गाय, आमचा मोती, हत्ती, मी पोपट बोलतोय !, मोर, गावातील सकाळ, पावसातील मौज, माझा आवडता ऋतू , माझे आवडते फूल, आंबा (फळांचा राजा), माझे घर, माझी आई, माझी बहीण, माडाचे मनोगत | निबंध
आपल्याला स्वागत आहे! ह्या विशेष ब्लॉगवर विविध मराठी निबंधांची [ Marathi Nibandh Marathi Essay ] मालिका आहे, ज्यातल्या विषयांवर निबंध लिहिण्यासाठी आपल्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, आणि नोकरदारांना सहाय्य मिळेल. या ब्लॉगमध्ये, निवडक विषयांवर विचार करण्यासाठी विविध प्रेरणादायी निबंध प्रस्तुत केले जातात. हे निवडक विषय आहेत: गाय, आमचा मोती, हत्ती, मी पोपट बोलतोय!, मोर, गावातील सकाळ, पावसातील मौज, माझा आवडता ऋतू, माझे आवडते फूल, आंबा (फळांचा राजा), माझे घर, माझी आई, माझी बहीण, आणि माडाचे मनोगत. या निबंधांमध्ये, आपल्याला साधारण व्याख्यान, व्याख्यान, आणि विचार करण्याची कौशल्यातून उत्तम निबंध मिळेल, ज्यामध्ये सामाजिक विचार, प्रेरणादायी कथा, आणि विविध अनुभव आपल्या विद्यार्थ्यांना विचारण्यासाठी प्रस्तुत केले जातात. त्यातली बालभाषेची सरलता आणि विचारशीलता आपल्याला आवडेल, आणि आपल्या विद्यार्थ्यांना नवीन विचारांसाठी प्रेरित करेल. आपले स्वागत आहे आणि निबंधांतील आपल्या रुचीचे विषय निवडण्याचे आणि सर्व अद्याप विशेषतः २ वा, ३ वा, ४ वा, ५ वा, ६ वा, आणि ७ वा वर्गातील विद्यार्थ्यांसाठी उत्तम निबंध स्रोत म्हणून वापरायला सोपा होईल.
गाय – Marathi Nibandh
Marathi Essay on cow
गाय हा पाळीव प्राणी आहे. गाय स्वभावाने मायाळू व शांत असते. गाईला चार पाय, दोन शिंगे, दोन कान, दोन डोळे व एक गोंडेदार शेपटी असते. गाईचा रंग साधारणपणे पांढरा, काळा किंवा तांबूस असतो. गाईला घातला हिरवा चारा,
गाय गवत, झाडपाला व आपण दिलेले अन्न खाते. ‘ की देते भरपूर दुधाच्या धारा,’ अशी तिची थोरवी आहे. गाईचे दूध सकस असते. ते प्यायल्याने शक्ती येते. गाईचे दूध पचनास हलके असते. लहान मुलांच्या योग्य फारच उपयुक्त असते. लहानथोरांना गाईचे दूध फार आवडते.
वाढीसाठी गाईचे दूध गाईच्या दुधापासून दही, ताक, लोणी व तूप तयार करतात. हे तूप औषधातही उपयोगात आणतात. गाईच्या शेणापासून जळणासाठी लागणाऱ्या गोवऱ्या व खत तयार होते. खेडोपाडी मातीच्या घरांतील जमिनी शेणाने सारवतात; त्यामुळे घर स्वच्छ राहते. गाईचे मूत्र (गोमूत्र) घरात शिंपडले की घर पवित्र होते असे मानतात. अशी विविध प्रकारे गाय आपल्या उपयोगी पडते.
गाय ही आईप्रमाणे मायाळू असल्यामुळे तिला ‘गोमाता’ असे म्हणतात. गाईची दरवर्षी आश्विन वदय द्वादशीच्या म्हणजे वसूनारसच्या दिवशी पूजा करतात.
घराचा राखणदार-आमचा मोती – Marathi Nibandh
શૂડ ડ મૂડ ડ મૂડ ડ
ओळखलात ना हा आवाज ? भिऊ नका हं! हा आवाज तुमच्या चांगलाच ओळखीचा असेल. हा आवाज आहे आमच्या कुत्र्याचा बरं का !
आमच्या कुत्र्याचे नाव आहे मोती. तो घराची राखण करतो; तशीच शेताचीही राखण करतो.
मोतीला भाकरी, मांस व पाव-बिस्किटे फार आवडतात. त्याला हाडे चघळायचीही सवय आहे.
मोती सशाची व इतर लहान प्राण्यांची शिकार करतो. प्रसंगी तो वाघाशीही सामना देईल असे वाटते.
कोणी अनोळखी माणूस दिसला की, ह्याने भुंकायला सुरवात केलीच म्हणून समजा. घरी आलेल्या पाहुण्यांची एकदा ओळख झाली, की मग मात्र तो त्यांना कधीही विसरत नाही. मात्र चोराची हालचाल तो बरोबर ओळखतो आणि त्याचा पाठलाग करतो.
कुत्रा हा इमानी प्राणी आहे. तो आपल्या मालकाशी एकनिष्ठ असतो. मालक दिसला की, तो प्रेमाने शेपटी हलवत त्याला सामोरा जातो आणि आनंदित होतो. आमचा मोती असाच वागतो. म्हणूनच तो सर्वांचा आवडता आहे.
अबब! केवढा मोठा हत्ती !
Marathi Essay on Elephant
अबब ! केवढा मोठा प्रचंड प्राणी हा !
ह्या प्रचंड प्राण्याचे नाव हत्ती आहे. याचे कान सुपाएवढे मोठे आणि पाय खांबासारखे जाड असतात. हा प्राणी आकाराने खूप मोठा असला तरी त्याचे डोळे मात्र फारच लहान असतात आणि शेपटी तर इवलीशीच ! हत्तीला एक लांब सोंड असते. सोंड म्हणजे त्याचे नाक होय.
हत्तीला भुईमुगाच्या शेंगा फार आवडतात. सोंडेने तो आपले अन्न उचलतो व तोंडात टाकतो. झाडाच्या कोवळ्या डहाळ्या व ऊस तो मजेने खातो. पाण्यात डुंबणे तर त्याला फार आवडते.
हत्तीच्या सोंडेजवळ दोन बाजूंना दोन पांढरेशुभ्र सुळे असतात. अन्न खाण्यासाठी त्याच्या तोंडात निराळे दात असतातच. त्याच्या ह्या सुळ्यांपासून निरनिराळ्या शोभेच्या वस्तू बनवतात. लाकडे वाहण्याच्या कामी हत्तीची फार मदत होते. सोंडेने तो मोठमोठी झाडे मुळासकट उपटून टाकतो. हत्ती सर्कशीत अतिशय चांगली कामे करतो. हत्ती आम्हां लहान मुलांना खूप खूप आवडतो.
मी पोपट बोलतोय !
Marathi Essay on Parrot
मी आहे पोपट. मला तुम्ही ‘मिठू’ म्हणता. माझा रंग हिरवा आहे. माझी चोच लाल आणि बाकदार आहे. माझ्या गळ्याजवळ हा जो पट्टा दिसतो ना, तो माझा कंठ.
माझे आवडते अन्न म्हणजे पेरू, मिरची आणि भिजलेली डाळ. मला झाडावरचा पिकलेला बदाम फार आवडतो. मी झाडाच्या ढोलीत राहतो.
मी दिसायला सुंदर आहे. मी गोड गोड बोलतो म्हणून तुम्ही मला पकडता आणि पिंजऱ्यात ठेवता. हौसेने पाळता. तुम्ही मला ‘जय, जय’, ‘या बसा’, ‘नमस्कार’, ‘विठू-विठू’ असे बोलायला शिकवता. मी शिकवल्याप्रमाणे बोलू लागलो की, तुम्हांला मोठी गंमत वाटते. मग तुम्ही आनंदाने टाळ्या वाजवता आणि म्हणता, “वा, वा ! आमचा पोपट कसा छान छान बोलतो.”
तुमचा लहानगा भाऊ बोबड्या शब्दांत पटापटा बोलू लागला की, तुम्ही मोठ्या कौतुकाने म्हणता, “बघा, आमचा अभिजित कसा पोपटासारखा बोलतो तो!” हे ऐकून मला आनंद होतो; मग मी आनंदाने दांडीवर झोके घेतो.
माझे तुम्ही इतके कौतुक करता, चांगले चांगले खायला घालता, पण तुम्ही मला पिंजऱ्यात ठेवल्यामुळे मी दुःखी आहे. मोकळ्या आकाशात आनंदाने बागडण्यासाठी तुम्ही मला सोडाल का?
मोर
Marathi Essay on Peacock
” थई थुई नाच माझ्या अंगणात मोरा, साऱ्या पक्ष्यांचा तू राजा शोभतोस खरा !”
मोर हा पक्षी खूप सुंदर ष रूपवान आहे. हिरव्या व निळ्या रंगांमुळे त्याचे अंग खुलून दिसते. त्याच्या डोक्यावर असलेला तुरा शोभिवंत दिसतो. त्याची मान लांब व बाकदार आहे. त्याच्या सुंदर पंखांवर लांब पिसे असून त्यांवर इंद्रधनुष्यासारखे रंग खुलून दिसतात. तो जेव्हा आपला पिसारा फुलवतो तेव्हा तो पिसारा सुंदर दिसतो. त्यावरील डोळ्यांच्या आकाराची रंगीबेरंगी नक्षी पाहून आपले मन प्रसन्न होते. त्याचे शरीर जड असल्यामुळे त्याला उडता येत नाही.
पावसाळा आला की, मोराला फार आनंद होतो. आकाशात ढगांचा गडगडाट सुरू झाला की, तो ‘म्याओ, म्याओ’ असे ओरडतो आणि पिसारा फुलवून ‘थुई थुई ‘ नाचायला सुरवात करतो. त्याचा नाच फारच मोहक वाटतो. मोराच्या मादीला
‘ लांडोर’ म्हणतात. मोर दाणे, कीटक व रानातील चारा खातो.
मोर हे सरस्वती देवीचे वाहन आहे असे मानले जाते. तसेच आपल्या देशात मोराला ‘राष्ट्रीय पक्ष्या ‘चा मान मिळाला आहे.
गावातील सकाळ
कोबडा आरवला. पहाट झाली. गावातील सारेजण जागे होऊ लागले. बायका दळण दळू लागल्या. देवळात काकडआरती सुरू झाली. देवळातील घंटानादाने वातावरण भक्तिभावाने भरून गेले. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. फुले फुलून सर्वत्र सुगंध दरवळू लागला.
हळूहळू सर्व दिशा गुलाबी रंगाने खुलून दिसू लागल्या. डोंगराआडून सूर्याचे लाल बिंब वर येऊ लागले. सूर्याचे कोवळे किरण चोहोबाजूंना पसरले आणि लख्ख प्रकाश पडला.
बायका घागरी घेऊन नदीवर पाणी आणायला निघाल्या. शेतकरी बैल व नांगर घेऊन शेतावर निघाले. गुराखी गुरे घेऊन रानात निघाले. पक्षी चारा आणण्यासाठी आकाशात उडाले. सारेजण नव्या जोमाने कामाला लागले.
अशी ही सर्वांना नव्या उत्साहाने कामाला लावणारी सकाळ ! चला, आपणही उत्साहाने अभ्यासाला लागूया !
पावसातील मौज
Marathi Nibandh on Rainy Season
गाढ झोपेत असतानाच आईची हाक ऐकू आली, “उषा, आज उठायचं नाही का?” मी उठून बसते, तोच पाऊस सुरू झाला. मी खिडकीजवळ बसून पावसाची मजा पाहत होते.
मी आज शाळेत जाऊ नये असेच पावसाला वाटत असावे; कारण पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. त्यामुळे शाळेत न जाण्याची परवानगी आईकडून मिळाली. मग काय विचारता, दुधात साखरच पडली !
पाऊस सारखा कोसळत होता. रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. वाहनांची रहदारी कमी झाली होती. कामावर जाणाऱ्या लोकांचा गोंधळ उडाला होता. गुडघाभर पाण्यातून एका हांताने पॅण्ट सावरत व दुसऱ्या हातात छत्री धरून लोक जात होते. छत्र्या नसलेले लोक दुकानांच्या आडोशाला उभे राहून पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. पाण्यातून एखादी मोटार भुर्रकन निघून जाई आणि दोन्ही बाजूंनी पाण्याचे फवारे उडत; त्यामुळे आधीच भिजलेले लोक अधिकच भिजत.
थोड्याच वेळात पाऊस ओसरला. मग चाळीतील मुलांची धम्माल उडाली. बांध कोसळून पाण्याचा लोंढा जसा पुढे सरकतो तशा मुलांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर आल्या. त्यांनी कागदाच्या होड्या पाण्यात सोडल्या आणि एकमेकांच्या अंगावर पाणी उडवून सर्वजण ओलेचिंब झाले.
अचानक पडलेल्या पावसाची मौज काही औरच असते.
माझा आवडता ऋतू
Marathi Nibandh on Rainy Season
उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत. या सर्वांत मला आवडतो पावसाळा. रखरखीत सृष्टी पावसाळ्यात शांत व हिरवीगार होते. जिकडेतिकडे हिरवळ व पाण्याचे ओहोळ पाहून मन शांत व आनंदित होते.
पाऊस पडायच्या अगोदर आकाशात काळेकुट्ट ढग जमतात. ढगांचा
गडगडाट आणि विजांचा चमचमाट होतो आणि मग पाऊस पडू लागतो. ओल्या झालेल्या मातीचा सुगंध मन धुंद करून टाकतो.
मग आम्ही मुले ‘ये रे ये रे पावसा’ हे गाणे म्हणत अंगणात नाचू लागतो. कागदाच्या होड्या करून वाहत्या पाण्यात सोडतो आणि मजा पाहतो. धो, धो पाऊस पडू लागला की, कितीतरी आनंद होतो. शेतकऱ्यांच्या आनंदाला तर पारावारच राहत नाही. नदी, नाले व विहिरी तुडुंब भरून वाहतात. शेती जोमाने तयार होते. गाईगुरांना भरपूर चारा मिळतो. झाडे व वेली हिरव्यागार दिसतात. त्यांच्यावर फुललेली रंगीबेरंगी फुले टवटवीत दिसतात. डोंगरावरून कोसळणारे धबधबे आणि कधी कधी आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य यांची शोभा तर फारच छान दिसते.
असे सर्वांचेच जीवन फुलवणारा आनंदाचा व समाधानाचा ऋतू म्हणजे पावसाळा ! म्हणूनच मला तो फार आवडतो.
माझे आवडते फूल
जाई, जुई, मोगरा, गुलाब ह्या फुलांचा सुवास बागेत सगळीकडे दरवळत असतो; परंतु या फुलांमध्ये मला गुलाबाचेच फूल फार आवडते.
गुलाबाचे फूल सुगंधी व डौलदार असते, म्हणूनच ते मोहक वाटते. जसा ‘जंगलाचा राजा सिंह’, ‘फळांचा राजा आंबा’ तसा ‘फुलांचा राजा गुलाब’ होय.
गुलाबाचे झाड काटेरी असते. पण याच काट्यांतून नाजूक असा गुलाब फुलतो. तो टवटवीत दिसतो. लाल, गुलाबी, पिवळा व सफेद असे गुलाबाचे अनेक रंग असतात.
गुलाबाच्या फुलांपासून गुलकंद तयार करतात. गुलाबपाणी व अत्तरही बनवले जाते. गुलावाचे फूल औषधी आहे. गुलाबाची फुले हारासाठी व पूजेसाठी उपयोगात आणतात. स्त्रिया गुलाबाचे फूल आवडीने वेणीत माळतात. फुलदाणीत ठेवलेला गुलाबांचा गुच्छ घराची शोभा वाढवतो.
पंडित जवाहरलाल नेहरूंना गुलाबाचे फूल फार आवडे. ते नेहमी गुलाबाचे फूल आपल्या कोटावर लावत असत.
गुलाबाचे फूल स्वतः काट्यांत राहून दुसऱ्यांना आनंद देते, म्हणून ते मला खूप खूप आवडते.
गुलाबाचे फूल दिसते छान।
फुलांच्या राजाचा मोठा मान ।।
आंबा – फळांचा राजा
आंब्याच्या झाडाला सर्व वृक्षांमध्ये महत्त्वाचा वृक्ष मानतात. हे झाड आकाराने मोठे असून फांदयापानांनी गच्च भरलेले असते. आंब्याच्या डहाळ्या व पाने लग्नकार्य, पूजा इत्यादी शुभप्रसंगी उपयोगात आणतात.
वसंत ऋतूत आंब्याच्या झाडाला मोहोर येतो; त्यावेळी कोकिळ पक्षी या झाडावर बसून गोड आवाजात गाऊ लागतो. त्यामुळे मन आनंदित होते.
लवकरच आंब्याच्या झाडावर कैऱ्या दिसू लागतात. त्या मोठ्या झाल्यावर पिकू लागल्या की, गोड व रसाळ आंबे मिळू लागतात.
पिकलेला आंबा लालसर, पिवळा दिसतो. तो गोड व रुचकर लागतो. सर्व फळांत आंब्याचे फळ चवीला उत्तम असल्यामुळे त्याला ‘फळांचा राजा’ किंवा ‘अमृत फळ’ असेही म्हणतात.
हापूस, पायरी, रायवळ, लंगडा, तोतापुरी असे आंब्याचे अनेक प्रकार आहेत. रत्नागिरीचा हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे. त्याला इंग्लंड, अमेरिका व इतर काही देशांत खूप भागणी असते.
कच्च्या आंब्याचे (कैरीचे) पन्हे, लोणचे व मुरंबा करतात. रसाळ आंब्यापासून आमरस, आंबेपोळी व आंबावड्या करतात.
झिम्मा खेळताना मुली गाणे म्हणतात –
आंबा पिकतो, रस गळतो।
कोकणचा राजा झिम्मा खेळतो ।।
माझे घर
‘माझे घर’. फक्त दोनच शब्द; पण त्यात किती मोठा अर्थ भरला आहे. माणसाचे सारे सुख त्याच्या घरात साठवलेले असते. विश्रांतीचे स्थान म्हणजे घर.
माझे घर सुंदर व टुमदार आहे. त्यात एक खोली बैठकीची, दुसरी अभ्यासाची, तिसरी स्वयंपाकाची आणि चौथी खोली झोपायची आहे. संडास व स्नानगृह अशा सोयी घरात आहेत.
आमच्या घराला अनेक दरवाजे, खिडक्या व झरोके आहेत. त्यामुळे घरात भरपूर उजेड येतो. हवा खेळती व शुद्ध राहते. औमचे घर स्वच्छ असून हवेशीर आहे.
आमच्या घरासमोर अंगण आहे. अंगणात तुळशीवृंदावन आहे. घराभोवती छोटीशी सुंदर बाग आहे. त्या बागेत त-हेत-हेची फुलझाडे आहेत. फुले फुलली की, त्यांच्या सुवासाने सर्व घर भरून जाते. बागेमुळे आमचे घर सुंदर दिसते.
माझे हे हवेशीर घर मला फार आवडते. मी जर कधी कुठेही पाहुणा म्हणून गेलो तर परत आपल्या घरी केव्हा जाईन असे मला होते. इतके माझ्या घराचे मला आकर्षण आहे.
माझी आई
“थोर तुझे उपकार, आई, थोर तुझे उपकार !”
ही एकच ओळ आईची थोरवी सांगण्यास पुरेशी आहे. खरोखर कधीही व कशानेही फेडले जाणार नाहीत असेच तिचे उपकार असतात.
माझी आई मला फार आवडते. ती मला सकाळी लवकर उठवते. तोंड धुऊन आंघोळ झाली की स्वच्छ कपडे घालायला देते; देवाला नमस्कार करायला सांगते, मग दुधाबरोबर खाऊ खायला देते. मग मला अभ्यासाला बसवते. शाळेची वेळ झाली की जेवायला वाढून मला शाळेत पाठवते.
शाळेतून घरी आल्यावर काही ना काही ती खायला देते. दिवेलागणी होताच मला हातपाय धुऊन देवाला नमस्कार करायला लावते. ‘शुभं करोति कल्याणम्’, ‘मनाचे श्लोक’ व ‘उजळणी ‘ माझ्याकडून म्हणवून घेते.
मी आजारी पडलो तर आई रात्रंदिवस माझी काळजी घेते. मी गुणी बनावे व माझी तब्येत चांगली राहावी म्हणून ती मला चांगल्या सवयी लावते. मी परीक्षेत पहिला नंबर काढतो; त्यामुळे माझ्या आईला फार आनंद होतो. ती माझ्या पाठीवर प्रेमाने हात फिरवून म्हणते, “किती किती हुशार व गुणी आहे माझा बाळ !” त्यामुळे मला अतिशय आनंद होतो. पण काही चूक केली तर ती रागावतेही.
आपल्या मुलाने खूप खूप शिकावे, गुणी व्हावे व जगात नाव मिळवावे यासाठी माझी आई सतत झटत असते.
माझी बहीण
माझी एक लहान बहीण आहे. तिचे नाव सीमा. ती पहिलीत शिकत आहे. तिच्या बाई तिला छान छान गोष्टी सांगतात. घरी आल्यावर त्याच गोष्टी ती आम्हांला ऐकवते. वर्गात शिकवलेली गाणी हावभावांसह, आम्हांला ती गाऊन दाखवते. त्यामुळे आम्ही सर्वजण तिचे फार कौतुक करतो.
तिची कोणी थट्टा केली तर ती रडू लागते. मग खाऊ देऊनच तिची समजूत घालावी लागते. मित्रांबरोबर मी कुठे फिरायला निघालो की ती माझ्या पाठीशी लागते. पतंग उडवायला मी गच्चीवर गेलो की तीही माझ्याबरोबर येते. मग मी तिला फिरकी धरायला सांगतो. पतंग उंच उडाला की फिरकी टाकून देऊन ती टाळ्या वाजवत नाचू लागते. मग मात्र पतंग सावरताना माझी धांदल उडते.
घरातील सर्वांत छोटी म्हणून सर्वजण तिचे लाड करतात. आईने मला कधी मारले व मी रडू लागलो तर माझ्याबरोबर तीही रडू लागते. असे माझ्यावर तिचे खूप प्रेम आहे. म्हणूनच ती मला खूप आवडते.
माडाचे मनोगत
रात्रीचे नऊ वाजले असतील. वडलांनी काहीतरी काम सांगितले होते; पण ते काम मी विसरून गेलो. तेव्हा वडील रागाने म्हणाले, ” ताडामाडासारखा उंच वाढला आहेस खरा, परंतु काडीचीसुद्धा अक्कल नाही.” मला अतिशय वाईट वाटले रागावून मी अंथरुणावर झोपी गेलो.
तोच मला कोणीतरी कुजबुजल्याचा आवाज आला आणि पाहतो तो काय, माडाचे झाड मला काहीतरी सांगत आहे-
“का रे बाबा, माझे नाव तुला हिणवण्यासाठी वडलांनी घेतले, म्हणून तुला वाईट का वाटले? अरे, माझी उंची जशी खूप आहे, तसा माझा उपयोगही इतर झाडांपेक्षा जास्त आहे.
“एखादया गरिबाची झोपडी माझ्यामुळे तयार होते. शहाळ्याचे पाणी कधी प्यायला आहेस काय? किती गोड आणि किती गार! आतील खोबरे म्हणजे जणू काही दुधावरील साय ! किती चवदार असते ते! खोबऱ्याची बर्फी कशी छान लागते ! खोबरेल तेल तर सर्व बाबतींत उपयोगी पडते. या सर्व गोष्टीही माझ्यामुळेच तुम्हांला मिळतात. नारळाचे फळ देवाला आवडते. त्याला ‘श्रीफळ’ म्हणतात. माझ्यापासून केरसुण्या व दोऱ्या इत्यादी वस्तू तयार करतात. माझ्या शरीराचा कोणताही भाग वाया जात नाही, म्हणून मला ‘कल्पवृक्ष’ म्हणतात.
“तेव्हा तुझी माझ्याबरोबर तुलना केली म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. सर्व कामे वेळच्या वेळी कर आणि आपल्या सद्गुणांनी माझ्यासारखा मोठा हो !”
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.
1 thought on “निबंध | गाय | आमचा मोती | हत्ती | माझी आई | आंबा | पावसातील मौज | Marathi Nibandh | Essay”