स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून, गणेश चतुर्थी, रक्षाबंधन – नारळीपौर्णिमा, दिवाळीतील मौज, मकरसंक्रांत, होळी, माझा आवडता छंद, माझा आवडता खेळ, माणसाला शिंगे फुटली तर, मी पाहिलेले रमणीय ठिकाण : माथेरान | निबंध
आपल्याला स्वागत आहे! ह्या ब्लॉगवर आपल्याला विविध विषयांवर मराठी निबंधांचा – Marathi Nibandh Marathi Essay संग्रह मिळेल, ज्यातल्या विषयांवर आपल्याला निबंध लिहिण्यासाठी सोपे आणि स्वतंत्र विचार आहेत. या निबंधांमध्ये त्यांना विविध प्रेरणादायी निर्मिती, आणि आदर्श अभ्यास प्राप्त होईल. निवडक विषय आहेत: लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून, गणेश चतुर्थी, रक्षाबंधन – नारळीपौर्णिमा, दिवाळीतील मौज, मकरसंक्रांत, होळी, माझा आवडता छंद, माझा आवडता खेळ, माणसाला शिंगे फुटली तर, आणि मी पाहिलेले रमणीय ठिकाण : माथेरान. आपल्या विद्यार्थ्यांसाठी, विविध विषयांवर संशोधन, विचार आणि अभ्यासाच्या शिकण्याचा उत्तम स्रोत तयार करण्यात आला आहे. या निबंधांचा वाचन करून, आपल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील विविध अभ्यासात सहाय्य मिळेल. सर्व वर्गांसाठी उपयुक्त आणि अत्यंत सोपे असे निबंध संग्रह आहे. आपले स्वागत आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना नवीन विचारांसाठी प्रेरित करण्यासाठी धन्यवाद!
बालभाषेची सरलता आणि विचारशीलता आपल्याला आवडेल, आणि आपल्या विद्यार्थ्यांना नवीन विचारांसाठी प्रेरित करेल. आपले स्वागत आहे आणि निबंधांतील आपल्या रुचीचे विषय निवडण्याचे आणि सर्व अद्याप विशेषतः २ वा, ३ वा, ४ वा, ५ वा, ६ वा, आणि ७ वा वर्गातील विद्यार्थ्यांसाठी उत्तम निबंध स्रोत म्हणून वापरायला सोपा होईल.
लोकमान्य टिळक – Marathi Essay
Marathi Essay on Lokmanya Tilak
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व ते मी मिळवणारच!” अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक हे भारताचे महान पुढारी होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत ही गर्जना करून सर्व देश स्वराज्याकरता जागा केला.
टिळकांचे नाव बाळ, त्यांच्या वडलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्हयात २३ जुलै, १८५६ रोजी झाला. टिळक लहानपणापासून हुशार व करारी होते.
कॉलेजात असतानाच टिळकांनी सरकारी नोकरी न करता देशाची सेवा करण्याची शपथ घेतली होती प्रथम त्यांनी तरुणांना देशभक्तीचे शिक्षण देण्यासाठी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ नावाची शाळा काढली. जनतेत देशभक्तीची भावना उफाळून यावी यासाठी त्यांनी ‘केसरी’ व ‘मराठा’ ही वर्तमानपत्रे काढली. जनतेत ऐक्य निर्माण करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणपती उत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले.
लोकमान्य टिळक लोकांचे आवडते नेते होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून ते जन्मभर इंग्रज सरकारशी लढले. त्यांनी तुरुंगवास भोगला. त्यांना मंडाले तुरुंगात सात वर्षांची शिक्षा झाली. ही शिक्षा भोगत असतानाच त्यांनी ‘गीतारहस्य’ नावाचा ग्रंथ लिहिला.गोवि
जनतेच्या हितासाठी झटणाऱ्या टिळकांना लोकांनी ‘लोकमान्य’ ही पदवी दिली. इंग्रजांशी झगडत असतानाच वयाच्या ६४ व्या वर्षी, १ ऑगस्ट, १९२० रोजी टिळक स्वर्गवासी झाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर Marathi Essay
Marathi Essay on Savarkar
भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रज सरकारविरुद्ध ज्या अनेक क्रांतिवीरांनी चळवळी केल्या; त्यांत क्रांतिवीर सावरकरांची कामगिरी फार मोलाची आहे.
क्रांतिवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे, १८८३ रोजी नाशिकमधील भगूर येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच वाचनाचा छंद होता. त्यांची भाषाशैलीही उत्तम होती. त्यांनी वक्तृत्वस्पधांत अनेक बक्षिसे पटकावली होती.
बॅरिस्टर होण्यासाठी वीर सावरकर इंग्लंडला गेले. तेथे त्यांच्यावर क्रांतिचळवळीत भाग घेतल्याचा आरोप ठेवून त्यांना पकडण्यात आले. त्यांना अटक करून भारतात आणत असताना त्यांनी बोटीतून उडी घेतली आणि पोहत जाऊन किनारा गाठला. त्यांच्या ह्या धाडसी पराक्रमाची कीर्ती जगात पसरली.
तुरुंगात असताना सावरकरांनी ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक लिहिले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी फार मोठा त्याग करणाऱ्या या क्रांतिवीराला दिनांक २६ फेब्रुवारी, १९६६ रोजी मृत्यू आला.
महात्मा गांधी Marathi Essay
Marathi Essay on Mahatma Gandhi
गांधीजींचे नाव मोहनदास. त्यांच्या वडलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळीबाई. (गांधीजींचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे २ ऑक्टोबर, १८६९ रोजी झाला. गांधीजी नेहमी खरे बोलत. आईवर व गुरुजींवर त्यांची फार श्रद्धा होती. ते विलायतेत जाऊन बॅरिस्टर होऊन भारतात परत आले आणि येथील स्वातंत्र्यचळवळीची जबाबदारी सांभाळून साऱ्या देशाचे ते ‘बापू’ झाले.
त्यांनी सत्य, अहिंसा, शांती, असहकार व सत्याग्रह इत्यादी मार्गांनी बलाढ्य इंग्रज साम्राज्याशी मोठ्या नेटाने झुंज दिली. स्वराज्य मिळवण्यासाठी त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला; उपोषण व सत्याग्रह करावे लागले.
गांधीजींची राहणी अगदी साधी होती. ते पंचा नेसत. झोपडीत राहत. लोकांचे जीवन सुखी करण्यासाठी गांधीजी रात्रंदिवस झटत असत. गरिबांना काम मिळावे म्हणून त्यांनी चरख्याचा प्रचार सुरू केला. गरीब-श्रीमंत असा भेदभाव ते मानत नसत. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी गांधीजींनी खूप प्रयत्न केले. दलित जनतेस ‘माणूस’ म्हणून जगण्याची शिकवण दिली. ते खरोखरच ‘ राष्ट्रपिता’ होते.
गांधीजींना ‘बापूजी’, ‘महात्मा’ व’ राष्ट्रपिता’ या नावांनी ओळखले जाते. देशासाठी बलिदान करून ते अजरामर झाले !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Marathi Essay on Babasaheb Ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. त्यांना ‘दलित समाजाच्या जागृतीचे जनक’ म्हणतात. त्यांनी दलितांचे अज्ञान दूर करून त्यांना निर्भयतेने आणि स्वाभिमानाने जगायला शिकवले.
डॉ. आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल, १८९१ रोजी एका दलित कुटुंबात झाला. त्यांचे नाव भीमराव. डॉ. आंबेडकरांना शिक्षण घेताना फारच अडचणी आल्या आणि अपमानही सहन करावा लागला. पण न डगमगता त्यांनी मोठ्या धैर्याने व चिकाटीने सतत अभ्यास केला व आपले शिक्षण पार पाडले.
/ त्यानंतर आंबेडकर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले.’ तेथे त्यांनी एम्. ए. व पीएच्. डी. अशा दोन पदव्या संपादन केल्या. नंतर डॉ. आंबेडकर इंग्लंडला गेले. तेथे ते बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झाले. कायदेपंडित म्हणून त्यांनी जगात नावलौकिक मिळवला.
डॉ. आंबेडकरांना लोक आदराने ‘बाबासाहेब’ म्हणत. त्यांना वाचनाचा अतिशय नाद होता. त्यांच्याजवळ ग्रंथांचा फार मोठा संग्रह होता. लोकजागृतीसाठी त्यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी’ ही संस्था काढली. ते दलितांचे नेते बनले. महाडच्या चवदार तलावातील पाणी दलितांना भरता यावे म्हणून त्यांनी मोठा सत्याग्रह केला आणि दलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला.
दलितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर, १९५६ रोजी निधन झाले.
शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून
Marathi Essay on Shivaji Maharaj
मी वडलांबरोबर अपोलो बंदर येथील ‘भारताचे प्रवेशद्वार’ पाहायला गेलो होतो. तेथे हातातील तलवार उगारून घोडीवर बसलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून माझी छाती गर्वाने फुगून आली.
शिवाजी महाराजांचा हा पुतळा पाहून मला आमच्या गुरुजींनी सांगितलेल्या शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी आठवू लागल्या. त्यांच्या पराक्रमाचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहू लागला.
हीच ती कृष्णा घोडी! याच घोडीवर स्वार होऊन त्यांनी अनेक पराक्रम केले आणि हीच ती त्यांच्या हातातील भवानी तलवार ! याच तलवारीने शिवाजी महाराजांना अनेक लढायांत विजय मिळवून दिला.
शिवाजी महाराजांनी अनेक बहादूर मावळ्यांच्या मदतीने मुसलमान-मोगल बादशहांना ‘सळो की पळो’ करून सोडले. “आधी लगीन कोंडाण्याचे, मग रायबाचे” असे म्हणणारा तानाजी! पावनखिंड लढवणारा बाजीप्रभू देशपांडे ! मस्तक धडावेगळे झाले असतानाही शत्रूची मुंडकी उडवणारा मुरारबाजी ! अशा अनेक नरवीरांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. महाराष्ट्राचा राजा म्हणून शिवाजी महाराजांनी १६७४ साली राज्याभिषेक करवून घेतला. राज्यव्यवस्थेसाठी अष्टप्रधान मंडळ नेमले.
भारतात असा थोर राजा झाला नाही आणि होणारही नाही ! शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून सर्वजण नतमस्तक होतात.
https://marathisquare.com/shivaji-maharaj-story-in-marathi-information/: निबंध | Marathi Nibandh | होळी | स्वातंत्र्यवीर सावरकर | महात्मा गांधी | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Marathi Essayगणेश चतुर्थी
Marathi Essay on Lord Ganpati
भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे, गणेश चतुर्थी. या दिवशी जिकडे तिकडे गणेशाची मूर्ती आणण्याची धमाल उडालेली असते. गणेशाची मूर्ती वाजत गाजत आणून सजवलेल्या मखरात बसवतात. त्याची यथासांग पूजा करतात. भक्तिभावाने गणपतीला दुर्वा वाहतात व मोदकांचा नैवेद्य दाखवतात. या दिवसापासून गणेशोत्सवास सुरवात होते. हा गणेशोत्सव मुख्यतः महाराष्ट्रात साजरा केला जाणारा मोठा उत्सव आहे.
गणपती हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध दैवत आहे. संकटांचा नाश करणारे, सुख देणारे महान दैवत आहे. गणपती ही विदयेची देवता आहे. म्हणून लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण मोठ्या भक्तिभावाने व आनंदाने गणपतीची पूजा करतात. घरोघरी गणपतीची आरती होते.
काही लोक गणपतीचे विसर्जन दीड दिवसाने, काही गौरीबरोबर पाच दिवसांनी, तर काही सात दिवसांनी करतात. सार्वजनिक गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतात.
गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी ‘श्रीं’ची वाजत गाजत मिरवणूक काढतात.
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,” असे म्हणत लोक ढोल, ताशे वाजवून लेझीम खेळत खेळत, नाचत जातात. समुद्र, नदी किंवा तलाव यांत गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करतात.
गणेशोत्सव हा एक अत्यंत आनंदमय उत्सव आहे. गणेशोत्सवात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे भक्तिभाव निर्माण होतो, करमणूक होते. सामाजिक एकोपा वाढतो. ज्ञान वाढते.
रक्षाबंधन-नारळीपौर्णिमा
रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येतो. या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते. ती त्याला ओवाळते. मग भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देतो.
‘भावाचा उत्कर्ष व्हावा आणि भावाने बहिणीचे रक्षण करावे,’ ही त्यागाची व प्रेमाची भावना या प्रथेमुळे निर्माण होते.
रक्षाबंधन सणापूर्वी अनेक दुकानांत रंगीबेरंगी राख्या विक्रीसाठी मांडून ठेवलेल्या दिसतात, हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
महाराष्ट्रात रक्षाबंधन हा सण नारळीपौर्णिमा म्हणून साजरा करतात. कोळी लोक समुद्राला देव मानत असल्यामुळे या दिवशी ते समुद्राची पूजा करतात. समुद्राला नारळ अर्पण करतात. कोळी कोळणी नवीन कपडे व दागदागिने घालून गाणी गातात व नाचतात. या दिवशी जेवणात नारळीभात असतो. लहानथोर मंडळी हा सण आनंदाने साजरा करतात.
दिवाळीतील मौज
Marathi Essay on Diwali
दिवाळी हा सर्व सणांत मौजेचा आणि भरपूर आनंदाचा सण आहे. दीपावली म्हणजे दिव्यांची ओळ. घराघरांसमोर दिव्यांची आरास करून हा सण साजरा करतात; म्हणून ह्या सणाला’ दीपावली- दिवाळी’ म्हणतात.
आश्विन वदय त्रयोदशीपासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत दिवाळीचे पाच दिवस निरनिराळ्या प्रकारे साजरे केले जातात. पहिला दिवस ‘धनत्रयोदशी ‘चा. या दिवशी दारासमोर सुंदर रांगोळी काढून पणत्या व आकाशकंदील लावतात. या दिवसापासून फटाक्यांच्या ‘धूमधडधडाक् आणि सूररऽऽ’ अशा आवाजांनी दिवाळीच्या आनंदाला सुरवात होते. दुसरा दिवस नरक चतुर्दशीचा. या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान करतात. गोड गोड पदार्थ खायला मिळतात. तिसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन करतात. चौथा दिवस बलिप्रतिपदेचा. या दिवशी व्यापारी वर्गाचे नवीन वर्ष सुरू होते आणि पाचवा दिवस भाऊबीजेचा. या दिवशी मोठ्या प्रेमाने बहीण भावाला ओवाळते आणि तितक्याच प्रेमाने भाऊ तिला ओवाळणी घालतो. असे हे मजेचे पाच दिवस आनंदाने साजरे केले जातात. ि
दिवाळी हा सर्व सणांचा राजा आहे. या सणात आम्हां लहान मुलांची फारच मजा असते. आम्हांला नवीन कपडे, गोड गोड पदार्थ व फटाके मिळतात. दिवाळीत
शाळेला सुट्टी असते. दिवाळी अंक वाचायला मिळतात; त्यामुळे ज्ञानात भर पडते.
असा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांचा आवडता दिवाळीचा सण फार मौजेचा असतो.
मकरसंक्रांत
Marathi Essay on Makar Sankrant
मकरसंक्रांत हा सण १४ जानेवारीला येतो. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्याला संक्रांत म्हणतात. हा संक्रांतीचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या दिवसापासून दिवसाचे प्रमाण हळूहळू मोठे मोठे होत जाते.
संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया सूर्यनारायणाची व मातीच्या सुगडांची पूजा करतात. सुगडात ऊस, बोरे व ओला हरभरा घालून सुवासिनी एकमेकींना वाण व काही वस्तू भेट म्हणून देतात. संक्रांतीचा हळदीकुंकू समारंभ रथसप्तमीपर्यंत साजरा करतात.
मकरसंक्रांतीच्या दिवशी तीळ व गूळ मिश्रित पोळीचा खास बेत असतो. या दिवशी सर्वजण एकमेकांना हलवा व तीळगूळ देतात. “तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला,” असे एकमेकांना सांगतात.
मुलांना संक्रांतीचा दिवस फार आनंदाचा वाटतो. मुले आकाशात रंगीबेरंगी पतंग उडवून मौजच मौज लुटतात.
मकरसंक्रांतीचा हा सण प्रेमाचे व स्नेहाचे प्रतीक मानतात.
होळी
Marathi Essay on Holi
होळीचा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला (मार्च महिन्यात) येतो. महाराष्ट्रात होळीला शिमगा म्हणतात. हा सण दोन दिवस साजरा करतात.
पहिल्या दिवशी खळे सारवून मध्यभागी एखादया झाडाची मोठी फांदी रोवून त्याभोवती लाकडे, गोवऱ्या व गवत रचून होळी तयार करतात. होळीभोवती रांगोळी काढून तिला फुलांच्या माळांनी सजवतात.
होळीची पूजा करतात. मध्यरात्री होळी पेटवतात. होळी पेटवताना मोठ्याने बोंब ठोकतात. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात व होळीत नारळ टाकतात.
होळी ही हुताशनी देवी आहे. ती होळीबरोबर सर्व वाईट गोष्टींचा नाश करते असा समज आहे.
होळीच्या दुसऱ्या दिवशी ‘धूलिवंदन’ साजरे करतात. त्या दिवशी रंग व गुलाल उडवण्याचा खेळ खेळतात. एकमेकांवर रंग उडवण्यात मौज वाटते. दोन्ही दिवशी गोड जेवण करतात.
होळी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या थाटात साजरा केला जातो.
माझा आवडता छंद
Marathi Essay on My Favorite Hobby
प्रत्येक माणसाला कुठला ना कुठला तरी छंद असतोच! कुणाला लेखनाचा, कुणाला खेळण्याचा, कुणाला तिकिटे जमवण्याचा, तर कुणाला गाण्याचा छंद असतो.
मला मात्र वाचनाचा छंद आहे. मला वेळ मिळाला की, मी कुठले ना कुठले तरी पुस्तक वाचत बसतो. काही पुस्तकांमध्ये शूर जवानांच्या, धाडसी राजकुमारांच्या गोष्टी असतात. त्या वाचल्यावर त्यांच्या धाडसाचे कौतुक वाटते. वाचनामुळे जगातील पुष्कळ माहिती मिळते. ‘भक्त ध्रुव’ व ‘भक्त प्रल्हाद’ ही पुस्तके वाचून आपण त्यांच्यासारखे दृढनिश्चयी व निष्ठावान व्हावे, असे वाटते.
थोर संतांच्या, थोर समाजसुधारकांच्या गोष्टी वाचल्याने त्यांच्याप्रमाणे आपणही लोकांच्या उपयोगी पडावे असे वाटते. रामायण, महाभारत वाचून आपण नीतिमान, सद्गुणी व धीट बनतो.
अनेक पुस्तके वाचल्याने भाषा सुधारते. शब्दज्ञान वाढते. मनाला एक प्रकारचा आनंद वाटतो. माझ्या या वाचनाच्या छंदाने मी गोष्टी सांगण्यात व निबंधलेखनात पटाईत झालो आहे.
माझा आवडता खेळ
Marathi Essay on My Favorite Game
मला ‘खो-खो ‘चा खेळ अतिशय आवडतो. या खेळामुळे चांगला व्यायाम होतो. या खेळात शरीराला मोठी इजा होण्याची भीती नसते. या खेळाला मोठे मैदान लागत नाही. साहित्याचीही गरज नाही. म्हणून खर्चही येत नाही. त्यामुळे गरीब मुलांनाही हा खेळ खेळता येतो.
या खेळाचे नियम सोपे आहेत. त्यामुळे हा खेळ कंटाळवाणा वाटत नाही. खो दिलेल्या मुलाने एकाच दिशेने खुंटापर्यंत धावत जाऊन परत विरुद्ध दिशेला फिरून खेळाडूला पकडून बाद करायचे असते. विरुद्ध खेळाडूला बाद करण्यासाठी नेहमी सावध असावे लागते. तसेच आपण सापडू नये म्हणून नागमोडी वळणे घेऊन मोठ्या चलाखीने पकडणाऱ्याला चकवावे लागते.
‘खो-खो ‘च्या खेळात शक्तीपेक्षा युक्ती व चलाखी उपयोगी पडते. हा खेळ खेळल्याने अंगी चपळता येते. मोकळ्या मैदानात खेळल्यामुळे शुद्ध हवा मिळते व आपला उत्साह वाढतो; म्हणून मला ‘खो-खो ‘चाच खेळ फार आवडतो.
माणसाला शिंगे फुटली तर…
काही वेळा लहान मुले वडीलमाणसांच्या नकळत एखादी गोष्ट करतात.
कदाचित ती उघडकीसही येते. त्यावेळी वडीलमाणसे रागातच म्हणतात, “आता तुला शिंगे फुटायला लागली आहेत वाटते !”
एकदा हे वाक्य ऐकताना मी विचार केला की, माणसाला शिंगे फुटली तर काय होईल ! खरेच, माणसाला शिंगे फुटली तर काय मजा येईल नाही !
मग काय ! दोन्ही शिंगांना रंगीबेरंगी रिबिनी बांधून, दोन्ही शिंगांमध्ये फुले अडकवून मुली मोठ्या तोऱ्यात चालतील. शाळकरी मुलांचा एक प्रकारे चांगलाच फायदा होईल. एका शिंगामध्ये दफ्तर व दुसऱ्यात खाऊचा डबा अडकवला की चालले लेकाचे शाळेला ! दोन्ही हात मस्ती करण्यास रिकामे !
‘अय्या, चिमीचे शिंग किनई गडे, ‘हस्तिदंती’ आहे,” असे म्हणत चिमीच्या मैत्रिणी तिचा हेवा करतील.
“माणसाला शिंगे फुटली तर!” या कल्पनेने गंमत वाटते; पण त्यामुळे माणूस विद्रूप व विचित्र दिसेल आणि बैलात व माणसात काहीच फरक राहणार नाही.
तेव्हा माणसाला नको रे बाबा, त्या शिंगांची कटकट !
मी पाहिलेले रमणीय ठिकाण : माथेरान
Marathi Essay on My Favorite Place Matheran
माथेरान हे ठिकाण ‘कोकणपट्टीने नंदनवन’ म्हणून प्रसिद्ध आहे. मनोवेधक सृष्टिसौंदयनि नटलेले आणि मोकळ्या व थंड हवेचे हे ठिकाण पाहिले की मनाला वेड लागते आणि आपण येथेच राहावे असे वाटते.
मुंबई ते पुणे प्रवास करताना वाटेत नेरळ हे स्टेशन लागते. या स्टेशनवर उतरले की स्टेशनच्या पलीकडे माथेरानला जाणारी निळ्या रंगाची छोटी आगगाडी दिसते. या गाडीतून प्रवास करताना मोठी मौज वाटते. ही गाडी नागमोडी वळणे घेत जात असताना प्रथम ‘जुम्मापट्टी’ व नंतर ‘वॉटर पाइप’ ही स्टेशने सोडून पुढे गेली की, माथेरानचा थंडगार वारा मन उल्हसित करतो.
माथेरानला आल्यावर जिकडे तिकडे उंच वृक्षांची, झाडाझुडपांची घनदाट झाडी दिसते. या झाडीतून अनेक रस्ते नागमोडी वळणे घेत गेले आहेत.
माथेरानमध्ये निसर्गसुंदर अशी लहानमोठी छत्तीस शिखरे आहेत. त्यांपैकी पॅनोरमा, गारबट, लुइझा, पॉक्र्युपाइन व चौक पॉइंट हे पॉइंट्स मनाला वेड लावणारे आहेत.
माथेरानच्या पायथ्यापासून ते थेट माथ्यापर्यंतचा प्रवास आणि प्रत्यक्ष माथेरानमधील प्रवास म्हणजे विविध तन्हेने नटलेल्या निसर्गसौंदर्याचा जणू चलचित्रपटच होय ! असे हे माथेरानचे मनोवेधक निसर्गसौंदर्य पाहिले की डोळ्यांचे पारणे फिटते.
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.
1 thought on “निबंध | Marathi Nibandh | होळी | स्वातंत्र्यवीर सावरकर | महात्मा गांधी | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Marathi Essay”