स्वामी विवेकानंदांची भारत परिक्रमा
बंगालमध्ये इंग्रजी राजवटीत शिकून पदवीधर झालेल्या लोकांची संख्या पुष्कळ होती. काही सुशिक्षितांना विज्ञान-तंत्रज्ञानाचे अध्ययन केल्याने शास्त्रीय दृष्टी प्राप्त झाली होती. त्यांपैकी नरेंद्र विश्वनाथ दत्त हा एक बुद्धिमान युवक. प्रा. हस्टी यांच्यासारख्या प्राध्यापकाकडून स्वामी विवेकानंदांना – Swami Vivekananda तत्त्वज्ञानाचे धडे मिळाले. त्यांच्याच सांगण्यावरून ते रामकृष्णांनाही भेटले. श्री. रामकृष्णांनी नरेंद्राच्या अनेक शंकांचे निरसन केले. त्याला मूर्तिपूजेचे महत्त्वही ध्यानी आणून दिले. जवळजवळ निरक्षर अशा या गुरुदेवांनी पाश्चात्य विद्याविभूषित नरेंद्रास अध्यात्माची अनुभूती दिली. डोंगरदऱ्यांत ध्यानधारणा करत बसण्यापासून त्याला परावृत्त केले व ‘जनता हाच जनार्दन’ मानून त्याची पूजा म्हणजेच लोकसेवा करण्यास सांगितले ! नरेंद्राचे मन ध्यानधारणेकडे आणि साक्षात्काराकडेही ओढ घेत होते. त्यामुळे नरेंद्र आणि त्यांच्या गुरुबंधूंनी रीतसर विरजा होम करून सशास्त्र संन्यास घेतला. शिवाय लोकसेवा करण्यासाठी प्रथम लोकजीवनाचे दर्शन घ्यायला हवे होते. समाजात जाऊन लोक जागरणाचे काम करावयाचे तर त्यासाठी बडानगरमध्ये राहून, आपापसांत साधनेसंबंधी चर्चा करून, शास्त्रचर्चा करत राहून काय साधणार? म्हणून १८८८ मध्ये स्वामी विवेकानंद कोलकत्याच्या बाहेर पडले.
ते प्रथम काशीस गेले. तिथे साधू-सज्जनांना भेटणे, साधना करणे, तीर्थक्षेत्र पाहणे झाले. त्यावेळी पंडित प्रमदादासांशी ओळख झाली. त्या संस्कृत पंडिताने स्वामीजींच्या शंकांचे निरसन केले. प्रमदादासांचा स्नेह स्वामीजींनी संपादन केला व नंतरच्या प्रवासातही पत्राद्वारे आपल्या शंकांचे निरसन करून घेण्याचा स्वामीजींचा प्रयत्न चालू राहिला.
नंतर हरिद्वारला जात असताना वाटेत १८८९ मध्ये स्वामीजी एकाकी प्रवास करून हाथरस या छोट्या लोहमार्ग स्थानकावर उतरले. एका बाकड्यावर बसले. भोवताली अंधार वाढत होता. पोटात भुकेची आग पेटली होती. कुठे जायचे ते माहीत नव्हते. इतक्यात कंदील हाती घेऊन शरच्चंद्र गुप्ता हे स्थानकाधिकारी स्वामीजींच्या समोर उभे राहिले. “आपण कोण? कोठून आलात? थकलेले दिसता,” त्यांनी चौकशी केली. स्वामीजींना आग्रह करून ते घरी घेऊन गेले. पुढचे काही दिवस स्वामीजी त्यांच्याकडेच राहिले. या तेजस्वी पुरुषाकडून आपले कल्याण होईल, अशा श्रद्धेने शरच्चंद्रांनी त्यांचा उपदेश मिळावा, असा प्रयत्न चालवला होता. स्वामीजी त्याला म्हणाले, “आपल्या कामाची सुरुवात म्हणून प्रथम वैराग्य अंगी बाणवायला हवे. जा झोळी घेऊन भिक्षा मागून आण.” स्वामीजींनी त्यांना स्थानकावरील हमाली करणाऱ्यांच्या घरून भिक्षा आणण्यास सांगितले आणि आलेल्या अन्नात दोघे वाटेकरी झाले। स्थानकप्रमुख सामान्य हमालांकडून भिक्षा घेऊन आला ही गोष्ट सामान्य नव्हती; त्यामुळे स्वामीजींनी त्याला दीक्षा दिली. नाव ठेवले सदानंद’ स्वार्मीजींना हा पहिला शिष्य मिळाला!
नोकरीचे त्यागपत्र देऊन ‘सदानंद’ स्वामींजींच्या पाठोपाठ निघाला. तो स्वामीजींच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. दोघेही हृषीकेश येथे जाऊन कठोर साधना करू लागले. सवय नसल्याने ‘सदानंद’ आजारी पडला. मग स्वामीजींनी प्रथम आपल्या या शिष्याची सेवा केली, त्याला घेऊन ते कोलकत्यात आले. त्यानंतर बडानगरमधील मुक्कामात वेद-उपनिषदादी ग्रंथांचे अध्ययन, रुढी-लोकाचार यांचा अर्थ लावणे, त्यांचा अभ्यास विचार संशोधन करणे चालू होते. त्यानंतर अधिक सखोल अभ्यासासाठी सदानंदाची बडानगरात व्यवस्था लावून पुन्हा स्वामीजींनी भ्रमंती सुरू केली. गाझीपूरला पव्हारी बाबा हे ज्येष्ठ साधू नदीकाठी एका गुहेत राहात होते. त्यांना स्वामीजी भेटले. स्वामीजींना पुन्हा निर्विकल्प समाधीचा ध्यास लागला होता. त्यासाठी पव्हारी बाबांना गुरू करण्याचा विचारही ते करत होते. त्या काळात कठोर साधना करीत असताना दोन स्वतंत्र विचारांचे धागे त्यांच्या मनात होते. आपल्या मातृभूमीची सेवा करावी, हिंदू धर्माचे स्वरूप उज्ज्वल करावे, हा एक विचार; तर कठोर तपश्चर्या करून निर्विकल्प समाधीचा अनुभव मिळवत परमेश्वराशी संपूर्ण एकरूप व्हावे हा दुसरा विचार । परंतु ‘तुला प्रथम खूप मोठे काम करायचे आहे. मग आपोआपच तू समाधिस्थितीत जाशील,’ असे रामकृष्णांनी स्वप्नात येऊन त्यांना सांगितले. समाधिप्राप्तीसाठी पव्हारी बाबांचा शिष्य होण्यापासून त्यांनी स्वामींजीना परावृत्त केले.
या सुमारास आपल्या बहिणीने आत्महत्या केल्याचे दुःखद वृत्त स्वामीजींना समजले. पण नुसता शोक करून न थांबता भारतीय स्त्रियांच्या दुरवस्थेने चिंतित झालेले स्वामीजी स्त्रियांच्या उन्नतीचा विचार गंभीरपणे करू लागले. त्यांच्या गुरुबंधूचे आजारपण, कौटुंबिक समस्या, प्रकृतीच्या तक्रारी इ. कारणाने स्वामीजींचे कोलकत्यास वारंवार जाणे चालू होते. या मायाजालातून बाहेर पडलेच पाहिजे हा विचार स्वामीजींच्या मनी दृढ होऊ लागला. मग आपल्या तीन गुरुबंधूसमवेत ते अल्मोरा, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, दंडी असा प्रवास करत श्रीनगरला गेले. तुरीयानंद योगायोगाने तेथेच होते. मग हे गुरुबंधू जवळजवळ महिनाभर तेथे माधुकरीवर उदरनिर्वाह करत राहिले. स्वामीजींनी त्यांच्या समवेत उपनिषदांचा अभ्यास चालू ठेवला.
नुकताच ख्रिश्चन झालेला एक शिक्षक स्वामीजींना भेटला. स्वामीजींनी त्याला हिंदू धर्माची महती पटवून दिली व परिणामी तो पुन्हा हिंदू झाला. स्वामीजींचे शिष्यत्व त्याने पत्करले. टेहरीत आजारी पडलेल्या अखंडानंदांना मीरत येथे डॉ. त्रैलोक्यनाथांकडे ठेवून बाकी गुरुबंधू हृषीकेश येथे गेले. खडतर साधना करण्याच्या विचारात असलेले स्वामी स्वतःच तेथे आजारी पडले. आसपास डॉक्टर नसल्याने स्वामीजींच्या आजारपणाने गुरुबंधू चिंतित झाले. कोणी एक वैदू योगायोगाने आला. त्याच्या गावठी जडीबुटीने स्वामींना बरे वाटले. मीरत येथील मुक्कामात बडानगरातील वातावरणाची अनुभूती सारे पुन्हा एकदा घेऊ लागले. कालिदासांचा अभ्यास येथे सर्वांनी स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली केला. विष्णुपुराणाचे वाचनही पूर्ण केले. विशेष हे की, अखंडानंदांच्या जिज्ञासेमुळे स्वामीजी वाचनाचे जे तंत्र वापरत असत; ते त्यांनी सर्वांना समजावून सांगितले. येथून निघताना मात्र स्वामीजींनी एकट्याने पुढे जाण्याचा निर्धार केला. अखंडानंदांची बरोबर येण्याची खूप इच्छा असूनही त्यांना नकार देऊन स्वामीजी एकटेच दिल्लीस गेले. दिल्ली पाहताना या प्राचीन राजधानीची इतिहासगाथा त्यांच्या मनात जागृत होत होती. अशा मनःस्थितीत स्वामीजींनी राजपुतान्याकडे प्रयाण केले.
१८९१ च्या फेब्रुवारीत स्वामी अलवारला आले. तेथे ते तेथील मान्यवरांशी चर्चा करत. तेथील एक मौलवी स्वामीजींशी कुराणावर चर्चा करायला येत. कुराणाबद्दलचे स्वामीजींचे ज्ञान पाहून त्या मौलवींना आनंद झाला. मग त्या मौलवींसह आणखी लोक यायला लागले. गर्दी बघून प्रवचने करावी लागली. अलवार संस्थानचे शंभूनाथ हे प्रसिद्ध पंडित होते. त्यांच्या निमंत्रणावरून स्वामीजी त्यांच्याकडे वास्तव्यास गेले. तेथे स्वामीजींना भेटण्यासाठी अनेक लोक येऊ लागले. त्यांच्यासाठी धर्मविषयक अनेक विषयांवर स्वामीजी अतिशय रसाळ प्रवचने करीत. या दरम्यान स्वामीजींची कीर्ती ऐकून संस्थानच्या दिवाणांनी – मेजर रामचंद्रांनी, त्यांना आपल्याकडे नेले. दिवाणजी स्वामीजींना मंगलसिंग महाराजांकडे घेऊन गेले. ते स्वामींना म्हणाले, “तुम्ही चांगले शिकले, सवरलेले दिसता. मग कामधाम करून उपजीविका का नाही चालवत?” स्वामीजींनी महाराजांना प्रतिप्रश्न केला. “आपण या संस्थानचे राजे. प्रजेकडे लक्ष देण्याऐवजी आपण लवाजमा घेऊन शिकारीत का वेळ दवडता?”
महाराज म्हणाले, “मला ते आवडते,”
“मग मला हे संन्यस्त जीवन आवडते” स्वामी उत्तरले. महाराज निरुत्तर झाले.
महाराजांना मूर्तिपूजा मान्य नव्हती. दरबारात मूर्तिपूजेमागचे तत्त्व स्वामीजींना विचारले असता स्वामीजी म्हणाले,
“दिवाणजी ! हे मोठे तैलचित्र कोणाचे?”
“आमच्या महाराजांचे.”
“ते हातात घ्या व त्यावर धुंका.” दिवाणजी व दरबारी मंडळी घाबरून गेली.
“स्वामीजी, हे काय आपण बोलता?” दिवाणजींनी प्रश्न केला.
“मी सांगतो ना ! धुंका त्यावर ! साधा कागद, रंग, काच यावर धुंकायला काय हरकत आहे? धुंका की !”
सारा दरबार आळीपाळीने स्वामीजींकडे व महाराजांकडे पाहू लागला. यावर हसून स्वामीजी म्हणाले,
“तुम्ही या साध्या कागदावर धुंकायला का घाबरता? पण मला माहिती आहे. तुम्ही हा नुसता कागद मानत नाही. तिथे तुम्हाला तुमचे महाराज – दिसतात. त्यामुळे त्या कागदावर थुंकणे तुम्हाला बरोबर वाटत नाही. त्यालाच मूर्तिमंत महाराज समजून तुम्ही त्याला हार घालता. त्याला नमस्कार करता, हिंदूधर्मात मूर्तिपूजा जी आहे ती यामुळेच.”
हे सारे बोलणे ऐकून ‘मूर्तिपूजा म्हणजे मूर्खपणा’, असे म्हणणे कसे चुकीचे आहे; हे महाराजांच्या ध्यानी आले. खूप वादविवाद करून जे कदाचित झाले नसते ते स्वामीजींनी कल्पकतेने साधले. महाराजांनी स्वामीजींना आपल्या राजवाड्यात निवासासाठी आमंत्रण दिले. त्यावर स्वामीजी म्हणाले, “मी येईन, पण एका अटीवर, राज्यातील कोणाही गोरगरिबास वाड्यात येण्यास प्रतिबंध ठेवू नये.”
राजांनी ते मान्य केल्यावर स्वामीजी थोडे दिवस राजवाड्यातही राहिले. तेथे येणाऱ्या सर्वांशी बोलताना समोरच्यांमधील स्फुल्लिंग जागृत करण्यात स्वामीजींचे दिवस जात होते. ‘संस्कृतच्या अध्ययनाबरोबरच पाश्चात्य विज्ञानाचा अभ्यास हवा. अभ्यास, परिश्रम यांच्या जोडीला विचारांचा अचूकपणा व रेखीवपणाही महत्त्वाचा आहे. आपला वैभवशाली इतिहास लोकांना योग्य प्रकारे सांगायला हवा.’ अशा विचारांनी स्वामीजींचे संभाषण भारलेले असे. यानंतर स्वामीजी खेत्रीच्या महाराजांकडे गेले. महाराजांच्या वाड्यात स्वामीजींबरोबर अनेक विषयांवर चर्चा चालत; त्यामुळे प्रभावित होऊन महाराजांनी स्वामींचे शिष्यत्व स्वीकारले. देशाच्या अभ्युदयात स्वामी काही महत्त्वाचे योगदान करतील, असे महाराजांना वाटत होते. नवीन विज्ञानाचे शोध हिंदूंच्या सृष्टी रचनाशास्त्रातील कल्पनांशी कसे जुळते मिळते आहेत, अशा चर्चा दोघांमध्ये चालत.
पोरबंदर म्हणजे सुदाम्याची नगरी. तेथील संस्थानाचे दिवाण श्री. शंकर पांडुरंग पंडित या मराठी माणसाकडे स्वामीजी राहिले. त्यांनी वेदांचा अनुवाद करण्याचे काम घेतले होते. त्या निमित्ताने स्वामीजींशी भरपूर वेदचर्चा होई. दोघेही एकमेकांपासून शिकत होते. जवळजवळ वर्षभराच्या वास्तव्यात पातंजल भाषाभ्यासही दोघांनी केला. मुंबईहून पुण्यास आगगाडीने येत असता लोकमान्य टिळकांशी स्वामीजींचा परिचय झाला. पुण्यातील विद्वान मंडळींसमोर स्वामीजींचे भाषणही झाले. पुढे कोल्हापुरात छत्रपतींना भेटून स्वामीजी बेळगावी गेले. हरिपाद मित्रांच्या घरी ते राहिले. पुढे म्हैसूरच्या महाराजांना स्वामीजींची वाणी ध्वनिमुद्रित करून घ्यावी, असे वाटले. ती तबकडी मात्र आज कुठे उपलब्ध नाही. बंगलोर, त्रिचूर, कोचीन, त्रावणकोर, मदुरा, रामेश्वर, त्रिवेंद्रम येथे लोकसंपर्क करून स्वामीजी कन्याकुमारीस पोचले.
कन्याकुमारीच्या त्या सुंदर मूर्तीपुढे स्वामींनी साष्टांग प्रणिपात केला. मातृभूमीच्या चरणांशी आपण पोचलो, याची स्वामीजींना जाणीव झाली. एकीकडे गंगासागर, दुसरीकडे सिंधुसागर आणि त्यांना साधणारा हिंदू महासागर अशा सागरत्रयींच्या संगमस्थानी स्वामीजी समोरच्या खडकावर पोहत गेले. भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी कुमारीने जेथे घोर तपश्चर्या केली होती तेच ते स्थान ! हे त्यांच्या भ्रमंतीचे अखेरचे ठिकाण ! दिशा दर्शन !
स्वामीजींनी तीन दिवस आणि तीन रात्री या त्रिसागरसंगमस्थानी ध्यानधारणा केली. आपल्या देशाचा भूतकाळ व भविष्यकाळ त्यांच्या नजरेसमोर आला. ‘एकेकाळी वैभवाच्या शिखरावर असलेला आपला देश आज अधःपतनाच्या खोल दरीत कसा काय फसला? हा देश पुन्हा वैभवाने, बुद्धिमत्तेने, नीतिसंपन्नतेने ठाम उभा राहायला हवा. त्यासाठी काय करायला हवे?’ या विचारांनी त्यांच्या मनात गर्दी केली. ‘आपल्या धर्माची महती, आपल्या धर्माने दिलेला अध्यात्माचा उदारमतवादी संदेश पश्चिमेकडील राष्ट्रांपर्यंत पोहोचवून आपली मातृभूमी पुन्हा एकदा देदीप्यमान झाल्याचे पाहण्यासाठी मी प्रयत्न करीन’ असा संकल्प त्यांनी या संगमावर केला. त्या क्षणी स्वामीजींमधील एका राष्ट्रद्रष्ट्याचा जन्म झाला.
अमेरिकेत जाऊन त्या भोगभूमीला वेदान्ताची ओळख करून देण्याचे महत्कार्य स्वामीजींसमोर स्पष्ट होत गेले. नंतर श्री शारदामातांनी या स्वामीजींच्या संकल्पास आपला आशीर्वाद दिला. सर्वसामान्य जनांनी पै-पैसा जमा करून निधी उभारला. त्यातून स्वामींनी शिकागोची ती सर्वधर्मपरिषद हिंदुत्वाचा जयघोष करून गाजवली.
सुमारे चार वर्षांची ही भारत परिक्रमा ! सहस्रावधी किलोमीटरचा हा प्रवास । या काळात स्वामीजी शेकडो किलोमीटर उपाशीतापाशी पायपीट करत गेले. प्रसंगी स्थानकावरील गलिच्छ अभ्यागत कक्षात तर प्रसंगी राजप्रासादातही ते राहिले, मौलवींकडेही त्यांनी जेवण केले. या परिक्रमेच्या दरम्यान स्वामीजींनी भारतीय समाजाचे जवळून दर्शन घेतले. वेद-पुराणे, संस्कृत काव्ये व नाटके यांचा अभ्यास त्यांनी केला. संस्कृत व्याकरणाचे ज्ञानही त्यांना शंकर पांडुरंग यांच्यासारख्या व्युत्पन्न पंडितांकडून संपादन करता आले. जिथे कोणी पुढच्या प्रवासासाठी त्यांना साहाय्य केले ते त्यांनी स्वीकारले नाही; तर मैलोन्मैल पायपीट करून, उपास काढत त्यांनी पुढचे ठिकाण गाठलेले दिसते. म्हैसूरच्या वा रामनंदच्या महाराजांनी देऊ केलेला निधी त्यांनी नाकारला तेही योग्यचः आपल्या अनुयायांची निवड करताना त्यांची पात्रता ठरविण्यासाठी त्यांनी योग्य अशा परीक्षेचा वापरही केलेला दिसतो. नाना प्रश्न विचारून अध्ययन विषयातील वा व्यवहारातील शंकांचे निरसन करून घेत स्वामीजींनी त्या काळात ज्ञान मिळवले. ज्ञानसंपन्न होण्याचे स्वामीजींचे कार्य त्यांना काशीच्या वास्तव्यात सफल झाल्याचे दिसते. यासाठी प्रेमदादास, शंकर पांडुरंग, पव्हारी बाबा अशांच्या चरणाशी बसून नवीन शिकण्याची नम्रता स्वामींनी कायम ठेवत्नी हे स्मरणीय आहे. ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, शास्त्रग्रंथ विवेचन, मनुजा चातुर्य येतसे फार’ या वचनातील काही स्वामीजींनी अनुभवले. सारे भेदाभेद पार करून समदृष्टीने सर्वांशी वागणे हे संन्यास शब्दात गृहीत आहे हे ज्ञान स्वामीजींना होतेच, पण प्रत्यक्ष व्यवहारात आपल्याकडून त्याप्रमाणे आचार झाला नाही अशा प्रसंगी त्यांनी स्वतःला सुधारण्याची काळजीही घेतली हे ध्यानात घ्यायला हवे.
कुणा व्यक्तीसाठी कार्य करू नका, विचारांसाठी कार्य करा’ – स्वामी विवेकानंद.
प्रबोधनाचे तुम्ही प्रवर्तक, हिंदुत्वाचे अहो उपासक । नवधमर्माचे तुम्ही प्रचोदक, मानव्याचे जणु पथदर्शक ।।
मार्ग आमुचा उजळो जगति, तेजोमय हे तुमचे जीवन । आता तुम्हा स्मरताना घडले, कर्तव्याचे समग्र दर्शन ।।
त्या तेजस्वी डोळ्यांमधली वीज अजुन सांगते । उत्तिष्ठत जाग्रत । बंधूंनो उत्तिष्ठत जाग्रत । ।।
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.