अडचणीत टाकी. तसेच त्याची तो जातीवरून, धर्मावरून थट्टाही करीत असे. पण मग बिरबलाने एकदा काय केले बादशहाची भरपूर तारीफ करून त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवले आणि त्याला विचारले, “महाराज महाराज, मी खूप विचार केला परंतु मला काही केल्या एका प्रश्नाचे उत्तर येत नाही. आपण सांगू शकाल?”

बिरबलाने हा प्रश्न विचारल्यावर बादशहाला त्याच्यातील हुशारीबद्दल थोडा अहंकारच वाटू लागला. कारण एरवी कुठल्याही बाबतीत वेळोवेळी बिरबल आपली चतुराई दाखवून अडचणी दूर करत असे आणि आज उलट झाले, बिरबल कोड्यात पडला! बादशहा मोठ्या उदारपणाचा आव आणीत बिरबलाला म्हणाला, “विचार ना विचार! खुशाल विचार. कसलाही संकोच न करता मला प्रश्न विचार. मी उत्तर देईन त्याचे अगदी योग्य असे उत्तर!”

मग बिरबलाने बादशहास प्रश्न विचारला, “महाराज, मला असे सांगा की सूर्य हा रोज पूर्वेलाच का उगवतो. तो कधी पश्चिमेला नाहीतर दक्षिणेला का नाही उगवत!”

बिरबलाचा प्रश्न ऐकून बादशहाला खूप विचित्रच वाटले. असला काय मूर्खपणाचा प्रश्न विचारतो आहे हा बिरबल. शेवटी वैतागून बादशहा बिरबलास म्हणाला, “अरे असला विचित्र प्रश्न मला काय विचारतोस? एखाद्या मूर्ख माणसाला विचार. मग मिळेल तुला ह्या प्रश्नाचे उत्तर!”

बादशहाच्या ह्या वाक्यावर बिरबल अगदी शांतपणे बादशहास म्हणाला, “महाराज, म्हणून तर मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो आहे!”

बिरबलाचे उत्तर ऐकून बादशहा वरमला. त्याला कायमचे कळून चुकले की कधीही आपण स्वतःला बिरबलापेक्षा जास्त हुशार समजू नये.


फाशीची शिक्षा

बादशहा जेवढा चांगला होता तेवढाच कुणालाही शिक्षा देण्याबाबतीत वाईट होता. तो चिडल्यावर शिक्षा देताना एकदम टोकाचीच शिक्षा देई. एकदा काय झाले, दरबारात एक सैनिक अधिकारी आला. त्याने बादशहाचे नाव उच्चारताना चुकीचे उच्चारले. त्यामुळे साहजिकच बादशहाला खूप राग आला. बादशहाने रागाच्या भरात त्याला फाशीची शिक्षा पुकारली.

वास्तविक त्या सैनिक अधिकाऱ्याने कुठलीच गोष्ट मुद्दाम केली नव्हती आणि सैनिक अधिकाऱ्याला फाशीच ठोठवावी इतकी मोठी चूक तर त्याच्याकडून अजिबात घडली नव्हती. मग तो अधिकारी बिरबलाकडे गेला. त्याच्या हातापाया पडला. गयावया केली. तो म्हणाला, “साहेब, मला वाचवा. मी मुद्दाम केलेले नाही!” मग बिरबल बादशहाकडे गेला. बादशहाचा राग अद्याप शांत झालेला नव्हता. तो बिरबलास बोलूच देत नव्हता. बादशहा बिरबलास म्हणाला, “तू मला काहीसुद्धा सांगायच्या फंदात पडू नकोस. तू जे सांगशील, नेमके मी त्याच्या उलटे करीन.”

याच वक्तव्याचा फायदा बिरबलाने घेतला. तो लगेच बादशहाला म्हणाला, “महाराज मग ह्या अधिकाऱ्यास आत्ताच्या आत्ता फाशीच द्या!”

बिरबल बोलेल त्याच्या उलट करण्याचा निर्णय बादशहाने जाहीर केल्याने बादशहाला आता फाशीचा निर्णय रद्द करणे भाग पडले.


अचूक उत्तर

एकदा काय झाले, बादशहाने दरबारातल्या सगळ्या सरदारांना गणित घातले. बादशहा म्हणाला, “मला याचे उत्तर क्षणात हवे.”

बादशहाने गणित घातले, “सत्ताविसातून नऊ गेले तर किती उरले!” सगळ्या सरदारांना ह्या गणिताचे खूप आश्चर्यच वाटले. जो तो क्षणार्धात उत्तर सांगू लागला, “महाराज सत्ताविसातून नऊ गेल्यावर उरतात अठरा!”

परंतु त्यावर बादशहा म्हणाला, “सत्ताविसातून नऊ गेल्यावर अठरा उरतात हे उत्तर पूर्णपणे चुकीचे आहे.” मग तेवढ्यात तिथे बिरबल आला, त्याने सांगितले, “महाराज, सत्ताविसातून नऊ गेल्यावर शून्य उरते!” यावर बादशहा म्हणाला, “अगदी बरोबर!”

बिरबलाने ते उत्तर सर्व सरदरांना समजावून सांगितले, “प्रत्येक वर्ष

हे २७ नक्षत्रांचे असतात. त्यात ९ नक्षत्रे पावसाची असतात. तीच नक्षत्रं नसली तर पाऊस पडणार नाही. खूप दुष्काळ पडेल. तुम्हाला काही खायला प्यायला मिळणार नाही. त्यामुळे कुणी जिवंत राहणारच नाही.

सगळेच संपून जाईन. बाकी शून्य उरेल!”

मग बादशहाने बिरबलाचे कौतुक केले, “बिरबला तूच खरा बुद्धीमान आणि चतुर पुरुष आहेस!”


चिमणीची गोष्ट

एकदा बादशहा आजारी पडला. त्याने एक इच्छा व्यक्त केली की त्याला रात्रभर सारखी कुणीतरी गोष्ट सांगत राहावी. कारण बादशहाला आजारपणामुळे झोप येत नव्हती आणि गोष्टसुद्धा सांगून सांगून किती सांगणार? प्रत्येक गोष्ट संपली की बादशहा सारखा प्रश्न विचारी, मग काय झाले? मग काय झाले? त्यामुळे गोष्ट सांगणाऱ्याला सुद्धा कंटाळा यायचा. शेवटी मग बिरबलच बादशहाकडे गोष्ट सांगायला आला. तो गोष्ट सांगू लागला, “तर एक भिल्ल होता. त्याने झोपडीत त्याचे धान्य साठवून ठेवले!”

बादशहा म्हणाला, “मग काय झाले?”

बिरबल म्हणाला, “तिथे एकेक चिमणी येऊ लागली!” बादशहा म्हणाला, “मग काय झाले?” बिरबल म्हणाला, “एक चिमणी आली एक दाणा घेऊन निघून गेली!” बादशहा म्हणाला, “मग काय झाले?” बिरबल म्हणाला, “मग दुसरी चिमणी आली, दुसरा दाणा घेऊन निघून गेली!” बादशहा म्हणाला, “मग काय झाले?” बिरबल म्हणाला, “तिसरी चिमणी आली. तिसरा दाणा घेऊन ती निघून गेली!” पुन्हा बादशहाने विचारले, “मग काय झाले?” बिरबलाने उत्तर दिले, “मग चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी अशा पाचशे चिमण्या आल्या आणि एकेक दाणा घेऊन भूर्र ई ई! उडून गेल्या!”

मग बादशहा म्हणाला, अरे बिरबला, “तुझे असे ह्या गोष्टीत किती वेळ चालणार? सारखी एक चिमणी येते आणि दाणा घेऊन उडून जाते भुर्र ई ई!”

मग बिरबल म्हणाला, “महाराज, अशा लाखो चिणण्या आल्या आणि एकेक दाणा घेऊन उडून गेल्या भूर्र र्र ई!” मग बादशहा वैतागून म्हणाला, “मला कंटाळा आला तुझ्या गोष्टीचा आणि आता रात्रभर हे तुझे असेच चालणार…!”

मग मात्र बिरबलाने बादशहाला स्पष्ट सांगितले, “महाराज, आपण सारखे गोष्ट चालू असताना, मग काय झाले, मग काय झाले असे विचारणे थांबवतच नाही. त्यामुळे त्या चिमण्यातरी यायच्या थांबणार कशा?” त्यानंतर मात्र बादशहाला आपली चूक कळली. मग त्याने, “मग काय झाले?” विचारणे थांबवले.


आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.

Leave a Comment